Nagesh S Shewalkar

Others

3.1  

Nagesh S Shewalkar

Others

विनाथांबा

विनाथांबा

6 mins
1.4K


सायंकाळचे पाच वाजता होते. घराण्याचे कुलदैवत खंडोबारायाचे दर्शन घेण्यासाठी मी जेजुरीला निघालो होतो. स्वारगेट बसस्थानकावर भरपूर गर्दी होती. जेजुरीला भरपूर गाड्या असूनही अर्धा - पाऊन तासापासून बस लागली नव्हती. इतर प्रवाशांप्रमाणे मी पण बसची वाट पाहत उभा राहिलो. काही वेळाने एकाच कुटुंबातील तीन जोडपी आणि दोन मुले अशा आठ व्यक्ती तिथे पोहोचल्या. प्रत्येक सदस्याच्या हातात एक-एक बॅग होती. त्या जत्थ्यात तीन पुरुष असतानाही सारा कारभार तरूण स्त्रीच्या हातात असल्याचे जाणवत होते. तिच्यासोबत तिचा पती, तिची दोन मुले, सासू - सासरे आणि तिचे आई वडील असा परिवार असल्याचे त्यांच्या चर्चेनुसार लक्षात येत होते. आपल्या परिवाराकडे बघत तिने विचारले,

"सगळे आलात ना? आपापला डाग सोबत आहे ना? थांबा. मलाच मोजून खात्री करून घ्यावी लागेल. नुसत्या माना हलवून चालणार नाही." असे म्हणत तिने प्रत्येक वस्तूला हात लावत,... 'एक.. दोन.. तीन..' अशी गणना सुरू केली. आठ डाग, दोन पिशव्या, तीन वॉटरबॅग सुरक्षित असल्याचे पाहून 'हुश्श' करीत कपाळावरचा घाम पुसत तिने इकडे तिकडे पाहिले. तिच्या दृष्टीने सुरक्षित माणूस बघत तिने मला विचारले,

" का हो भाऊ, जेजुरीला गाडी इथेच लागते ना?"

"अर्धा तास झाला तरी गाडी आली नाही."मी म्हणालो.

"का ss य? बापरे बाप! अर्ध्या तासापासून बस नाही? म्हणूनच एवढी गर्दी आहे. आता कसं होणार?" असे बडबडत ती हलकेच पतीकडे सरकत म्हणाली, "पाकीट चांगले ठेवलय ना? दहा हजार आहेत बरं. नीट चढा. बस लागली की, हौसे, गवसे सारेच गर्दी करतात. तुमच्या सारखा वेंधळा माणूस पाहून हात साफ करतात. सासूबाई, पोत सांभाळा बरे. बघा. केवढी गर्दी आहे.... "

तितक्यात 'स्वारगेट - गोंदवले' बस आली. बसला कितीही गर्दी असली तरी मुसंडी मारून बसमध्ये प्रथम चढण्याचा माझा विक्रम अबाधित होता. तो कायम राखण्यासाठी मी दरवाजा गाठला नि आत चढणार तितक्यात जणू तोफ कडाडावी तसा आवाज

माझ्या कानात शिरला,

" ओ भाऊ, थांबा की. दिसत नाही का, बाईमाणूस चढते ते. थोडा ही दम नाही. चढायची घाई..." असे म्हणत मासोळीने पाण्यात सुर मारावा तशी ती बाई मला मागे ढकलून पुढे जाऊन बसच्या पहिल्या पायरीवर दाराला पाय देऊन पहिलवानाच्या थाटात उभी राहिली. साऱ्या प्रवाशांना आव्हान देत म्हणाली,

" हे बघा, थांबा हं. कुणीही चढायची घाई करायची नाही. पहिल्यांदा माझी माणसं चढतील. या. सासुबाई, या. या हो, तुम्ही या...." असे करत तिने स्वतःचा सारा परिवार आत घेतला आणि विश्वचषक जिंकलेल्या कर्णधाराच्या तोऱ्यात ट्राॅफी घ्यावी तशी स्वतःची पर्स सांभाळत आसनावर बसताना तिने पुन्हा एकदा माणसांची आणि सामानाची मोजणी केली.

" आहेत. सारे डाग आहेत. अहो, आता कुठे जाऊ नका हं. तुम्हाला भारी सवय आहे, बाथरूमला जायची. तुमची वळवळ समजते मला. सासवड येईपर्यंत थोडी कळ काढा."

"आले का ग सामान?" सासुबाईने विचारले.

"सगळं व्यवस्थित आले. बाकी सासुबाई, तुम्ही कमाल केलीत हं. मागे एकदा रेल्वेने मुंबईला जाताना तुम्ही हातातील बॅग फलाटावर ठेवून रेल्वेत चढला. छोटीशी वस्तू तुम्हाला नीट सांभाळता आली नाही. माझे लक्ष होते म्हणून ती ह्यांना पाठवून आणून घेतली. आज बॅग न विसरता आणलीत पण गळ्यात पोत आहे का? आहे. आहे. दिसली. लगेच बाहेर काढू नका. अहो, झोपलात का लगेच? काय बाई, माणूस? बरोबर चढले नाहीत तर लागले घुरक्या ठोकायला! असा झोपाळू माणूस दुसरा नसेल. अहो.. अहो.. दचकू नका. मीच आहे. पाकीट आहे ना.... " त्या तरूणीची विनाथांबा बडबड चालू असताना आत आलेला वाहक म्हणाला,

" डायरेक्ट गोंदवले चढायचे हं. सासवाडवाले तर बिलकुल बसायचे नाही... "

" का नाही बसायचे? बस काय तुमच्या घरची आहे की न थांबायला सासवड तुमची सासरवाडी आहे? तुम्ही नोकर आहात महामंडळाचे."ती बाई तावातावाने म्हणत असताना वाहक म्हणाला,

"तुमचा तर नाही ना..."

"तुमचं मंडळ कुणाच्या पैशावर चालते हो... प्रवाशांच्याच ना? उद्या आम्ही महामंडळाच्या बसेसवर बहिष्कार टाकला तर काय होईल? एका दिवसात तुमचा तोरा उतरेल बरं... "

" ओ बाई, उतरा लवकर. "

" तुमची मस्ती अशी नाही उतरणार. अहो, जा आणि त्या कंट्रोलरला सांगा. महामंडळाला स्वतःची जहागिरी समजणाऱ्या या वाहकाची मस्ती उतरायला हवी. लवकर या. नाहीतर जाऊन बसाल बाथरूमला. थांबा. मीच जाते. कंडक्टर, मी येईपर्यंत गाडी हलली नाही पाहिजे. माझी सात माणसं आणि आठ डाग आहेत... " म्हणत ती बाई उठल्याचे पाहून वाहक म्हणाला,

" बसा. सोडतो.. "

" हांग अस्स! लकडीशिवाय मकडी वळत नाही. महामंडळ तुमच्यासारख्या नोकरांमुळे घाट्यात जातेय. शेवटची घटका मोजत आहे.... "

" माझ्या मावशी, थांबा ना जरा. घ्या तिकीटं "

" पास आहेत पास! चार दिवस पास काढून फिरतोय. दोन सासवडची तिकिटे द्या. ह्यांच्या वेंधळेपणामुळे माझ्या आई बाबांचा पास हरवल्याचा भुर्दंड सोसावा लागतो. "

" दोन सासवड आणि दोन हजाराची नोट? माझ्याकडे सुट्टे नाहीत. "

" नाहीत कसे? तुम्ही कंडक्टर ना? मग चिल्लर नाही ठेवायची? तिकीट देणे, चिल्लर देणे यासाठी महामंडळ तुम्हाला पोसतेय ना? नसतील तर उतरून आणा. समजता काय? "

" काहीही समजत नाही आजीबाई? "

" मी? मला आजी म्हणतोस? आजी असेल तुझी आई. आजी असल तुझी आजी, तुझी बहीण, तुझी आत्या.... अहो काका, जरा नीट उभे राहा की. किती खेटून उभे आहात? बघा थोडे, केस पांढरे होऊन टक्कल पडतय, तोंडाचं बोळकं झालय पण वागणं बघा, दिसली बाई की, दे खेटा...... " त्या बाईची टकळी ऐकून तो माणूस अर्धमेला होऊन बाजूला सरकला. पुण्यातील गर्दीमुळे जागोजागी अडथळे येत असल्याने बराच वेळ लागत होता. सारेच प्रवासी कंटाळून गेले होते. वाहकाने तिकीटे दिली आणि तो आसनावर येऊन बसला न बसला की ती बाई म्हणाली,

" पैसे वापस द्या. "

" बाई, चिल्लर नाहीत हो. सासवडला गेल्यावर बघू."

"उतरल्यावर काय बघू? उतरणारांची आणि चढणारांची एकच गर्दी शिवाय तुम्हाला डबल बेल मारण्याची भलतीच घाई. त्या धांदलीत आम्ही विसरून गेलो म्हणजे? तुमचे काय जाते?"

"बाई, हे बघा, गाडी आत्ताच निघालीय. गाडीचे कलेक्शन तर बघा साडेसातशे.... "

" जळली तुमची साडेसाती! खरे तर महामंडळाचा प्रवास म्हणजेच कायम साडेसाती! त्याच्या जोडीला तुमच्यासारखे राहू-केतू असले म्हणजे ना लागली वाट! "

" सासवडला दोघा - तिघांना मिळून पैसे देतो. "

"वा रे वा! ही आणखी एक शक्कल. पैसे आमचे, भांडण आमच्यात लावून तुम्ही नामानिराळे! रक्कम काही कमी नाही. एखादा चिल्लर आणण्यासाठी गेला आणि झाला पसार तर का तुमच्या नावाने आंघोळ करायची की त्याच्या नावाने शिमगा करावा? ते काहीच चालणार नाही. मी तुम्हाला दोन हजाराची गुलाबी - गुलाबी नोट दिली आहे. तुम्हीच बाकीचे पैसे परत करा.... " ती बाई बोलत असताना चालकाने बसमधील दिवे बंद केले. त्यामुळे बाईंच्या रागाचा भडका उडाला. ती म्हणाली,

" केले दिवे बंद. अंधाराच्या साम्राज्यात आंबटशौकिन, चोरटय़ांची मज्जा. "

" अहो, आतले दिवे बंद केले म्हणजे हेडलाइटला फोर्स मिळतो.... "

" त्यासाठी गाडीत अंधार? तसा नियम आहे का? बॅटरी फुल्ल चार्ज करा ना, नाही तर दोन बॅटऱ्या लावा. महामंडळाला का भीक लागलेय?.."

"काय पीडा आहे बाबा, कदम, लाइट टाक रे बाबा..."

म्हणत वाहकाने डबल बेल दिली. तसे गाडीतले लाइट लागले.

" आई- बाबा झोपू नका. जागे आहात ना? बाबा, तुम्ही एकदा झोपले ना मग काही खरे नाही. कानात लाउडस्पीकर लावला तरीही तुम्हाला जाग येत नाही. अहो, तुम्हीही झोपलात का? ऊठा. ए कार्टे, झोपू नको. काय सांगाव बाई, कशी झोप लागते ते कळत नाही...." असे म्हणत बाईने स्वतः कडक जांभई दिली.......

गाडीने सासवड बसस्थानकात प्रवेश केला. बऱ्याच वेळेपासून बस नव्हती. त्यामुळे तिथे खूप गर्दी होती.

" चला. सासवड उतरा. लवकर उतरा. "

" उतरतोय ना. कशाला उगाच ओरडता? ऊठा. अहो, झोपलात का? सासवड आले. मामंजी, चला. सासुबाई, जाग्याच आहात ना. ऊठा बरे. आपापले सामान घ्या..." म्हणत ती बाई दारापाशी गेली आणि वाहकाला म्हणाली,

"कंडक्टर, आता तरी चिल्लर देता ना?"

"अरे, हो. तुम्ही गुलाबी नोट दिलीय ना?"

" मग काय हिरवी नोट दिली का? दोन हजाराची करकरीत नोट दिलीय. विसरलात? माझ्या लक्षात आहे म्हणून बरे, नाहीतर चांगलाच चूना लावत होते की. द्या पटकन. अहो, थांबा म्हणतेय हं. उतरू द्या. मोजून आठ माणसं आहेत.. सहा फुल दोन हाफ! चढण्याची घाई करू नका. एकेकाला उतरू द्या. माणूस - बाई काहीही पाहायचे नाही. चढायची नुसती घाई. तरूण तर तरूण, म्हातारे तर त्यांच्याही दोन पावलं पुढे. उतरले का सगळे? कंडक्टर, बेल मारायची नाही. तुम्ही दिलेले पैसे मोजतेय. हां बरोबर. आत्ता माणसं आणि डाग मोजतेय. ...."म्हणत त्या बाईने सारी माणसे ओळीने उभी केली. प्रत्येकाला आपापला डाग हातात घ्यायला लावला. दोन दोन वेळा सारे मोजून होताच वाहतूक पोलीसाने वाहनांना जाण्याचा इशारा करावा तसा त्या बाईने हाताने 'चले जाव' असा इशारा केला......


Rate this content
Log in