Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Nagesh S Shewalkar

Others


5.0  

Nagesh S Shewalkar

Others


वायसा प्राण तळमळला.

वायसा प्राण तळमळला.

8 mins 1.7K 8 mins 1.7K

•• वायसा प्राण तळमळला ••

उमेश हातमारे त्याच्या गावापासून खूप दूर असलेल्या नोकरीच्या गावी राहत होता. त्यादिवशी रविवारची सुट्टी होती. गाव दूर असल्याने आणि परिस्थिती बेताची असल्यामुळे प्रत्येक रविवारी उमेशला घरी जाता येत नसे. गावी त्याची आई, शिकणारे दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुली अशी सारी खाणारी तोंडे होती.कमावता एकटा उमेश होता. त्या गावी बदली होऊन तीन महिने झाले होते. त्यामुळे त्याच्या विशेष अशा ओळखी नव्हत्या. त्या गावी गोदावरी नदी असल्याने गावाला विशेष महत्व प्राप्त झाले होते. पंचक्रोशीतील लोक दशक्रिया विधी करण्यासाठी त्या गावी येत असत. गाव फारसं मोठं नसलं तरीही बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे ते गजबजलेले असे. दशक्रिया या शिवायही लोक विविध कारणांमुळे गंगास्नानासाठी येत असत. पोर्णिमा, अमावस्या या दिवशी भरपूर गर्दी होत असे. कुणी संतती व्हावी म्हणून, कुणी बाहेरबाधा,भुताटकी, अचानक उद्भवलेले आजार कमी होऊन सुख समृध्दी, धनारोग्य लाभावे म्हणून लोक गंगास्नान आणि गंगापूजन करण्यासाठी त्या गावी येत असत.

त्यादिवशी उमेशने दुपारचे जेवण केले. घरासमोर दोन-चार चकरा मारल्या. पुन्हा खोलीत येऊन गादीवर कलंडला. परंतु रोज दुपारी झोपायची सवय नसल्यामुळे झोप लागत नव्हती. सकाळी आलेल्या एकुलत्या एक वर्तमानपत्राचे त्याने अजून एक पारायण केले. त्याच-त्याच बातम्यांचे रवंथ केले. आणि अचानक त्याला काही तरी आठवले. तो झटकन उठला. खोलीला कुलूप लावून गंगातीरी निघाला. सुट्टीच्या दिवशी करमत नसले की, तो वेळ घालवण्यासाठी गंगेच्या काठी जाऊन बसत असे. उमेश गंगेच्या घाटावर पोहोचला. तिथे फारशी गर्दी नव्हती. हिवाळ्याची दुपार, वातावरणात आधीच थंडावा होता. साहजिकच अंगात हुडहुडी भरत होती. सूर्य किरणांमुळे थोडासा दिलासा मिळत होता. उमेशने समोर बघितले. गोदावरीच्या पात्रात पाणी भरपूर होते. गावातील बायका धुणे धुत होत्या. नेहमीप्रमाणे त्यांच्या गप्पांचा फड रंगला होता. हसण्याच्या लाटांवर लाटा आदळत होत्या. काही क्षणात उमेशच्या कानावर उसासे आणि कुजबूज पडली. त्या आवाजाच्या दिशेने उमेशने बघितले. दोन-चार मुले नदीकडे पाहून कुजबूजत होते. त्यांचे चेहरे गोरेमोरे झाले होते. चेहऱ्यावर लालसर छटाही पसरली होती. ती मुलं ज्या दिशेने पाहात होती, तिकडे उमेशने बघितले. विवाहित असूनही समोरील दृश्य पाहून उमेश भान हरपला. नदीत एक तरुणी स्नान करीत होती. शारीरिक सौंदर्यात ती कमालीची श्रीमंत होती. ती विवस्त्र नसली तरीही तिच्या अंगावरील वस्त्रं तिचे सौंदर्य लपवून ठेवण्यापेक्षा ते उजागर करताना धन्यता मानत होते.....

"काय राव, कोण्या गावचे?" शेजारी बसलेल्या इसमाने विचारताच भानावर आलेल्या उमेशने विचारले, "मी?"

"घ्या आता. इथं दुसरं कुणी आहे का? काय नाव तुमचं?"

"उमेश हातमारे..."

"हातमारे? पहिल्यादाच ऐकतोय. काय बिमारी आहे?"

"बिमारी आणि मला?" उमेशने आश्चर्याने विचारले. "गंगास्नानासाठी आलात ना? स्नानासाठी येणारास काही ना काही त्रास असतो. भानामती, करणी अशा आजारांपासून मुक्ती मिळावी म्हणून लोक इथे येतात, गंगेत डुबकी मारून जो काही आजार असेल तो पळवून लावतात." तो इसम म्हणाला.

"नाही. मला काहीही आजार नाही. मी इथे नोकरीला आहे..." उमेश सांगत असताना त्याला कावळ्यांची कावकाव ऐकू आली. दोघांनीही त्या दिशेने पाहिले. दशक्रिया चालू असलेल्या घाटावर कावळ्यांची गर्दी झाली होती. परंतु ते सारे दशक्रियेच्या जागेपासून चार हाताचे अंतर राखून कावकावत होते. काही क्षणात अचानक ते सारे उडाले आणि शेजारच्या झाडीत गडप झाले.

"पिंडाला कावळा शिवला नाही." तो माणूस म्हणाला.

"काय झाले? हा काय प्रकार आहे?" उमेशने विचारले.

"तुम्हाला माहिती नाही? अहो, मेलेल्या माणसाची दशक्रिया गंगेच्या ठिकाणी करतात. मृत इसमाची एखादी अतृप्त इच्छा असल्यास ती तृप्त करण्यासाठी म्हणून हा विधी करतात. पिंडदान करतात. त्या पिंडाला कावळा शिवला तर इच्छा पूर्ण झाली असे समजतात. मला सांगा, मयत व्यक्ती का इथे येणार आहे का? नाही ना? म्हणून मग कावळ्याला पाचारण करतात. पिंडाला कावळ्याने स्पर्श केला तरी पिंड पितराला पावला, मयताची काहीही इच्छा नाही असे..."

"आणि कावळा पिंडाला शिवलाच नाही तर ?"

"तर मग मृताची इच्छा शोधून ती पूर्ण करायची."

"मी नाही समजलो." उमेश म्हणाला.

"चला तिकडे..." असे म्हणून तो उठला. उमेशही उठला आणि त्याच्या पाठोपाठ निघाला. तो इसम म्हणाला,

"माझा बाप मेला तेव्हा याच घाटावर आम्ही त्याचा दहावा केला. पिंड ठेवला. कावळा जवळ यायचा पण पिंडाला चोच लावायचा नाही. खूप प्रयत्न केले पण कावळे दाद देत नव्हते. आमचा बारका भाऊ बेरकी, तो पिंडाजवळ जाऊन हात जोडून म्हणाला, बापू, तुमचा जीव तुम्ही ठेवलेल्या बाईमध्ये गुंतलाय. काळजी करू नका. आम्ही तिला अंतर देणार नाही... भावाची प्रार्थना पूर्ण व्हायच्या आधीच एक नाही, दोन नाही तर चक्क पाच-पंचवीस कावळ्यांनी त्या पिंडावर झडप घातली..." बोलता बोलता ते दोघे दशक्रिया चालू असलेल्या ठिकाणी पोहोचले. तिथे आधीच बरेचसे बघे बसले होते. त्यांच्यापासून अंतर राखून दोघेही तिथे बसले. पूजा सांगणारे गृहस्थ म्हणत होते,

"आठवा बरे, मयताची कोणती इच्छा अपूर्ण आहे का ते."

"काही आठवत नाही हो." मयताचा मुलगा म्हणाला.

"त्यांची खाण्यापिण्याची म्हणा इतर कोणती...." विधी करणारी व्यक्ती बोलत असताना तो माणूस हळूच उमेशला म्हणाला,

"हा मेलेला माणूस की नाही, फार बिलंदर, गुंडा होता. अडल्या-नडल्यांची कामे करायचा परंतु त्यांच्याकडून रक्कम मिळायला उशीर झाला की, मग कर्जदारांच्या घरात शिरुन बायकांची अब्रू लुटत असे...."

तिकडे कावळे कावकाव करत पुन्हा पिंडाजवळ आलेले पाहून सर्वांच्या मनात आशेचा दीप तेवला परंतु कावळ्यांनी लगेच उडाण भरलेली पाहून सारे हताश झाले.

"आठवा. त्यांना काय आवडायचे?"

"हां. त्यांना ना पेढे, भजे, गुलाबजाम..."

"जा. जा. लवकर घेऊन या..." पुजेकरीबुवा म्हणाले आणि कुणीतरी शेजारच्या हॉटेलमध्ये धावत गेले.

"तुम्हाला सांगतो, हे मेलेलं म्हातारं असं मानायचं नाही. याची इच्छा ही मंडळी पुरवूच शकणार नाहीत." तो इसम म्हणाला.

"अहो, तुम्हाला माहिती आहे ना, मग सांगा ना जाऊन." उमेश म्हणाला.

"नको रे बाबा..."

"घ्या. पेढे घ्या. ही गरमागरम भजी आणि हे गुलाबजाम घ्या. परंतु आम्हाला मुक्ती द्या. असा आमचा अंत नका पाहू. लवकर मोकळे करा ..." असे म्हणत एका व्यक्तीने पाचशे रुपये पिंडाजवळ ठेवले.काही कावळे पिंडाजवळ आले.सारे आशाळभूत नजरेने कावळ्यांकडे बघत होते. कावळे पिंडाकडे पाहात होते. दुसऱ्याच क्षणी कावळ्यांनी एकमेकांकडे पाहिले. जणू ते एकमेकांशी संवाद साधत होते परंतु लगेच सारे कावळे उडून गेले....

"असे करा. घरी जाऊन घरच्या बायकांना विचारुन या.त्यांना निश्चितच काही तरी माहिती असणार." पूजा सांगणारी व्यक्ती म्हणाली.

"तुम्हाला सांगतो,माझा मामा मेला तेव्हा त्याच्या मुली लग्नाच्या होत्या.माझ्या दुसऱ्या मामाने त्याचा सारा विधी केला. हर प्रकारे प्रयत्न झाले परंतु कावळा शिवत नव्हता. शेवटी विधी करणारा मामा म्हणाला की, दादा, तुझा जीव तुझ्या मुलींमध्ये गुंतलाय. घाबरू नको . तुझ्या मुलींना मी चांगले सासर पाहून देईन. तुम्हाला सांगतो, दुसऱ्या क्षणी कावळ्यांनी पिंड फस्त केला बघा. "

"अजब आहे बुवा सारे." उमेश म्हणाला.

"एक सांगू का, कावळा शिवणे, न शिवणे हे सारे जो कुणी पूजा सांगतो ना त्याच्या हातात असते.."

"ते कसे? तुम्हीच तर म्हणालात ना की, मयताची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय कावळा शिवत नाही."

"ते बरोबर आहे. पण एखादेवेळी कावळा शिवलाच नाही, पिंडासमोर नाक घासून, फळफळावळ, वस्त्र, दक्षिणा ठेवून यजमानांच्या नाकी नऊ आले की, विधी सांगणारा स्वतःचा तिसरा डोळा उघडतो. कसे ते सांगतो. दशक्रिया करणारी मंडळी ठराविक असतात. जस सेशन कोर्टात, हाय कोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात ठराविक वकील असतात ना तसे! अशा आणीबाणीच्या वेळी ही पूजा सांगणारी मंडळी एक खास मंत्र म्हणतात आणि दुसऱ्याच क्षणी कावळा शिवतो..."

तितक्यात घरी गेलेला माणूस परत आला आणि म्हणाला,

"लहानी बहीण म्हणाली की, बाबा तिला पाटल्या करून देणार होते. आत्याचे म्हणणे आहे की, तिला दक्षिण भारतातील देवस्थाने दाखवणार होते. आमची एक आत्या विधवा आहे. तिला म्हणे बाबांनी आश्वासन दिले होते की, तिला आमचा एक वाडा, तीन एकर शेती देतो."

"घासा नाक आणि हे सारे पूर्ण करण्याचे वचन द्या..." विधी सांगणारी व्यक्ती म्हणाली. त्याप्रमाणे पूजा करणाऱ्या मुलाने सारे कबूल केले परंतु एकही कावळा फिरकलासुद्धा नाही. तसे समोरचे सारे पदार्थ बाजूला विधी करणारा इसम म्हणाला,

"छे! असा हटवादी आजपर्यंत कधीच भेटला नाही..."

"आणि असा मालही भेटला नसेल.." कुणीतरी म्हणाले आणि पिकलेल्या खसखशीत उमेशने विचारले,

"असे का म्हणाला तो?"

"अहो, पिंडासमोर ठेवलेले अन्नपदार्थ सोडून फळे, कपडे, पैसे आणि ठरलेली दक्षिणा कुणाची असते तर पूजा सांगणाराची..." तो माणूस समजावून सांगत असताना उमेशला अचानक आठवले की, असे प्रकार त्याच्या गावाकडेही आहेत. तो लहान असताना त्याचे चुलते वारले तेव्हांची गोष्ट त्याला आठवली. चुलत्याचा दहाव्याचा विधी करायला त्याचे बाबा निघाले त्यावेळी कुणीतरी म्हणाले की, बाबा रे, त्याचा जीव पोरीमध्ये अडकला असणार. कावळा घासाला शिवला नाहीतर मुलींना चांगले वागवीन, शिकवून, चांगले ठिकाण पाहून लग्न लावून देईन असे कबूल कर. पण झाले उलटेच. उमेशचे बाबा योग्य जागेवर पिंड ठेवायला निघाले असताना कावळ्यांनी अर्ध्या रस्त्यातच झडप मारून पिंड पळवला.....

तिकडे पूजा सांगणारी व्यक्ती म्हणाली,"पहा. आठवा. त्यांची एखादी यात्रा...काशी,गया..."

"अशाला कशाला गया आणि काशी? कोण्या गयाबाईकडे किंवा काशीबाईकडे जायची इच्छा..." एक जण बोलत असताना दुसरा मध्येच म्हणाला,

"अहो, मरायच्या आधी दारु, कोंबडा...."

"राम...राम ! अहो, हे सारे वर्ज्य आहे हो."

"ते जाऊ द्या पण आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा."

"ते का माझ्या हातात आहे? पण आता कोणतातरी सुरक्षित रस्ता शोधणे आवश्यक आहे. असे करा, एका बाटलीची आणि कोंबड्याची किंमत समोर ठेवा....." पूजा सांगणारा इसम म्हणाला. त्याप्रमाणे हटलेल्या बापाला मुक्ती मिळावी म्हणून कंटाळलेल्या मुलाने पाचशेच्या दोन नोटा समोर ठेवताच पूजा सांगणारा माणूस म्हणाला,

"घ्या. हे सारे स्वीकारा. जीवाची चैन करा. या पोरांना मोकळं करा. माना एकदाचे. हे एकाक्षा, हे वायसा पदरात घे..."

काही क्षणात जणू ठरल्याप्रमाणे कावकाव करत कावळे पिंडाभोवती जमले. जणू कावळ्यांची गोलमेज परिषद भरली होती. कावळ्यांनी पिंडाचे, समोर ठेवलेल्या नोटांचे निरीक्षण केले. त्यांच्या पैकी एक जण, कदाचित तो त्यांचा नेता असावा, त्याने पंखांची फडफड केली आणि वाटाघाटी फिसकटलेल्या, अंगाची लाहीलाही झालेल्या कामगारांच्या शिष्टमंडळाने परतावे तसा तो कावळ्यांचा थवा परतला...

"अहो, आठवा लवकर. अजून दोन दशक्रिया आहेत. ती माणसंही खोळंबली आहेत..." ती व्यक्ती बोलत असताना गर्दीतून कुणीतरी म्हणाले,

"आता एकच राहिले बुवा. मयताने कर्ज दिलेल्या घरातील स्त्री त्याच्या मिठीत यायची राहिली असेल तर तिला..."

तिकडे दुर्लक्ष करून पूजा सांगणारा माणूस म्हणाला, "छे! काय बुवा हा प्रसंग? बरे, अर्धवटही सोडता येत नाही..."

"नाही. असा विचार करु नका. तुम्ही अर्धवट सोडले तर आमच्या साऱ्या पिढ्या नरकात जातील.काही तरी मार्ग काढा."

"ठीक आहे. यांना शांती मिळावी म्हणून मी उद्या...." ती व्यक्ती बोलत असताना एक खणखणीत आवाज आला,

"काय झाले रे? कावळा शिवतो का नाही?" सर्वांनीच आवाजाच्या दिशेने पाहिले.साठी ओलांडलेली एक गलेलठ्ठ स्त्री घाटाच्या पायऱ्या चढून वर येत होती. तिला पाहून मुलगा म्हणाला,

"आई, बरे झाले तू आलीस ते. बाबांची एखादी इच्छा पूर्ण झाली नसेल तर सांग ना. सारे प्रयत्न झाले. आवडी-निवडीच्या साऱ्या वस्तू देऊन झाल्या. चार तासापासून आम्ही असे बसून आहोत, कावळा काही शिवायला तयार नाही..."

"अस्स आहे का? ...." असे विचारत ती स्त्री पिंडाजवळ पोहोचून पिंडाकडे बघत म्हणाली," का हो,काय अवदसा आठवली? जिवंतपणी तर यातना दिल्या आता मेल्यावर तरी सुख द्या...." असे म्हणत तिने झाडावर बसलेल्या कावळ्यांकडे बघितलं. तिथले सारे कावळे भुर्रकन उडून गेल्याचे पाहून ती पुढे म्हणाली,"बरे! असे आहे तर ! गाडी गोडीने वळणावर येणार नाही तर. वाटले होते, नरकात गेल्यावर तरी वाकडे शेपूट सरळ होईल पण..." असे म्हणत तिने लुगड्याच्या पदरात दडवलेले लाटणे काढले. ते पाहून जमलेल्या लोकांनी आश्चर्याने 'आ' वासला. बाई पुढे म्हणाली,

"आता गुमान खाता की कसं...." लगोलग बाईने पिंडाकडे पाहून लाटणे उगारले आणि आश्चर्य घडले. बाईंनी उगारलेला हात खाली येईपर्यंत झाडावरचे कावळे त्या पिंडावर तुटून पडले.....


Rate this content
Log in