STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Children Stories Tragedy Thriller

4  

Kavita Sachin Rohane

Children Stories Tragedy Thriller

ती रात्र

ती रात्र

3 mins
3

*ती रात्र*
        आजची ही कथा एका अशा कुटुंबाची आहे, ज्यांनी वेळेचे भान ठेवून एकमेकांमध्ये असलेले मतभेद विसरून, प्रसंगावधान ठेवून एकमेकांची मदत केली. 
दोन भावांचं एक कुटुंब होतं. वडिलोपार्जित घरात दोघे राहत होते. काही मतभेद असल्यामुळे त्यांनी घराच विभाजन केलं आणि वेगवेगळे राहू लागले.
मोठ्या भावाला दोन मुले होती व लहान भावाला एक मुलगा व मुलगी आणि त्या मुलांना आजी सुद्धा होती. ती लहान मुलासोबत राहत होती. तसं कुटुंब हे मध्यमवर्गीय होतं. सुखी होतं गरजेपुरत सर्व काही त्यांच्याजवळ होतं.फक्त एक समस्या होती ती म्हणजे लहान भावाच्या मुलाला रात्री झोपेत चालण्याची सवय होती. त्यांची ही समस्या जरा गंभीरच होती त्यामुळे, सगळेच चिंतेत असायचे. त्याच्यासाठी त्यांना व्यवस्थित नियोजन करावे लागत होतं.
     त्यांच्या आजोबांना सुद्धा हा रोग होता .त्यामुळे अनुवंशिकपणे तो मुलांमध्ये आला असावा असं समजलं जात होतं. अशा परिस्थितीत त्या मुलाला व्यवस्थित ठेवणे व त्याची काळजी घेणे हे एक मोठं कार्य घरातल्यांना वाटत होतं. तो कधी झोपेतून उठून अंथरुणातच बसत होता. तर कधी घरातच फिरायचा. चालताना त्याचे डोळे उघडे राहायचे पण तो काय करतोय, कुठे चाललाय हे त्याला काहीच कळत नव्हते. त्यामुळे घरातल्या व्यक्तींना दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद कराव्या लागत होत्या. तसेच जमिनीवर कुठल्याही प्रकारच्या धारदार वस्तू ठेवता येत नव्हत्या. जवळपास वयाच्या अकराव्या वर्षापासून त्याला हा त्रास होतो. डॉक्टरांनी औषध- उपाय सांगितले होते त्याप्रमाणे घरातील लोक त्याची काळजी घेत होतेच. पण म्हणतात ना, जे व्हायचं असतं ते कधी टळत नाही. तसंच काहीस या मुलासोबत झालं.त्या दिवशी नेहमीप्रमाणे सर्वांनी रात्रीच जेवण घेतलं आणि थोडा वेळ गप्पगोष्टी करून आपापल्या खोलीत झोपायला गेली .सर्वजण झोपी गेली पण मुलांच्या आईकडून एक चूक झाली. तिने कामाच्या व्यापात घराच्या मुख्य दराला कुलूप लावलेच नाही. मग काय, नेहमीप्रमाणे तो मुलगा रात्री झोपेतून उठला आणि त्या दिवशी तो नुसता अंथरुणात उठून बसला नाही तर तो चालत चालत घराच्या मुख्य दाराकडे गेला. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी सगळ्यांनाच चांगली झोप लागली होती त्यामुळे कुणाचेही त्याच्याकडे लक्ष राहिले नाही. 
     मुलगा दाराची कडी उघडून बाहेर पडला वडिलांनी दाराची कडी लावली होती.आई सर्वात शेवटी कुलूप दाराला लावून झोपते त्यामुळे वडिलांनी कुलूप लावण्याची तजदी घेतली नव्हती.मग काय ?
तो घराच्या बाहेर पडला आणि चालू लागला, त्याला काय कळणार पुढे आणि मागे काय आहे. तो घराच्या बाहेर पडला, इकडे त्याच्या आजीला अचानक जाग आली तिने मुलाच्या बिछान्याकडे बघितले तर तो तिथे नव्हता. ती घाबरली, तिने घरातल्या सर्वांना झोपेतून उठवले .त्या मुलाची आई स्वतःलाच दोष देत बसली .घरात सगळा आरडा- ओरडा सुरू झाला. त्यामुळे त्याच्या काकाच्या घरची सुद्धा जागी झाली. मतभेद जरी असले तरी अशावेळी भावाची साथ द्यायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं म्हणून ते सर्वजण त्या मुलाच्या घरी गेली आणि काय झालं विचारून, काय करायचं ठरवू लागली. मोठ्याकडे चार चाकी गाडी होती त्यामुळे, त्यांनी लगेच गाडी काढली आणि त्या काळोखात दोघेही निघाले. मनात काळजी, भीती दोन्ही होतं पण एकमेकाची साथ देत दोघेही त्याचा काटेकोरपणे शोध घेत होते. रात्र असल्यामुळे रस्त्यावर कुत्र्यांशिवाय कुणीही दिसत नव्हतं. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर त्यांना तो मुलगा दिसला. रस्ता सरळ असल्यामुळे तो चालत सुटला होता .त्याला बघताच त्यांनी गाडी थांबवली आणि त्याला गाडीत बसविले. देवच त्या दिवशी पावला म्हणावं अशी त्यांची अवस्था झाली होती. त्याचं भाग्य की मुलाला काहीच दुखापत झाली नव्हती. म्हणतात ना, "देव तारी त्याला कोण मारी" असच कदाचित झालं असेल. मुलगा दिसल्यावर वडील आणि मोठे काका दोघेही आनंदी झाले. दोघांचाही जीव भांड्यात पडला. त्यांनी त्या मुलाला घरी आणलं. घरचे त्याला पाहून आनंदी झाले.त्या एका घटनेमुळे त्याचं कुटुंब एकत्र आलं आणि यापुढे त्या मुलाच्या बाबतीत खबरदारी घ्यायची हे त्यांच्या लक्षात कायमचं राहिल. 
✍️ **कविता रोहणे* 
सातारा महाराष्ट्र*


Rate this content
Log in