Nurjahan Shaikh

Children Stories Inspirational Others

4  

Nurjahan Shaikh

Children Stories Inspirational Others

सत्याची शिकवण

सत्याची शिकवण

5 mins
474


   "श्रुती, तू आज येणार आहे की नाही ? आम्ही तिघी अभ्यासाला नूरच्या घरी जाणार आहोत." निशा आणि नुतन श्रुती ला खडसावून विचारत होत्या, पण श्रुतीचा सुर काही बदलत नव्हता. तिला आज कुठेही जायचे नव्हते. तिचा आज अभ्यास करण्याचा मूड देखील नव्हता.

     तेवढ्यात नूरने त्यांना सुचवले," चला, मग आज आपण ग्रंथालयात जाऊया आणि मस्तपैकी पुस्तके वाचत बसूया, आज अभ्यासाला दांडी.... आज थोडासा ब्रेक घेऊया आणि छान पैकी पुस्तके वाचत बसुया. यावर निशा नूतन लगेच तयार झाल्या. श्रुतीला ही कसेतरी खेचत ग्रंथालयात नेले, परंतु श्रुती जरा नाराजच दिसत होती. याचे कारण काही समजत नव्हते. चौघी ग्रंथालयात पोहोचल्या. आपापले कार्ड ग्रंथपाल बाईंना दाखवून पुस्तके शोधण्यासाठी आत वळल्या. श्रुती मात्र बेंचवर बसून एकटीच विचार करत बसली होती. 

     आज लायब्ररीत महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम होता. आम्ही तिघी देखील धावत प्रतिमा पूजन करण्यासाठी तिकडे गेलो. त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे कोट्स आणि विचार वाचत तिथेच उभे राहिलो. आज विशेष कार्यक्रम असल्याने गांधीवादी विचार, गांधीजींचे आत्मचरित्र, आत्मकथा, सच्ची कहानी यावरचे पुस्तक हे वरतीच काढून ठेवले होते. जो तो हेच पुस्तके घेऊन वाचत होता. आम्ही तिघींनी पण ठरविले एक पुस्तक घ्यायचे व वाचायचे. तिघींनी एकेक पुस्तक उचलले व श्रुती जवळ जाऊन बसलो. श्रुती मात्र अजुनही शांत बसली होती. ती आमच्याशी देखील बोलत नव्हती. आम्हा तिघांना जरा संशय आला. काय कारण असेल बर, समजायला काही मार्ग नव्हते. शेवटी नूतन ने एक पुस्तक आणून श्रुतीच्या हातात दिले आणि म्हटले, "हे बघ श्रुती, मनात विचारांच्या वादळांना शांत करायचे असेल, तर मनाला कशात तरी गुंतव, आज गांधी जयंती आहे आणि मी आवर्जून तुला सांगते, तुझे दुःख तुला आमच्याबरोबर वाटायचे नसेल तर हे पुस्तक वाच. यातून तुला काही उपाय सापडतो का बघ." 

       ते पुस्तक देत नूतन आपल्या जाग्यावर जाऊन बसली. श्रुतीने हळूच एक पान उलटले त्यावर लिहिले होते 'महात्मा गांधीजी की सच्ची कहानीया' हळूहळू ती पाने उलटत गेली आणि ते पुस्तक वाचण्यात गर्क झाली. जवळपास तिने सर्व पुस्तक वाचून काढले. आम्ही देखील आमची पुस्तके वाचत बसलो होतो. तिने एकदम आम्हा तिघींना हाक मारली आणि खुणवले, "जरा बाहेरच्या कट्ट्यावर बसूया" श्रुतीत झालेला बदल आम्ही लगेच ओळखला आणि पुस्तके जमा करून बाहेर कट्ट्यावर गेलो. श्रुती एकटीच झाडा जवळ उभी होती. आम्ही तिघी तिच्या जवळ गेलो आणि काय झाले म्हणून विचारलं. ती पुढे आली आणि अचानक रडू लागली. तिने सांगितले, "परवा आपण फन म्हणून केलेल्या पार्टीसाठी मी पप्पांच्या पाकिटातून पैसे चोरले होते. त्या पैशाबद्दल कोणालाच काही सांगितले नाही. काल दिवसभर पप्पा पैसे शोधत होते. मम्मीला देखील खूप रागावले. ते पैसे त्यांनी घराचा हप्ता भरण्यासाठी ठेवले होते. आज हप्ता नाही भरला तर दंड भरावा लागेल म्हणून पप्पा सगळ्यांना रागवत होते, पण माझी त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमत झाली नाही. ते मला रागवतील म्हणून घाबरून मी काहीच बोलले नाही. पप्पा आईला,घरकाम करणाऱ्या मावशींना, येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्येकाला रागवत होते. मी पार घाबरून गेले मला खरं सांगायची भीती वाटत आहे." मग नूतन पुढे येऊन म्हणाली, "अगं वेडी आहेस काय ? जे खरं असेल, ते बोल. आपण पार्टी काही आपल्या मजेसाठी केली नव्हती, त्याच्या पाठीमागे आपला उद्देश काय होता माहित होतं ना ? मग स्वतःला नाराज करू नको, जे खरं असेल ते पप्पांना सांग. ते देखील टेन्शन मध्ये असतील आणि खरे बोललो तरच आपण सर्वजण आनंदित राहु. मनात अपराधी भावना राहणार नाही. 

     मध्येच नूरने विचारले, "आम्ही एवढा वेळ तुला समजावतोय, तु आधीच का बोलली नाही मग ?" श्रुती म्हणाली, "तुम्ही जे पुस्तक दिले होते ना मला वाचायला, त्यातल्या गांधीजींच्या कथा वाचल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला." मग निशा म्हणाली," बघ श्रुती गांधीजींच्या विचारांचा आपल्यावर किती प्रभाव होतो. जी गोष्ट लपवण्याचा तु प्रयत्न करत होती, या कथा वाचल्याने, त्यांचे विचार वाचल्याने आपण स्वतःत किती पॉझिटिव्हली बदल करतो. प्रत्येक समस्येचे उत्तर सहजगत्या मिळून जाते." शेवटी चौघींनी मिळून श्रुतीच्या पप्पांना सर्व काही खरे सांगायचे ठरवले. 

     चौघी मैत्रिणी श्रुतीच्या पप्पांकडे गेल्या. श्रुती मात्र ते त.. त.. प.. प .. करत होती. तेवढ्यात निशा म्हणाली, "काका आम्हाला तुम्हाला काही सांगायचे आहे." काका खूप वैतागले होते. ते पैशांना घेऊन अस्वस्थ होते. ऐकण्याच्या मनस्थितीत देखील नव्हते. तेवढ्यात श्रुती पप्पां जवळ गेली, त्यांच्या पाया पडून ओक्साबोक्सी रडू लागली, "पप्पा मला क्षमा करा, तुमचे पैसे मीच घेतले यात मम्मीची काहीच चूक नव्हती, मला पैसे लागणार होते पण ते तुम्ही किंवा मम्मीने दिले नसते आणि तुमच्या पाकिटात एवढे पैसे बघून मला रहावले नाही आणि मी ते घेतले, पप्पा मला माफ करा ."

      काकांना खुप राग आला होता. एक तर पैसे भरण्याची शेवटची मुदत होती आणि त्यांच्या लाडकिने चे पैसे चोरले होते. परंतु नूतन एकदम पुढे झाली व पप्पांना शांत करत म्हणाली, "काका श्रुतीला माफ करा. जेव्हापासून तिने पैसे घेतले होते, तेव्हापासून ती देखील स्वतःला त्रास करून घेत होती. ती पश्चातापाच्या आगीत जळत आहे. काका तिला क्षमा करा. तिला आता तिची चूक कळली आहे. पुन्हा नाही ती असं करणार."

     काकांनी तिला उठवत पैसे न विचारता घेतल्याबद्दल चे कारण विचारले, तेव्हा श्रुती म्हणाली, "पप्पा तीन दिवसांपूर्वी आम्ही रस्त्यावरून जाताना एक मुलगी झाडाखाली रडत बसली होती. तिच्या जवळ जाऊन विचारले, तर ती म्हणाली की तिचे 'भव्यदिव्य गायन स्पर्धा' मध्ये निवड झाली आहे, परंतु त्यात फि भरायची आहे, फिशिवाय तिला एंट्री नाही. आम्ही खूप वेळा तिचे गाणे ऐकले होते, परंतु तिची फि जास्त असल्यामुळे ती स्पर्धेत भाग घेऊ शकत नव्हती, म्हणून आम्ही चौघींनि तिची फी भरण्याचे ठरवले. तिला फि देऊन स्पर्धेत पाठविले आणि काय विशेष तिचा प्रथम क्रमांक आला."

   "कोण ती सरिता ?", पप्पांनी विचारले. निशा म्हणाली, "हो काका, सरिता . तिला आम्हीच पैसे देऊन स्पर्धेत पाठविले होते आणि तिच्या साठीच आम्ही पार्टी ठेवली होती. श्रुतीने तेवढ्यासाठीच तुमचे पैसे न विचारता घेतले होते."

" पप्पा मला माफ करा, मी तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होते, परंतु मी खूप घाबरले त्यामुळे माझे धाडसच झाले नाही. श्रुती घाबरत घाबरत म्हणाली. "आणि आता हे धाडस कसे काय जमले??" पप्पानी हसत हसत विचारले. मग नूरने पण हसत हसत सांगितले," महात्मा गांधीजी की सच्ची कहानींया पढ़कर काकाजी." सर्वजण हसू लागले.


*संदेश :- नेहमी सत्य बोलावे.*

       *छोट्या छोट्या गोष्टींसाठी खोटे बोलण्यापेक्षा खरे बोलून परिस्थितीशी सामोरे गेले पाहिजे आणि नेहमी खरे बोलले पाहिजे जेणेकरून आपणास व दुसऱ्यांना याचा त्रास होणार नाही.*


Rate this content
Log in