सोनूची चौकसबुद्धी
सोनूची चौकसबुद्धी
'आई, आई, आज आमच्या बाईंनी मला पाच स्टार्स हातावर काढले, हे बघ!' सोनू लाडात येऊन आईला सांगत होता. तो खूपच खुश होता, कारण आज त्याला त्याच्या बाईने चांगल्या वर्तणुकीसाठी फाइव्ह स्टार्स हातावर काढले होते.
तो मोठ्या गटात शिकत होता. आजही मला आठवते, जेव्हा त्याच्या शाळेचा पहिला दिवस होता, त्याने आईला घट्ट आवळून धरले होते. तो आईला सोडतच नव्हता. मी देखील कंटाळून गेले होते. त्याला एवढे समजावले पण तो काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी आईने त्याला कसेबसे समजावले आणि त्याला शाळेत सोडून आम्ही दोघी स्कुटीवर बसून घरी आलो. त्या दिवशी तो दिवसभर आमच्याशी रागावलेला होता आणि आज पहा त्याला त्याच्या चांगल्या वागणुकीसाठी त्याच्या बाईंनी वर्गात शाबासकी देऊन त्याचे कौतुक केले होते.
तो खूप आनंदात होता. आज त्यांची एक दिवसीय सहल बागेत फिरण्यासाठी गेली होती. बागेत जाण्याआधी बाईंनी त्यांना भल्यामोठ्या सूचना सांगितल्या होत्या. सूचनांचे पालन करायचेच असे बजावून सांगितले होते. एकमेकांचे हात सोडायचे नाही, एकट्याने भटकायचे नाही. फुलं, पाने तोडायची नाही वगैरे वगैरे वगैरे .... नियम बागेत जाईपर्यंत सतत सांगण्यात येत होते.
सोनू आपल्या साथीचा हात पकडून रांगेत चालत होता. अचानक त्याला पोत्याच्या खाली काहीतरी हालत असल्याचे दिसले. त्याचे लक्ष परत परत त्या पोत्याकडे जात होते. का कोणास ठाऊक? पण सोनुला त्या पोत्याच्या खाली काही तरी असल्याचा संशय येत होता. त्याने लगेच बाईंना बोलावून आणले आणि दाखवले, 'बाई, त्या पोत्या खाली काही तरी हलतय.' बाईंनीं त्याला रागवत म्हणाल्या, 'सोनू तिकडे काही नाही, कुठेही समूह सोडून जायचं नाही. अडगळीच्या ठिकाणी तर अजिबात जायचं नाही.' असे सांगून बाईं सोनुला तिकडून घेऊन गेल्या. पण सोनूचे लक्ष तिकडेच लागले होते. तो सारखा विचार करत होता, 'काय असेल बर त्याच्या खाली?'
बागेत खूप सुंदर वातावरण होतं. छोटा सोनू बागेतल्या फुलपाखरांच्या पाठीमागे पळत होता. घसरगुंडी तर त्याला खूपच आवडत असे. त्याच्यावर मनसोक्तपणे घसरून तो थकला होता, तरी
ही त्याला मेरी-गो-राऊंड वर खेळायचे होते. सगळ्या खेळण्यांवर खेळून झाल्यावर तो आणि त्याचा मित्र एका जागी बसले होते. त्यांच्या शेजारीच एक छोटेसे तळे होते. तळ्यात खूप सारी कमळाची फुले आणि छोटे छोटे कासव देखील होते. बदके आणि हंस तर आनंदाने सगळीकडे फिरत होती.
सोनू जिथे बसला होता तिथून सोनूने पाहिलेलं हलणारे पोतं स्पष्टपणे दिसत होते आणि अजूनही ते हालत होते. सोनूने परत बारकाईने लक्ष देऊन पाहिले. अजून ते पोत हालत होते. त्याने कोणालाही न विचारता हळूच तो त्या पोत्या शेजारी गेला. सोनूने खूप धडपड केली ते पोते उचलण्याचे, पण ते पोते काही सरकत नव्हते. त्याला अचानक हिरव्या रंगाचं काही तरी वळवळत असल्याचे दिसले. पहिल्यांदा तो थोडासा घाबरला, पण तरीही तो ते पोते बाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी कसं बसं करून त्याने पोते बाहेर काढलं, तर बघतो काय कासवाचे छोटे पिल्लू! आणि त्याने जोराने आनंदाने किंकाळी फोडली, 'व्वा ! किती सुंदर कासवाचे बाळ आहे. बाई ईकडे या, कासवाचे बाळ पोत्यात अडकले आहे.'
बाई आणि शिपाई मावशी दोघीही धावत आल्या. त्यांनी आधी सोनुला धरले. सोनुला नीट बघितले. त्याला कुठे लागले का म्हणुन विचारले. पण सोनू म्हणाला, 'बाई मला काही झाले नाही. ते पहा छोटुराम !! कासवाचे बाळ.' सोनुला कासवाचे पिल्लू पाहून खूप आनंद झाला होता. बाईंनी आणि शिपाई मावशींनी त्या पिल्लूला हळूच बाहेर काढले. तो पिल्लू खूप वेळाने धडपडत होता, पण सोनुने त्याला दाखवल्यामुळे, त्याच्या धाडसामुळे कासवाची सुटका झाली होती.
बाईंनी बागेच्या गार्डला बोलून आणले व त्या गार्डने कासवाचे पिल्लू परत तळ्यात सोडले. कासवाचे पिल्लू आपल्या तळ्यात परत आल्याने आनंदाने पोहत होते. तो सोनू कडे जणू गिरक्या घेत आनंद व्यक्त करत होते. बाईंनी सोनुला शाब्बासकी दिली. मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवले म्हणून त्याचे कौतुक केले आणि एकटे कोठेही जायचे नाही म्हणूनही बजावले. एवढा छोटासा सोनू पण त्याची निरीक्षणशक्ती, समजूतदारपणा व धाडसीपणा कमालीचा होता. त्याने आज एका छोट्या जीवाला जीवदान दिले होते. हे सोनूचे संस्कारच होते जे हळूहळू विकसित होत होते.