Nagesh S Shewalkar

Others

2  

Nagesh S Shewalkar

Others

शुभम् भवतु!

शुभम् भवतु!

14 mins
1.6K


           

   सकाळचे दहा वाजत होते. अनिल नामक पंचवीस वर्षे वयाचा युवक 'शुभम् भवतु' या दुकानासमोर उभा होता. दुकान नुकतेच उघडले होते. दुकानासमोर असलेल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या फलकावर ठळक अक्षरात लिहिले होते, 'लग्नासाठी आवश्यक असणारे सारे काही एका छताखाली! भरमसाठ कर्जाची व्यवस्था!' तो फलक तीन तीन वेळा वाचल्यानंतर अनिल आत शिरावे का नको अशा अवस्थेत दुकानात शिरला. एका अत्यंत सुंदर तरुणीने त्याचे स्वागत केले.

"नमस्कार सर! या. काय हवय?"

"लग्नाची सारी खरेदी करायची आहे."

"व्वा! व्वा! आपले हार्दिक अभिनंदन। सारी खरेदी आपण नगदी...."

"नाही. कर्ज मिळेल ना? तो फलक वाचून......"

"नक्कीच मिळेल. आपण अगोदर आमच्या कर्ज विभागात जाऊन कागदपत्रांची पूर्तता करा. पण सर, आपण दागिने, कपडे सारे घेणार आहात ना?"

"होय. सारे मिळेल ना सारे?"

"सर, हळद कुंकवापासून ते कपडे, दागिन्यांपर्यंत सारे काही मिळेल. अगदी मंगलकार्यालय, कॅटरींग,वरातीसाठी घोडाही मिळेल. पण सर, एवढी सारी खरेदी आणि एकटेच..."

"तसे नाही. थोडा वेळात येतीलच सारे."

"मग ठीक आहे. या...." असे मोठ्या अदबीने म्हणत तिने अनिलला 'कर्ज विभाग' या दालनाकडे नेले. आत जाताना अनिलने दुकानात सर्वत्र नजर टाकली. तिथे साऱ्या मुलीच दिसत होत्या...... एकापेक्षा एक सुंदर आणि तरुण! आपले इप्सित साध्य होणार या आनंदात तो आत शिरला. तिथेही एका मदमस्त तरुणीने त्याचे स्वागत केले. मधाळ, कोमल आवाजात ती म्हणाली,

"स्वागत आहे सर ! या. बसा."

"मला माझ्या लग्नासाठी कर्ज हवय. "

"ओ. के. सर, एक सांगा, आपला पगार कोणत्या बँकेत होतो?"

"सुजलाम सुफलाम सहकारी बँक!"

"छान! आपले एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे का? तसे असल्यास आपणास व्याजमध्ये दोन टक्के सुट मिळते."

"नाही. या एकाच बँकेत खाते आहे."

"ओ.के. नो प्रॉब्लेम! सुजलाम बँकेचे पासबुक, चार धनादेश, पाच फोटो...."

"आणले आहे." म्हणत अनिलने साऱ्या आवश्यक गोष्टी काढून त्या तरुणीच्या स्वाधीन केल्या.

"गुड! हा फॉर्म घ्या. जिथे जिथे √ अशी खूण केलीय ना, त्या प्रत्येक ठिकाणी स्वाक्षरी करा..." असे सांगत त्या युवतीने एक फॉर्म आणि पेन अनिलकडे दिला. अनिल एक एक ठिकाणी स्वाक्षरी करीत गेला. जवळपास स्वाक्षरीचे शतक झाले असावे. दरम्यान दोन वेळा पाणी, एक वेळा चहा असा पाहुणचार झाला. 

"वेल डन! तुम्ही आता मनाप्रमाणे, मनसोक्त खरेदी करू शकता. तोवर आपल्या कर्जाची मान्यता येईल. या. पुनश्च आपले अभिनंदन! आपल्या भावी वैवाहिक जीवनास हार्दिक शुभेच्छा!"

"धन्यवाद! " असे म्हणत अनिल बाहेर आला. बाहेर त्याचे तीन मित्र आणि एक मैत्रीण त्याची वाट पाहात होते. त्यांच्याशी 'हाय ' होईपर्यंत एक सुंदर तरुणी त्यांच्याजवळ येऊन अत्यंत नम्रपणे म्हणाली,

"सर, खरेदीला सुरुवात करायची ना? अगोदर काय घेणार? किराणा? कपडा? दागिने?"

"किराणा नंतर घेऊ लग्नाला चार-आठ दिवस राहिले असताना. प्रथम दागिने? कसे? " अनिलने मित्रांकडे बघत विचारले. अनिलच्या कुटुंबात तो एकटाच होता. तो दहावीला असताना त्याचे आईवडील वारले होते. वसतीगृहात राहून, शिकवण्या घेत त्याने स्वतःचे पुढील शिक्षण पूर्ण केले. पदवीधर होता त्याला नोकरीही मिळाली......

"हो चालेल की. " त्याचे मित्र म्हणाले. तशी ती युवती म्हणाली,

"सर, चौथ्या मजल्यावर दागिन्यांची शो-रुम आहे. या." असे म्हणत त्या सौंदर्यवतीने त्यांना लिफ्टमध्ये नेले. तिथली तरुणीही तशीच अत्यंत सुंदर होती. तिने दोन्ही हात जोडून सर्वांचे स्वागत केले. काही क्षणात लिफ्ट चौथ्या मजल्यावर थांबली. बाहेर पडताच तिथेही एक सौंदर्यवती स्वागतासाठी उपस्थित होती. 

"सर, अगोदर कुणाचे दागिने घेणार? मुलाचे की मुलीचे?"

"अगोदर नवरदेवाचे घेऊया." अनिल सांगत असताना त्याच्या भ्रमणध्वनीवर त्याचे कर्ज मान्य झाल्याचा संदेश आला.

"मला वाटले आपण 'लेडीज फर्स्ट' म्हणणार. नो प्रॉब्लेम! आपण अंगठीपासून सुरुवात करूया..." म्हणत त्या तरुणीने एका काउंटरवरील मुलीस इशारा केला. 

"या मॅडम, या सर...." त्या तरुणीने गोड आवाजात सर्वांचे स्वागत केले. अनिलकडे बघत म्हणाली,

"सर, आपली तर्जनी बघू."

"अहो, पण आत्ताच त्याला अंगठी घालणार म्हणजे... " अनिलचा एक मित्र म्हणाला तशी ती तरुणी लालेलाल होत म्हणाली,

"ईश्श! हाऊ ज्योकिंग! मी अंगठी घालण्यासाठी नव्हे तर तर्जनीचे माप घेण्यासाठी म्हणाले हो."

"बाप रे! एकलव्याला अंगठा मागितला होता तसा तर प्रकार नव्हे ना?" दुसऱ्या मित्राने विचारले.

"सर, तसे काही नाही हो. तुमचं आपलं भारीचं काही तरी..." म्हणत त्या तरुणीने माप घेण्यासाठी असलेली अंगठ्यांची माळ काढली. अनिलनने पुढे केलेल्या हाताची तर्जनी तिने हलकेच पकडली. तिच्या लुसलुशीत हाताच्या नरम गरम स्पर्शाने कृतकृत्य झालेल्या अनिलने आपल्या कंपूकडे पाहून डोळे मिचकावले.

"भाग्यवान आहे साला" एक जण हलकेच म्हणाला. दुसरा मित्र तितक्याच हळू आवाजात म्हणाला,

"ए, नो जलसी! आपणही एक एक अंगठी घेऊया. अग, सिद्धी तू घेणार आहेस का?" 

सिद्धी काही बोलण्यापूर्वीच ती मुलगी म्हणाली,

"सॉरी! यांची अंगठी बाजूच्या काउंटरवर मिळेल." काही क्षणात अनिलच्या तर्जनीचे माप निश्चित झाल्यानंतर त्या मुलीने विविध प्रकारच्या अंगठ्यांची पाच-सात तबके त्यांच्या समोर ठेवली. जो तो स्वतःची पसंती सांगत होता. ती मुलगी प्रत्येकाच्या पसंतीची अंगठी काढून दाखवत होती. अनिल एक-एक अंगठी बोटात घालून पाहात होता. त्या सर्वांपेक्षा वेगळी अशी अंगठी त्या तरुणीने अनिलला दिली आणि म्हणाली,

"ही घालून बघा. ही तुमच्या हाताला परफेक्ट सुट होईल." ती अंगठी बोटात घालून अनिल म्हणाला,

"अरे व्वा! किती छान आहे ना? का रे कशी आहे रे?"

"मस्त! आहे. " सिद्धी शांत असल्याचे पाहून ती मुलगी म्हणाली,

"तुम्हाला आवडली नाही का? तुमची पसंती महत्त्वाची आहे. आफ्टरऑल तुम्ही..."

"नाही. नाही. तिची मैत्रीण आहे. तिची एगेंजमेंट आधीच झाली आहे. दोन-चार दिवसात तिच्या लग्नाचीही खरेदी इथेच होणार आहे." अनिल म्हणाला.

"सॉरी! रियली सॉरी!..." ती सिद्धीकडे बघत म्हणाली.

"इट'स् ओके! डोन्ट वरी!" सिद्धी म्हणाली.

"पण सर, आपल्या होणाऱ्या मिसेस कुठे आहेत? खरे सांगू का, त्या नसताना तुम्ही खरेदी करत आहात म्हणजे फार मोठी रिस्क घेत आहात."

"ती कशी?" अनिलने विचारले.

"अहो, त्यांच्या आवडीनिवडी माहिती नसताना तुम्ही सारी खरेदी करता म्हणजे आश्चर्यच आहे. आजकाल वधुवर एकत्रच खरेदी करतात."

"बरोबर आहे. जाऊ देत. असे करा ना, या झाल्या आमच्या आवडी! आता तुमची निवड सांगा ना, कारण तुम्हाला तशी दृष्टी असते. प्लीज!" अनिल म्हणाला.

"मला विचाराल तर सर, तुमच्या बोटाला ही अंगठी एकदम शोभून दिसेल. शिवाय डिझाइन नवीनच आहे. कालच नवा माल आला आहे...." सांगत सांगत तिने अनिलचा हात हातात घेतला. त्या स्पर्शाने अनिलला स्वर्गीयसुख लाभल्याप्रमाणे आनंद झाला. अंगठी अनिलच्या बोटामध्ये घालून ती त्याच्याकडे घायाळ करणाऱ्या नजरेने पाहत असताना मित्रांनी एकमेकांकडे बघत हलकेच टाळ्यांचा ठेका धरला. तो ऐकताच भानावर आलेली ती मुलगी कावरीबावरी होऊन म्हणा,

"स...स....सॉरी! मी माझी पसंत सांगितली एवढेच. अंतिम पसंती तुमची असेल. "

"बरोबर आहे. पण तुमची आवड तेवढीच महत्त्वाची आहे."

शेवटी एकदाची अनिललने अंगठी पसंत केली. बाजूला असलेल्या काउंटरवर जाऊन त्यांनी मुलीसाठी अंगठी निवडली. ती निवडताना सिद्धी पुढे झाली. तिने बराच वेळ घेत एक छान अंगठी निवडली. बाजूलाच असलेल्या एका भव्यदिव्य अशा झगमगत्या दालनातून अनिलने लॉकेट निवडले. बांगड्या असलेल्या दालनात सर्वांनी प्रवेश केला. तिथे असलेल्या अत्यंत सुंदर मुलीने त्या जत्थ्याचे स्वागत केले. सिद्धीकडे पाहून ती म्हणाली,

"बघूया तुमचा हात. माप घ्यावे लागेल." सिद्धी काही बोलण्यापूर्वीच अनिल म्हणाला,

"एक मिनिट. ती माझी मैत्रीण आहे..."

"असे का? सॉरी हं! तुमच्या होणाऱ्या मिसेस कुठे आहेत? त्यांचे माप घ्यावे लागेल. आल्या नाहीत का त्या? यांची साइज....म्हणजे मनगटाची साइज एकच असेल ना? यांच्यापेक्षा त्यांचा हात लहान की मोठा आहे? तसे पुन्हा बदलून मिळतील पण तुम्हालाच त्रास होईल....."ती तरुणी सांगत असताना अनिल तिच्या गोऱ्यापान मनगटाकडे पाहतोय हे लक्षात येताच ती गोरीमोरी झाली. तसा अनिल म्हणाला,

"हे..हे...असेच गोरे..गोरे....म्हणजे तुमच्यासारखीच साइज असणार. तुमच्याच क्रमांकांच्या द्या."

"ठीक आहे. ...." म्हणत तिने नाना प्रकारच्या सुंदर, मनमोहक बांगड्या दाखवायला सुरुवात केली. त्यातले काही जोड निवडून अनिल आणि त्याच्या मित्रांनी त्याच मुलीला बांगड्या हातात घालून दाखवायला सांगितले. तशी ती मुलगी तो प्रत्येक प्रकार स्वतःच्या हातात घालून हात खाली, वर, चारही बाजूला वळवून दाखवत होती. शेवटी एक सेट पसंत करून अनिल आणि त्याचे मित्र दुसऱ्या दालनात शिरले. तिथली तरुणी जशी सुंदर होती तितकीच ती शारीरिक आकाराने मदमस्त होती. 

"वेलकम सर! काय दाखवू?" नशिल्या आवाजात तिने विचारले.

"दाखवताय ते खूपच आहे. जरा लेटेस्ट, फॅशनेबल मंगळसूत्र दाखवता का?"

"सर, मी दाखवण्यासाठीच येथे बसले आहे. म्हणजे माझे ते कर्तव्यच आहे. ...." म्हणत तिने नानातऱ्हेचे, सुंदर, नाजूक असे मंगळसुत्रांचे नमुने पुढ्यात ठेवले परंतु तिच्यासमोर उभे असलेल्या नमुन्यांचे लक्ष तिच्या गळ्यावर रेंगाळत असलेले पाहून सिद्धीच्या तळपायाची आग मस्तकात शिरत होती. तिच्याकडे दुर्लक्ष करत एकाजणाने त्या विक्रेत्या मुलीस विचारले,

"तुम्ही पान खाता का हो?"

"सॉरी! मी नाही समजले?" त्या तरुणीने त्याच्या नजरेला नजर भिडवत विचारले.

"मला असे म्हणायचे होते की, आपण जर पान खात असाल तर मस्तानीच्या गळ्यातून म्हणे पानाचा रस खाली उतरताना दिसत होता."

"तुम्ही पण असे आहात ना सर..... बाय द वे, कोण ही मस्तानी?" म्हणत तिने मानेला असा झटका दिला ना की, त्या मित्राला चक्कर येता येता राहिली.

"अरे, ते जाऊ दे. पानाची गोष्ट जुनी झाली. ह्यांनी साधे पाणी, चहा किंवा कोल्ड्रिंक घेतले ना तरी ते गळ्यातून खाली जाताना दिसेल."

"भलतेच काही तरी हं. पण खरेच मजा येत आहे. असे ग्राहक रोज रोज येत नाहीत हो."

"तुम्ही म्हणत असाल तर रोज भेटू की.म्हणजे आज अनिलची खरेदी झाली. उद्या याची, परवा याची

खरेदी करायला येऊ की..."

"यू आर मोस्ट वेलकम् !" ती तरुणी हसत म्हणाली. त्यावेळी तिचे दोन्ही ओठ विलग होताच तिच्या दंतपंक्तीचे झालेले दर्शन सर्वांनाच वेडावत होते. त्या तिथे दोन मंगळसूत्र, एक चप्पलहार आणि एक नेकलेस खरेदी करून तो लवाजमा तिसऱ्या मजल्यावर असलेल्या साड्यांच्या दालनात गेला. इतर सर्व दालनापेक्षा साडी दालन फार मोठे होते. विशेष म्हणजे पैठणी दाखवणारी मुलगी, आणि इतर सर्व मुली पैठणी परिधान केलेल्या होत्या. 

"या. सर, या. नववधूसाठी पैठणी हवी आहे का?" अतिशय लोभसवाणे सौंदर्य असलेल्या एका मुलीने गोड, मधुर आवाजात विचारले.

"हो. पण मोर असलेलीच पैठणी दाखवा बरे." एक मित्र फुशारकी दाखवत म्हणाला

"नक्कीच हं. बसा." 

"मला एक सांगा या दालनातील सर्वांचा ड्रेस कोड एकच म्हणजे पैठणीच आहे का?"

"होय. या दालनात पैठणी सक्तीची आहे."

"पैठणीचा खर्च तुम्हाला कसा काय परवडतो ?"

"आम्हाला कसला झेपतो एवढा खर्च? मालकच व्यवस्था करतात."

"अरे कसे असेल, मालकाला कंपनींकडून एकावर एक पैठण्या फ्री मिळत असतील किंवा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पैठण्या पाठवत असेल."

"नाही. नाही. फ्री वगैरे नाही. मालक किंवा कंपनी कुणीही खर्च करत नाही. ही आमच्या मालकांची शक्कल आहे. तुम्हाला म्हणून सांगते, कुणाला सांगू नका हं. नवीन पैठणी दुकानात आली की आधी आम्ही नेसायची आणि घरी जाताना काढून ठेवायची. आज माझ्या अंगावर जी पैठणी आहे ती उद्या प्रेसला जाते..."

"प्रेसला जाते म्हणजे? पत्रकारांकडे जाते?"

"नाही. तसे नाही. प्रेसला म्हणजे इस्त्रीसाठी जाते. तिकडून आल्यानंतर मग विक्रीसाठी खुली होते."

"याचा अर्थ तुम्ही वापरलेल्या पैठण्या गिऱ्हाईकांच्या गळ्यात बांधता का?" सिद्धीने रागारागाने विचारले.

"सिद्धी, अग, पैठणी गळ्यात कशी बांधता येईल. तो काय स्कार्फ आहे का?"

"मॅडम, वापरून पाहण्याचे काही फायदेही आहेत...."

"डोंबल्याचे आलेत फायदे? हां. आले लक्षात. नवनवीन तऱ्हेतऱ्हेच्या पैठणीच्या पहिली घडी मोडण्याचा मान तुम्हाला मिळतो हा तुमच्यासाठी फायदाच की.."व्यंगात्मक शब्दात सिद्धी म्हणाली.

"नो मॅडम, कसे आहे, आम्ही इथे साडी नेसली म्हणजे घडी मोडली की, पैठणीला कुठे छिद्र, एखादा डाग तर नाही ना, एखादा धागा उसवलेला तर नाही ना हे समजू शकते. पैठणी कमी मापाची तर नाही ना हेही कळते. सर्वात महत्वाचे म्हणजे कापडाचा पोत, डिझाइन यासोबत रंग शरीरावर उठून दिसतात का नाही हेही समजू शकते. अशी हातात घेऊन किंवा शरीरावर टाकून पाहिली ना तर तेवढे समजत नाही. जेवढे अंगावर नेसल्यावर कळते. आम्ही एक दिवस वापरली तर खात्रीपूर्वक सांगू शकतो की, कोणता वाण कुणाच्या शरीरावर जास्त खुलेल ते. बरे, मॅम, पैठणी तुम्हाला नेसता येईल की, रेडिमेड...इलास्टिक असलेली पैठणी दाखवू काय?"

"मॅडम, हे काय भलतेच? अहो, लग्न चालू असताना....."

"तुमचे काही तरी भलतेच हं. सर,आजकाल कुणाला नेसायला तेवढा वेळ नसतो म्हणून कंपनीने तशी व्यवस्था केली आहे. आजकाल साडी, शालू, पैठणी असो किंवा नऊवारी असो सारे मिऱ्या घालून नंतर त्यावर शिवण मारुन अगदी सर्वांसाठी ...फ्री साइज तयार माल येतो...."

"इलास्टिक मात्र उच्च दर्जाचे वापरतात ना?"

"ग्रेट ज्योक! तुम्ही मित्रमंडळी फारच विनोदी आहे बुवा. असे गिऱ्हाईक आजकाल फार दुर्मिळ झाले आहेत. लाखो रुपयांची खरेदी करतात परंतु कपाळावर करोडो आठ्यांचे जाळे असते. शिवाय सारखी किरकिर करतात. नवरा-बायकोंमध्ये तर हमखास भांडणे होतातच. बरे,हे पैठणीचे काही लेटेस्ट नमुने आहेत...." ती तरुणी बोलत असताना अजयच्या एका मित्राचे लक्ष तिच्या अंगावर असलेल्या पैठणीवर खिळले होते. त्याने विचारले,

"ही तुमच्या अंगावरील पैठणी...."

"ही? व्वा ! अगदी पारखी नजर आहे हो तुमची...."

"कसे आहे, तुमच्या शरीरावर ...म्हणजे तुमच्या सौदर्यामुळे ह्या पैठणीचे रंग खुलत आहेत."

"नाही. असे नाही हो. हा रंग, हे काँबीनेशन एवढे अफलातून आहे ना की, ते कुणाच्याही अंगावर उठून दिसते."

"छानच आहे. मॅडम,चांगल्या कापडाच्या, काँबीनेशनच्या लुंग्या करून शिवल्या तर शोभतील का?"

"व्वा! आयडिया बुरा नही है।" ती तरुणी मोकळ्या स्वरात म्हणाली. 

"मग द्या ना हिच म्हणजे असाच एखादा तुमच्यासारखा पीस....पैठणीचा हो..."

"बघते हं. लीले, तू परवा नेसलेली पैठणी प्रेस करुन आली का ग?"

"अग, कालच आलीय पण आल्याबरोबर मीनीने नेसली होती. ए, मीनाबाई, तू नेसलेली पैठणी कुठे आहे? का विकली ?"

"आज आलेल्या प्रेसच्या गठ्ठ्यात असेल. थांब. आणते.."असे म्हणत मीना आतल्या खोलीत गेली.

"तोवर दुसरा माल बघा..." म्हणत तिने पैठणीचा अजून एक गठ्ठा त्यांच्यासमोर टाकला. काही क्षणातच मीना बाहेर आली. ती म्हणाली,

"अग, आजच्या गठ्ठ्यात तर आली नाही. आज सकाळीच इस्त्रीवाला आला होता. हिच आवडली आहे का यांना? मग तुझी दे ना फेडून. जा. आत जाऊन चेंज करून ये. मी सांभाळते यांना.थांब. मी इस्त्रीवाल्याला फोन करते...." बोलत बोलत तिने एक क्रमांक जुळवला. काही क्षण बोलणे झाले. तशी ती म्हणाली,

"याचा अर्थ तुम्ही असा 'चोरावर मोर' व्यवसाय करता? मालकाकडे तक्रार करते तुमची...." असे म्हणत तिने रागारागाने फोन आपटून हळू आवाजात ती पहिल्या तरुणीला म्हणाली

"अग, नेमकी तीच पैठणी नेसून इस्त्रीवाल्याची बायको लग्नाला गेली आहे..."

" उद्या आपण या दुकानात आलो ना तर इथे झाडू मारणारी बाई पैठणी नेसून झाडू मारायला येईल...." सिद्धी रागागाने बोलत असताना त्या मुलीने विचारले.

"अय्या, मॅडम, तुम्हाला कसे समजले? अंतर्ज्ञानी आहात की काय?".

"माय गॉड! काय हा भयानक प्रकार? आम्ही खपवून घेणार नाही. अन्या, लाव. मीडियाला फोन लाव. बोलाव लवकर. होऊ दे यांचा भांडाफोड." सिद्धी रागारागाने म्हणाली.

"मॅड...मॅड...मॅडम...शांत व्हा. प्लीज शांत व्हा. खरे तर ही अंदर की बात है, आम्ही कुणालाही सांगत नाही. मालकांची तशी सक्त ताकीद आहे. तुमची ही कंपनी एकदम जॉयफुल आणि जॉली दिसली म्हणून आमचे सिक्रेट ओपन केले हो. आमच्या नोकरीचा प्रश्न आहे हो. आमच्या पोटावर पाय देऊ नका हो. वाटल्यास या पैठणीवर पन्नास टक्के सुट देते, ती सुट मी दंड म्हणून भरते पण जाऊ देत. नोकरी तर वाचेल. मॅम, सर, प्लीज. तुम्ही तरी समजावून सांगा ना...."ती तरुणी काकुळतीने म्हणाली. तसा अनिल म्हणाला,

"इटस् ओके. सिद्धू, हे बघ. तुझे अगदी बरोबर आहे. पण हिने प्रामाणिकपणे आपल्याला सांगितले म्हणून समजले. जर सांगितले नसते तर आपल्याला काही माहिती झाले असते का? जाऊ दे ना, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे."

"हे...हे.. हेच स्त्री दाक्षिणात्य भोवतेय. सुंदर स्त्री म्हटली की, तुम्ही अधिकच सॉफ्ट होता..."

"मॅडम, सापडली बघा. हे तीन पिस आले होते. शपथेवर सांगते ही घडी मोडलेली नाही. यामध्ये एक ब्लाउजपीसचे कापड आहे. लग्न लवकर असेल आणि तोपर्यंत शिवून मिळणार नसेल तर कंपनीने एक रेडीमेड ब्लाउजही दिले आहे. हे बघा..."

"अहो, पण ....." अनिल चाचरत म्हणाला. त्याला काय म्हणायचे आहे हे ओळखून ती मुलगी तात्काळ म्हणाली,

"काळजी करू नका. फ्री साइज ब्लाउज आहे. मी घातलेय. मला व्यवस्थित आले आहे....."

"पैठणीप्रमाणे आधी वापरून पाहून नंतर मग गिऱ्हाईकांच्या गळ्यात मारत नाही आहात ना?" सिद्धीने रागारागाने विचारले.

"नाही हो ताई, तसे काही नाही."

   पैठणी, शालू आणि इतर चार-पाच साड्यांची खरेदी होताच ते सारे अनिलच्या खरेदीसाठी बाजूच्या दालनात गेले. ज्या प्रमाणे पैठणीच्या दालनातील मुलींनी पैठणी नेसली होती त्याचप्रमाणे तिथल्या मुलीही सुटबुट घालून सज्ज होत्या. तशाच सौंदर्यवान होत्या. एका मुलीने समोर टाकलेल्या सुटांमधून अनिल आणि त्याच्या मित्रांनी सहा-सात जोड निवडले. तशी ती तरुणी म्हणाली,

"सर, एक-एक सुट ट्राय करुन बघा. म्हणजे जो सुट शोभून दिसेल तो निवडता येईल."

"ठीक आहे..." असे म्हणत अनिल शेजारच्या खोलीत गेला. एकानंतर एक सुट अंगावर चढवून तो बाहेर येत होता. या बाजूने, त्या बाजूने समोरून, पाठीमागून त्याचे मित्र त्याला न्याहाळत होते. मात्र सर्वांचे कोणत्याही एका वाणावर समाधान, एकमत होत नव्हते. शेवटी विक्रेती म्हणाली,

"तुम्ही हा सुट एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला शोभेल हा."

"खरे सांगता?" अनिलने अगतिकतेने विचारले. 

"अगदी! तुमचे रुपच तसे राजबिंडे आहे. रुबाबदार व्यक्तीमत्त्वाला हे काँबीनेशन परफेक्ट सुट होते. पाहता क्षणी तुमची लाइफपार्टनर तर प्रेमात पडेलच पण कुणीही तुमच्या प्रेमात पडेल....." ती तरुणी बोलत असताना अनिल तो सुट घेऊन पुन्हा शेजारच्या खोलीत गेला. काही क्षणात सुट घालून तो बाहेर आला. तशी ती मुलगी त्याच्या मित्रांना म्हणाली,

"बघा. सर कित्ती छान दिसत आहेत. जणू हा सुट यांच्या साठीच शिवण्यात आला. मॅम, सॉरी हं. पण एकदा माझ्या नजरेतून बघा. कित्ती खुलून दिसतो आहे ते. तुमचे लग्न ठरलेय म्हणून नाही तर कुणीही..... अगदी मी पण सरांच्या....." बोलता बोलता आपण काय बोलून गेलोय ही जाणीव होताच ती मुलगी मस्त लाजली. ते पाहून अनिलसह सारे तीनताड उडाले.

"अजूनही वेळ गेलेली नाही...." एक जण म्हणाला.

"ईश्श....." ती पुन्हा झकास लाजली.

"सर, अजून काही खरेदी राहिली आहे का?" त्याच मुलीने विचारले.

"हो ना. सर्वात महत्त्वाचे राहिले आहे. त्याशिवाय लग्नाच होणार नाही ना." अनिल म्हणाला.

"अजून काय घ्यायचे ते सांगा म्हणजे त्या दालनात..."

"ते...ते...म्हणजे व...वधू कोणत्या दालनात आहेत..."

"का ss य? वधू? दालन? माय गॉड! म्हणजे तुमची होणारी नवरी हरवली आहे तर. मग त्यांचे नाव सांगा म्हणजे अनाउन्समेंट...."

"अहो, तसे नाही. अजून वधू निवडायची आहे...."

"अरे, बाप रे! म्हणजे तुमचे लग्न ठरले नाही?"

"नाही ना. तेच तर सांगतोय ना. सांगा ना, प्लीज वधू...."

"इथे या दुकानात? वधू?"

"अहो, असे काय करता? तुमच्या दुकानासमोरच्या फलकावर काय लिहिले आहे...'लग्नासाठी आवश्यक सारे काही एकाच छताखाली!' आता मला सांगा लग्न करायचे म्हटले की, अति आवश्यक काय असते?"

"न..न...नवरी....."

"मग नवरी इथे मिळणार म्हणून तर आम्ही आलो आहोत.."

"बाप रे बाप! भलताच घोळ झालाय की. अहो, कसे शक्य आहे?"

"का नाही? इथे साऱ्या मुलीच आहेत, एक तरी जेंटस् दाखवा बरे. त्यामुळे मला वाटले की, यापैकी एखादी आपण पसंत करु....."

"हा पेच सोडवण्यासाठी आपण आमच्या व्यवस्थापकाडे जाऊ. या..." असे म्हणत ती तरुणी आणि तो जत्था निघाला...

व्यवस्थापक असलेली ती मुलगी कदाचित त्या मॉलमध्ये सर्वात सुंदर मुलगी होती. तिला त्या मुलीने सारा प्रकार सांगितला. तोपर्यंत घडत असलेला सारा प्रकार त्या

मॉलमध्ये काम करणाऱ्या साऱ्या मुलींना समजला होता. उत्सुकतेपोटी मुली व्यवस्थापकाच्या दालनाच्या बाहेर जमा झाल्या होत्या. खरेदीसाठी आलेले बहुतेक सारे गिऱ्हाईकही तिकडे धावले. 

व्यवस्थापिका अनिलला म्हणाली,"कसे शक्य आहे? लग्नाच्या बस्त्यामध्ये....आयमिन साहित्यामध्ये का वधूवर येतात?"

"का नाही? मला सांगा, लग्न वधुवराचेच असते ना? तेच मुख्य असतात ना?" अनिलने विचारले.

"तुमचे बरोबर आहे. पण सॉरी!...."

"ठीक आहे. घेतलेल्या साहित्याचे मी काय करू? सारे साहित्य वापस घ्या."

"माफ करा. विकलेला माल आम्ही परत घेत नाहीत. एक्सचेंज होऊ शकतो."

"अजून कुठे विकला आहे? नुसती पसंती..."

"पसंती झाल्याबरोबर माल बिलिंगला जातो. तिथे संगणकावर त्याची नोंद होते. मानिनी, सरांनी पसंत केलेल्या सर्व साहित्याची...."

"होय, मॅडम, आत्तापर्यंत सरांच्या खात्यावर पाच लाख ऐंशी हजार पाचशे छप्पन रुपये पडलेत..."

"आणि सर, तेवढेच कर्ज सुजलाम सुफलाम बँकेच्या तुमच्या खात्यात जमा होऊन लगेच आमच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. तसे वेगवेगळे संदेश आपल्या मोबाइलवर आले असतील..."

"अहो, पण माझे लग्नच ठरले नाही तर मी या सगळ्या सामानाचे काय करू?"

"तो तुमचा प्रश्न आहे. सर, अगोदर विचारणा करायला हवी होती."

"एक मिनिट, हा सारा प्रकार गैरसमजातून झाला आहे. मला सांगा हे सारे खरेच परत घेता येणार नाही?"अनिलच्या एका मित्राने विचारले.

"एक मार्ग आहे, खरेदीची पंचवीस टक्के आणि प्रोसेसिंग फी वीस टक्के रक्कम भरावी लागेल."

"मॅडम, सॉरी! गैरसमज नसावा. या मॉलमध्ये कर्मचारी म्हणून खूप मुली आहेत. त्यापैकी कुणी एखादी मुलगी......कसे आहे, आमचा अनिल, दिसायला अगदी राजबिंडा आहे. मोठ्या पदावर आहे. गलेलठ्ठ पगार आहे. फ्लॅट बुक केलाय. सर्वात म्हणजे सडाफटींग आहे. एकटाच असल्यामुळे सासू-नणंद, दीर-सासरा अशी कोणतीही कटकट नाही. अगदी राजाराणीचा संसार होईल. प्लीज एकदा सर्वांना विचारुन तर पहा ना. प्लीज...प्लीज....."

"असे म्हणता? ठीक आहे. या बाहेर..." म्हणत व्यवस्थापिका दालनाच्या बाहेर आल्या. तिथे जमा असलेल्या मुलींना त्या म्हणाल्या, 

"मुलींनो, हे अनिलसाहेब, नीट पहा.लग्न करू इच्छितात. जर तुमच्यापैकी कुणाला हे साहेब पसंत असतील तर हात वर करावा...."त्यांचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच

तिथे असलेल्या सत्तर ऐंशी मुलींपैकी तीस-पस्तीस मुलींनी हात वर केला. त्यापैकी एक हात तिथे खरेदीसाठी आलेल्या एका मुलीचाही होता. परंतु शेजारी उभ्या असलेल्या तिच्या नियोजित पतीने रागारागाने तिचा हात खाली ओढला आणि तिला ओढतच मॉलच्या बाहेर नेले. तिकडे अनिलचे लक्ष व्यवस्थापिका बाईकडे लागले होते ते पाहून ती चक्क लाजली आणि तिचा हात वर कधी झाला ते तिलाही समजले नाही. ते पाहून अनिलने स्वतःचा हात त्यांच्या दिशेने पुढे करताच तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्यांचा गजर सुरू करताच व्यवस्थापकबाईंचा हात अनिलच्या हातात विसावला...........

                                                                                


Rate this content
Log in