Nagesh S Shewalkar

Others

4.3  

Nagesh S Shewalkar

Others

शिवीसम्राज्ञी

शिवीसम्राज्ञी

11 mins
1.4K


सुगरणनगरात वाजणाऱ्या कर्णकर्कश्श लाउड स्पिकरने नगरातील तमाम बायकांची दुपारची झोप हराम केली होती. सकाळी उठल्यापासून सतत कष्टाचा डोंगर उपसणाऱ्या स्त्रीयांसाठी वामकुक्षी म्हणजे जीव की प्राण! अशा प्रसंगी परमप्रिय पतीचा अडथळा त्यांना सात जन्मात एकदाही नको असतो. तिथं इतरांची काय कथा? सुगरणनगरीतील स्त्रीया त्या आवाजाची तक्रारही करू शकत नव्हत्या कारण तो लाउड स्पिकर होता, 'सुगरण गणेश मंडळाचा....' नगरातील झाडून सारी मुले गणेश मंडळाचे सभासद होते. त्यामुळे पुत्रप्रेमापोटी त्या आवाजाला मुक्त परवाना मिळत होता. डुलकी नाही तर नाही किमान जमिनीवर पाठ टेकून थोडासा आराम करावा असा सर्व स्त्रीयांनी मनोमन परंतु जणू एकमुखाने मंजूर केला होता.

गणपती बाप्पाच्या दहा दिवशीय तात्पुरत्या निवासाशेजारी त्रिलोकेबाईंचे घर होते. स्वतःचे अवाढव्य शरीर सांभाळत त्या पलंगावर आराम करत असताना त्यांच्या दारावरच्या घंटेचा नाद सदनात घुमला. त्या आवाजाने त्यांच्या घोरण्यात व्यत्यय निर्माण झाला. शरीराची हालचाल करत त्यांनी आदमास घेतला. त्यामुळे साहजिकच 'पलंगनाद' झाला. तेवढ्यात पुन्हा घंटी वाजली. घंटी वाजवणारा जणू घंटीवरील बोट काढतच नव्हता. मोठ्या कष्टाने पलंगावरून उतरत त्रिलोकेबाई पुटपुटल्या,'काय हा उच्छाद? वाजवणाराला काही शिष्टाचार माहिती आहेत की नाही? एकदा घंटी

वाजवली की, काही वेळ थांबावे. वाट पहावी. हा साधा अलिखित नियम माहिती नसणारांनी खरे तर बेल वाजवण्याच्या फंदात पडू नये. खरे तर त्याचवेळी ह्यांना म्हणाले होते की, बेल फार मोठ्या आवाजाची घेऊ नका. घंटी ही घरातील माणसांना सुचना मिळावी यासाठी असते. आपल्या घरी कोण आलेय हे गल्लीत इतरांना कळण्यासाठी नसते.परंतु माझं ऐकतील ते 'हे' कसले? मी सांगायचे एक आणि ह्यांनी करायचे दुसरेच हे आमच्या सप्तपदीच्या गाठीतच भरलेले....'म्हणत त्यांनी दार उघडले. दारात पाच-सहा गणेशभक्त मुले पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्या कडाडणार तितक्यात समोर स्वतःच्या मुलाला पाहून त्यांचा राग अनावर झाला. परंतु तरीही त्या म्हणाल्या,

"पोरांनो, केवढा आवाज करुन ठेवलाय. दुपारची झोप तर उडालीच पण दोन मिनिटे..."

"आई, तू दोन नाही तर चक्क एकशे वीस मिनिटे.."

"चूप बस! स्वतः तर अभ्यास करत नाहीसच आणि मलाही झोपू देत नाही. पंधरा दिवसांनी टेस्ट आलेय आणि तू हा असा भीक मागत फिरतो?"

"काकू, जाऊ द्या हो. टेस्ट काय वर्षभर होतच राहतात. परंतु गणपती बाप्पा वर्षातून एकदाच येतो. काकू, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे..."

"आनंदाची? कोणती रे?"

"गणपती मंडळाच्यावतीने आम्ही एक स्पर्धा ठेवली आहे..."

"कशाची बोडक्याची स्पर्धा रे?"

"काकू तुम्ही बोडकी करणार?"

"बोडकी करेल तुझी माय. हलकटा, चूप! काही ठेवायची नाही स्पर्धा-बिर्धा! मेल्यांनो, गेले वर्षी 'सुगरण कोण?' या स्पर्धेत त्या परीक्षकांनी माझे बटाटेवडे फस्त केले आणि नंबर काढला त्या काळकुट्या उत्तरेबाईच्या तिखट आग उपम्याचा...."

"पण काकू, तुम वड्यात मीठच नव्हते..."

"चूप रे !...."

"आई, या वर्षीच्या स्पर्धेत तुला नक्कीच पहिला नंबर मिळेल. स्पर्धा कशाची आहे ते माहिती आहे का? विषय तुझ्या आवडीचा आहे."

"कशाची आहे रे?"

"नवऱ्याला एका दमात जास्तीत जास्त शिव्या घालणे..."

"चोंबड्यानो, हा काय विषय झाला रे? कुणी सुचवला हा विषय? असला धुमाकूळ घालाल ना तर गणेशोत्सव बंद करायला लावीन. काय वात्रट कार्टी आहेत. वायफळ विषय निवडून आमची परीक्षा घेता होय रे?"

"काकू, दहाबायकांनी नावेही नोंदवलीत...."

"काय? दहा? बायकांनीही लाजा सोडल्यात की काय? घरात शिव्याच काय पण नवऱ्याच्या कानाखाली आवाज काढणे निराळे परंतु सार्वजनिक ठिकाणी, परिचित लोकांसमोर शिव्या द्यायच्या म्हणजे. हे..हे टू मच हं...निगरगट्टपणाचा कळस झाला."

"काकू, लवकर सांगा. पूर्ण कॉलनी फिरायची आहे."

"आई, दे ग तुझे नाव. बाबा, काहीही म्हणणार नाहीत. जस्ट फॉर ए फन! मी समजावेल बाबांना..."

"काही सांगू नको. त्यांना काय कळतेय.शिव्या देणे हा का त्यांचा प्रांत आहे? लिहा नाव...."

"वा! काकू, वा! तीन बक्षीसे ठेवली आहेत....'शिवीसरीता, शिवीभुषण आणि शिवीसम्राज्ञी!"

त्याचवेळी गणेशभक्तांचा दुसरा जत्था उत्तरेबाईंच्या घरी पोहोचला.

"छे! छे! ही स्पर्धाच नको. भर सभेत जाहीरपणे नवऱ्याला शिव्या द्यायच्या म्हणजे? एकांतात मुकाटपणे शिव्या खात असले तरी त्यांनाही मान आहे."

"काकू, त्रिलोकेकाकूंनी भाग घेतलाय."

"तुम्ही आमच्या जवळच्या आहेत म्हणून सांगतो, त्यांनी चंगच बांधलाय...."

"कशाचा?"

"काहीही करून पहिला नंबर मिळवणारच असा. शिवाय गत वर्षाचा तुमचा बदला घेण्याची प्रतिज्ञा घेतली आहे त्यांनी. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळावे म्हणून काकांना त्यांची चूक असो किंवा नसो शिव्या देत रंगीत तालीम सुरु केली आहे."

"असे आहे का? तिची एवढी हिंमत? मला खुन्नस देते का? थांबा. यावर्षी नाही तिला चारीमुंड्या चित केले तर कपाळावर टिकली लावणार नाही. काय समजते स्वतःला? हिचाच नवरा काय शेळपट आहे? माझ्या नवऱ्याला का शिव्या खाता येत नाहीत की त्यांना शिव्यांचे अजीर्ण होईल?मला का शिव्यांची अलर्जी आहे? ये म्हणावे मैदानात. केवळ शब्दांनीच तिचे दात तिच्याच घशात नाही घातले तर हे मंगळसूत्र बांधणार नाही."

"काकू, तुमचे नाव लिहू का?"

"अरे, लिहू का म्हणून काय विचारतो? एकदा नव्हे तर दहा वेळा लिही. कुणी शिव्यांची डिक्शनरी काढतो म्हटले तरी त्याला पुरून उरतील एवढ्या शिव्या माझ्याजवळ आहेत."

तिकडे मुलांचा तिसरा जत्था सौ. उटपटांगेच्या घराचा दरवाजा ठोठावत होता. स्वतःचे भरभक्कम शरीर सांभाळत उटपटांगेंनी दार उघडले.

"काका, काकू नाहीत का?"

"नाही रे. ती गावाला गेली आहे. का बरे?"

"आपल्या गणेश मंडळातर्फे एक स्पर्धा ठेवली आहे. वाटले काकू नक्कीच भाग घेतील म्हणून...."

"कोणती रे स्पर्धा?"

"नाही. नको. तुम्हाला सांगितले तर तुम्ही रागवाल आमच्यावर."

"अरे, नाही रे. असे काही होणार नाही. मला सांगा की."

"नवऱ्याला एका दमात जास्तीत जास्त शिव्या देणे."

"काय? अरे, मुर्खांनो दुसरा विषय नव्हता का रे? अरे, वेळ पडलीच तर कुणाचा मार खाईन पण बायकोच्या शिव्या खाणार नाही."

"काका, हा विषय काकूनींच सुचवला होता. "

"काय? हिनेच सुचवला? मग ठीक आहे. निवृत्त झाल्यापासून एकांती बायकोच्या शिव्या खातोय. आता तुमच्या मंडळाच्या सौजन्याने आणि जनतेच्या साक्षीने शिव्या खाईन. लिहा. हिचे नाव लिहा."

बरीच मुले वसाहतीत फिरुन नावे नोंदवत होती तर काही मुले मंडळाच्या स्पिकरवरुन आगामी स्पर्धेची जाहिरात करीत होती.......'सुगरण कॉलनीतील माता, भगीनी, नंदा, जावा, भावजया, सासवा, सुना आणि नवऱ्यांच्या बायकांनो तुम्हा सर्वांसाठी खुशखबर!खुशखबर!!खुशखबर!!! तुम्ही ऐका. सर्वांना सांगा.आपल्या सुगरण गणेश मंडळाच्यावतीने एक नाविन्यपूर्ण स्पर्धा तीही खास बायकांसाठी आयोजित केली आहे. स्पर्धेचा विषय आहे...'नवऱ्याला एका दमात जास्तीत जास्त शिव्या देणे.' खरे तर हा विषय सर्व बायकांचा आवडता आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. रोख रक्कमेसह विशेष तीन पदव्यांनी गौरविण्यात येणार आहे. तरी सुगरणनगरीतील महिलांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा....'

स्पर्धेच्या दिवशी विविध स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात झळकली. शहरात या नाविन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा सुरु झाली, उत्सुकता निर्माण झाली. स्पर्धा दुपारी दोन वाजता सुरु होणार होती. सुगरणनगरीतील कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदारांना त्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. आमदारांनी सपत्नीक उपस्थित राहण्याचे आश्वासन दिलं.

दुपारी एक वाजल्यापासून शहरातील नागरिकांचे विशेषतः स्त्रीयांचे पाय सुगरणनगराच्या दिशेने चालू लागले. शहरातील अनेक स्त्रियांनी ती स्पर्धा सर्वांसाठी खुली करण्याची विनंती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केली.पण मंडळाने स्पष्ट नकार दिला.त्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची उत्सुकता कदाचित आमदारांना लागली होती किंवा पत्नीच्या आग्रहाखातर ते सपत्नीक दोन वाजण्याच्या अगोदरच हजर झाले. स्पर्धेच्या ठिकाणी होत असलेली गर्दी पाहून संयोजकांनी पोलिसांना पाचारण केले. बरोबर दोन वाजता आमदार सपत्नीक व्यासपीठावर विराजमान झाले. स्पर्धेला अचानक प्राप्त झालेले महत्त्व पाहून स्पर्धकांनी स्वतःच्या नटण्या-मुरडण्याला विशेष महत्त्व दिले. अध्यक्षांची निवड, सरस्वतीपूजन, स्वागत या पारंपारिक पद्धती पार पडल्यानंतर माइकचा ताबा संचालन करणारे प्रा. दास यांनी घेतला. ते म्हणाले,

"स्वागतम्! सुस्वागतम्!! स्वागतम्!!! खरे तर या स्पर्धेची सुरूवात आणि सोबत आपल्या सर्वांचे स्वागत कार्यक्रमाचे औचित्य साधण्यासाठी इरसाल आणि ग्रामीण ढंगातील शिव्यांनीच करावे असा एक विचार माझ्या मनात येऊन गेला. परंतु महत्सप्रयासाने तो विचार मी टाळला. स्पर्धेविषयी दोन शब्द.... होय. मला माहिती आहे, आपण सारे शिव्या ऐकण्यासाठी जमला आहात. मी नसती बडबड करतोय हे पाहून अनेकांनी मज पामरासी शिव्या हासडण्यास सुरुवात केली असेल परंतु संचालक म्हणून मला काही शिष्टाचार पाळावेच लागतात. या स्पर्धेसाठी हाच विषय का निवडण्यात आला? आपणा सर्वांच्या मनात असलेला प्रश्न मी संयोजकांना विचारला. त्यांनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक होते. ते म्हणाले की, कमी अधिक प्रमाणात का होईना परंतु प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्याला शिव्या देते. लोकशाहीत खऱ्या अर्थाने कशाचे सार्वत्रिकीकरण झाले असेल आणि कोणती एकमेव गोष्ट तळागाळापर्यंत पोहोचली असेल तर ती म्हणजे शिव्या देणे. ज्या देशात राष्ट्रीय पातळीवर मोठमोठे नेते खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांना शिव्या देतात तेव्हा या विषयाचे महत्त्व मी पामराने काय सांगावे. अहो, जे जगजाहीर आहे, सर्वत्र ते चार भिंतीआड का ठेवावे? उलट या शिव्या अशा सार्वजनिक ठिकाणी दिल्या तर शिव्यांमधील विविधता सर्वांच्या लक्षात येईल. त्यातून चांगल्या आणि वापरण्यासाठी योग्य अशा शिव्यांचे आदानप्रदान होईल... तसे पाहिले तर या गणेश मंडळाचे सारे कार्यकर्ते तसे तरुण आहेत. परंतु त्यांचे विचार अंतर्मुख करणारे आहेत. 'शिव्या देणे हा प्रत्येक स्त्रीचा विवाहोत्तर हक्क आहे आणि तो त्या बजावणार.' हे या स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून रडके गुरुजी आणि हसवे सरांची नियुक्ती झाली आहे. दोघेही अविवाहित असल्यामचळे 'पत्नीला झुकते माप दिले.'हा आरोप होण्याची सुतराम शक्यता नाही. स्पर्धकांसोबत ज्यांच्यासाठी या 'लाखोलीचे' आयोजन आहे ते पतीही असणार आहेत. कबड्डीच्या नियमाप्रमाणे एका दमात शिव्या द्याव्या लागतील. पंच म्हणून प्रा. दास यांची म्हणजे माझी नेमणूक झाली आहे. गेली पाच वर्षे मी राष्ट्रीय पातळीवर कबड्डीचा 'दम'दार पंच आहे. तेव्हा स्पर्धा सुरू करुया. मी पहिल्या स्पर्धक सौ. हुंडेबाई यांना आमंत्रित करतो......

व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसलेल्या बायकांमधून तीस-बत्तीस वर्षे वयाची तरुणी उभी राहिली. त्याचवेळी व्यासपीठाच्या उजव्या बाजूने पस्तीस वर्षीय तरुण उभा राहिला. दोन्ही बाजूंनी ते दोघे व्यासपीठावर पोहोचले. स्टेजच्या मध्यावर दोघांची वाघीण-बकरा या आवेशात गाठ पडली. खाऊ का गिळू यादृष्टीने पाहणाऱ्या सौ. हुंडेबाई कडाडल्या,

"माझ्या बहिणीला फोन केलात का? मला वाटलेच होते,सासरच्या माणसांची तुम्हाला काय किंमत?

त्यांच्यावाचून काय तुमचे खेटर अडणार आहे? स्वतःच्या बहिणीच्या घरी मात्र चार चार दिवसाला पळत जाता? असतो. फरक असतो पण एवढा? लक्षात येण्याजोगा? मी कधी सासरमाहेर असा दुजाभाव केला नाही. उलट तुमच्या लोकांची उष्टे सावडून सावडून पाठीचा कणा मोडला पण कधी हूं का चूं केले नाही. तुम्हाला काय त्याचे कौतुक म्हणा. तुम्हाला तुमचा चहा ठरलेल्या वेळी मिळाला म्हणजे झाले. उद्या माझे काही बरेवाईट झाले म्हणजे मग कळेल माझी किंमत. या जन्मात तरी आराम मिळतो का नाही देव जाणे? हेच कशाला दरवर्षी तुमचीच सात जन्मासाठी मागणी करते. हा भोग एकच नाही तर सात जन्म?नुसता वनवास आहे. सासुरवास, पतीवास..सारे वासच वास! ..." तितक्यात प्रा. दास यांनी शिट्टी फुंकली आणि जणू मुठीत धरलेला जीव हुंडे यांनी सोडला. त्यानंतर प्रा. दास यांनी त्रिलोकेकर असा पुकारा करताच आडदांड शरीरयष्टी असलेल्या सौ. त्रिलोकेकर उभ्या राहिल्या. गर्मी जास्त होत असल्यामुळे चेहऱ्यावरील मेकअपने साथ सोडायला सुरुवात केली होती. दुसऱ्या बाजूने किरकोळ शरीरयष्टीच्या त्रिलोकेकरांंचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यांच्या चेहऱ्यावरची हाडे मोजण्याइतपत स्पष्ट होती.

त्रिलोकेकरांंना समोर पाहताच पत्नीच्या रागाचा पारा चढला. त्या कडाडल्या,

"सकाळी म्हणाले होते की, आमदार साहेब कार्यक्रमाला येणार आहेत तर एक छानसा गजरा आणा. परंतु तुमचं डोकं ठिकाण्यावर असेल तर ना? गजरा तर आणलाच नाही पण बैलाच्या नाकातून घालावयाचा गोंडा आणलात. अर्थात बैलाला गजरा गोंडाच दिसणार म्हणा. एवढी सुंदर मी पण कधी कोडकौतुकाने काही आणणार नाहीत. नेहमी असाच वेंधळेपणा. कॉलनीत माझ्यासारखी कुणी आहे का सुंदर? फार दूर कशाला जायच..मागे वळून पहा, आमदारबाईंपेक्षा मी नक्कीच सुंदर आहे. खरे आहे ना आमदारसाहेब? प्रत्येक नवऱ्याला त्याच्या कुरूप बायकोच्या सौंदर्याचे फार कौतुक असते हो. पोळ्याला बैलाला सजवावे तसे नवरे आपापल्या काळ्याकुट्ट बायकोला सजवतात. पण आमच्या नशिबात हा नंदीबैल...." बोलता बोलता त्रिलोकेकर बाईंचा दम वर झाला. त्यांना 'दम्याचा' विकार होता. परिस्थिती लक्षात घेऊन त्रिलोकेकर यांनी आमदारांच्या समोर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली. खोकणाऱ्या पत्नीच्या डोक्याखाली हात देत त्यांनी पत्नीला दोन तीन घोट पाणी पाजले. तशा त्रिलोकेबाई श्वासावर नियंत्रण मिळवत म्हणाल्या,

"बघा. बघा. आमदारसाहेब, तुमच्या समोर कसे साळसूदपणे वागतात ते. बाकी तुम्हाला पाणी पाजायला छान जमते हो. बरे होईल, तुमच्या हातून पाणी पिताना शेवटचा श्वास घेतला तर....."असे म्हणत त्या नवऱ्याच्या आधाराने खाली उतरत असताना टाळ्यांचा कडकडाट झाला. पाठोपाठ श्री व सौ उत्तरे ही जोडी व्यासपीठावर पोहोचली. समोरासमोर येताच उत्तरे म्हणाल्या,

"काम....काम...काम! दम तो कसा नाहीच. सकाळी तुम्हाला खिडकीवरचे जाळे काढा असे म्हणाले होते. पण ते साधे काम तुम्हाला नाही जमले. कसे जमेल? तुम्ही पुरुष ना? काम न करणे हा तुम्हा पुरुषांचा जन्मसिद्ध आणि तिरडीवर जाईपर्यंतचा हक्क. तो तुम्ही बायकोच्या मानगुटीवर बसून कदाचित ती मरेपर्यंत बजावणारच. घर झाडले तर तुमचे पौरुष झडून जाईल ना. बायको केली म्हणजे तिच्यासाठी काही कर्तव्य असते हे तुमच्या गावीही नसते. माणसाने एवढा सूड...." तितक्यात दासे यांनी शिट्टी मारली.त्यामुळे त्या थांबल्या....

प्रा.दासे एक-एक नाव पुकारत होते. उत्तरोत्तर शिवीस्पर्धा रंगात आलेली असताना दासे म्हणाले,

"आता आपण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. शेवटच्या स्पर्धक येळेकर या येत आहेत. ह्यांचे वैशिष्ट्य असे की, या बाई आजच्या स्पर्धकात सर्वात वयस्कर आहेत. वय सांगायचे असेल तर त्यांनी नर्व्हस नाइंटीजमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत येत आहेत अर्थातच श्री येळेकर...."

काही क्षणातच कमरेत वाकलेले, चष्मा घातलेले, कानात यंत्रे बसविलेले श्री व सौ येळेकर हे दोघे काठ्यांच्या सहाय्याने व्यासपीठावर पोहोचले. कोणतेही आढेवेढे न घेता सौ येळेकर खणखणीत आवाजात म्हणाल्या,

"आजपर्यंत.... लग्न झाल्यापासून शिव्यांचे सहस्त्रार्पण झाले असेल परंतु तुमच्या वागण्यात काही फरक पडला असेल तर शपथ! आज या पब्लिकसमोर आणि आमदारांच्या साक्षीने निक्षून सांगते, यावर्षी संक्रांतीला पैठणी आणली नाही तर मी मंगळसूत्र लेवणार नाही. चला. आता. त्या शिट्टीच्या दासाने शिट्टी फुंकण्यापूर्वी उतरा खाली...." असे म्हणत येळेकरबाईने येळेकरांचा हात धरला आणि दोघे हलकेच खाली उतरले. दास म्हणाले,

"मित्रांनो, आता निकालाची वेळ. पाहूया काय निकाल लागला तो...."

परीक्षक रडके म्हणाले, "उपस्थितीतांनो, स्पर्धा तशी चांगलीच झाली. आमच्या बुद्धीला जसे पटेल, जमेल तसा आम्ही निकाल लावला आहे. त्याचं फळ आम्हाला भोगावे लागणार आहे, ज्यांना बक्षीस मिळाले नाही त्यांच्या शिव्या खाऊन. आम्ही तृतीय पुरस्कारासाठी निवड केली आहे, ती सर्वात ज्येष्ठ स्पर्धक सौ. येळेकर यांची! तसे पाहता त्यांनी या ठिकाणी एकही शिवी दिली नाही. मग त्यांची निवड का आणि कशी? आम्ही दोघे परीक्षक अविवाहित आहोत परंतु स्वतःची पत्नी जर पांढरे कपाळ किंवा मंगळसुत्राशिवाय वावरणार असेल तर ती शिवी लाखोंच्या शिवींची बरोबरी करते. तेव्हा येळेकर पती-पत्नीला विनंती की, त्यांनी आमदार महोदयांच्या शिवीभुषण हा पुरस्कार स्वीकारावा." लगेच पुरस्कार प्राप्त जोडी व्यासपीठावर आली. आमदारांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. ते दोघे खाली उतरत असताना बायकोचा झोक जात आहे हे पाहून येळेकरांनी त्यांना हात देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी येळेकर पहाडी आवाजात म्हणाल्या,

"काही नको. मी लुळी नाही की पांगळी नाही. आंधळी तर मुळीच नाही." ते ऐकताच उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून सौ. येळेकरांना साथ दिली. त्यानंतर आलेल्या श्री व सौ हुंडे या जोडीचा सत्कार करून आमदारांनी त्यांना शिवीसरीता हा पुरस्कार देऊन गौरविले.

"मित्रांनो, आता या आगळ्यावेगळ्या, उत्कंठावर्धक स्पर्धेचे अंतिम आणि प्रथम बक्षीस! शिवीसम्राज्ञी हा अत्यंत प्रतिष्ठेचा, सन्मानाचा पुरस्कार दोन महिलांना विभागून जात आहे. त्या दोघी आहेत, त्रिलोकेकर आणि उत्तरे! " दोन्ही जोडपी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात व्यासपीठावर पोहोचली. दोन्ही स्त्रीया पुढे होत्या तर त्यांच्या मागे त्यांचे यजमान होते. तरीही उत्तरे बाईंनी मागे पाहिले आणि म्हणाल्या,"आहात न माझ्याच मागे? नाही तर जाल त्रिलोकात म्हणजे त्रिलोकेकरबाईंच्या मागे.... सवयीप्रमाणे! आमदारीनबाई तुम्हाला सांगते, लग्नात आहेर करताना किती गर्दी होते ना, नेमकी त्याचवेळी हे संधी साधतात. माझ्या सोबत आहेत हे दाखवताना दुसऱ्याच बाईला खेटून उभे राहतात आणि ती पत्नी असल्याप्रमाणे तिच्यासोबत आहेर करतात..."

आमदार पुढे झाले. शिवीसम्राज्ञी पुरस्कार त्या दोघींना देणार तितक्यात सौभाग्यवती आमदार कडाडल्या,

"थांबा हो. हा पुरस्कार या दोघींनाही द्यायचा नाही....." ते ऐकून सारे स्तब्ध झालेले असताना त्या पुढे म्हणाल्या, "अहो, या पुरस्काराची खरी मानकरी मी आहे. गेली पस्तीस वर्षे तुम्ही सातत्याने घराबाहेर सत्ता गाजवत असताना, तुम्ही घरी असो अथवा नसो, पाऊस असो, उन असो, थंडी असो की, वादळवारे असो तुम्हाला नित्यनेमाने लाखोली .....पाहता काय? बेलपत्रांची नव्हे तर शिव्यांची लाखोली वाहण्याचा माझा नित्यनेम कधीच चुकला नाही. त्याचे हे फळ का? मी येथे उपस्थित असताना तुम्ही यांना हा पुरस्कार बहाल करणार? चालणार नाही.आमदारसाहेब, चालणार नाही. सांगा बरे, शिवीसम्राज्ञी या बहुमानाची खरी मानकरी......"

"तुम्हीच सौभाग्यवती आमदार, तुम्हीच. तुमच्या शिवाय या पुरस्काराला शोभाच येणार नाही. तेव्हा या अशा....." असे म्हणत टाळ्यांचा प्रचंड कडकडाटात आमदारांनी स्वतःच्या पत्नीलाच शिवीसम्राज्ञी हा पुरस्कार बहाल केला. दुसरीकडे सौ त्रिलोकेकर आणि सौ उत्तरे या दोघी मनोमन शिव्यांचे सहस्त्रार्पण करीत होत्या.....श्री व सौ आमदार यांना......


Rate this content
Log in