STORYMIRROR

SHRIKANT PATIL

Others Tragedy

3  

SHRIKANT PATIL

Others Tragedy

सदाच दुकान

सदाच दुकान

3 mins
3.5K


धामापूर गावच्या वेशीत आल्यावर पहिल्यांदा दर्शन व्हायचं ते म्हणजे सदा पवाराच्या दुकानाच्.'सदानंद किराणा स्टोअर्स' असा डिजिटल फलक लावलेला.गावातील सर्व मंडळी सदाच्या दुकानातूनच किराणा माल भरायची. तसा सदाचा बोलका स्वभाव आणि त्याच उदारपण यामुळे सारी माणसं सदाच्या दुकानात गर्दी करायची. पण आजकाल तो सदा राहिला न्हवता. सदा वाईट मार्गाला लागला होता. गावातील कांही स्वार्थी माणसांच्या नादाने तो पूर्ण दारुच्या आहारी गेला होता.

एके दिवशी सदाच दुकान बंदच होतं .दुकान बंद बघून "कुठे गेलाय हा सदा सकाळी सकाळी कुणास ठाऊक. या पेदाडयांच काय सांगता येत नाही .कुठे जातोय कुणाला कधी पत्ताच लागत नाही . " असं सदा पवारा विषयी बडबडत रामा पुढारी जात होता . रामाला सकाळी सकाळी काहीतरी दुकानातून पाहिजे होतं. म्हणून सदूच्या दुकानाकडे तो आला होता पण, सकाळी आठ वाजले तरी सदाचं दुकान उघडलं न्हवतं.

तेवढ्यात रामाला बघून राजू पवारांन विचारलं,"रामा काका, आज लवकरच दुकानाकड आला होता. "

"अरे राजू, माझ्या बारक्या नातवाला सकाळी सकाळी उठल्यावर चहात बुडवायला काहीतरी लागत असत. नेमकं काल कामाच्या गडबडीत लेकराना काय तरी खायला आणायच इसरलं. "

"सदाचे दुकान उघडलंअसेल तर घेऊन जाऊ काहीतरी म्हणून आलोय बघ. खारी बिस्किट तरी मिळेल काय म्हणून आलोय पण हा कुठं रात्री पिऊन पडला कुणास ठाऊक?"

" होय काका, रातच्याला तो त्या अज्या पवारच्या शेताकड दारु पिऊन चिंचेच्या झाडाखाली पडला होता. संज्याने रात्री त्याला रिक्षात टाकून आणले व घरी सोडले."

सदा एक बारीक शिडशीडीत शरीर यष्टीचा माणूस. नेहमी अंगामध्ये पांढरा सदरा, डोक्यावर शुभ्र टोपी आणि पांढराशुभ्र लेंगा. आपल्या काळ्या मिशीला पिरंगाळत नेहमी दुकानाच्या गल्ल्यावर बसायची त्याची सवय. घरात बायको-जानकी , शिक्षण मधेच सोडून दिलेला व आता गावात कुठतरी काम करणारा एक मुलगा-सखाराम आणि एकुलती एक लग्नाला आलेली मुलगी - प्राजक्ता .असा त्यांचा 'हम दो, हमारे दो 'छोटा परिवार. सदा ची बायको- जानकी आपला संसाराला कुठेतरी मोलमजुरी करुन हातभार लावत असे.

एके काळी सदाचे तेजीत असणारे दुकानं. जसा दुकानात पैसा येऊ लागला तसा सदाला दारूचा नाद लागला होता. दारू पिऊन पिऊन सगळी शरीरयष्टी खिळखिळी झाली. आज सदा च्या दुकानात किराणा माल सोडून किरकोळ चुना- तंबाखू ,खारी -बिस्कीट एवढीच शिल्लक सेवा होती.उधारी घेवून लोकांनी व्यसनाधीन सदाला त्याच्याशी गोड बोलून बोलून लुटलं होत. त्यामुळे त्याचा संसार आज मोडकळीस आला होता. "पोरं लग्नाला आली तरी अजून सदाला अक्कल कशी काय नाही" अशी सदाला शहाणपण शिकवणारी माणसं नेहमी म्हणायची.

दुकानाचा खोका परसू कदमाच्या मालकीच्या जागेत होता. एके दिवशी सदाच्या या अशा वागण्याला कंटाळून परसू कदम म्हणाला , "अरे सदा , हे दुकानाचे खोके तेवढं उचलून दुसरीकड घेऊन जा. तुझ धंद्यावर लक्ष नाही आणि तुला कित्येकदा सांगूनही तुझ्यात सुधारणा होत नाही."

आता सदाच दुकानं बंद पडलं होतं. त्याचा संसार उघड्यावर पडला होता .तो आज कुठेतरी जाऊन मोलमजुरी करू लागला. सदा मोलमजुरी करायचा आणि कमावलं तेवढं दारूच्या व्यसनांपायी घालवून टाकायचा. इकड जानकी आपला संसार स्वतःच्या हिंमतीवर चालवू लागली. पोरगं सख्याला गावातील रामा पुढा-याकड गुरं राखायला ठेवलं. ते रोज रानात गुरं चारायला घेऊन जाऊ लागलं. पोरगी प्राजक्ताला मुंबईला तिच्या चुलत्याकड धाडलं. प्राजक्ता मुंबईत घरकाम करुन स्वतःच्या लग्नासाठी पैसा -अडका जमवू लागली. शेवटी या विनाशकारी विळख्यात अडकलेला संसार सावरायचा जानकीनं प्रयत्न सुरु केला .आता संघर्ष हा तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता.




Rate this content
Log in