सैनिकोहो तुमच्यासाठी...
सैनिकोहो तुमच्यासाठी...


सायंकाळचे पाच वाजत होते. शाळा सुटल्यानंतर इमारतीच्या परिसरात असलेल्या त्या बागेत नेहमीप्रमाणे चार-पाच मुले जमली होती. थोडा वेळ बसून गप्पा मारून झाल्या की मग खेळायला जाणे हा त्यांचा ठरलेला नित्यक्रम होता. आठव्या-नवव्या वर्गात शिकणारी ती सारी मुले अभ्यासक्रम आणि खेळ यासह इतर शालेय उपक्रमात हुशार होती. विविध विषयावर ती मुले खूप छान चर्चा करताना महत्त्वाचे मुद्दे मांडत असत.
"अरे, आज आपल्या सैनिकांनी पाच अतिरेकी ठार केले असल्याची बातमी मी आत्ताच टीव्हीवर पाहिली. कसल्या अवघड ठिकाणी ते अतिरेकी लपून बसले होते. बाप रे! बातम्यात ती जागा पाहताना मला भीती वाटत होती यार. पण आपले सैनिक किती शूर, धाडसी, बेडर आहेत. तितक्या अडचणीत जाऊन त्यांना पत्ता न लागू देता त्यांचा खात्मा केला रे. मला तर बातमी पाहताना आपल्या शूर सैनिकांचा खूप अभिमान वाटला रे. मी तर त्यांना सलाम केला भाऊ."
"खरे आहे. आपले भारतीय सैनिक आहेतच तसे. म्हणून तर त्यांच्या पराक्रमाच्या गाथा, सिनेमा, कथा, कविता, पोवाडे सारे काही ऐकावे, पाहावे, वाचावे वाटते. कंटाळा येत नाही."
"ते तिकडे ऊन, थंडी, वारा, पाऊस अशा वातावरणात ठामपणे, हातात प्राण घेऊन उभे असतात म्हणून आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. सुखाचे चार घास खाऊ शकतो."
"मला की नाही एक कविता आठवली. खूप आवडते ती मला. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले ते गीत आहे. आमच्याकडे त्या गीताची सीडी आहे. मी नेहमीच ऐकतो ती..."
"अरे, मग म्हण की. आम्हालाही ऐकायला आवडेल. आपल्या सैन्याचा पराक्रम..."
"भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी..."
"व्वा. किती सोप्या शब्दात वर्णन केले आहे ना...तिकडे कुटुंबापासून दूर राहणाऱ्या, जीव धोक्यात घालून लढणाऱ्या शिपायांच्या कुटुंबातील व्यक्तींना जशी त्यांची क्षणोक्षणी आठवण येते, त्यांच्यासाठी जीव तीळतीळ तुटतो, जेवण गोड लागत नाही, अशीच अवस्था साऱ्या भारतीयांची होते. ह्या भावना ज्या ज्या वेळी आपल्या सैनिकांपर्यंत पोहचतील, आपले देशबांधव आपल्या सोबत आहेत हे त्यांना समजेल त्यावेळी त्यांच्या अंगात हजारो हत्तीचे बळ येईल आणि ते एका वेगळ्याच त्वेषाने, स्फूर्तीने, जोशाने शत्रूवर तुटून पडतील."
"पुढे ऐका...
वावरतो फिरतो आम्ही, नित्यक्रम अवघे करतो
राबतो फिरतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमची, आतडे तुटतसे पोटी... सैनिक हो तुमच्यासाठी..."
"खरे आहे. आपण आपली सारी कामे, व्यवहार करतो. जिथे पाहिजे तिथे जातो, मन मानेल तसे वागतो, जे हवं ते खातो. आपण आपल्या राज्यात, शहरात, गल्लीत, घरात, शाळेत सर्व ठिकाणी आपापली कामे करीत असतो. आपल्या घरातील मोठी माणसं आपल्या घरातील माणसांची विशेषत: लहान लहान मुलांची पोटं भरावीत, त्यांच्या आवडीचे त्यांना खायला-प्यायला मिळावे म्हणून काम करीत असतात..."
"थोडं पुढे जाऊन मी या ओळीचा मला समजलेला अर्थ सांगतो. घरातील बालकांना चांगले खायला मिळावे म्हणून धडपडणारी आपल्या घरातील ज्येष्ठ माणसे त्याच बालकांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून प्रयत्नशील असतात. परंतु हे करताना प्रत्येकालाच ज्यावेळी सैनिकाची आठवण येते त्यावेळी ते जे काम करीत असतील अर्थात जेवण जरी करीत असतील तरीही त्यांचा हात क्षणभर थांबतो. घास घशात अडकतो. आतडी पिळवटून येते. अशी जी परिस्थिती सैनिक बांधवांच्या घरोघरी असते तशीच परिस्थिती सामान्य माणसाची होते. जरी त्यांच्या घरचे सैन्यात कुणीही नसले तरीही जे आज आमच्यासाठी स्वतःच्या तळहातावर स्वतःचे शीर घेऊन उभे असतात ते आमच्या घरातील, आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत या भावनेने त्यांचे डोळे भरुन येतात, हृदय हेलावून जाते आणि म्हणून राष्ट्रीय दिनी म्हणजे पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी अशा महत्त्वाच्या दिवशी भारत मातेच्या जयजयकारासोबत सारा देश भारतीय जवानांचा जयघोष करतो. त्यांना मानाचा मुजरा करतो... म्हणूनच आपले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' हा नारा देऊन सैनिक आणि शेतकरी दोघांचेही महत्त्व अधोरेखित केले होते."
"अगदी खरे आहे. या रचनेत गदिमा पुढे म्हणतात,
आराम विसरलो आम्ही, आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडून या इकडे, वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रूंची, डोळ्यात होतसे दाटी
सैनिक हो तुमच्यासाठी..."
"किती सुंदर वर्णन केले आहे ना. सैनिकाला उद्देशून कवी म्हणतात, तुमच्याकडे पाहून ....'आराम हराम है ' अशी तुमची अवस्था पाहून, तुमच्यापासून स्फूर्ती घेऊन आम्ही आळसाला दूर ढकलून, आराम न करता, न थकता, न कंटाळता काम करीत असतो. मधूनच आमच्या देशाच्या उत्तरेकडून अर्थातच आमच्या शत्रूकडून दुश्कृत्य केल्याच्या, आमच्या देशाच्या भूभागावर हल्ला केल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या, वाऱ्यासह येऊन धडकतात. त्यावेळी भीतीने अंग शहारते. डोळ्यात अश्रू गर्दी करतात. स्वतःच निष्प्राण झाल्यासारखे वाटते. समोर येतो तुमचा कधीच न पाहिलेला चेहरा, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची स्थिती, त्यांचा पोटात खळबळ माजवणारा आक्रोश. तुमच्या पराक्रमापुढे नतमस्तक होताना वाटते, असेच उठून सीमेवर जावे, तुम्हाला भेटावे, तुम्हाला धीर द्यावा आणि आमच्या देशाकडे डोळे वाकडे करून पाहणारांचे डोळे गरमागरम सळई घालून फोडावेत, त्यांना कंठस्नान घालावे. परंतु ज्यावेळी आमच्या लक्षात येते की, आम्ही काहीही करू शकत नाही त्यावेळी आमचा जणू शक्तिपात होतो. भावना दाटून येते... 'सैनिक हो तुमच्यासाठी आम्ही काय करू शकतो?'.... भावनाविवश होणे एवढेच आपल्या हाती आहे..."
"ऐका आता गदिमांच्या पुढल्या हाका...
उगवला दिवस मावळतो, अंधार दाटतो रात्री
माऊली नीज फिरविते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्नात येऊनी चिंता काळजा दुखविते देठी...सैनिक हो तुमच्यासाठी..."
"सीमेवर लढणाऱ्या सुपुत्राची स्थिती मला वाटते या कडव्यात वर्णन केली आहे. उगवलेला दिवस मावळतो. अंधार दाटून येतो. जणू तो रात्रीसह सर्व चराचराला कवेत घेतो. अशावेळी थकल्याभागल्या मुलांच्या शरीरावर स्वतःचे हात फिरवून त्याला त्याची आई झोपी घालते. परंतु ज्यावेळी ती स्वतः झोपते त्यावेळी तिच्या स्वप्नात कोण येते? तिचा सीमेवर लढणारा सुपुत्र तिच्या स्वप्नात येतो आणि तिचे काळीज खोलवर चिंतेच्या आगोशात जाते..." तो बोलत असताना अचानक टाळ्यांचा आवाज आला. सर्वांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. एक आजोबा टाळ्या वाजवत त्यांच्या दिशेने येत होते. जवळ येताच ते म्हणाले,
"व्वा! मुलांनो, व्वा! मघापासून तुमची चर्चा ऐकतोय. खूप छान माहिती आणि ज्ञान आहे तुमच्याजवळ. मला आवडली ही तुमची चर्चा. नाहीतर तुमच्या वयाची मुले सिनेमा, गाणी अशाच गोष्टींचा उहापोह करतात..."
"पण आजोबा..."
"आले लक्षात. आपण यापूर्वी भेटलो नाहीत. मी कालच गावाकडून आलोय. इथे माझी मुलगी राहते. दिवसभर बसून कंटाळा आला म्हणून इथे आलो. नंतर तुम्ही आलात. आणि काय सुंदर विश्लेषण केले तुम्ही गदिमांच्या या रचनेचे. बहुत खुब!"
"आजोबा, बरोबर आहे ना? काही चुकत तर नाही ना आमचे?"
"नाही. काहीही चुकत नाही. कसे आहे, ह्या रचना अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत. शब्द, भाषा बदलत नसली तरीही कधीकधी त्या काळचे संदर्भ आपल्या लक्षात येत नाहीत. तुम्ही सर्व कडव्यांचा अर्थ अगदी बरोबर घेतला आहे. हे जे शेवटचे कडवे आहे ना, त्याचा अर्थ मला थोडासा वेगळा वाटतो याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असा मुळीच नाही..."
"आजोबा, सांगा ना, आम्हाला आवडेल तुम्ही सांगितले तर."
"ही संपूर्ण कविता म्हणजे भारतीय नागरिकांनी आपल्या सैनिकांच्यासाठी गायिलेली थोरवी आहे. सैनिकांप्रती व्यक्त केलेल्या हृदयस्पर्शी भावना आहेत. सारा देश सैनिकांच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे हे सांगणारी ही रचना आहे. त्यामुळे मला वाटते 'उगवला दिवस मावळतो...' या कडव्यात उगवलेला दिवस मावळला आहे. रात्रीचा अंधार सर्वत्र दाटलेला असताना एक माऊली आपल्या बाळांंना झोप लागावी म्हणून त्याच्या थकलेल्या, भागलेल्या शरीरावरून हात फिरवून त्याला झोपविण्याचा प्रयत्न करते. मुलांनो, या ठिकाणी कविराजांनी माऊली कुणाला म्हटलंय तर झोपेला... नीज म्हणजे झोप या अर्थाने. होते काय तर आपण झोपेच्या स्वाधीन झालो की, अनेकांना स्वप्ने पडतात. तुम्हाला पडतात की नाही..."
"हो. आजोबा, खूप स्वप्ने पडतात..."
"बरोबर. यात असे म्हटलय की, ज्यावेळी आपण सारे भारतीय नागरिक झोपेत असतो त्यावेळीही आपल्या स्वप्नात आपले शूर शिपाई येतात कारण आपल्याला त्यांची चिंता सतत सतावत असते. अविरत दुःख होणाऱ्या मातेप्रमाणे सैनिकांच्या चिंतेने, काळजीने काळजाला जणू तडे पडल्याप्रमाणे मुळापासून तिला दुःख होते. फक्त याच कडव्यात नाहीतर संपूर्ण कवितेत भारतीयांना आपल्या सैनिकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमासोबत, अभिमान तर वाटतोच वाटतो परंतु त्यासोबतच एक प्रकारची ओढ, चिंता, सहानुभूती अशा भावनाही दाटून येतात. क्षणोक्षणी, पदोपदी त्यांची आठवण येताच हृदय हेलावून जाते. डोळे भरून येतात, असे काही मला भावले..."
"आजोबा, खरेच. खूप छान सांगितले तुम्ही. एक नवीन दृष्टी मिळाली."
"मुलांनो, एक सांगू का, भावार्थ आपल्याला भावतो, पटतो तोच खरा. लिहिताना कवीचा एक वेगळा हेतू असतो, वातावरण वेगळे असते. ठीक आहे. चालू द्या तुमचे. मी येतो..."
"आजोबा, थांबा ना थोडा वेळ. शेवटचेच कडवे राहिले आहे."
"बरे, थांबतो. पण त्याचा अर्थ अगोदर तुम्हाला जसा वाटला तसा सांगा..."
"पुढच्या ओळींमध्ये कवी असे म्हणतात...
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणास घेऊनी हाती
तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी, झुरतात अंतरे कोटी
सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी..."
"मला वाटते की, कवी असे म्हणतात की, सैनिक हो, तुम्ही तुमचे प्राण हातात घेऊन, समोर शत्रू उभा ठाकलेला असताना, बंदुकीच्या गोळ्या सारख्या तुमच्या दिशेने येत असतानाही तुम्ही देशाचे रक्षण करताना केवळ देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवत असता असे नाहीतर देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जीवांचेही रक्षण करीत असता. एवढेच नाहीतर सैनिकहो, तुम्ही आहात म्हणून आमची शेती, घरदार, पैसाअडका सारे काही सुरक्षित आहे. तुमचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. सुखाचे चार घास आम्ही खात आहोत ते तुमच्या भक्कम पाठिंब्यावर, तुमच्या शौर्यावर! पण एक सांगू का, सैनिक बांधवांनो, आमचे ही हृदय तुमच्यासाठी तुटते, झुरते. तुमची आठवण आली की, घास घशाखाली उतरत नाही, मन भरून येते, उदास होते..."
"मुलांनो, खूप छान. तुमचे अगदी बरोबर आहे. सैनिकांबद्दलच्या आपल्या भावना, संवेदना प्रकट व्हाव्या, हा देश, या देशातील नागरिक तुमच्यासोबत आहेत हे त्यांना कळावे म्हणून अनेक नागरिक शहरात कुठेही आपला सैनिक दिसला की, त्याला जयहिंद करतात..."
"हो आजोबा. परवा आम्ही रेल्वेने गावाला जात होतो. रेल्वेत गर्दी खूप होती. आमचे आरक्षण होते म्हणून आम्हाला जागा मिळाली होती. त्या गर्दीत एक शिपाई जणू एका पायावर उभा होता. ते पाहून माझ्या बाबांनी त्या सैनिकमामाला आमच्या आसनावर सामावून घेतले. थोडी अडचण झाली परंतु त्या मामाच्या चेहऱ्यावर आलेले आनंदाचे, समाधानाचे भाव पाहून आम्ही सारे काही विसरलो. नंतर त्याने सांगितलेल्या गोष्टी, त्याच्यावर आलेले प्रसंग ऐकून माझी आई तर अक्षरशः रडायला लागली. एक मस्त अनुभव आला."
"आजोबा, राखी पोर्णिमेला अनेक बायका सैनिकांना राखी बांधण्यासाठी त्यांच्याकडे जातात. त्यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची स्फूर्ती, उत्साह येत असेल ना?"
"अगदी बरोबर आहे. कुणीतरी आपलं आहे, आपण एकटे नाही आहोत, आपला सारा देश आपल्या पाठीशी आहे ही भावना त्यांच्या मनात हजार हत्तींचं बळ निर्माण करीत असेल. नव्या उमेदीने, नव्या ताकदीने ते पुन्हा देशाच्या संरक्षणासाठी उभे राहत असणार."
"आजोबा, मी तर ठरवलंय की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय फौजेत जायचं, आपल्या देशाचे, नागरिकांचे रक्षण करताना भारतमातेच्या दिशेने वाकडा डोळा करणारांना, अपशब्द बोलणारांना चांगलाच धडा शिकवायचा, त्यांच्या नरडीचा घोट घ्यायचा..."
"मी पण तुझ्यासोबत सैन्यात येणार..." असे म्हणत एका मुलाने हात पुढे केला. दुसऱ्याच क्षणी प्रत्येकाने त्याच्या हातात हात देत मनोमन सैन्यात जाण्याची जणू प्रतिज्ञा घेतली. तितक्यात त्यांच्यापैकी कुणीतरी उत्स्फूर्तपणे म्हणाले,
"भारत माता की....." तेवढ्याच जोशात त्याला सर्वांनी साथ दिली,
"जss य..."
त्या मुलांचा तो जोश, तो आवेश पाहून आजोबांना त्यांच्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेणारे मावळे दिसले. डोळ्यांच्या कडा पुसत आजोबांनी त्या मुलांचा निरोप घेतला...