Nagesh S Shewalkar

Others


5.0  

Nagesh S Shewalkar

Others


साडी संक्रांतीची

साडी संक्रांतीची

10 mins 2.1K 10 mins 2.1K

** साडी संक्रांतीची **

मी दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत असताना माझ्या कानावर आवाज आदळला,

"अ ss हो ss..." दिवाणखान्यात माझ्याशेजारी कुणी बसलेले असते तर कदाचित त्या आवाजाने त्याची कानठळी बसली असती. परंतु वर्षानुवर्षे मला आणि माझ्या कानांना त्या आरोळीची सवय झाली होती.

"वर्तमानपत्र वाचताय का?" स्वयंपाक घरातून बाहेर येत सौभाग्यवतीने सौम्य आणि लाडिक आवाजात विचारताच मी मनोमन ओळखले की, इतक्या प्रेमळ अंदाजाने संवाद सुरू झाला आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी हेतू असणार.

"हे पण वाचा ना..." मधाळ स्वरात बोलत ब्लाउजच्या आत दडवलेला एक कागद काढून, त्याची घडी उकलून माझ्या हातात दिला. मी त्या कागदावर एक ओझरती नजर टाकली. संक्रांत तोंडावर होती. त्यानिमित्ताने एक ऑफर होती.

"हे..हे...पांपलेट तुला कुठे सापडले?" मी आश्चर्याने विचारले. कारण जाहिरात युगात दररोजच्या वर्तमानपत्रासोबत तशी दहा-पाच पत्रके हमखास येत असतात. वर्तमानपत्र आल्याबरोबर मी आधी साऱ्या पत्रकांवरून नजर टाकतो. त्यातली 'बायकोच्या कामाची आणि माझ्या खिशाला कात्री लावू पाहणारी' पत्रकं मी बायकोपर्यंत जाऊच देत नाही.

"हे पत्रक आपल्याकडे कसे आले नाही?मी आत्ता जोशीबाईंकडे त्या कोणती भाजी करत आहेत हे पाहायला गेले होते तर जोशीभाऊजींनी मला हे दिले आणि हळू आवाजात म्हणाले की, वहिनी, हे पत्रक तुमच्यासाठी आहे. घरी जाऊन वाचा हं. आमच्या हिला दाखवू नका...." सौ ते सारे सांगत असताना माझ्या तळपायाची आग मस्तकात शिरली आणि मी मनातल्या मनात कडाडलो,

'अच्छा! जोश्या, असा डाव खेळलास का? आता माझीही चाल बघ. नाही तुझ्याकडून तुझ्या बायकोला एकदाणी उकळायला लावली ना,तर नाव नाही सांगणार.... "अहो, कोणत्या विचारात आहात? हे वाचता ना?"

"हो. हो. वाचतो...." असे म्हणून मी ते पत्रक वाचू लागलो. त्यात लिहिले होत,

'आजकाल आपल्या शहरामध्ये दुचाकीस्वारासोबत पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. साडीची आवड नसणारी आणि साडीची निवड करताना भरपूर सवड नसलेली स्त्री शोधूनही सापडणार नाही. सोबतच महिलांना मॅचिंगचीही आवड असतेच असते. अगदी हातापायांच्या बोटांना लावले जाणारे पॉलिश, चप्पल, बांगड्या, टिकली, लिपिस्टिक, केसांना काबुत ठेवणारे बो अशा प्रत्येक गोष्टी त्यांना साडीसोबत मॅचिंग हव्या असतात. महिलांची रंगसंगतीची आवड लक्षात घेऊन आम्ही प्रत्येक साडीला रंग आणि डिझाइन्सला मॅच होणारे, खुलणारे हेल्मेट देण्याची व्यवस्था केली आहे...' मी ते पत्रक वाचत असताना मला पूर्ण वाचू न देता बायको म्हणाली,

"कित्ती छान ऑफर आहे ना, साडीसोबत मॅचिंग हेल्मेट फ्री! शिवाय ही योजना फक्त आजच्या दिवसासाठी आहे. संक्रांत आलीच आहे. साडी घ्यायचीच आहे तर मग जाऊया आपण. नाहीतर मीच जाऊन येते. साडी खरेदी म्हटलं की, तुमच्या कपाळावर आठ्याच आठ्या. तुम्ही एक काम करा ना, स्वयंपाक राहिला आहे तर तेवढी खिचडी लावा ना. पैसे देता ना?"

"पैसे? साडीसाठी ना? देतो की. अग, आजकाल एवढे पैसे आपण कुठे जवळ ठेवतो? एटीएम..." मला पूर्ण बोलू न देता कारभारीन म्हणाली,

"एटीएममधून कशाला काढता? त्यातही खडखडाट असतो सर्वदा. त्यापेक्षा मीच कार्ड घेऊन जाते..." असे म्हणत तिने माझ्या पॅन्टमधून कार्ड काढूनही घेतले. ते पाहून मी म्हणालो,

"अ...अग...अग..."

"घाबरू नका. जास्त महागाची नाही आणणार. फार तर पाच..सात हजाराची आणते.."

"काssय? सात हजाराची?"

"नाही हो. एवढ्या महागाची कशी घेईन? पाच-सहाशेची घेते. साड्या ठेवायला कपाटात जागा तरी कुठे आहे? कपाट उघडले न उघडले की कोंबलेल्या साड्या बदाबदा खाली पडतात. मॅचिंग हेल्मेट फ्री मिळतेय म्हणून घेतीय. नाहीतर या वर्षी मला संक्रांतीची साडी घ्यायचीच नव्हती...." असे म्हणत ती बाहेर पडत असताना मी म्हणालो,

"अग, जोशीबाई येणार नाहीत का?"

"नाही. काही बोलल्या नाहीत. मी पण सांगितले नाही."

"अस ग कस, तुम्ही दोघी जीवश्च कंठश्च मैत्रिणी ना? मग त्यांना न सांगता अशी फायद्याची खरेदी केल्यावर त्यांना राग येणार नाही का? वाईट वाटणार नाही का?"

"अग बाई, खरेच की. बरे झाले तुम्ही आठवण करून दिली ते. घेऊनच जाते वहिनींना ..." असे म्हणत सौभाग्यवती जोश्यांच्या घरी गेल्याचे पाहून मी पुटपुटलो,

'क्या कहते हो, जोशीजी? हम किसी का उधार नही रखते...'

संक्रांत! शेवटी तिने माझ्याकडे वक्रदृष्टी वळवली तर! तसे पाहिले तर संक्रांतीची साडी ही महिलांसाठी हक्काची साडी! नववर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत! बाजार करण्याची आवड असणाऱ्या महिला जानेवारी महिन्याच्या दोन -तीन तारखेपासून खरेदीसाठी गर्दी करतात. इतर खरेदीपेक्षा बायका मनापासून रमतात त्या साडीच्या दुकानात. दुकानातील माणसाने साड्यांचा ढीग जरी समोर टाकला तरी बायकांचे लक्ष कपाटातील साड्यांवरच असते. त्यात एखादी वेगळी साडी दिसली की, बाई म्हणणार, 'ती काढा ना हो. ती..ती.. नाही ती नाही. तिच्या बाजूची...ती नाशी रंगांची...' असे सांगूनही त्या माणसाच्या लक्षात आले नाही तर तर एखादी स्त्री स्वतः उठून जाते आणि हवी असलेली साडी ओढून काढत असताना शेजारची एखादी बाई म्हणते की, ही करा पॅक...त्यावेळी दुकानातील एकूणएक महिलांच्या असुयायुक्त नजरा त्या साडीवर जातात. ती साडी पाहून एखादी महिला म्हणतेही, 'अहो, तशी दाखवा ना एखादी....'

दुकानात बायका साडी पसंतीच्या कार्यक्रमात दंग झालेल्या असताना त्यांचे नवरे मात्र रडणाऱ्या मुलांना घेऊन दुकानाच्या बाहेर उभे असतात. आक्रस्ताळेपणाने रडणाऱ्या एखाद्या मुलाला घेऊन एखादा पती दुकानात येऊन म्हणतो,

"अग, झाले का? आटोप की लवकर..."

तेव्हा एखादी तोफ कडाडल्याप्रमाणे पत्नी म्हणते,"थांबा हो. तुम्हाला काय कळते? संक्रांतीची साडी घ्यायची आहे. गेल्या वर्षी मला दुर्बुद्धी सुचली आणि तुम्हाला साडी आणायला सांगितली तर तुम्ही घेऊन आलात अठराव्या शतकातील साडी. कधी नव्हे त्या काळकुट्या मोरेबाईला संधी मिळाली. तिला तर काय, तिच्या हातात जणू कोलितच पडले...."

"बाईसाहेब, साडी बघता ना?" कंटाळलेला माणूस विचारतो.

"साडीच बघायला आले ना?" त्या नोकरावर ती सारा राग काढते. असे अनुभव सर्वांनाच विशेषतः मध्यमवर्गीयांना हमखास येतात. त्यादिवशी आमच्या सौभाग्यवती एटीएम कार्ड घेऊन साडी खरेदी करण्याच्या मोहिमेवर गेल्या होत्या. त्यामुळे मी कमालीचा अस्वस्थ, उदास झालो होतो. मात्र एक समाधान जरुर होते,ते म्हणजे बायकोसोबत सौ जोशीही गेल्या होत्या....

खूप दिवसांपासून मनात घोळणारा कथाविषय कागदावर उतरवावा म्हणून मी शब्दांची जुळवाजुळव करत होतो. पण छे! मुड नसताना शब्द आठवतीलच कसे? बसलो आपला विचार करत.... शब्दांची आराधना करत... असाच थोडा वेळ गेला. मी माझ्या तंद्रीत असताना सोफ्यावर माझ्याशेजारी कुणीतरी दणकन बसले आणि सी-सॉ च्या फळीप्रमाणे मी वर उडालो. दचकून पाहतो तर शेजारी माझा गलेलठ्ठ मित्र नितीन त्रासलेल्या, वैतागलेल्या चेहऱ्याने बसला होता.

"कोण नितीन तू? अरे, किती दचकलो मी."

"चूप बे. वहिनी, पाणी आणा हो. आणि फक्कड चहा करा बरे."

"अरे, तुझी वहिनी गेलीय संक्रांतीच्या बाजाराला." मी म्हणालो.

"काssय? संक्रांतीचा बाजार?" नितीनने दचकून विचारले.

"हो. पण तू असा काय ओरडतोस?" मी विचारले.

"अरे, कित्ती नशीबवान आहेस रे तू?"

"नित्या, माझी बायको माझे एटीएम घेऊन गेली आणि तू मला नशिबवान म्हणतोस?"

"होय. वहिनी स्वतःच बाजारात गेल्या हे काय कमी आहे? नाही तर आम्ही... अरे, त्या संक्रांतीच्या बाजारापेक्षा कुणी बाँब टाकला असता तर बरे झाले असते."

"का रे, संक्रांतीच्या निमित्ताने वहिनीने बरेच लुबाडलेले दिसते आहे की. चप्पलहार, बनारशी..." मी गमतीने विचारत असताना नितीन भडकून म्हणाला,

"तुला चप्पलहार आठवतोय? चप्पल लगावल्याप्रमाणे झालेला माझा थोबडा दिसत नाही. म्हणे बनारशी? अरे, त्या बनारशीपेक्षा मी संन्यास घेऊन काशीला जाणे पसंत करेन."

"अशाला कशाला गया आणि काशी..."मी त्याला चिडवत असताना तो ओरडून म्हणाला,

"सांगून ठेवतो हं. आता खूप झाले हं...." तो वैतागून बोलत असल्याचे पाहून मी शांतपणे विचारले,

"काय झाले? काय बिनसले ते सांग बरे..." म्हणत मी शेजारी ठेवलेला पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला . ते पाणी पिऊन शांत झालेला नितीन सांगू लागला........

त्यादिवशी सकाळी नितीनला जाग आली तीच मुळी घरातल्या आदळ आपटीने. नेहमी प्रसन्न वातावरणात होणारी सकाळ आज अशी का उगवली, असा प्रश्न मनाला विचारत त्याने दात घासले. तितक्यात नयना चहाची कपबशी त्याच्यासमोर आदळून निघून गेली. चहा संपवून नितीनने कशीबशी आंघोळ केली. स्वयंपाक घरातून कुकरची शिट्टी ऐकू आली. नयना रागातच होती. शिट्टी झाल्यानंतर वाफ दबून कुकर शांत झाले होते. परंतु नयना काय बिघडले ते सांगतही नव्हती उलट पाण्याला उकळ्या फुटाव्या आणि त्यावरील झाकण ताडताड उडावे त्याप्रमाणे ती आतल्या आत धुमसत होती. आंघोळ झाल्यानंतर त्याने लगबगीने स्वतःचे सारे खिसे तपासले. कार्यालयातल्या एखाद्या सहकाऱ्याने मुद्दाम त्याच्या खिशात गजरा,लेडीज रुमाल टाकला तर नसेल ना या शंकेने परंतु तसे काही नव्हते. शेवटी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करावा म्हणून नितीन स्वयंपाक घरात गेला. नयना पोळ्या लाटत होती. पोळ्यांना अश्रुरुपी तुपाने माखणेही चालू होते. लालेलाल डोळे, घोड्याप्रमाणे फुरफुरणारे नाक काहीतरी बिनसल्याचे सांगत असताना नितीनने लाडात येऊन विचारले,

"काय झाले नयना डार्लिंग? व्वा! काय मस्त वास येतोय भाजीचा! काय टाकलेस ग?"

"माझं डोंबलं टाकलय! पगार होऊन चार दिवस झाले. रोज वाट पाहतेय, आज म्हणाल, उद्या म्हणाल. पण तुमचे आपले..." म्हणत नयनाने डोळे उजव्या दंडावरच्या ब्लाउजला तर नाक डाव्या दंडावरच्या ब्लाउजला घासले.त्यामुळे नाक अधिकच लालेलाल झाले.

"अग, पण झाले तरी काय? आईबाबांकडे जायचे का?"

"वर हा असा फाजीलपणा. आज किती तारीख आहे हो?"

"त...त.... तेरा जानेवारी! बाप रे, बाप! उद्या संक्रांत? माय गॉड! मी विसरलोच होतो."

"नशीब माझे! आत्ता तरी आठवले. नाही तर, माझे गेले असते पुढे...." असे बडबडणाऱ्या नयनाला मध्येच अडवत नितीन म्हणाला,

"असे बोलू नको ना. आत्ता ताबडतोब रजा पाठवून देतो आणि मस्तपैकी साडी आणतो... तीही माझ्या पसंतीची!" "काही नको. साडीबिडी!" नयना धुसफुसत म्हणाली.

काही वेळातच नितीन बाजारात पोहोचला. घरून निघताना त्याला वाटले होते, दहा वाजत आहेत. त्यामुळे दुकांनामध्ये गर्दी नसेल. परंतु त्याचा अंदाज साफ चुकला. दुकानात बायका आणि बाहेर लेकरं सांभाळणारे नवरे! पुढील दुकानात घेऊ म्हणता म्हणता नितीनची कुठेही डाळ शिजत नव्हती. अनेक दुकानांपुढे तर चक्क 'नवऱ्यांना-पुरुषांना प्रवेश बंद!' असे फलक लावले होते. शेवटी तो एका दुकानात शिरला. त्या दुकानातही भरपूर गर्दी होती. त्याच्याकडे बघायलाही कुणाला वेळ नव्हता. वाट पाहून त्रासलेला नितीन म्हणाला,

"दादा, साडी घ्यायची होती."

"थांबा हो. बघता ना, आम्ही का रिकामे बसलो आहोत?" नोकराने सारा वैताग नितीनवर काढला. थोड्या वेळाने दुसऱ्या एका नोकरास त्याची दया आली आणि त्याने आठ दहा साड्या नितीनसमोर टाकल्या. आपण काय पाहतोय आणि काय नाही अशा परिस्थितीत त्याने एक साडी उचलली. पैसे देण्यासाठी तो काउंटरवर गेला. साडीची किंमत ऐकून तो दचकला. पैसे मोजून तो दुकानाच्या बाहेर आला. त्याने घड्याळ बघितले. दुपारचे चक्क दोन वाजत होते. सकाळी दहा वाजता घराबाहेर पडलेल्या नितीनने कपभर चहाशिवाय काहीही घेतले नव्हते. नितीन घरी पोहोचला त्यावेळी नयना पलंगावर पडून फुसफुसत होती. तिचा असा समज झाला होता की, साडी आणतो अशी थाप मारून नितीन चक्क कार्यालयातच गेला आहे. नितीन शयनगृहात पोहोचला आणि आनंदाने म्हणाला,

"ऐ नैने, उठ. बघ तर. साडी आणलीय....दोन हजाराची!..." ते ऐकताच झाले गेले विसरून नयनाने चक्क पलंगावरून उडी मारली. नितीनच्या हातातील पिशवी हिसकावून तिने आतली साडी ओढून काढली. साडीला आलटून पालटून बघत ती म्हणाली,

"ही दोन हजाराची साडी? काही कळते का? काय हा भडक रंग? त्यावरची ही डिझाइन बघा, कशी झूल वाटतेय. शेजारच्या कुंदीची साडी बघा, केवळ तीनशेची! मोनालीची पाचशेची साडी लाख पटीने बरी. दाखवू का आणून तुम्हाला? मी काय खेडवळ वाटले तुम्हाला, कशीही साडी आणून खुश करायला..."

"अग पण, ही महागाची आहे, ही बघ पावती.."

"पावती घाला खड्ड्यात. पोतेरे आणलेत नुसते. चला. कुठल्या दुकानात घेतली ते दाखवा..." म्हणत नयनाने कशीबशी दुसरी साडी नेसली आणि दोघे निघाले.....

नंतरच्या तीन तासात नितीन संचारबंदी असल्याप्रमाणे नयनाच्या मागे मागे हिंडत होता. शेवटी एकदाची नयनाने साडी पसंत केली आणि नितीनचा जीव भांड्यात पडला. नयनाच्या पाठोपाठ दुकानाच्या बाहेर आलेल्या नितीनजवळ ती साडी देत नयना म्हणाली,

"साडीला पिको फॉल करून आणा. मी घरी जाऊन तुमच्या आवडीची कांदाभजी करते......" साडीपुराण ऐकवणाऱ्या नितीनला मी विचारले,

"झाले का पिकोफॉल?"

"ऐकतर. त्यासाठी खूप दुकाने फिरलो. परंतु तिथेही भयंकर गर्दी आहे. आजच काय पण पुढील दोन दिवसातही कुणी द्यायला तयार नाही. शोधत शोधत इकडे आलो. तुझ्या घरासमोर पिकोफॉल करणाऱ्या बाईंना विचारले. पण त्याही तयार होत नव्हत्या..."

"अरे, साडीची खरेदी तर झाली ना,पिकोफॉल काय नंतरही करता येईल ना.."

"नाही रे बाबा, नाही. मी मुद्दामच केले नाही असा नयनाचा समज होईल. अरे, अक्षरशः त्या बाईंचे पाय धरले. तेव्हा ती तयार झाली. तेही दुप्पट भावाने...." नितीन बोलत असताना आमच्या सौभाग्यवतीचे आगमन झाले. तिच्या अवताराकडे आम्ही पाहतच राहिलो. तिच्या डोक्यावर रंगीबेरंगी हेल्मेट होते, त्यावर चित्रविचित्र चित्रेही काढली होती. चेहऱ्यावर येणारे हेल्मेटचे आवरण वर केल्यामुळे चेहरा अर्धवट दिसत होता. डोळ्यावर नवाकोरा गॉगल होता. आत येताच नितीनकडे पाहून तिने विचारले,

"काय भाऊजी, झाली का संक्रांतीची खरेदी?..." नितीनला बोलण्याची संधी न देता नवीन आणलेली साडी पिशवीतून काढून माझ्याकडे पाहून तिने विचारले,

"कशी आहे हो साडी? साडेतीन हजाराची आहे."

"काय? साडेतीन हजाराची?"

"अहो, थांबा. ऐका ना. झाले काय, त्या दुकानात बायकांची एवढी गर्दी होती ना भाऊजी, आजकाल फ्री म्हटलं उड्या पडतात बायकांच्या. गर्दीमुळे नीट पाहताही येत नाही. बरे,दुकानदारही महावस्ताद

ऑफरच्या नावाखाली आवळा देऊन कोहळा काढतात. दुकानदारास म्हणाले की, बाबा रे, पाचशे-सातशेची चांगली साडी दाखवा तर तो नाक मुरडून म्हणाला, थांबा थोडे. हे मोठे गिऱ्हाईक होऊ द्यात. मग बघू. काय बाईसाहेब, संक्रांतीची साडी घेताय आणि तीही फक्त पाचशेची! पाचशेच्या साडीवर हेल्मेट फ्री नाही हं. साहेबांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. त्याच्या अशा कुत्सित बोलण्याने मला असे लाजीरवाणे झाले म्हणता. असा राग आला त्याचा ना मग त्याच तिरमिरीत घेतली मग ही साडी. त्यामुळे हेल्मेट आणि हा गॉगलही फ्री मिळालाय. अहो, बघा ना साडी ..."असे म्हणत साडी माझ्याकडे देण्यापूर्वी पुन्हा स्वतःच पुढे म्हणाली,

"अहो, प्लीज एक काम करा ना. ही पावती, ही साडी घेऊन दुकानात जा. तिथे याच डिझाईनची फिक्कट गुलाबी रंगाची साडी आहे. ती आणा ना. ती नोकरमाणसं नीट पाहूसुद्धा देत नाहीत. त्यांच्यापेक्षा खरेदीला आलेल्या बायका त्यांच्या पुढे! ऐका ना,त्याच दुकानाच्या शेजारी पिकोफॉलचे दुकान आहे. तिथून पिकोफॉल करून आणा ना. प्लीज उठा ना. जा ना. ....." सौभाग्यवती बोलत असताना श्री व सौ. जोशी यांचे आगमन झाले. आल्याबरोबर सौ. जोशी मला म्हणाल्या,

"भाऊजी, अनायासे तुम्ही त्याच दुकानात जात आहात तर माझीही साडी बदलून आणा ना. तिथे की नाही, अशीच मोरपंखी रंगाची साडी आहे ती आणा ना. प्लीज. यांनाच पाठवत होते परंतु तुम्ही जाताय म्हटल्यावर पेट्रोलचा डबल खर्च कशाला? शिवाय यांना थोडी थंडीही वाजून आलीय..." सौ. जोशी बोलत असताना मी जोश्यांकडे पाहिले. त्यांनी मला थम्सअप् केले. मी लगेच नितीनकडे पाहिले. तो गालातल्या गालात हसत सकाळपासून त्याच्याभोवती गरगरणारी संक्रांत माझ्याकडे वक्रदृष्टीने बघत असलेली पाहून आतल्या आत खुश होऊन मला लिखाणासाठी एक विषय देत निघाला........


Rate this content
Log in