Nagesh S Shewalkar

Others

3  

Nagesh S Shewalkar

Others

पुरस्कार वापसी!

पुरस्कार वापसी!

8 mins
923


देशातील लोकसभा निवडणुकींचे निकाल लागले आणि मागील पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या पक्षाला आणि पंतप्रधानांना मतदारांनी प्रचंड बहुमताने निवडून दिले. मागील पाच वर्षे पंतप्रधान पदावर असणारी व्यक्तीच पुन्हा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झाले, ती काळ्या दगडावरची रेघ होती, जनतेचा आदेशही तसाच होता. या पंतप्रधानांच्या मागच्या काळात त्यांच्या कार्यप्रणालीवर, विचारसरणीवर ठपका ठेवून, देशात असहिष्णुता माजली आहे, जातीयवादी डोके वर काढत आहेत, दिवसाढवळ्या जुलूम होताहेत, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य या सर्वांवर गदा येते आहे या विचाराने प्रेरित झालेल्या, तथाकथित विचारवंतांनी, बुद्धीवंतांनी सरकार विरोधात एक देशव्यापी चळवळ उघडून ज्यांना ज्यांना शासकीय पुरस्कार मिळाले होते ते त्यांनी सरकारकडे परत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे देशातील हजारो व्यक्तींनी मिळालेले पुरस्कार शासनाकडे परत केले होते. तीन वर्षांपूर्वी झालेल्या या आंदोलनाच्यावेळी 'पुरस्कार वापसी समिती' स्थापन करण्यात आली होती. हे आगळेवेगळे आंदोलन सुरु करणाऱ्या आणि स्वतःचा पुरस्कार सर्वप्रथम परत करून या चळवळीचा श्रीगणेशा करणाऱ्या सुमन बहगले यांना सन्मानाने या समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.....

         

त्यादिवशी सकाळी सकाळी समितीच्या सदस्यांच्या भ्रमणध्वनीवर बहगले यांनी एक संदेश पाठवला. त्यानुसार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समितीची तातडीची बैठक त्यांनी बोलावली होती.

पुरस्कार वापस समितीची स्थापना झाल्यापासून अनेकदा या समितीच्या बैठका झाल्या होत्या. प्रत्येक वेळी बैठकीचा मसुदा अगोदरच पाठवल्या जात असे. मागील काही वर्षात समितीने सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने उभारली होती. कुठे काही कुणावर अन्याय झाला की, बहगले बाईंचे निषेधाचे आणि दोषींवर तातडीने, कठोरातील कठोर कार्यवाही करण्याचे निवेदन विविध माध्यमांच्या माध्यमातून सरकारकडे पोहोचत असे. एकंदरीत समितीने आणि त्यातल्या त्यात अध्यक्षा बाईंनी सरकारच्या विरोधात रान माजवले होते.

        

 बैठकीचा संदेश प्राप्त झाला परंतु नेहमीप्रमाणे बैठकीची विषय पत्रिका सोबत नसल्यामुळे साऱ्या सदस्यांपुढे प्रश्न पडला की, बैठकीचे प्रयोजन काय असेल? समितीतील एका सभासदाने दुसऱ्या सभासदाला फोन लावून विचारले,

"मिळाले का बैठकीचे निमंत्रण?"

"हो. मिळाले. पण विषय नाही समजला. काय असेल? तुम्हाला काही समजले का?"

"नाही ना. म्हणून तर तुम्हाला केलाय मी. काय असेल हो? आपल्या समितीच्या निवडणुका घ्यायचा विचार तर नसेल ?"

"निवडणुका? अहो, आपली समिती कुठे पंजीकृत आहे? चली तो चली, नही तो बरखास्त कर डाली। अशी अवस्था."

"मला काय वाटते, नवे सरकार सत्तारुढ होते आहे त्यांचे अभिनंदन करायचा ठराव घ्यायचा असेल."

"त्यासाठी बैठक कशाला? आतापर्यंत बाईंनी प्रत्येक वेळी सरकार आणि पंतप्रधान यांचा निषेध केलाय. कधी घेतली का बैठक? एका बैठकीत काही सदस्यांनी अशा परस्पर कृतीचा जाब विचारला तर बाईंनी त्या सभासदांची चांगलीच हजामत केली."

"मुस्कटदाबीचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या अध्यक्षा! किती कमाल आहे ना, सरकारच्या विरोधात ज्या कारणांसाठी आपण सारे बुद्धिवंत, ज्ञानवंत, विचारवंत एकवटलो, सरकारच्या असहिष्णू कारभाराचा निषेध म्हणून आपण आपापले मोठमोठे पुरस्कार वापस केले त्याच समितीमध्ये असहिष्णुतेचे वातावरण, हुकूमशाहीचे पडघम वाजत आहेत."

"आणि महत्त्वाचे म्हणजे सरकार विरोधात आवाज उठवणारे आपण सारे या प्रवृत्तीपुढे मुग गिळून बसलो आहोत. ते जाऊ द्या. कदाचित नवीन सरकारचे अभिनंदन करायचे असेल?"

"अभिनंदन? आपले अध्यक्ष? अहो, त्यावेळी जोशात येऊन पुरस्कार वापस केल्यानंतरही मला राज्य शासनाचा एक पुरस्कार मिळाला. समितीच्या बैठकीत माझा सत्कार तर सोडा पण बाईंनी साधे अभिनंदनही केले नाही. उलट लेकी बोले सुने लागे याप्रमाणे नकळत मला खूप काही सुनावले."

"पण तुम्ही तो पुरस्कार स्वीकारला का हो?"

"हो. स्वीकारला. आधीच बाईच्या नादी लागून राज्य सरकारच्या दोन पुरस्कारांवर मी पाणी सोडले होते. सरकारच्या विरोधात जाऊनही सरकारने पुन्हा पुरस्कार देऊ केला यामागे सरकारचे मोठेपण तर आहेच पण माझी ख्याती, कीर्ती, कामगिरी, माझा रुतबा, माझे सामाजिक स्थान, माझे साहित्य क्षेत्रातील योगदान, मी हाताळलेले वेगवेगळे विषय या अशा अनेक गोष्टींमुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. तो मला नाकारणे शक्यच नव्हते. "

"तुम्हाला एक खरी मनातली गोष्ट सांगू का, खरेच का हो देशात असहिष्णुतेचे, जातीयतेचे, हुकुमशाहीचे, मुस्कटदाबीचे किंवा आणीबाणीसम वातावरण होते का हो, सध्या आहे का?"

"मुळीच नाही. अहो, साधी गोष्ट आहे, तसे वातावरण असते तर आपण सरकारच्या विरोधात बोंबा मारु शकलो असतो का? आपल्याच समितीच्या शंभरपेक्षा अधिक सदस्यांनी सरकारचा निषेध म्हणून सरकारने मोठ्या सन्मानाने दिलेले पुरस्कार परत केले, त्यानंतरही सरकारच्या प्रत्येक कृतीचा, निर्णयाचा आपण कधी मोर्चा काढून, कधी निदर्शने करुन, कधी निवेदनाद्वारे, कधी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला आहे. पण सरकारने किंवा त्यांच्या कुण्या कार्यकर्त्याने आपणास काही त्रास दिला आहे का? "

"मुळीच नाही. मला सांगा, आपल्या समितीचे सदस्य असे किती आहेत? शंभर फार तर सव्वाशे. बरोबर? सव्वाशे कोटी जनसंख्येच्या मानाने पण तथाकथित बुद्धिवंत, विचारवंत एकदम नगण्य. आपण ज्या परिस्थितीचा बागुलबुवा उभा करण्याचा प्रयत्न केला तशी खरोखरीच परिस्थिती असती तर आपली हिंमत झाली असती? तसे तथाकथित वातावरण असते तर जसे आणीबाणीच्या काळात सरकारने लोकांना तुरुंगात डांबले होते तसेच आपल्या बाबतीत हे सरकार करु शकले असते. पण तसे कुठे झाले नाही."

"माझ्या मनातले बोललात. ज्या काही व्यक्तींना निर्घृणपणे संपविण्यात आले त्यांना काय सरकारने संपवले? कोणत्याही सरकारच्या काळात असे माथेफिरू लोक असतात. सरकारने आदेश देऊन किंवा पोलिसांनी समोरासमोर गोळ्या घालून या लोकांना संपवले असते तर मग म्हणता आले असते की, राज्यात, देशात तसे वातावरण आहे."

"आताही या निवडणुकीत सातशे का सहाशे कलाकारांनी या सरकारला मतदान करु नका असे आवाहन केले होते. ऐकले का जनतेने? उलट इतर नऊशे-हजार कलाकार याच सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. ज्यांनी सरकारची बाजू घेतली त्यांच्यासाठी नव्हते का असहिष्णुतेचे वातावरण? त्यांच्यासाठी वेगळी लोकशाही होती का? त्यांची का पंतप्रधान रोज गळाभेट घेऊन नाश्त्याला, जेवायला बोलावत होते?"

"व्वाह। अगदी बरोबर आहे. न्याय-अन्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माझ्यासाठी असणारी न्याय बाजू इतरांसाठी अन्यायकारक होऊ शकते पण याचा अर्थ देशात असहिष्णुता आहे, हुकूमशाही आहे असा होत नाही."

"आता उद्या बाईसाहेब नवीन सरकार आणि पंतप्रधान यांचा निषेधाचा ठराव घ्यायला लावतात की काय?"

"म्हणून तर मी म्हणतो आपल्याच समितीमध्ये एकाधिकारशाही आहे, दुसऱ्यांचे विचार ऐकून न घेण्याची वृत्ती आहे. म्हणजेच असहिष्णुता किंवा अजून जे काही आपण सरकारच्या बाबतीत निषेधार्ह आहे असे म्हणतो ते सारे आपल्याच समितीत आहे."

"खरे आहे. पण करणार काय? आलीया भोगासी असावे सादर. चला. भेटूया उद्या."

अशी चर्चा अनेक सभासदांमध्ये भ्रमणध्वनीच्या माध्यमातून रंगत होती.

        

नियोजित दिवशी, ठरलेल्या वेळी एक एक सदस्य बहगले यांच्या निवासस्थानी येत होता. आल्याबरोबर सर्वांना एक धक्का बसत होता कारण पुरस्कार वापसी समितीच्या ज्या काही बैठका भूतकाळात झाल्या होत्या त्या सर्व बैठका बहगलेबाईंच्या घरीच होत असल्यातरी प्रत्येक बैठक फाटकाला लागून असलेल्या एका मोठ्या दिवाणखान्यात होत असत. त्या फाटकापासून काही अंतरावर बाईंचा एक फार मोठा बंगला होता. बाहेरून पाहताक्षणी डोळ्याचे पारणे फिटावे अशी त्या बंगल्याची रचना होती. परिसरात असलेली मोठी बाग, पोहण्याचा तलाव अशा अनेक गोष्टी येणारांचे लक्ष वेधून घेत असत. समितीच्या अनेक सदस्यांची अशी इच्छा होती की, तो बंगला आत जाऊन पहावा, ऐश्वर्य काय असते पहावे. एक-दोघांनी तशी इच्छाही व्यक्त केली पण बाईंनी मनमोहक स्मित करून त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पण त्यादिवशी मात्र बंगल्याच्या फाटकाजवळ स्वागतासाठी उभा असलेला माणूस येणाऱ्या प्रत्येकाला मोठ्या अदबीने, सन्मानाने, आपुलकीने मुख्य बंगल्यातील आलिशान, भव्य, सुसज्जीत अशा दिवाणखान्यात नेऊन तितक्याच हळुवारपणे बसण्याची विनंती करत होता. त्या दिवाणखान्यातील सजावट, किमती वस्तू पाहून प्रत्येकाचे डोळे दिपत होते, तोंडाचा 'आ' होत होता. असे वाटत होते की, आपण कुणाच्या घरी नाही तर एखाद्या आकर्षक वस्तू संग्रहालयात आलो आहोत. देशातील नव्हे तर विदेशातील अमूल्य, देखण्या, मनमोही, सुंदर अशा वस्तुंची तिथे रेलचेल होती. दिवाणखान्यातील एका कोपऱ्यात असलेले एक कपाट आणि त्यातील स्मृतिचिन्हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत होता कारण पुरस्कार वापसी आंदोलनाची सुरुवात करताना बहगलेबाईंनी जवळपास पंचवीसपेक्षा अधिक पुरस्कारापोटी मिळालेले सन्मानचिन्हे, सन्मानपत्रे यांची जाहीर होळी तर केलीच होती पण पुरस्कारस्वरूप विविध संस्थांकडून मिळालेली रक्कमही त्या त्या संस्थांना परत करत असल्याची घोषणा एका भव्यदिव्य पत्रकार परिषदेत केली होती. पण सारे महत्त्वाचे पुरस्कार मात्र त्या कपाटाची शान वाढवत होते.


"हे काय पाहतोय आपण? बाईंनी पुरस्कार परत मिळवले की काय?"

"परत कसे मिळणार? आपल्या समक्ष एका पोत्यात बांधलेले स्मृतीचिन्हे आणि सन्मानपत्रे अग्नीच्या स्वाधीन केली होते की."

"अहो, नंतर मिळालेले पुरस्कार असतील."

"शक्यच नाही. आपल्या आंदोलनाच्या आधीच मिळालेले हे सारे पुरस्कार आहेत."

"हो. यावरील पुरस्काराची नोंद आधीचीच आहे. म्हणजे बाईंनी पुरस्कार परत केलेच नाहीत?"

"या स्मृतिचिन्हांची इथली उपस्थिती तरी हेच दर्शवते."

"म्हणजे आपण पुरस्कार परत करून मुर्ख ठरलो की काय?"

"ते तर स्पष्टच दिसते आहे..." कपाटासमोर उभे राहून चर्चा करणाऱ्या व्यक्तींच्या कानावर 'आल्या बाईसाहेब आल्या' हा आवाज आला.


बहगलेबाई सुहास्य मुद्रेने सर्वांना नमस्कार करत आत आल्या. त्या त्यांच्या खुर्चीवर बसताच उपस्थित सारे आपापल्या जागांवर बसताच बाई म्हणाल्या,

"सर्वांचे माझ्या या झोपडीत स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांची इच्छा होती की, माझे घर आतमध्ये येऊन बघावे म्हणून या शेवटच्या बैठकीत ती इच्छा पूर्ण करते आहे...."

"शेवटची इच्छा? म्हणजे?"

"आजच्या बैठकीत आपली पुरस्कार वापसी ही समिती आपण कायमची बरखास्त करत आहोत. कारण कसे आहे, आपण मागील काही वर्षांपासून देशात माजत असलेल्या दुराचाराच्या विरोधात आंदोलन उभे केले होते. पण सरकारने म्हणावी तशी दखल घेतली नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपल्या समितीच्या मताशी सहमत असलेल्या हजार एक व्यक्तींनी सरकार पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन केले होते पण त्यांनाही मतदारांनी दाद दिली नाही. मग आपणच कशाला विरोध करायचा?"

"बरोबर आहे. पण मॅडम, अशाने हुकूमशाही अधिकच जोर पकडेल. कुणीतरी विरोध...."

"खरे आहे. पण ताई, मला वाटते आपण परत केलेल्या पुरस्कार वापसीच्या अनुषंगाने सरकारने 'पुरस्कार सन्मानाने बहाल' अशा योजनेतून पुरस्कार पुन्हा ज्याचे त्याला परत करण्याची योजना सुरू केली की काय? कारण तुम्ही परत केलेले सारे पुरस्कार दिमाखाने कपाटात विराजमान झाले आहेत म्हणून विचारले...." एका सदस्याने विचारले आणि ते ऐकून बाईंचा चेहरा चपापल्यासारखा झाला. त्या काही बोलण्यापूर्वीच दुसरा सदस्य म्हणाला,

"तसे कसे होईल? कारण बाईंनी परदेशी कपड्यांची होळी करावी या थाटाने मिळालेल्या सन्मानपत्रांची आणि चिन्हांची होळी केली होती. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय..."

"माझा काहीही गैरसमज होत नाही. त्या कपाटात तुम्ही स्वतः बघा म्हणजे तुमच्या डोळ्याला वस्तुस्थिती दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील."

"तुम्हाला काय म्हणायचे आहे? अहो, त्या होळीत बाईंनी पोतड्यात भरून ठेवलेली कित्येक सन्मानपत्रे आणि चिन्हे मी स्वतः अर्पण केली आहेत...."

"थांबा. अशी आपसात चर्चा करु नका. तुमचे दोघांचेही बरोबर आहे...." बाई पहिल्यांदाच बोलत असताना तिसऱ्या सदस्याने विचारले,

"म्हणजे? ज्या पुरस्कारस्वरूप वस्तू जाळल्या त्या खऱ्या नव्हत्या?"

"नाही. नाही. आपण होळीत टाकलेली सारी सामग्री ही मला मिळालेली पारितोषिके होती पण त्यातला एकही पुरस्कार शासकीय किंवा तत्सम स्वरूपाचा नव्हता तर माझ्या सुरुवातीच्या काळात लहान लहान संस्थांकडून मिळालेले ते पुरस्कार होते...."

"म्हणजे तुम्ही सरकारसोबत आम्हालाही फसवले की...." तो सदस्य बोलत असताना त्याला मध्येच थांबवून अन्य एक सदस्य हातातील वर्तमानपत्र फडकवत म्हणाला,

"अहो, बाईंनी आपल्याला नेहमीच फसवले आहे. हे बघा, निवडणुकीच्या आधी काही लोकांनी म्हणजे जवळपास सातशे लोकांनी या सरकारला निवडून देऊ नये असे आवाहन केले होते परंतु त्यात आपल्या समितीचे किंवा बाईंचे नाव नव्हते ...."

"हो पण बाईंच्या सांगण्यावरून मी सरकारला मतदान करु नये असे आपल्या समितीच्या माध्यमातून आवाहन केले होते..."

"आणि त्याचवेळी सरकारला मतदान करावे असे हजार एक कलाकारांनी केलेल्या आवाहनात बाईंचाही सहभाग होता. ही बातमी ...."

"म्हणजे बाईसाहेब आता देशात असहिष्णुता वगैरे नाही का? कारण तुम्ही सरकारच्या बाजूने आहात म्हणून विचारले हो."

"होय. काही खाजगी कारणास्तव मला परवा भुमिका बदलावी लागली. म्हणूनच आजची ही बैठक बोलावून मी आपली समिती विसर्जित करत आहे. आपणास सर्वांना झालेल्या तसदीबद्दल मी क्षमायाचना करत आहे. धन्यवाद. फराळाची व्यवस्था आहे तिचा लाभ घेऊन सर्वांनी प्रयाण करावे. आपली पुरस्कार वापसी समिती बरखास्त करत आहे. धन्यवाद!..." असे म्हणून सर्वांना अभिवादन करत सुमन बहगले घरात निघून गेल्या. पाठोपाठ सारे उपस्थितही निघाले.....

     चार पाच दिवसांनी सर्व प्रसार माध्यमातून एक बातमी प्रसारित झाली. त्याप्रमाणे नवीन आलेल्या केंद्रातील सरकारने एक पुरस्कार समिती स्थापन केली होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी सुमन बहगले यांची वर्णी लागली होती...


Rate this content
Log in