STORYMIRROR

Nagesh S Shewalkar

Others

4.3  

Nagesh S Shewalkar

Others

मी टू वुई टू

मी टू वुई टू

6 mins
1.7K


मी टू....वुई टू !

सायंकाळचे चार वाजत होते. सिद्धहस्त लेखक अण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी प्रथितयश लेखिका शोभाताई यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यांच्या 'साहित्य नंदन' या निवासस्थानी एक एक पत्रकार येत होते. बरोबर चार वाजता अण्णासाहेब आणि शोभाताई पत्रकारांशी बातचित करण्यासाठी आले. जमलेल्या सर्व पत्रकारांना अभिवादन करून दोघेही खुर्चीवर बसल्याबरोबर एका पत्रकाराने विचारले,

"अण्णासाहेब, आज काय विशेष?" त्या दोघांपैकी कुणी उत्तर देण्यापूर्वी दुसऱ्या पत्रकाराने विचारले,

"एखादा मोठा पुरस्कार मिळाला की काय?" या प्रश्नावर अण्णासाहेबांनी गंभीर चेहऱ्याने पत्नीकडे पाहताच घसा साफ करत, माईकवर बोटे आवळत शोभाताई गंभीरपणे म्हणाल्या,

"म..म..मी.. ट.. टू.."

"काय? मी टू? आय मिन यू टू?"

" होय ! चाळीस वर्षे झाली आहेत त्या गोष्टीला. त्यावेळी मी जेमतेम वीस वर्षांची असेल. तेंव्हा आजकाल हे जे चालले आहे ना, मी टू... अशा प्रसंगाला मला सामोरे जावे लागले. माझा लैंगिक छळ... शोषण झाले आहे..."

"चाळीस वर्षांपूर्वी? मग तुम्ही आजवर गप्प का बसलात?"

"मला माहितीच होते, जी कुणी स्त्री काही वर्षांपूर्वी झालेल्या शोषणाची माहिती उघड करते तिला आजकाल हाच प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो. कसे आहे, आजकालच्या मुली ज्या निर्भयपणे, धाडसाने पुढे येऊन स्वतःवर झालेल्या अन्यायाची, अत्याचाराची माहिती जाहीरपणे देतात तेवढ्या मोकळेपणी आम्ही बोलू शकत नव्हतो. आजच्या मानाने आम्ही अप्रगत होतो. महत्त्वाचे म्हणजे आज महिलांना मीडियाचे जे ठाम पाठबळ नव्हते तसे आम्हाला नव्हते कारण त्याकाळी मीडियाच नव्हता. आमच्यावर झालेला अत्याचार आम्ही इतरत्र तर सोडा परंतु जन्मदात्या आईजवळही सांगू शकत नव्हतो...."

"शोभाताई, माझ्या माहितीनुसार तुम्ही वयाच्या पंधराव्या, सोळाव्या वर्षांपासून लिहायला सुरुवात केली आहे. याचा अर्थ तुमची लेखनी सक्षम होती. इतर मुलींच्या मानाने तुम्ही सशक्त, सबला होता तरीही तुम्ही सारे शांतपणे सहन केले?"

"बरोबर आहे, तुमचे. पण तो काळ विचारात घेतला पाहिजे. झालेला प्रकार मी जगापुढे आणला असता तर माझ्यावर कुणी विश्वास ठेवला नसता. आज जसे एखाद्या मुलीने, महिलेने तिच्यावर झालेला अन्याय, शोषण मग ते खरे असो वा खोटे असो जनतेसमोर आणला की, सारा समाज, तुमचा मीडिया त्याची सत्यता न पडताळून पाहता महिलेच्या मागे उभे राहता तेंव्हा तसे नव्हते. सारा दोष मुलीच्या माथी मारून तिला बहिष्कृत केल्या जात असे. मी सारे काही खरे खरे सांगितले असते तरीही केवळ आई आणि फारच झाले तर बाबांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता. कदाचित मी न केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून मला आजीवन अविवाहित राहावे लागले असते...."

"पण तो घाणेरडा प्रकार करणारा माणूस होता तरी कोण? त्याने तुम्हाला अशी कोणती वागणूक दिली ?"

"होते एक प्रसिद्ध लेखक..."

"काय? लेखक? साहित्य क्षेत्रात असले प्रकार? सिनेमा, जाहिरात क्षेत्राचे एखादे वेळी ठिक आहे परंतु साहित्य क्षेत्रात ही?"

"का नाही? माणूस कुठल्याही क्षेत्रातील असो त्याला भावना आहे, वासना आहे. त्यातून प्रत्येक क्षेत्रात हे असे प्रकार घडतात...." प्रथमच अण्णासाहेब बोलले.

"कोण आहेत ते? जिवंत आहेत का? "

"आहेत. जिवंत आहेत. चारित्र्यसंपन्न म्हणून ख्यातनाम आहेत. सिद्धहस्त लेखक आहेत. आजही त्यांची लेखनी नित्य काही ना काही साहित्य प्रसवत असते..."

"मग एवढ्या वर्षांनंतर तुम्ही त्यांच्यावर केस करणार काय?"

"कशाला ती केसबिस करायची? सत्तरी गाठत असलेल्या इसमाला कशाला न्यायालयाच्या चक्रव्यूहात अडकावयाचे?"

"मग या परिषदेचे प्रयोजन काय?"

"म्हटले आपणही मी टू प्रकरणात आपला सहभाग नोंदवावा. असले प्रकार आजच नव्हे तर आमच्याही काळात घडत होते हे मी टू अभियान चालवणाऱ्या महिलांना माहिती व्हावे हा प्रमुख उद्देश आहे. काय हो?" शोभाताईंनी अण्णासाहेबांकडे बघत विचारले.

"होय! वुई टू...म्हणजे मी टू.."

"त्या व्यक्तीचे नाव तर सांगा ना. प्रकार काय घडला तो तरी जगाला समजू द्या..."

"सांगते. सारे काही सांगते...." असे सांगून शोभाताईंनी सारा इतिहास उलगडला...

वीस वर्षे वय असलेल्या शोभाताई एक उत्तम लेखिका होत्या. त्या प्रामुख्याने विनोदी कथा लिहित होत्या. त्यांच्या कथांना प्रसिध्दीही मिळत होती. विशेष म्हणजे त्यांच्या कथा वाचकांना पसंतीला उतरत होत्या. अनेक वाचक खास पत्र पाठवून शोभाताईंचे कौतुक करत असत. त्याकाळी मोबाईल तर नव्हतेच आणि साधे फोनही फार कमी लोकांकडे होते त्यामुळे वाचक-लेखक यांचा संवाद केवळ पत्रातून होत असे. अनेक वाचक शोभाताईंना असेही सातत्याने सुचवत असत की, आता आम्ही तुमच्या कथासंग्रहाची वाट पाहतोय. लवकरात लवकर तुमचा कथासंग्रह यावा ही एकमेव इच्छा आहे. वाचकांचा आग्रह पाहून शोभाताईंना ही अस वाटू लागले की, खरेच आता आपण कथासंग्रहाच्या माध्यमातून वाचक दरबारी जावे.

शोभाताईंनी तो विचार मैत्रिणी आणि आईवडील यांच्यासमोर त्यांनी तो विचार मांडला. सर्वांनी तो विचार उचलून धरला. मात्र वडिलांचे असे मत पडले की, तुझ्या कथा चांगल्या आहेत. पण कथासंग्रह काढण्यापूर्वी एखाद्या चांगल्या लेखकाला दाखवायला हव्यात. कुणाची प्रस्तावना मिळाली तर कथासंग्रह अध दर्जेदार होईल. बाबांचा विचार शोभाताईंना पटला. त्यांच्या मनात आले की, बाबा म्हणतात ते बरो

बर आहे. वाचकांचे मत बरोबर असले तरीही, कथांना पारितोषिके मिळाले असले तरीही आपला कथासंग्रह अधिक दर्जेदार व्हावा, त्यात नवखेपणा, उथळपणा राहू नये याविचाराने शोभाताई त्याकाळी नामवंत असलेल्या एका लेखकाला भेटायला गेल्या. ते ख्यातकीर्त लेखक तसे तरुण होते. शोभाताईंपेक्षा चार-पाच वर्षांनी मोठे असतील. लेखक घरीच होते ते पाहून शोभाताईंना आनंद झाला. अभिवादन, परिचय झाला आणि शोभाताईंनी हातातील कथांचे हस्तलिखित त्यांच्यासमोर ठेवले आणि म्हणाल्या,

"ह्या माझ्या विनोदी कथा आहेत. माझी अशी इच्छा आहे की, आपण त्या कथा वाचून मला मार्गदर्शन करावे. तुम्ही पसंती दिली तर माझा कथासंग्रह काढण्याचा विचार आहे. तुम्ही प्रस्तावना दिली तर नक्कीच माझ्या साहित्याला एक वेगळेच वजन, वलय प्राप्त होईल."

"शोभाताई, तुम्ही खरेच खूप छान लिहिता. तुमच्या लेखनाची, विनोदाची एक वेगळीच शैली आहे. तुम्हाला वाचकांची नस सापडली आहे. मला वाटत नाही फार काही बदल करावे लागतील. तुम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही. पण, तुमची इच्छाच असेल तर मी प्रस्तावना द्यायला तयार आहे. परंतु, माझी एक अट आहे..."

"अट? ती कोणती?" शोभाताईंनी असमंजसपणे विचारले.

"अहो, अशा घाबरू नका. मी काही मानधन मागत नाही. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, मला वाचायचा अतिशय कंटाळा आहे. इतर कुणाचे साहित्य तर मी कधीच वाचत नाही परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल मी माझ्या स्वतःच्या कथाही फक्त दोनदा वाचतो.पहिल्यांदा म्हणजे कथा रफ लिहिताना आणि दुसऱ्या वेळी म्हणजे फेअर करताना. कसे होईल तुमच्या कथांचा हा अनमोल खजाना येथे ठेवून जाल. वारंवार माझ्याकडे चकरा माराल. मी प्रत्येकवेळी तुम्हाला फक्त आश्वासन देत राहिल. तुम्ही वर्ष... दोन वर्षे वाट पाहून हे हस्तलिखित परत मागाल त्यावेळी ते तुम्ही आज जिथे ठेवून जाल तिथेच असणार. मी हातही लावणार नाही. मलाही वाटते तुमच्या पुस्तकाला प्रस्तावना द्यावी. त्यासाठी तुम्हाला एक करावे लागेल, तुम्ही तुमच्या वेळेनुसार येथे येऊन तुमच्या कथा वाचून दाखवाव्यात. सुधारणेची गरज वाटलीच तर मी ते लगेच सांगत जाईन त्यामुळे वाचन पटकन होईल, सुधारणाही होईल आणि लगेच मी सांगेन आणि तुम्ही प्रस्तावनाही लिहून घ्याल."

"ठिक आहे. सांगते मी..." असे सांगून शोभाताई तिथून घरी परतल्या. त्यांनी सारे आईवडिलांना सांगितले. त्यांनी परवानगी देताच त्या दुसऱ्या दिवशीपासून त्या लेखकाकडे जाऊ लागल्या. कथा वाचून दाखवताना ते लेखक मध्येच त्यांना थांबवून सूचना करू लागले. त्यासाठी शोभाताईंना त्यांच्याजवळ बसावे लागत असे. लेखक महाशय ते अंतर नकळत कमी करू लागले. समजावून सांगण्याच्या निमित्ताने, हातातील कागद देताना घेताना हस्तस्पर्श होऊ लागले. जवळ बसल्यावर मांडीला मांडीचा स्पर्श कळत नकळत होत असत. एखादा शब्द, वाक्य किंवा विनोद आवडला की, लेखक महोदय शाबासकी देण्याच्या निमित्ताने शोभाताईंच्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवू लागले प्रसंगी तो हात तिथे स्थिरावू लागला.

सुरुवातीला ह्या प्रकारामुळे शोभाताईंना संकोचल्याप्रमाणे, अवघडल्यासारखे होत असे. परंतु काही बोलता येत नसे. हळूहळू शोभाला त्या स्पर्शाची सवय झाली. त्यांनी ते सारे सहजपणे घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे महाशयांची हिंमत वाढली. त्यांनी पुढचे पाऊल टाकायला सुरुवात केली. टाळी देणे, टाळीसाठी हातात आलेला हात बराच वेळ हाताने ठेवणे. तीन-चार दिवसात दोघे चहा, फराळाचे निमित्त बाहेर जायला सुरुवात केली. नंतर तर शोभाताई स्वतः होऊन या साऱ्या गोष्टींसह सिनेमाला जाण्याचा हट्ट करु लागल्या. स्पर्शसुखाने आणि जवळीकीने हुरळून गेलेले लेखकराव त्यांच्या साऱ्या मागण्या आनंदाने पूर्ण करू लागले. ...." बोलताना शोभाताई थांबलेल्या पाहून एका पत्रकाराने घाईघाईने विचारले,

" पुढे काय झाले? म्हणजे त्या लेखकाने शरीरसुखाची...."

दुसऱ्या पत्रकाराने विचारले," ते लेखक आहेत तरी कोण?" कुणी काही बोलणार तितक्यात एका पत्रकाराने पुन्हा विचारले,

"एक मिनिट, अण्णासाहेब, तुम्ही काही क्षणापूर्वी असे म्हणालात की, वुई टू..मी टू....याचा अर्थ काय? म्हणजे तुमचेही शोषण झाले की काय?"

"कसे आहे, खरे सांगायचे तर हो, माझे ही शोषण झाले आहे.."

"त्याकाळी एखादी मुलगी एखाद्या मुलाचे शोषण...."

"शोषण म्हणजे काय फक्त लैंगिक शोषण नाही तर आर्थिक लुबाडणूक, पिळवणूक हेही शोषणच ना....."

"म्हणजे?" उपस्थित अनेक पत्रकारांनी एकदम विचारले.

"आम्हा दोघांचे म्हणजे हिचे शारीरिक शोषण आणि माझे आर्थिक शोषण करणारांना आम्ही दोघांनी मिळून चांगली शिक्षा दिलीय...." असे म्हणत अण्णासाहेबांनी शोभाताईंचा हात हातात घेतला. दोन्ही हात उंचावून ते म्हणाले, " आम्ही केलेल्या एकमेकांच्या शोषणाची शिक्षा म्हणून आम्ही एकमेकांशी लग्न केले.... थांबा. होय. मीच तो लेखक ज्याच्याकडे शोभा कथा वाचून दाखवण्यासाठी येत असताना मी हिच्याशी शारीरिक लगट करीत असताना...."

त्यांना मध्येच थांबवून शोभाताई म्हणाल्या,

"आणि मी वेगवेगळे हट्ट करून यांना आर्थिक बाबतीत लुबाडले...." त्या बोलताना थांबल्या आणि दुसऱ्याच क्षणी दोघे एक आवाजात म्हणाले," एकमेकांना अशा प्रकारे लुटल्यामुळे प्रायश्चित्त म्हणून आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो...."

ते ऐकून सारे पत्रकार गडगडाटी हास्य करीत असताना चहा-बिस्कीटाचा आस्वाद घेऊन तिथून निघाले.........

नागेश सू. शेवाळकर,

(९४२३१३९०७१)


Rate this content
Log in