महायात्रा
महायात्रा


त्या सायंकाळी मी बाहेर कुठे जावे या विचारात असताना घरासमोर स्कुटी थांबल्याचा आवाज येतो न येतो तोच पाठोपाठ भसाडा आवाज आला,"चंद्या, अबे, चंद्र्या...." चंद्रकांत या माझ्या नावाचा असा चोळामोळा करणाऱ्या माझ्या परममित्र किशोरचा आवाज मी ओळखला. मी बाहेर आलो. मला पाहताच तो हरफनमौला म्हणाला,
"अबे, चल. बस. संज्याचा बाप गेला रे..."
"काय? अरे, पण ऑपरेशन तर चांगले झाले होते ना? कालच संजूचा फोन आला होता. संजय कधी आला येथे?"
"ते सगळे बरोबर आहे. पण मला आताच संज्याचा फोन आला होता..." तो सांगत असताना मी मागे बसल्याचे पाहून त्याने स्कुटी दामटली....
संजय ! आमचा जिगरी दोस्त! दहावर्षांपासून आमचं त्रिकुट आमच्या वर्तुळात प्रसिद्ध! संजयचे वडील म्हणजे पन्नास वर्षे वयाचे एक हसरे, सदाबहार व्यक्तीमत्त्व! त्यांच्या घरी केव्हाही गेले तरी त्या माणसाच्या चेहऱ्यावर कायम हसू. आम्ही कधी त्यांना रागावलेले, उदास बसलेले पाहिलेच नाही. आमच्या त्रिकुटाचा अड्डा हमखास संजयच्या घरीच असायचा. पण आमच्या खोड्यांना त्यांनी कधी वैतागून रागे भरले नाही. एक महिन्यांपूर्वी त्यांना ह्रदयाविकाराचा सौम्य झटका आला. डॉक्टरांनी त्यांना हैद्राबाद येथे नेण्याचा सल्ला दिला. हैद्राबादच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा आणि पाच लाख रुपये खर्चाचा आकडा सांगितला. 'मरता क्या न करता!' याप्रमाणे संजयचा मोठा भाऊ आणि तीन मेहुण्यांनी मिळून पैशाची व्यवस्था केली. तशी पैशाची कमी नव्हती. ऑपरेशनची तारीख ठरवायचा विषय निघताच संजयचे बाबा म्हणाले,
"संज्याचं लग्न झाल्याशिवाय घर सोडणार नाही. तो बोहल्यावरून उतरल्याबरोबर मी हैद्राबादला जाईन." ते हट्टाला पेटलेले पाहून घरातील सारे जण आणि संजय लग्नाला तयार झाला. मुलाला त्यातही संजयसारख्या श्रीमंत पोरासाठी मुलींचा काय तोटा? अवघ्या पंधरा दिवसात संजय बोहल्यावरून उतरला. त्यांना आशीर्वाद देऊनच त्याच्या वडिलांनी हैद्राबादला प्रयाण केले .....
आमची स्कुटी त्या गल्लीत शिरली. नेहमी गोंगाट असणारी ती गल्ली एकदम शांत होती. वातावरणाचा, मनःस्थितीचा परिणाम असावा. संजयच्या दारात चार-पाच माणसे बसून होती. काय झाले ते त्यांच्या चेहऱ्यावरील भावातून कळत होते. त्यातच केस विस्कटलेले, डोळे लाल झालेल्या अवस्थेत संजय उभा होता. आमची स्कुटी थांबते न थांबते तोच संजयने आमच्याकडे धाव घेतली.
आम्ही दाटून आलेल्या स्थितीत त्याला मिठीत घेतले. त्याचा आवेग शांत होण्याची वाट बघत आम्ही त्याच्या खांद्यावर थोपटत राहिलो. तो काहिसा शांत झाल्यावर मी विचारले,
"असे अचानक कसे घडले?"
"हो ना. मी काल रात्रीच निघालो. त्यावेळी मला बोलले. सकाळी मी घरी पोहोचण्यापूर्वीच दादाचा फोन घरी पोहोचला...." शांत होत संजय म्हणाला.
"कुठे जायचे का? कुणाला सांगायचे का?" किशोरने विचारले.
"हो..." असे म्हणत त्याने खिशातून एक कागद काढला. त्यावर नाव आणि संपर्क क्रमांक होते.तो कागद माझ्या हातात देत म्हणाला,"ह्यांंना एसटीडी कॉल करून सांगा ना... " तो बोलत असताना आमच्यापासून काही अंतरावर एक ऑटो येऊन थांबला. साहजिकच साऱ्यांचे लक्ष तिकडे गेले. ऑटोतून उतरलेल्या स्त्रीला पाहताच संजय रडत म्हणाला," आत्या, बाबा गेले ग..."
मी आणि किशोर एसटीडी करायला निघालो. जवळपास पंचवीस-तीस कॉल करायचे होते.ती यादी पाहून किशोर म्हणाला,
"चंद्या, आपण एक कॅसेट करु या."
"कशासाठी?" मी काही न समजल्याने विचारले.
"अरे, इतके फोन करुन तेच तेच बोलण्यापेक्षा आपण एका मिनिटाचा टेप केला तर तिकडून फोन उचलला की टेप सुरु करायची. आराम तर होईल....." तशा दुःखाच्या प्रसंगी ज्यांना विनोद सुचतात अशी व्यक्ती खरेच सुखी असते? तशाही प्रसंगी मला एका व्यक्तीची आठवण झाली. अगदी दुःखाच्या प्रसंगी तो माणूस हसणं पेरून दुःख हलके करण्याचा प्रयत्न करीत असे. एकदा एका माणसाने त्याला विचारले,
"का हो, तुम्ही नेहमी हसता, तुम्हाला दुःख, वाइट अशा भावना ..."
"नाही हो."
"कसे शक्य आहे? दुःख नसणारा माणूस विरळाच. तुम्ही काही तरी लपवत आहात?"
"मी दुःख लपवतो." तो माणूस सहजपणे म्हणाला.
"काय? मग हे चेहऱ्यावरचे हसू?"
"ये तो दुखपर ओढा हुआ परदा है, जिसके पिछे दिल का गम छुपा हुआ है..." असे म्हणत ती व्यक्ती निघून गेली...हसत हसत.
यादीतील सर्वांना फोन करून आम्ही परतलो. ज्याला समजले तो संजयच्या घरी धाव घेत होता. येणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न ठरलेला असे, 'काय हो? केव्हा? कसे?"
त्यावर कुणी तरी उत्तर देई. ते ही तसे ठरलेले,'आज सकाळी सहा वाजता गेले. फोन आला. आता सातला निघणार आहेत."
"सातला? हैद्राबाद म्हणजे बारा तास लागणारच. रात्री काही विधी होणार नाही. सकाळीच करावा लागेल. तब्येत ठीक होती असे ऐकले होते."
"ठीक होती. ठणठणीत नव्हती. रात्री संजू बोलून निघाला ."
"त्यांना काय वाढून ठेवलय ते समजले होते की काय कुणास ठावूक? त्यांच्या मनातून हैद्राबाद येथे जावे असे नव्हते. मला म्हणाले होते, तुमचे ऐकतात सारे, नेऊ नका म्हणून सांगा."
"कुणाला काय समजते? आशा वेडी असते. बरे होतील या आशेवर पाच लाख पाण्यात...."
"काय म्हणता? पाच लाख?"
"तर मग. अहो, दोन लाख भरल्याशिवाय प्रवेशच नाही. शिवाय रोजची इंजेक्शने, ऑक्सिजन, औषधी, सोबतच्या माणसांचा खर्च मिळून...."
"बापरे! गरीबाचे काम नाही रे बाबा."
"अहो, त्या दवाखान्याच्या फाटकापाशीही आपल्यासारखे जाऊ शकत नाहीत."
"अहो, पण पाच लाख? खूप झाले हो. फायदा तर कवडीचा झाला नाही."
"ते काही माहिती असते का?"
"बरे पुन्हा नंतर फोन वगैरे?"
"अहो, दुपारपासून त्यानेही डाव साधलाय. तिकडे मालक डेड झाल्याचे समजताच इकडे यांचा फोनही डेड झालाय."
"तक्रार केली नाही का?"
"काय फायदा? ज्यावेळी त्यांना वाटेल त्यावेळी ते यामध्ये जान फुंकतील."
मी आणि किशोरने संजयला बाजूला बोलावून मी म्हणाले,
"आणखी काही काम असेल तर सांग. नसेल तर आम्ही..."
"जा. पण सकाळी लवकर या."
"काही काळजी करू नको. आम्ही लवकर येतो." असे सांगत किशोरने स्कुटी सुरु केली.....
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघे लवकरच पोहोचलो. तेव्हा संजयच्या बाबांचे शव नुकतेच पोहोचले होते. पुढली तयारी सुरू झाली होती. दोघे जण बाजारात निघाले होते.
"ए जरा लवकर या रे बाबा..." एक जण म्हणाला
"काही विसरु नका रे बाबा. तिरडीचे साहित्य आणाल आणि कमड्याच विसराल. त्या आणण्यासाठी पुन्हा जावे लागेल. असे कुणी मुद्दाम करीत नाही. मानसिक अवस्था कशी निराळी असते हो. सांगण्याची ही वेळ आणि जागाही नाही पण सांगतोच. एका ठिकाणी काय झाले, अंत्यविधीचे सामान आणता आणता सायंकाळ झाली. सामान आले. प्रेताला आंघोळ घातली आणि मग आठवले मुडद्याचे कपडे? ते तर आणायचे राहिले?"
"मग?"
"मग काय? पुन्हा जाऊन आणले. मौतीला रात्रीचे दहा वाजले..."
"नाही. काही विसरत नाही....." असे म्हणत ते दोघे जणू एखाद्या युद्धाला जावे त्या थाटात निघाले. तिकडे एक वेगळीच चर्चा रंगली. नातेवाईक आणि शहरातले एकीकडे तर संजूच्या गावाकडून आलेली मंडळी दुसरीकडे असे दोन गट पडले. अंत्ययात्रा कशी न्यावी यावरून चर्चा सुरु झाली. शहरातील लोकांची इच्छा अशी होती की, शववाहिनी बोलवावी तर गावाकडील लोकांचा वाजतगाजत, पायी शवयात्रा न्यावी असा आग्रह होता. जरा गरमागरम चर्चा झाली पण शेवटी संजूचा मामा म्हणाला,
"असे करू, नगरपालिकेची शववाहिनी आणि एक टेंपो बोलावू या....." गरीब बिचाऱ्या गाववाल्यांचे काही चालले नाही. संजूचा मामा मला म्हणाला,
"चंदू, जरा नगरपालिकेत फोन लावून...."
"ठीक आहे, मामा. आम्ही पाहतो..." असे म्हणत मी आणि किशोर नगरपालिकेकडे निघालो. काही क्षणात आम्ही कार्यालयात पोहोचलो. तिथे सारा शुकशुकाट. सकाळी नऊ वाजत होते. तितक्या सकाळी कोण येणार? तिथे उभ्या असलेल्या चार शववाहिनीकडे बघत किशोर म्हणाला,
"चंद्या, बघ याच त्या अँम्बुलन्स. कशा मड्यासारख्या उभ्या आहेत...." त्याच्या त्या वाक्यावर हसावे की रडावे.... तितक्यात आम्हाला पाहताच एक शिपाई पुढे येऊन म्हणाला,
"काय पाव्हणं? कोन्ही गचकलं की काय?"
"होय. आम्हाला अँम्बुलन्स पाहिजे होती." मी म्हणालो.
"कव्हा पाहिजे?"
"केव्हा म्हणजे? आत्ता..."
"एढोळ का झोपला होता काय? अहो, आकरावाजेस्तोर ड्रायव्हरच येत नाही..."
"ड्रायव्हरच्या घरचा पत्ता सांगता का? घरी जाऊन घेऊन येतो..."
"आस म्हणता? पर पैले रजिस्टरवर एंट्री मारा..." बहुतेक रात्रीची कंट्री न उतरलेल्या त्या शिपायाने दिलेल्या पत्त्यावर आम्ही पोहोचलो. दार ठोठावले. विस्कटलेले केस, फाटकी बनियन घातलेल्या माणसाने दार उघडले. लालभडक डोळे असलेल्या अवस्थेत त्याने विचारले,
"कोण पाहिजे?"
"अ..अ..अँम्बुलन्स..."
"काय ताप झाला? कुठून ही अँम्बुलन्सची डिवटी घेतली...एखादे दिवशी मलाही याच अँम्बुलन्सवर जावे लागेल. एन्ट्री केली काय?"
"आत्ताच केली...."
"काय राव, कसे शक्य आहे? एक मुडदा पुण्याला पोहोचून रात्री तीनला आलो."
"आमचंही प्रेतच आहे."
"अहो, प्रेतच पोहोचवतात,जित्त माणूस नाही. पत्ता लिहिला ना? पंधरा मिनिटात निघतो."
"आम्ही थांबावे का?" किशोरने विचारले.
"नाही. गरज नाही. येतो मी." चालक म्हणाला आणि आम्ही परत निघालो. काही वेळातच आम्ही संजयच्या घरी पोहोचलो. अंत्ययात्रेचे सामान आणायला गेलेले लोक परतले नव्हते.
"हे आणखी कसे आले नाहीत?"
"अहो, आत्ता तर कुठे बाजार सुरु झाला असेल.येतील इतक्यात."
"शी! काय बाबा हा उशीर?"
एक-एक करत नातेवाईक, परिच येत होते. दर्शन घेण्यासाठी आत जात होते. त्यांना पाहताच अचानक पावसाची सर यावी तसा रडण्याचा आवाज काही क्षण उंचावर जात होता मात्र पुन्हा पावसाची सर ओसरावी तसा तो आवाज लुप्त होत होता. अंगणात लोक गटागटाने चर्चा करत होते. चर्चा मृताम्याच्या संदर्भात असल्या तरी त्याला स्वार्थाची झालर होती. "कालचा उपवास, रात्रीचे जागरण झाले आहे. आजही केव्हा तुकडा मिळतो कोण जाणे. चकरा येत आहेत...."
संजयच्या चार बहिणी, त्यांचे पती, संजूच्या तीन आत्या, मामा सारे जमले होते. वेगवेगळ्या गटात चर्चा सुरु होती. मी किशोरला विचारले,"काय चालू असेल? सारे गटागटाने काय बोलत...."
"अरे, काहीना दुःख आहे तर काही जणांना आनंदही झाला आहे."
"काही तरी तुझे यार..."
"खोटे वाटतेय? ये इकडे..." असे म्हणत गर्दीपासून दूर बसलेल्या संजूच्या एका मामाजवळ घेऊन गेला. मामाला किशोरने विचारले,
"काय मामा, फार वाइट झाले हो..."
"किशोर, अरे, सुटलो आम्ही. तुम्हाला त्यांची एकच बाजू माहिती होती. दुसरी बाजू आम्हाला माहिती आहे. माझे लग्न झाले तेव्हा यांना संध्याकाळच्या तुकड्याची चिंता होती. बहिणींची लग्न तर केले परंतु पैसे आमचे गेले रे. नंतर कुण्या बहिणीचे पैसे घे, कुणाचे सोने घे, कुणाचे शेती घे असे फसवत या माड्या बांधल्या रे...." ते ऐकत किशोरने मला हळूच दुसऱ्या गटाकडे नेलं, तो गट संजूच्या मेहुण्यांचा होता.
"संपले आता सारे. वस्तू, नगदी असे वर्षाकाठी पंधरा-वीस हजाराची कमाई होत होती तीही गेली."
ते ऐकून किशोरने मला एका कोपऱ्यात गावाकडून आलेले बोलत असलेल्या लोकांकडे नेले.
एक जण सांगत होता, "वाचले रे बुवा! धा हजार नेल्ते मालकाकडून..."
"पैसा कसा बुडेल रे?"
"आर, कोण्ला ठाव न्हाई. मालकाचा येव्हार पोरास्नी ठाव न्हाई..."
"मग महे चार हजार वाचले की काय?...." अशी चर्चा चालू असताना तिथे एक ऑटो येताना दिसला. दुरूनच बांबू वगैरे दिसत होते. ऑटोजवळ येताच सारे तिकडे धावले.
"अहो, अँम्बुलन्सचे काय झाले?" कुणाला तरी आठवण झाली.
"दहा वाजून गेले की. केव्हा येणार आहे?" एक जण विचारत असताना मी हळूच किशोरला खुणावले. आम्ही शेजारच्या घरून फोन लावला. फोन उचलणारा म्हणाला,
"अँम्बुलन्स होय? येईल की....येईल..."
"अहो, पण केव्हा? "
"येईल म्हणून सांगतोय ना. कळ सोसा थोडी...." म्हणत त्याने फोन ठेवला.
आम्ही बाहेर आलो. पाहतो तर शव टेंपोमध्ये नेण्याचा निर्णय झाला होता. प्रेताला बाहेर आणून आंघोळ घालत होते. जमलेल्या बायका, संजू, त्याचा भाऊ आणि इतरांचा आक्रोश पाहवत नव्हता. आतापर्यंत मुकदर्शक असणारांनी आपल्या बाह्या सावरुन त्यांना सावरण्याची कसरत सुरु केली. तर काही लोक पुढील तयारीला लागले. तितक्यात एक सरकारी गाडी आली. संजूचे बाबा स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे सरकारी पाहुण्याने येऊन प्रेताला हार अर्पण केला आणि आल्या पावली निघून गेला. शव उचलून टेंपोमध्ये ठेवले. शवयात्रेत ऐकू येणारी 'राम नाम सत्य है...' अशी घोषणा दिली जात होती की नाही इतक्या कमी आवाजात दिल्या जात असल्याचे पाहून गावाकडील एका म्हाताऱ्याने उंच आवाजात....'राम नाम ....' अशी घोषणा दिली. त्याला साथ मिळण्यापूर्वी गल्लीच्या तोंडाशी आलेल्या शववाहिनीकडे सर्वांचे लक्ष गेले. अँम्बुलन्स बघताच किशोर भडकून म्हणाला,
"ये वक्त है आने का? मडा तो निकल चुका। अब किसे पहूंचाओगे?"
"ये बाबू, आवाज बढाने का नही। मै भी आदमी हूँ। इतना काम करुँगा तो मुझे भी जल्दी जाना पडेगा.....इसी अँम्बुलन्समधून.......अभी एक यात्रा पहूंचाकर आ रहा हूँ।"
"लेकिन हमारी एंट्री तो पहले हुई थी...."
"कहाँ साब, अभी जो मुडदा छोडकर आ रहा हूं ना, उसकी मौत कल सबेरे हुई थी, रातभर अँम्बुलन्स की राह देखकर .....अच्छा निकालो फिस...."
"लेकिन...."
"बाबू, एंट्री हुई, हमारी फिस पक्की। तुमने राह देखनी थी।"
कुठे तरी, केव्हा तरी ऐकलेले शब्द आतल्या आतच गुदमरत होते जणू त्या शब्दांवरही सेंसॉर होते.......'राम नाम सत्य है.....।'