Bharati Sawant

Others

1.3  

Bharati Sawant

Others

महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राची संस्कृती

3 mins
5.4K


प्रत्येकाला आपापली संस्कृतीच आदर्श, प्रिय वाटते. महाराष्ट्राची संस्कृती ही भारत देशाला मिळालेली देणगी आहे. भव्य हिमालय भारतभर पसरले असताना सह्याद्रीच्या रांगांनी महाराष्ट्राला वेढले आहे. 


   बहु असोत सुंदर संपन्न की महा

   प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा


  असे म्हणून कवींनी महाराष्ट्राला गौरविले आहे. मराठी आमची ही मायबोली तरी ज्ञानेश्वरांनी 'अमृताहुनी गोड' असल्याचे म्हटले आहे. सर्व संतमहंतांनी महाराष्ट्राची, इथल्या मातीची आणि दैवतांची कीर्ती आपल्या अभंग, कीर्तनातून गाईली आहे. मोगल, डच,पोर्तुगीज नि इंग्रजांनी भारतावर राज्य केले परंतु मराठीने जनमानसात आपले स्थान कायम राखले आहे. इंग्रजांनी इथे दीडशे वर्षे राज्य केले. आपली इंग्रजी संस्कृती, परंपरा भारतीयांवर लादली. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महात्म्याने इंग्लंडमध्ये अध्ययनासाठी जाऊनही मातृभूमीविषयीचा, इथल्या मातीचा अभिमान कायम राखला. 

   

 ने मजसी ने परत मातृभूमीला

    सागरा प्राण तळमळला

  

असे आळवून त्यांनी सागराला उद्देशून काव्यनिर्मिती केली. महाराष्ट्रात अहिराणी, खानदेशी, कोकणी, वऱ्हाडी अशा कितीतरी भाषा बोलल्या जातात, परंतु प्रत्येकीचे माधुर्य रसाळच वाटते. इंग्रजी माध्यमात शिकणारा मुलगा रस्त्यावर ठेच लागताच "आई गं!" म्हणून विव्हळतो किंवा आश्चर्योद्गार काढताना "अरे बापरे!" असे शब्द तोंडात येतात. त्यामुळे महाराष्ट्रात कितीही इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघाल्या, लोकं इंग्रजाळली तरी मराठीने आपले वर्चस्व टिकवले आहे. कितीतरी लेखक, कवींनी मराठीचा दर्जा वाढवण्यासाठी उत्तम लेखन करून महाराष्ट्रात मराठीचा प्रभाव वाढविला आहे. 

महाराष्ट्रात आजही घराघरात संयुक्त कुटुंब पद्धती आहे. घरात देव-देव्हारे सोवळे तसेच सण, सोहळे साजरे केले जातात. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव आणि शिवजयंती तसेच दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि होळी असे विविध सण लोकांना एकजूट आणि प्रेममाया देणे-घेणे शिकवतात. एकत्र येऊन काही भरीव काम करण्यासाठी या सणांचे महाराष्ट्रात खूपच प्रस्थ आहे.


शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या मदतीने महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, पुरंदर, पन्हाळागड, विशाळगड अशा किल्ल्यांची तटबंदी करून गड-किल्ल्यांचे संवर्धन केले. या किल्ल्यांचा वारसा महाराष्ट्राची थोर परंपरा सांगण्यास उद्युक्त करतो. महाराष्ट्रात ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास असे अनेक थोर संत विभूती होऊन गेले. भागवत धर्माची पताका फडकवत यांनी वारकरी धर्माचा पाया घातला. ज्ञानेश्वरांनी तरी "माझा मराठीची बोलू कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके।।" अशा शब्दात मायबोलीचे वर्णन केले आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाला देवता मानून संतांनी वारी, दिंडीचे महत्त्व पटवून दिले. महाराष्ट्रात अनेक कलाकार होऊन गेले आहेत तमाशा, लावण्या किंवा शाहिरी पोवाडे रचणारे, मंदिरात भजन, कीर्तन करून लोकांच्यात जागृती घडवून आणणारे अनेक विभूती महाराष्ट्राला लाभले आहेत. गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून मूर्तिपूजेला कडाडून विरोध केला. बाबा आमटे सारख्या तपस्वींनी स्वतःची श्रीमंती किंवा जीवन गरीब, दीनदुबळ्या अपंगांसाठी खर्ची घातले.

      

देशाच्या रक्षणार्थ ५०% सैनिक महाराष्ट्रातून जातात कारण महाराष्ट्रात सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण झाल्या. देशासाठी "जिंकू किंवा मरू" हा बाणा राखणारा निधड्या छातीचा मराठी वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून बलिदानासाठी सदैव तत्पर असतो. महाराष्ट्रात कृष्णा-गोदावरी, वेण्णा कोयना अशा कितीतरी नद्यांची खोरी आहेत. त्यांच्या पाण्यामुळे जमीन सुपीक झाली आहे. आज महाराष्ट्रात कापूस, ऊस, हळद, मिरची उत्पादन होते. कृषिप्रधान महाराष्ट्रातील ५०% टक्के लोक शेती व्यवसाय करतात. महाराष्ट्रात बाबा कदम, शिवाजी सावंत, रणजित देसाई, गो.नी. दांडेकर यांच्यासारखे कथा-कादंबरीकार तसेच शांता शेळके, पद्मा गोळे, इंदिरा संत यासारख्या कवयित्री होऊन गेल्या. बहिणाबाई चौधरी, संत जनाबाई, संत निर्मलाबाईंनी आपल्या लेखणीद्वारे महाराष्ट्रातील वाचकांना छान शिकवण दिली. त्यांच्या रचना वाचताना वाचक गुंग होऊन जातो. महाराष्ट्रात मराठी समाज खूप मोठा आहे. ज्यामुळे मराठी संस्कृती टिकून राहिली आहे.

   

महाराष्ट्राला खूप मोठा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राने महाराष्ट्राचा खूप मोठा भाग व्यापला आहे. त्याच्या किनाऱ्यावर नारळी, पोफळी आणि सुपारीच्या बागा आहेत. मासे व भात असा आहार असणारे हे कोकणी, कोळी लोक महाराष्ट्रात आहेत. जगप्रसिद्ध हापूस आंब्याचे उत्पादन देवगड, रत्नागिरी या कोकण भागातून मिळते. केळी, द्राक्षे, संत्री यासाठी एकेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. प्रभू रामचंद्र वनवासात असताना भ्रमण करत असल्याच्या पाऊलखुणाही महाराष्ट्रात दिसतात. त्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी मराठी माणसाला वरदान आहे. पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, माहूर, कोल्हापूर ही साडेतीन शक्तीपीठामधील पीठे तसेच बारा ज्योतिर्लिंगामधील बरीच दैवते महाराष्ट्रात वसली आहेत. सुजलाम-सुफलाम महाराष्ट्राची भूमी मराठी माणसाची आन, बान आणि शान आहे. म्हणूनच कवी म्हणतात,

  मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा

  प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा


Rate this content
Log in