Nagesh S Shewalkar

Others

3.4  

Nagesh S Shewalkar

Others

माणुसकीच्या शत्रूसंगे..

माणुसकीच्या शत्रूसंगे..

6 mins
1.7K


   जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेत विद्यार्थिनीसोबत शिपाई ते मुख्याध्यापक या पदावर साऱ्या महिलाच काम करीत होत्या. वर्षानुवर्षे तशी शाळेची परंपरा होती. ती शाळा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील एक अग्रगण्य शाळा होती. केवळ शैक्षणिक बाबतीत नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, मैदानी खेळ यासोबतच सर्व स्पर्धात्मक क्षेत्रात शाळेच्या यशाचा ध्वज डौलाने फडकत असे. दरवर्षी अनेक स्पर्धांचे अजिंक्यपद शाळा पटकावत असे. शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून सारसेबाई कार्यरत होत्या. शिस्तबद्ध वातावरण, सुक्ष्म नियोजन आणि त्याची कठोर अंमलबजावणी यामध्ये सारसेबाईंचा कटाक्ष असे. शाळेच्या आवारात, वर्गात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. शिक्षिकेला वर्गावर जायला काही कारणांमुळे उशीर झाला तर वर्गातील मुली शांतपणे आपापल्या कामात व्यस्त राहात असत. शाळेत खेळाचा तास, संगीताचा तास असे काही सोडले तर कधीच कुठेही गडबड, गोंधळ होत नसे. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर स्वतः सारसेबाईंचे लक्ष असे. 

   इयत्ता आठवीच्या वर्गाला स्वतः मुख्याध्यापिका सारसेबाई मराठी हा विषय शिकवत असत. बाईंकडे नववी-दहावी या वर्गाचाही मराठी हा विषय होता. त्यादिवशी बाई सातव्या वर्गावर गेल्या. सर्व मुली उभ्या राहून एका आवाजात म्हणाल्या,"एक साथ नमस्ते, बाई!"

"नमस्ते, मुलींनो! कशा आहात? मजेत ना? बसा. बसा." बाई म्हणाल्या. सर्व मुली खाली बसताच बाई म्हणाल्या,"काल मी तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात नसलेली एक कविता वाचून यायला सांगितले होते. वाचली का ?"

"हो बाई. वाचली..." साऱ्या मुली एका आवाजात म्हणाल्या.

"व्वा! छान! सौम्या, कविता तुला कशी वाटली?" 

"बाई, मला कविता खूप खूप आवडली. "

"आवडून चालणार नाही. समजली पाहिजेत. राही, तू सांग. तुला समजली का?"

"मला आवडली आणि समजलीही." राही म्हणाली.

"खूप छान! ग. दि. माडगूळकर म्हणजेच गदिमा यांची 'माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू' ही कविता मी तुम्हाला मुद्दाम वाचून यायला सांगितले होते. अत्यंत सुंदर, सोपे सोपे शब्द आणि समजायला सुलभ शिवाय फार मोठा भावार्थ असलेली ही कविता आहे. गदिमांच्या अनेक बालकविता आहेत. त्या कविताही अशाच सोप्या, सहज सुंदर अशाच आहेत. मामाच्या गावाला जाऊया, गोरी गोरी पान दादा मला एक वहिनी आण,आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, सैनिकहो तुमच्यासाठी, हे राष्ट्र देवतांचे, ऐक मजा तर ऐक खरी अशी कितीतरी गाणी त्यांनी लिहिली आहेत. बरे, सानवी तू सांग, या गीतातील पहिला शब्द म्हणजे 'माणुसकी' या शब्दातून तुला काय समजले?"

 सानवी तात्काळ उभी राहून म्हणाली,"बाई, माणुसकी या शब्दातून मी माणूस आणि की हे दोन शब्द वेगळे केले. माणूस हा मराठी शब्द आणि की हा शब्द मी इंग्रजी म्हणजे किल्ली या अर्थाने घेतला आणि माणुसकी या शब्दाचा अर्थ मी माणूस बनण्याची किल्ली म्हणजे माणुसकी असा घेतला."

"खरोखर खूप छान! सानवी तू घेतलेला अर्थ अगदीच बरोबर आहे. पण मला सांग तुला हाच अर्थ का लावावसा वाटला?"

"बाई, दोन महिन्यांपूर्वी आपल्या शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात तुम्ही म्हणाला होतात की, मानवाचा जन्म मिळाला म्हणून आपणास माणूस होता आले परंतु हा जन्म सार्थक करावयाचा असेल तर अंगी माणुसकी येणे आवश्यक आहे...."

"अरे, बाप रे! सानवी, तू एवढ्या दिवसांपूर्वी मी सांगितलेले पक्के लक्षात ठेवलेस ते ऐकून खूप आनंद झाला." सारसेबाई आनंदाने म्हणाल्या.

"बाई, मीच नाही तर आपल्या वर्गातील अनेक मुली प्रत्येक कार्यक्रमात व्यक्त झालेल्या मतांची वहीवर नोंद ठेवतात. जमेल तशी फावल्या वेळी आम्ही त्यावर चर्चा करतो." सानवी म्हणाली.

"कित्ती छान! सेजल, आता तू सांग, तुला माणुसकीबद्दल काय वाटते?"

"माणुसकी म्हणजे माणसाने माणसाशी चांगले वागावे. ज्या कुणाला मदतीची गरज असेल आणि आपल्याला शक्य असेल तेवढी मदत करावी. लहान मुले, वृद्ध माणसे, आजारी माणसे, दिव्यांग व्यक्ती यांना आधाराची गरज असते त्यांना तशी मदत करावी. विनाकारण कुणाला त्रास देऊ नये, गरज नसताना कुणाची खिल्ली उडवू नये, गरज नसताना आपले मत मांडू नये...."

"अगदी बरोबर! मुलींनो, जो चांगले वागतो, समाजासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न करतो त्याला लोक त्रास देतात. हे त्रास देणारे लोक म्हणजे कोण ? तू सांग शर्वरी."

"बाई, ज्यांना कुणाचे चांगले झालेले पाहवत नाही, कुणी कुणाचे चांगले करीत असेल तर ते आवडत नाही. अशी माणसं चांगली कामे करणारांच्या वाटेत अडथळे निर्माण करतात. इतरांना त्रास देतात. दुष्टवृत्ती असणारे जे लोक आहेत ना, अशी माणसेच माणुसकीचे शत्रू असतात. आपल्याला त्यांच्याशी ....माणुसकीच्या शत्रूशी युद्ध करायचे आहे, लढायचे आहे." शर्वरी म्हणाली.

"खूपच सुंदर. राही, मला सांग, युद्ध करायचे म्हणजे काय प्रत्यक्ष तलवार, बंदूक घेऊन रणांगणावर जायचे का?"

"नाही, बाई. तसे नाही. मानवाजवळ असलेले दुर्गुण नाहीसे करण्यासाठी प्रयत्न करणे या अर्थाने युद्ध करायचे आहे. त्याला माणूस बनविण्यासाठी परिश्रम घ्यायचे आहेत. ही गोष्ट सोपी नाही. खूप मेहनत घेऊनही कुठे यश येईल, कधी अपयश येईल. परंतु अपयशाचा विचार न करता, न घाबरता आपल्याला आपले प्रयत्न म्हणजेच युद्ध सुरू ठेवायचे आहे...." राही सांगत असताना बाईंच्या लक्षात आले की, बऱ्याच वेळेपासून भैरवी हात वर करीत आहे. बाईंनी विचारले,

"भैरवी, तुला काही सांगायचे आहे का?"

"हो. बाई, या कवितेत असे म्हणलय की, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध करताना सैनिकही लढतील, नागरिकही लढतील, महिला.... बालक सारेच लढतील. असे कसे? इथे तर सरळसरळ लढाई करण्याचे संकेत मिळत आहेत. लढाई करणे ही माणुसकी कशी काय?"

"अगदी बरोबर. कसे आहे, भैरवी जे शत्रू सांगून ऐकत नसतील, उलट अत्याचार, जुलूम वाढवत असतील, निष्पाप.... म्हाताऱ्या लोकांना.... दिव्यांग लोकांना छळत असतील, मारत असतील...." सारसेबाई सांगत असताना मनवा हात वर करून बोलण्याची परवानगी मागत आहे हे पाहून बाई म्हणाल्या,"बोल मनवा. तुला काय सांगायचे आहे?"

"मला वाटते बाई, आपले माणुसकी नसलेले काही शत्रू हे आपल्या जवळ, आपल्या गावात असतात. परंतु दुसऱ्या राष्ट्रातून येणारे किंवा आपल्या देशात राहून आपल्या परदेशी शत्रूशी हातमिळवणी करून आपल्या नागरिकांना त्रास देणाऱ्या, त्यांचा जीव घेणाऱ्या शत्रूंना मारण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. मग त्या लढ्यात आमच्यासारख्या बालकांनाही उतरावे लागेल. कारण हा देश शिवछत्रपतींचा आहे. शिवाजीमहाराज म्हणजे माणुसकीचा सागर. शत्रूच्या देशातील निरपराध माणूस चुकून आपल्या राज्यात आला तरी त्याचा सन्मान करावा हा माणुसकीचा महामंत्र आपल्या शिवरायांनी दिला आहे."

"आणि बाई, काम पडले, अन्याय झालाच तर आमच्या देशातील महिलाही रणरागिणी बनून हातात समशेर घेऊन रणांगणावर उतरून शत्रूला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही." सौम्या त्वेषाने म्हणाली.

"बाई, आमच्या देशाच्या शत्रूंनी एक तर आमच्या देशाचा काही भाग गिळंकृत केला आहे.सोबतच आमच्या देशाचा सुजलाम सुफलाम प्रदेश जिंकण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. रोज काही ना काही कुरापती काढून आमच्या बंधू भगिनींना त्रास देतात, त्यांच्या जीवावर उठतात...." सेजल बोलत असताना सानवी म्हणाली,

"आणि म्हणूनच बाई कवितेतल्या काही ओळी फार महत्त्वाच्या आहेत. त्या ओळींचा आशय असा आहे की, आम्ही केलेल्या माणुसकीच्या प्रयत्नांना जर देशातले असो वा परदेशातील असो, शत्रू पाठिंबा देणार नसतील, आमचे प्रयत्न आमची कमजोरी समजत असतील तर मग मात्र आम्हाला आमच्या भूमातेचे रक्षण करण्यासाठी शस्त्राने केलेल्या आघाताला शस्त्रानेच उत्तर द्यावे लागेल."

"सानवी, खूप छान. तू काय म्हणतेस सौम्या?" बाईंनी विचारले.

"आमचा जीव गेला तरी बेहत्तर पण तसुभर म्हणजे सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन आम्ही कुणाला घशात टाकू देणार नाही. या युद्धात मरण आले तरी चालेल. पुन्हा जन्म घेऊ , पुन्हा लढू....जिंकू किंवा लढताना शहिद होऊ....."

"माणुसकीच्या शत्रुसंगे लढताना कितीही नुकसान झाले तरी चालेल. माणुसकीच्या शत्रुसोबत लढताना कितीही काळ लागला तरी चालेल परंतु आम्ही मागे हटणार नाही. युद्ध सोडून पळणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे की, आम्ही माणुसकीच्या शत्रुसंगे लढत आहोत. आमचे प्रयत्न, आमची इच्छा प्रामाणिक आहे. आम्ही आमच्याच देशात नाहीतर संपूर्ण विश्वात शांती नांदावी म्हणून, माणुसकी निर्माण व्हावी म्हणून लढतो आहोत म्हणून आम्हाला माहिती आहे, कितीही संकटं आली, किती ही त्रास झाला तरी अंतिम विजय हा आमचा, आमच्या माणुसकीचा आहे. आम्ही मागे हटणार नाही, हरणार नाही. कारण 'जिंकू किंवा मरू' या निश्चयाने आम्ही लढत राहणार...." राही बोलत असताना स्वतः सारसेबाईंनी टाळ्या वाजवून तिचे कौतूक केले.त्यांनी मुलींना विचारले,

"आवडली का मुलींनो गदिमांची ही कविता."

"हो बाई. खूप आवडली."

"मग मला एक सांगा, या कवितेतून तुम्ही काय बोध घ्याल? आपल्या या चर्चेचे सार काय?"

"आपण आपली माणुसकी सोडायची नाही. कुणाला त्रास द्यायचा नाही."

"आपण आपले प्रयत्न करताना भारतमातेकडे कुणी वाकड्या डोळ्यांनी पाहिले, माणुसकी सोडून वागू लागले तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहायचे नाही. देशात स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरीही मागे हटायचे नाही..." सौम्या बोलत असताना कुणीतरी जोशात म्हणाले, 'भारत माता की...'

'ज s s य...' सर्व मुलींनी एका आवाजात जोरदार साथ दिली. तितक्यात तास संपल्याची घंटा घणघणली आणि सारसेबाई मोठ्या आत्मविश्वासाने, आनंदाने बाहेर पडल्या.........

                                      नागेश सू. शेवाळकर,

                                      ११० वर्धमान वाटिका फेज ०१,

                                      क्रांतिवीरनगर, लेन ०२,

                                      संचेती शाळेजवळ, थेरगाव

                                      पुणे ४११०३३ (९४२३१३९०७१)

                         

                                                                      



Rate this content
Log in