माझा जीवनप्रवास
माझा जीवनप्रवास


असे म्हटले जाते, मुलगा असो की मुलगी, जन्माला येताना सटवाई त्याच्या कपाळावर त्याचे आयुष्य आणि भविष्य लिहिते. तिने काय लिहिले हे कोणालाच माहीत नसते पण काही लोक मात्र स्वतःच आपले आयुष्य घडवतात. पारंपरिक रूढी म्हणून किंवा सनातनी काळ माझे लग्न बत्तीस वर्षापूर्वी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी झाले. बालपणापासून शिकण्याची, वाचनाची भयंकर आवड. चार मुली असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझे लग्न एस. वाय. बीएस्सी.तच करून दिले, परंतु पदवी पूर्ण करून द्यायचे आश्वासनही दिले. सासरही सुशिक्षित त्यामुळे सर्व काही आलबेल. पदवीधर होऊन खूप स्वप्ने घेऊन मी मुंबईत आले. तिथे माझी सारी स्वप्ने पुरी होतील या आशेवर. बी.एड. करू की एम.एस.सी. पण दोन्हीपैकी काहीच करू शकले नाही. मात्र दोन वर्षात दोन मुलांची आई बनले. त्यांचे सर्व करताकरता वयाची पंचविशी आली. यजमानांना एम.ए. करण्याची इच्छा सांगितली. कारण मला मराठी वाचनाची खूप आवड आहे. एसएनडीटीतून एम. ए. (मराठी) केले. वाचन मनसोक्त केले. त्या दरम्यान खूप स्पर्धा परीक्षाही दिल्या. काहींच्या पूर्वपरीक्षा मी पास झाले. 'ऊर्जा दुय्यम मंडळ परीक्षा' लेखी पास होऊन मुलाखत दिली. पण नोकरी करायची नाही अशी यजमानांची अट असल्यामुळे त्याचा निकाल बघायला कोणी गेलेच नाही. फक्त परीक्षा देत राहिले.
एम.ए. नंतर पीएच.डी. करण्याची खूप प्रबळ इच्छा होती. परंतु यजमानांनी चक्क नकार दिला. मेडिसीन डॉक्टर नाही पण साहित्यिक क्षेत्रात तरी डॉक्टर पदवी लागेल ही माझी इच्छा अपुरीच राहिली. मुले शाळेत जाऊ लागताच नोकरीची किंवा काहीतरी करून दाखवण्याची सुप्त इच्छा डोके वर काढू लागली. त्यातून घरगुती शिकवणी वर्ग सुरू केले. ते चाललेही. कितीतरी मुले शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिटमध्ये आली. आपल्या हातून खूप छान काम होतेय त्याचा आनंदही होता आणि कमवतोय हीदेखील भावना होती.
लहानपणापासून निबंध लिहिण्याची प्रचंड आवड. असे पन्नास-साठ निबंध वहीत लिहून ठेवले होते. क्लासच्या मुलांना वाचायला द्यायचे पण एका पालक आईने विचारले, "तुम्ही पुस्तक का नाही छापत?" पण मला त्या क्षेत्रातली काहीच माहिती नाही असे सांगताच तिने तिच्या ओळखीच्या प्रकाशकांकडे नेले. त्यांना ती वही दाखवताच निबंध खूप आवडले. आणि मला छान मानधन देऊन त्याचे पुस्तक त्यांनी छापले. आठवी ते दहावी वर्गासाठी निबंध झाले. त्यात प्रकाशकांनी मला पाचवी ते सातवीसाठी निबंध लिहिण्याची गळही घातली. पंधरा दिवसांत ९० निबंध लिहून काढले.
दुसऱ्या एका प्रकाशकांनी या दोन पुस्तकांना अनुसरून आणखी दुसऱ्या निबंधाच्या दोन पुस्तकांची ऑफर दिली. आता मात्र माझी चार पुस्तके छापली गेली आणि मला वेगळीच ओळख प्राप्त झाली. माझा उत्साहही वाढला. मी लहानपणी मराठी चित्रपट पहायचे. त्यामुळे वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक शब्द, अनेक शब्दाबद्दल शब्द, भिन्न अर्थाचे शब्द, काना-मात्रा अनुस्वार देऊन अर्थ बदलणारे शब्द हजारांच्या पटीत लिहून काढले. त्यांचेही पुस्तक बनेल या प्रतिक्षेत आहे.
माझी ही पुस्तके एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांनाही फायद्याची आहेत. पण आजकाल वातावरण इंग्रजाळलेले आहे. आपल्या मुलाला फाडफाड इंग्लिश बोलता यावे, असे आई वडिलांना वाटत असते. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी म्हटलेली रसाळ मराठी भाषा अमृतमय होईल की रसातळाला जाईल हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ती भाषा अस्तंगत होईल की बहरेल हे काळच ठरवेल. पण आजची आपली पिढी मराठीचे बाळकडू प्यालेली आहे. दुसऱ्यांच्या मराठी ज्ञानाची किंमत करणारी आहे हे मला मराठी भाषेतील काव्य संमेलनातून समजले. त्यामुळे सर्वांचा मराठी वाचनाचा प्रवास उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जावा, माझ्याही मराठी ज्ञानाच्या शाखा रुंदावल्या जाव्या, पंखांना आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न जरी सार्थक झाले नाही तरी सटवाईने माझ्या कपाळावरही 'या जीवनात फुल ना फुलाची पाकळी यश मिळेल' असे लिहिले असावे असे मला वाटते. मी शिकवणी वर्गातून मुलांना ज्ञान वाटते आणि आपणासारख्या मराठी सारस्वतांकडून ज्ञान वाढवते. व्हाट्सअपच्या या क्रांतीने माझ्या लिखाणाचा आणि विचारांचा झपाटा खूपच वाढला आहे. घरातूनही छान तारीफ होते. आजूबाजूच्या लोकांकडूनही कौतुक होते. 'इतुकेही नसे थोडे' जीवनात खूप जगायचे आहे. अंतापर्यंत कुठेतरी पोहोचू, अशी आस मनाला वाटते. मी माझीच फक्त प्रगती न करता माझ्या दोन्ही मुलांचं करिअर उत्तम प्रकारे वाढवले. आज मी पेरलेल्या बीजाचं छान रुजून त्याची फळेही मधुर आणि चविष्ट झालेली माझ्या आयुष्यात मला पाहायला मिळत आहेत.