Nagesh S Shewalkar

Others

5.0  

Nagesh S Shewalkar

Others

कर्जपंचमी

कर्जपंचमी

14 mins
1.5K


चाळिशीकडे झुकलेले विजय आणि विजया चहा घेत असताना विजयने शेजारी असलेले वर्तमानपत्र उचलले. त्यासोबत आलेली जाडजूड पुरवणी पाहून विजय म्हणाला,

"अरे, बापरे! एवढी मोठी पुरवणी? कुणाचा वाढदिवस आहे की काय?"

"असेना कुणाचा? आपल्या नातेवाईकाचा, परिचितांपैकी कुणाचा वाढदिवस नक्कीच नाही. कुणाचा असला तरी अशी चमकोगिरी कुणी करणार नाही. मग तुम्हाला टेंशन का आले?" विजयाने विचारले.

"तसे नाही ग,कुणाचा वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, लग्न असे कार्यक्रम असले ना की, भ्रमणध्वनीची गॅलरी ओव्हर फ्लो होते. कालच माझ्या गॅलरीत जमा झालेले पाच हजार छायाचित्रे डिलीट करून फोन स्वच्छ केला. त्यामुळे सकाळपासून दोन्ही हात आणि उजव्या हाताचा खांदा एवढा दुखतो ना की, आज सकाळपासून भ्रमणध्वनीला हात लावणे दूर त्याकडे पाहिले पण नाही. "

" अस्स आहे का? तरी मला वाटले, सकाळपासून माझी सवत दूर दूर कशी आहे ते? "

" सवत? दूर दूर? "

" मोबाईल हो. तुम्हाला काय वाटले, खरोखरीची सवत? काय पण विजयराव? "

" ते जाऊ दे, आता भ्रमणध्वनी सुरू केला ना, मग बघ, संदेशाचा कसा धडाधड मारा सुरू होतो ते. "

" खरे आहे तुमचे. काल ना एक संदेश आला, तो वाचून हसावे की रडावे समजत नाही. "

" कुणी पाठवला होता तो? "

" कुणाचे तरी दिवटे चिरंजीव उत्तीर्ण झाले आहेत."

" ते दिवटे चिरंजीव उत्तीर्ण होतील असे कुणाला वाटले नव्हते का? कसा का होईना उत्तीर्ण झाला, मग त्याचे अभिनंदन करायलाच हवे. "

" अहो, तो प्ले ग्रुपमध्ये पास झाला आहे. व्हाट्सअपवर अभिनंदनाची भाऊगर्दी झालीच होती. परंतु, वर्तमानपत्रात त्याचा औक्षण केलेला, भला मोठा हार घातलेला आणि गुणपत्रिका हातात घेतलेले छायाचित्र टाकले होते. आपल्या इमारतीवर त्याच्या अभिनंदनाचे मोठ्ठे बॅनर लावले आहे. "

" बापरे! कुणाचा आहे ग तो मुलगा? "

" आपल्या वाॅचमनचा मुलगा आहे तो. "

" का... य? वाॅचमनचा मुलगा? "

" ऐकून तर घ्या, 'डॉन' मंगलकार्यात दोन तीन दिवसांत त्याच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे. आपल्याला ही आमंत्रण आहे. पञिका देणार आहेत."

"एवढ्या महागड्या कार्यालयात प्ले ग्रुपमध्ये पास झालेल्या मुलाचा सत्कार? एवढा खर्च? कुठून येतो इतका पैसा? " विजयने विचारले.

" अहो, कर्ज काढणार आहेत म्हणे. एक नवीन बँक उघडतेय..... काय नाव बघा.... मल्ल्या... नाही हो... हां... गल्ल्या बँक... आज का उद्या सुरू होणार आहे. ती बँक वाट्टेल तेवढे कर्ज देणार आहे.... "

" काय नाव म्हणालीस, गल्लाबँक? अच्छा! असे आहे तर! आले लक्षात. ही बँक कुणाची आहे ते माहित आहे तुला? "

" कोण आहे हो? "विजयाने विचारले.

" अग, तो अजय गल्ल्या ग... भारतातील बँकांकडून वीस हजार कोटी रुपये कर्ज घेऊन परदेशात दडी मारून बसलाय तो. सरकारने आणि धनको बँकांनी मिळून त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तो. त्याने न्यायालयात लेखी लिहून दिले आहे की, तीन महिन्यांत सर्व बँकांची पाई न पाई चुकती करीन म्हणून. स्वतःचे उरावर एवढे मोठे कर्ज असताना हा इतरांना मुंह मांगे ऋण द्यायला निघालाय. "

" यातही त्याची काही तरी चाल असणार हे नक्की. मिळेल त्यालाही कुणी तरी सव्वाशेर मिळेल. "

" तसेच व्हायला हवे.... "असे म्हणत विजयने वर्तमानपत्र उघडले. पहिल्याच पानावर भलीमोठी जाहिरात होती. भारतात परत येणाऱ्या अजय गल्ल्याच्या स्वागताची आणि अभिनंदनाची!

"घ्या. अजय गल्ल्याच्या स्वागताची आणि अभिनंदनाची केवढी मोठी जाहिरात टाकली आहे. विशेष पुरवणी काढून, मुखपृष्ठावर पूर्ण पानभर जाहिरात टाकणारे कोण आहेत, ठाऊक आहे?"

"कोणी टाकलीये जाहिरात?"

"ज्या बँकांना त्याने चुना लावायचे योजले होते ना, त्याच बँकांनी एकञित येऊन जाहिरात दिलीय. ऐक..

'स्वागत दोन्ही कर जोडोनीया

अजय नावाच्या कुबेर राया

तुम्हावरी आमची भरपूर ' माया '

परतफेड लवकरी करा हे दिनदयाळा' |"

"अग बाई, हे तर भजनच झाले की हो."

"भजन काय नि प्रार्थना काय. प्रसंग बाका आहे, काका म्हणण्याशिवाय पर्याय नाही. अरे, आज गल्ल्याचा वाढदिवस आहे म्हणे." विजय म्हणाला.

"जन्मदिवस? काय बाई योगायोग? आज नागपंचमी आणि या सरड्याचा वाढदिवस?"

"अग, बघ ना, नागपंचमीला जन्मलाय आणि बँकेच्या पर्यायाने जनतेच्या धनावर कुंडली मारून बसलाय. लोक म्हणजे त्याचे पाठीराखे यावर्षीपासून त्याचा जन्म दिवस 'कर्जपंचमी' म्हणून साजरा करणार आहेत म्हणे. तसेच हा आगळावेगळा मुहुर्त साधून 'अजय गल्ला' बँकेची स्थापना होणार आहे. या बँकेमार्फत गरजूंना बिनव्याजी हवे तितके कर्ज देणार आहेत. आज गल्लोगल्ली त्याची माणसं फिरून लोकांना सभासद करून घेताना त्यांचे कर्ज प्रस्ताव ही भरून घेणार आहेत.."

"अहो, पण त्याच्याकडे असलेल्या कर्जाचे काय? ते कसे फेडणार आहे तो? " विजयाने विचारले.

" अग, जो माणूस दुसर्‍याला भरमसाठ ऋण देणार आहे. तो का कंगाल आहे? त्याच्याकडे पैसाच पैसा असणार आहे. चुटकीसरशी तो थकलेली रक्कम बँकांच्या तोंडावर फेकून मोकळा होईल बघ. तो काही कच्च्या गुरूचा नाही. पार्षद केहता हे त्याचे गुरू आहेत. त्या लुटारू पार्षदचाही फोटो छापलाय बघ ठिक ठिकाणी... गल्ल्यासोबत. "

" पार्षद केहता? नाव ऐकल्यासारखं वाटतय. कोण हो हा? " विजयाने विचारले

" अग, तो नाही का, सात - आठ वर्षांपूर्वी शाळांना संगणक पुरविण्याचा ठेका मिळवून.... ".

" हां... हां.. आले लक्षात. संगणक म्हणून नुसती डबडीच पुरवली होती तोच. सारा पैसा उचलून.. "

" थोडा थोडका नव्हे तर चांगले वीस हजार कोटी रुपये हडप करून परदेशात जाऊन लपला होता. या त्याच्या कारनाम्यामुळे दोन राज्य सरकारे कोसळली होती. काही लोक बिचारे अजूनही तुरूंगात सडत पडले आहेत. असा माणूस हा या अजय गल्ल्याचा गुरू आहे. "

" मला एक सांगा, सरकारने गल्ल्याची सारी मालमत्ता विकायला काढली होती ना, त्याचे काय झाले? "

" काय होणार? लोकांना, सरकारला लुटून त्याने जमविलेली मायापुंजी आहे सारी. अनेकांचा तळतळाट आहे त्या मालमत्तेला.... कोण कशाला ती शापित प्रॉपर्टी विकत घेऊन स्वतःचे वाट्टोळे करून घेईल?... बरे, मी बाहेर जाऊन येतो. बघतो, गल्ला बँकेचे काय चालले आहे ते? "

" जा. पण, कर्जा-बिर्जाच्या भानगडीत बिलकुल पडायचे नाही सांगून ठेवते. काही बोलू नका. अहो, तो लुच्च्या गल्ल्या एवढ्या मोठ्या बँकांना हातोहात चुना लावतो, तो आपल्या सारख्यांना सहजासहजी पावेल असे वाटते तुम्हाला? "

" बरे बाई, तू म्हणतेस तसे... "असे म्हणत विजय बाहेर पडले. त्यांच्या घरापासून जवळच एक मोठ्ठे हनुमान मंदिर होते. मंदिराच्या परिसरात असलेल्या भव्य मैदानावर गर्दीचगर्दी दिसत होती. पाच - सहा तंबू टाकले होते. आतमध्ये पंधरा - वीस टेबलासमोर चार चार, पाच पाच खुर्च्या टाकल्या होत्या. परिसरात सर्वञ अजय गल्ल्या आणि पार्षद केहता यांची मोठीमोठी पोस्टर्स लावली होती. विजयने तंबूत प्रवेश केल्याबरोबर एका अतिशय सुंदर तरूणीने त्याचे दिलखेच कृतीने स्वागत केले. मधाळ आवाजात ती तरुणी म्हणाली, "वेलकम सर! कर्ज हवे आहे का?"

"तसेच काही नाही. प्राथमिक चौकशी करावी असा विचार आहे."

"काही हरकत नाही. या. असे या." म्हणत ती तरुणी अत्यंत आदरपूर्वक विजयला जवळच असलेल्या तरूणीकडे घेऊन गेली. त्या तरूणीसमोर अगोदरच चार - पाच माणसे बसली होती. ती तरूणी गोड आवाजात म्हणाली,

" सर, बसा ना प्लीज. यांचे झाले की, आपण बोलू" असे म्हणत ती तरुणी अगोदरच्या इसमांकडे पाहून म्हणाली,

"सर, आमचे अजय गल्ला सर, मुद्दामून गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी ही गल्ला बँक काढत आहेत. श्रीमंतांना कुणीही ऋण देईल हो.... "

" अगदी बरोबर आहे. जसे तुमच्या गल्लासरांना सर्व बँकांनी कर्ज दिले. वीस हजार कोटी रुपयांना लुटून आता स्वतःची बँक काढायला निघालेत. आता काय जनतेला लुटण्याचा विचार आहे? " एक गृहस्थ तावातावाने विचारत असताना ती तरुणी तितक्याच शांतपणे म्हणाली,

" सर, हा विषय वेगळा आहे. ती चर्चा इथे नको. येथे त्यांच्या वैयक्तिक बाबीवर..... "

" वैयक्तिक कशी? आमच्यासारख्या लोकांनी बँकेत ठेवलेला पैसा या लुटणाऱ्याने लुटून परदेशी बँकांमध्ये जमा केला....."

"सर, प्लीज. तुम्हाला या योजनेविषयी हवी असलेली सारी माहिती मी देईन. मी पडले कर्मचारी. "ती तरुणी अतिशय शांतपणे म्हणाली.

" बरोबर आहे. उगाच व्यत्यय आणू नका. गल्ल्यासाहेब काही वेळातच शहरात पोहचणार आहेत. त्यांना हे तुमचे सुविचार कळाले ना तर सारेच मुसळ केरात जाईल. एक पैसाही कर्ज मिळणार नाही. मॅडम, काय काय कागदपत्रे लागतात? जामीनदार, तारणहार.... म्हणजे तारण काय ठेवावे लागेल ते पटकन सांगा. " दुसरा माणूस म्हणाला.

" एक लक्षात घ्या, तुम्हाला हवी तेवढी रक्कम आम्ही देऊ... बिना जामीन, बिना तारण! तीन वेगवेगळे फाॅर्म तुम्हाला भरावयाचे आहेत. एक म्हणजे आमच्या बँकेत खाते काढायचा, दुसरा म्हणजे पैसा पुरवठा करणाऱ्या धनको बँकेचा आणि तिसरा म्हणजे कर्ज मागणी अर्ज. सोबत सहा फोटो, आधार कार्ड, पगार पत्रक, तुमचा पगार ज्या बँकेतून होतो त्या बँकेचे तुम्ही स्वाक्षरी केलेले तुमचे दोन धनादेश..... "

" किती कर्ज मिळेल? "एकाने विचारले.

" हवे तेवढे.... तुमच्या गरजेनुसार... "

" किती दिवसात मिळेल? "

" कागदपत्रांची पूर्तता केली की, चोवीस तासांत रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. पण एक अट आहे. "

" ती कोणती? " सर्वांनी एकदम विचारले.

" घाबरून जाऊ नका. आमची बँक नवीन असल्याने नियमानुसार दोन दिवस तुम्हाला व्यवहार करता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला कितीही रक्कम काढता येईल. शिवाय दोन दिवसांत तुम्हाला पासबुक, एटीएम, नेटबँक अशा एकूण एक सुविधा मिळतील. "

" मॅडम, माफ करा, स्पष्ट विचारतो यात काही......"त्याच माणसाने पुन्हा शंका विचारली.

" काय असणार आहे? मला सांगा, इतर बँकांमध्ये तुम्ही कर्ज मागणी करता तिथे यापेक्षा वेगळी, सोपी पद्धत आहे का?" तरूणीने विचारले.

" कशाची आलेय? अहो, कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ येतात. गल्ल्यासाहेबांना, इतक्या बँकांकडून बावीस हजार कोटी रुपये कर्ज मिळवताना किती पापड लाटावे लागले असतील ते तेच जाणे. बरे, हे सहा फोटो, ही आधार कार्ड झेरॉक्स, हे दोन धनादेश आणि हे पगारपञक...."

"व्वा! खूप छान! हे घ्या तीन फॉर्म. घरी घेऊन जा. नीट वाचा. पेन्सीलने खूण केलेल्या ठिकाणी स्वाक्षऱ्या करून घेऊन या. "

" कशाला घरी नेऊन वेळेचा अपव्यय करू? जे इथे तेच घरी.. ही पेन, ह्या घ्या स्वाक्षऱ्या... "म्हणत त्या व्यक्तीने धडाधड सह्या करायला सुरुवात केली. इतरांनीही त्याचे अनुकरण केले. स्वाक्षऱ्या होताच सारी कागदपत्रे त्या तरूणीकडे सुपूर्त करून, तिचे आभार मानून सर्वांनी तिचा निरोप घेताच विजयकडे पाहून त्या तरूणीने विचारले,

" बोला सर, तुम्हाला खूप वेळ थांबावे लागले."

"नाही. काही हरकत नाही. खरे तर मलाही कर्ज घ्यायचे होते, पण माझ्या बायकोचा ठाम विरोध आहे."

"अहो, सर, एक काम करा ना, त्यांना आवडणारी एखादी वस्तू लगेचच घेऊन जा. मग बघा, त्या खुश होऊन परवानगी देतात की नाही ते..."

"नाही. आमचं प्रकरण एवढं सोपं नाही. जरा वेगळच आहे. बघतो कसं पटवायचं ते.... बायकोला... "विजय म्हणाला आणि त्याच्या बोलण्यावर खळाळून हसताना लालेलाल झालेल्या त्या सौंदर्यवतीकडे पाहत विजय तिथून निघाला. बाहेर पडण्यापूर्वी विजयने तंबूमध्ये एक चक्कर मारली. सर्वत्र सारखीच परिस्थिती होती. काही समजले, बरेच न समजले या अवस्थेत आणि महत्वाचे म्हणजे भरपूर ऋण मिळणार .... चोवीस तासांत मिळणार या लालसेपोटी लोक जाग्यावरच कागदपत्रांची पूर्तता करून धडाधड सह्या करून 'ऋणानुबंधाच्या' गाठी पाडून परतत होते.

विजय व्दिधा मन:स्थितीत घरी पोहचला. त्याचीच वाट पाहत असलेल्या विजयाने त्याला पुरते घरात येऊ नये देता घाईघाईने विचारले,

"काय झाले हो. गल्ल्याचा गल्लाभरू कँप सुरू झालाय म्हणे. लोक कर्जाचे अर्ज भरून येताहेत. तुम्हाला बराच वेळ लागला. खरे सांगा तुम्ही कर्ज प्रकरण दाखल केले नाही ना? "

" नाही ग. चौकशी करून आलोय. एक मात्र आहे, सारे कसे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे.... "

" बोडख्याचा आलाय..... अहो, त्या स्वच्छ प्रकाशासमोर अजय गल्ल्या नावाचा काळाकुट्ट ढग दाटून आला आहे. त्याचे काय?"

"जाऊ दे ना, आपल्याला ऋण घ्यायचेच नाही ना, मग आपण का वाद घालायचा? " असे म्हणत विजयने बातम्यांची वाहिनी लावली. प्रत्येक वाहिनीवर अजय गल्ल्याचा बातमी होती. अजयचे विमानतळावर आगमन झाले होते. एखाद्या बड्या पक्षाच्या मोठ्या नेत्याने, एखाद्या जगप्रसिद्ध खेळाडूने अथवा नट-नटीने रोड शो करावा त्याप्रमाणे गल्ल्याची अतिप्रचंड अशी मिरवणूक काढण्यात आली होती. लाखोंच्या संख्येने लोक त्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा ऊभे राहून लोक त्याच्या दिशेने पुष्पवृष्टी करीत होते. जागोजागी महिला गल्ल्याचे औक्षण करीत होत्या. जीपमध्ये उभा राहून गल्ल्या लोकांनी प्रेमाने अर्पण केलेले हार, पुष्पगुच्छ व भेटवस्तूंचा स्वीकार करीत होता. रस्त्यावर जागोजागी त्याच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. तसे फलक लावण्यात त्याच्या धनको बँकांमध्ये चढाओढ लागली होती. तो सारा थाटामाट पाहून विजय मनाशीच पुटपुटला, 'अरे, बापरे! अजून या महाशयांनी कोणत्याही बँकेचा एक रुपयाही भरलेला नाही. न्यायालयात केवळ आश्वासन देऊन हा पठ्ठ्या परतलाय. त्याचे असे भव्य दिव्य स्वागत व्हावे. पहावे ते नवलच... '

जवळपास सहा तासांच्या अतिभव्य मिरवणुकीनंतर अजय गल्ल्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहचला. तिथे त्याच्याकडे ज्या ज्या बँकांचे कर्ज थकीत होते आणि ज्यांनी त्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या सर्व बँकांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. त्या सर्व प्रतिनिधींसोबत गल्ल्याची बैठक होती. त्या बैठकीत गल्ल्या परतफेडीचा स्वतःचा नवीन प्रस्ताव सादर करणार होता. त्या हॉटेलमध्ये गल्ल्या शिरत असताना त्याच्या जयजयकाराने सारा परिसर, अवघा आसमंत दुमदुमून गेला.

त्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर उपस्थित बँकांच्या प्रतिनिधींनी महागड्या भेटवस्तू देऊन गल्ल्याचे स्वागत केले. पाठोपाठ बावीस तरूणींनी गल्ल्याचे पंचारतीने ओवाळून स्वागत केले. एक तरूणी म्हणजे थकलेल्या एक हजार कोटी रुपयांची अर्थात एकूण बावीस हजार कोटी रुपयांची आठवण देत होती. आदरसत्कार, भेटवस्तू स्वीकारून गल्ल्या त्याच्या खोलीत गेला. इकडे सारे प्रतिनिधी बैठक दालनात त्याची वाट बघत बसले. जवळपास तीन तासांनंतर अजय गल्ल्या तिथे आला. ताटकळत बसलेल्या, वाट पाहून कंटाळलेल्या बँक प्रतिनिधींनी त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. अजय स्थानापन्न होईपर्यंत सर्वांनी टाळ्यांचा ठेका धरला. नंतर सारे बसल्यानंतर अर्धा तास इतर विषयांवर चर्चा रंगली. मुख्यतः अजय काढत असलेल्या बँकेबाबत सर्वच जण त्याच्यावर स्तुतीसुमने उधळत होते. एकाही प्रतिनिधीने थकीत कर्जासंदर्भात चकार शब्द काढला नाही. प्रत्येक जण दुसरा कुणी तरी विषय काढण्याची वाट पाहत होता. सिंहाच्या आयाळास स्पर्श कुणी करावा हा महत्त्वाचा प्रश्न होता. शेवटी अजय गल्ल्या म्हणाला,

"मला वाटते, ज्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे, तिकडे आपण वळू या. मला वाटले तुम्ही कुणी तो विषय काढाल. पण ठीक आहे, ऐका. माझा असा प्रस्ताव आहे की,....." असे सांगून गल्ल्याने स्वतःचा प्रस्ताव आणि भूमिका स्पष्ट शब्दात व्यक्त केली. ते ऐकून दुसर्‍याच क्षणी एका मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकेचे उच्चाधिकारी म्हणाले,

" हे शक्य नाही. ही सरळसरळ फसवणूक आहे. "

" ती कशी? तुम्हाला तुमचे कर्ज बेबाकी होण्याशी मतलब. ती रक्कम माझ्या खात्यातून येवो की अन्य कुणाच्या? यात गैरकानुनी आहे काय? नियमांच्या विरोधात जाऊन तुम्ही एक रूपया घेऊ नका, देऊ नका. एक कागद कमी असताना मंजुरी देऊ नका. इथे आपण आपलेच आहोत सारे, मला तुमच्या बँकांनी एवढे कर्ज दिले ते सारे नियम धाब्यावर बसवूनच दिले ना? एखादा अधिकारी अडून बसलाच तर त्याच्या वरिष्ठाचा किंवा एखाद्या मंत्र्यांचा फोन पुरे असायचा. काही बँकांनी तर कर्ज मंजूर करून, माझ्या खात्यात लाखो रुपये जमा केल्यानंतर सहा - सहा महिन्यांनंतर माझ्या सवडीनुसार कर्ज मागणी अर्जावर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. "

" हो. हो. गल्ल्यासाहेब बरोबर म्हणत आहेत. आमच्या बँकेने साहेबांना पंचवीस लाख रुपये मंजूर करून खात्यात जमा केले. त्यावेळी गल्लाजी परदेशात होते. तिथे त्यांना पैशाची अत्यंत गरज होती. तिथून त्यांनी राञी उशिरा आमच्या अध्यक्षांना फोन केला. पाठोपाठ एका मंत्र्यांनाही यांनी फोन करायला लावला. मग काय राञी दोन वाजता बँकेचे संबंधित अधिकारी एकत्र आले. कोणताही प्रस्ताव नसताना यांच्या खाती पंचवीस लाख रुपये कर्जापोटी जमा केले. गंमत म्हणजे दोन महिन्यांनी आमचे ऑडिट लागले. गल्ल्यासाहेब परदेशातून आलेच नव्हते म्हणून मग अध्यक्षांनी मला खास दूत म्हणून परदेशी पाठविले. त्यानिमित्ताने मला परदेशी जाता आले. थँक्स हं साहेब. "एक बँक प्रतिनिधी म्हणाला.

" गल्ल्याजींचा प्रस्ताव नियमाला धरून आहे. ते म्हणतात ना, भागते चोर की....... अरे, बापरे! अजयसाहेब, स.. स...सॉरी! " असे घाबरून म्हणणाऱ्या त्या प्रतिनिधीस थांबवून अजय म्हणाला,

" केवळ दोनच दिवसांत प्रत्येकाचा एक एक रूपया चुकता करीन."

"आम्ही तयार आहोत. आम के आम, गुटली के दाम! हमे आमसे मतलब होना चाहिये, न की गुटली से... "

शेवटी सर्वांनी अजय गल्ल्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि त्याचेच तीन तीन वेळा आभार मानून त्याचा निरोप घेतला..

त्याच रात्री उशिरा अजय गल्ल्याने प्रत्येक बँकेच्या अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासोबत बसून गल्लोगल्ली जे कँप लावले होते तिथे प्राप्त झालेल्या कागदपत्रांची तपासणी करून त्या त्या बँकांकडे आलेले कर्ज प्रकरणे दाखल केले. दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित बँकांमध्ये कर्ज विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले. एकूण एक प्रस्तावाची बारकाईने, कसून तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे त्याच दिवशी दुपारी तीन वाजता ज्यांनी ज्यांनी कर्ज प्रस्ताव सादर केले होते, त्यांचे कर्ज मान्य झाल्याचे संदेश प्रत्येकाला भ्रमणध्वनीवर प्राप्त झाले. याचा अर्थ अजय गल्ल्या या बँकेने 'चोवीस तासांत' कर्ज हे वचन पाळले होते. सोबतच मंजूर झालेले कर्ज प्रत्येकाच्या खाती जमा केल्याचा दुसरा संदेश ही बँकेने पाठवला होता. ते वाचून कर्जदार सभासदांमध्ये प्रचंड आनंदाचे, समाधानाचे वातावरण पसरले होते. जल्लोष करताना सारेच अजय गल्ल्यास धन्यवाद देताना त्याचे गुण गात होते.... राञी उशिरापर्यंत जागून प्राप्त झालेल्या संदेशांचे जणू अनेकांनी पारायण केले. सर्वत्र आनंदी वातावरण होते.

दुसर्‍या दिवशी कर्जदिन अर्थात ' कर्ज पंचमी' साजरी करावी, या हेतूने कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेतल्याने एकूण एक कार्यालये ओस पडले होती. गल्ली गल्लीतील लोकांनी एकत्र येऊन मिरवणुका काढल्या. ह्या मिरवणूका एकमेकींशी मिळत भव्य स्वरूपात एकत्र आल्या. छोट्या - मोठ्या प्रत्येक मिरवणुकीत एकाच व्यक्तीचा जयघोष सुरू होता तो म्हणजे अजय गल्ल्याचा! अनेकांनी विविध वाहने सजवून त्यामध्ये गल्ल्याचे छायाचित्र लावून, हार घालून गुलालाची उधळण करीत होते. साऱ्या कर्ज पंचमीच्या मिरवणूका शहरातील एका अतिविशाल मैदानावर एकञ आल्या. तिथे अजय गल्ल्यासही सन्मानाने पाचारण करण्यात आले. त्याचे व्यासपीठावर आगमन होताच घोषणांना, जयजयकारास भरते आले. प्रत्येक वसाहतीतील प्रतिनिधींनी गल्ल्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. गल्ल्यावर स्तुतीसुमने उधळणारांमध्ये जणू स्पर्धाच लागली.... सत्काराला उत्तर देण्यासाठी अजय गल्ल्या उभा राहिला आणि टाळ्या आणि घोषणांनी परमोच्च बिंदू गाठला. अजय गल्ल्या आपल्या भाषणात म्हणाला,

"सर्वांचे मनापासून धन्यवाद! उद्या दुपारनंतर प्रत्येकाला आपल्या खात्यातून रक्कम काढता येऊ शकेल. मी आज रात्री उशिरा महत्त्वाच्या कामासाठी परदेशी जात आहे. माझी सर्वांना एक विनंती आहे, ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे, त्याचसाठी खर्च करा. शानशोकीसाठी कर्जाची रक्कम वापरू नका. महत्त्वाचे म्हणजे हप्ता थकवू नका. कर्ज थकल्यामुळे काय होते ते मी अनुभवले आहे. गरिबी, लाचारी कुणाच्या नशीबी येऊ नये म्हणून मी अजय गल्ल्या ही बँक सुरू केली आहे. ही बँक वर्षाचे ३६५ दिवस आणि दिवसाचे चोवीस तास सुरू असेल. अर्ध्या रात्री कुणाला पैशाची गरज भासली तर त्याच्यावर पूर्वीचे कर्ज असो वा नसो आपल्या बँकेचे दरवाजे कायम जनतेसाठी खुले असतील. जयहिंद!.... " म्हणत टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात अजय गल्ल्या व्यासपीठावरून खाली उतरून एखाद्या नेत्याप्रमाणे दोन्ही हात जोडून उपस्थितांनामधून बाहेर पडला......

एका वेगळ्याच समाधानात, प्रसन्न अवस्थेत सारे लोक घरोघरी परतले. राञी उशिरा केंव्हा तरी भ्रमणध्वनीवर आलेल्या संदेशाने सकाळी सकाळी सर्वांचे स्वागत केले. सर्वत्र हाहाकार माजला. बँकेकडून आलेल्या संदेशामध्ये म्हटले होते,

' अमूक धनादेशानुसार आपल्या खात्यात अमूक रक्कम खर्च खात्यात टाकण्यात आली असून अंतिम शिल्लक शून्य रुपये आहे.'

त्या संदेशानुसार खातेदारांच्या खात्यातून कर्ज म्हणून जमा झालेली रक्कम कुणी तरी परस्पर काढून घेतली होती. अनेकांनी धनादेशाचा क्रमांक तपासला असता असे लक्षात आले की, कर्ज प्रस्तावासोबत दिलेला धनादेश कुणी तरी परस्पर वटविला होता. घाबरलेल्या, चिडलेल्या लोकांनी अजय गल्ल्या या बँकेच्या शाखेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण, शहरात त्यांची कुठेही शाखा नव्हती. संतापलेल्या लोकांनी अजय गल्ल्या बँकेचे सभासद होतांना दुसर्‍या एका बँकेत खाते उघडण्याचा अर्ज भरला होता त्या बँकांसमोर प्रचंड गर्दी केली. तिथे आधीच भरपूर पोलीस तैनात करण्यात आले होते. निषेधाच्या घोषणाबाजी सुरू झाली आणि काही वेळात बँक अधिकारी जमावासमोर येऊन म्हणाले,

"काय झाले ते शांतपणे ऐकून घ्या. अजय गल्ल्यांनी तुम्हाला हातोहात फसवले आहे.हवे तेवढे कर्ज देण्याची लालूच दाखवून तुमच्याकडून कर्जाच्या प्रस्तावासोबत स्वाक्षरी असलेले कोरे धनादेश घेतले. नियमानुसार आम्ही कर्ज मंजूर करून रक्कम तुमच्या खात्यात जमा करताच तुम्ही दिलेल्या कोऱ्या धनादेशाचा दुरूपयोग करून तुमच्या खात्यातील सारी रक्कम स्वतःच्या कर्ज खात्यात जमा करून बेबाकी झाला. सर्व बँकांचे बावीस हजार कोटी रुपये एकमुस्त जमा करून तो रातोरात विदेशात निघून गेला. कोणत्याही बँकेचा यात तिळमात्र दोष नाही. नियमानुसार सर्व प्रस्तावांची, कागदपत्रांची डोळ्यात तेल घालून, काटेकोर तपासणी करून मंजूर झालेले कर्ज सभासदांच्या खात्यात जमा करून मोबाईलवर संदेश पाठविले. नंतर अजय गल्ल्या यांनी जमा केलेले तुमचे धनादेश त्यांच्या खात्यात जमा करण्याचे कामही नियमानुसार बँकांनी केले. यात बँकेची कोणतीही चूक वा गैरकानुनी काम केलेले नाही. ज्यांना बँकेने फसवणूक केली असे वाटत आहे, त्यांनी खुशाल न्यायालयात जावे.... " असे निर्वाणीचे सांगत अधिकारी निघून गेले..... ' साजरी करायला गेले कर्जपंचमी, साजरी झाली रंगपंचमी!' अशी सर्वांची अवस्था झाली......

विजय वाहिन्यांवर 'अजय गल्ल्या' स्पेशल शो पाहत असताना चहा घेऊन आलेल्या विजयाला बघताच विजय मनात म्हणाला, 'बायको असावी तर अशी! विजयाने कर्ज विरोध केला म्हणूनच आपण लाखो रुपयांनी लुटले जाण्यापासून वाचलो.. '

चहाचा कप देताना विजया म्हणाली, "अहो, मी तुमच्या खिशातून की नाही, दोन हजाराची एक नोट घेतली बरे. असे पाहता काय, आपल्या वॉचमनचा मुलगा प्लेग्रुपमध्ये ऊत्तीर्ण झालाय की नाही, त्याचा डॉन मंगलकार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार आहे. आमच्या 'भिशि'च्या बायकांनी असे ठरवले की, त्या पोराला एक छान भेट वस्तू देऊ या........ इश्श! असे काय पाहताय हो. कसे तरीच होतेय हो..... " असे म्हणत लालेलाल चेहर्‍याने खाली मान घालून विजया पायाच्या अंगठ्याने पॉलिश फरशीला चमकावत होती......


Rate this content
Log in