Click here for New Arrivals! Titles you should read this August.
Click here for New Arrivals! Titles you should read this August.

Charumati Ramdas

Others


3  

Charumati Ramdas

Others


जादूचा शब्द

जादूचा शब्द

3 mins 1.5K 3 mins 1.5K

जादूचा शब्द


लेखक: वालेन्तीना असेयेवा

भाषांतर : आ. चारुमति रामदास


लांब, पांढरी शुभ्र दाढी असलेला लहानसा म्हातारा बेंचवर बसला होता आणि छतरीने रेतीवर कसल्यातरी रेघोट्या काढंत होता.

“थोडंसं सरका, प्लीज़,” पाव्लिकने त्याला म्हटलं आणि बेंचच्या कोप-यावर बसला.


म्हातारा थोडासा सरकला आणि मुलाच्या लाल, वैतागलेल्या चेह-याकडे बघून तो म्हणाला:

“तुला काही झालंय कां?”

“ठीकाय, ठीकाय! आणि तुम्हांला काय करायचं?” पाव्लिकने तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघितलं.

“मला तर काही करायचं नाहीये. पण तू आत्ता ओरडंत होता, रडंत होता, कुणाशीतरी भांडंत होता...”

“हे छान आहे!” रागाने मुलगा पुटपुटला. “मी लवकरंच नेहमीसाठी घरांतून पळून जाईन.”

“पळून जाशील?”

“पळून जाईन! फक्त लेन्कामुळे पळून जाईन,” पाव्लिकने मुठी आवळल्या. “मी आता तिला चांगलं बदडणारंच होतो! एकही रंग मला नाही देत! आणि तिच्याकडे कित्ती सारे आहेत!...”

“नाही देत? ठीक आहे, पण फक्त ह्याच कारणासाठी पळून जाण्यांत काही अर्थ नाहीये.”

“फक्त ह्याच कारणाने नाही. आजीने फक्त एका गाजरासाठी मला किचनमधून बाहेर हाकलून दिलं...सरळ पोते-याच्या फडक्याने, पोते-याच्या फडक्याने...”

पाव्लिक अपमानामुळे जोरजोरांत श्वास घेऊं लागला.

“मूर्खपणा!” म्हातारा म्हणाला. “एक रागावतो – दुसरा कुरवाळतो, दया दाखवतो.”

“कुणीही माझ्यावर दया नाही दाखवंत!” पाव्लिक किंचाळला. “दादा बोटिंग करायला जातो, आणि मला नाही नेत. मी त्याला म्हणतो, “ब-या बोलाने मला घेऊन चल, मी तसाही तुझ्यामागे नाही राहणार, वल्ह्या खेचून घेईन, स्वतःच उडी मारून नावेंत चढून जाईन!”

पाव्लिकने बेंचवर मुठीने प्रहार केला. आणि मग एकदम गप्प झाला.

“तर, दादा तुला नाही नेत?”

“आणि तुम्हीं प्रत्येक गोष्ट कां विचारताय?”

म्हातारा आपली दाढी कुरवाळून म्हणाला:

“मला तुझी मदत करायचीय. एक जादूचा शब्द आहे...”

पाव्लिकचं तोंड उघडंच राहिलं.

“मी तुला तो शब्द सांगेन. पण लक्षांत ठेव: त्याला खूप शांत आवाजांत म्हणायचं असतं, थेट त्या माणसाच्या डोळ्यांत बघंत, ज्याच्याशी तू बोलतो आहे. लक्षांत ठेव – शांत आवाजांत, थेट त्याच्या डोळ्यांत बघंत...”

“तो कोणचा शब्द आहे?”

म्हातारा थेट मुलाच्या कानावर वाकला. त्याची नरम दाढी पाव्लिकच्या गालाला स्पर्श करंत होती. तो कानांत काहीतरी कुजबुजला आणि मग मोठ्याने म्हणाला:

“हा जादूचा शब्द आहे. पण हे विसरू नकोस की तो कसा म्हणायचांय.”

“मी प्रयत्न करीन,” पाव्लिक हसूं लागला, “मी आत्ताच जाऊन प्रयत्न करतो.”

त्याने उडी मारली आणि तो घराकडे धावला.

लेना टेबलाशी बसून ड्राइंग काढंत होती. रंग – हिरवा, निळा, लाल – तिच्यासमोर पडले होते. पाव्लिकला बघतांच तिने लगेच त्यांना गोळा केलं आणि त्या ढिगाला हाताने लपवलं.


‘धोका दिला म्हाता-याने!’ मुलाने निराशेने विचार केला. ‘अश्या मुलीला तो जादूचा शब्द काय कळेल!’

पाव्लिक एका बाजूने बहिणीजवळ गेला आणि तिचा हात धरून खेचू लागला. बहिणीने वळून पाहिलं. तेव्हां, तिच्या डोळ्यांत बघंत, अगदी हळू आवाजांत मुलगा म्हणाला, “लेना, मला एक रंग दे ना...प्लीज़...”लेनाचे डोळे विस्फारले. तिचे बोटं सैल झाले, आणि, टेबलावरून हात काढंत, ती चकित होऊन कुजबुजली: “कोणचा पाहिजे तुला?”

“मला निळा पाहिजे,” नम्रतेने पाव्लिक म्हणाला.

त्याने रंग घेतला, हातांत धरला, तो घेऊन थोडा वेळ खोलींत हिंडला आणि बहिणीला परंत देऊन दिला, त्याला तर रंग नकोच होता. आता तो फक्त जादूच्या शब्दाबद्दल विचार करंत होता.

“आजीकडे जातो. ती काहीतरी बनवतेय. ती मला हाकलून लावेल की नाही हाकलणार?”

पाव्लिकने किचनचं दार उघडलं. आजी कढईतून गरम-गरम समोसे काढंत होती. नातू तिच्या जवळ धावला, दोन्हीं हातांनी तिचा लाल, सुरकुत्या असलेला चेहरा आपल्याकडे वळवला, आणि थेट तिच्या डोळ्यांत बघंत कुजबुजला:

“मला समोस्याचा एक तुकडा दे न, प्लीज़.”


आजी सरळ उभी राहिली. जादूचा शब्द तिच्या चेह-याच्या प्रत्येक सुरकुतींत, तिच्या डोळ्यांत, तिच्या स्मितांत चमकंत होता...

“गरम-गरम...गरम-गरम पाहिजे माझ्या लाडक्याला!” सगळ्यांत मस्त, कुरकुरीत समोसा उचलंत तिने म्हटलं.

पाव्लिकने आनंदाने उडी मारली आणि त्याने आजीच्या दोन्हीं गालांचा मुका घेतला.

“जादुगार! जादुगार!” म्हाता-याला आठवंत तो स्वतःशीच बडबडंत होता..

लंचच्या वेळेस पावेल शांत बसला होता आणि दादाचा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकंत होता. जेव्हां दादा म्हणाला की तो बोटींगसाठी जातोय, तेव्हां पाव्लिकने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूंच विनंती केली:

“मलापण घेऊन चल नं, प्लीज़.”टेबलाशी बसलेले सगळे लोक एकदम गप्प झाले. दादाने भिवया उंचावल्या आणि हसला.

“त्याला घेऊन जा,” अचानक बहीण म्हणाली, “तुला करायचं काय आहे!”

“हो, कां नाही नेणार?” आजी हसली. “नक्की, घेऊन जाईल.”

“प्लीज़,” पाव्लिक पुन्हां म्हणाला.दादा खो-खो हसंत सुटला, त्याने मुलाच्या खांद्यावर थाप मारली, त्याचे केस विस्कटून लावले.

“ऐख़, तू, ट्रेवलर! ठीक आहे, चल, तयार हो.” ‘आश्चर्यच झालं! ह्याने तर कमालंच केली! पुन्हां कमाल केली!’

पाव्लिक उडी मारून टेबलावरून उठला आणि रस्त्यावर पळाला. पण चौकांत म्हातारा नव्हतांच. बेंच रिकामा होता, फक्त रेतीवर छतरीने काढलेले काही न कळणारे चिह्न होते.


Rate this content
Log in