इण्डियन फ़िल्म्स 3.1
इण्डियन फ़िल्म्स 3.1


लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
आन्या आण्टी आणि इतर लोकं...
(माझ्या बिल्डिंगच्या काही लोकांबद्दल)
आमच्या मजल्यावर आन्या आण्टी राहते, तिला मी आणि मम्मा माहीत नाहीं कां, शेपिलोवा म्हणूनंच बोलावतो. शेपिलोवा तिचे आडनाव आहे. हे आडनाव तिच्यावर अगदी चपखल बसतं, ते ह्या चांगल्या बाईच्या चांगुलपणाला व्यवस्थित प्रकट करतं.
तर, ती खूप फास्ट आणि चतुर आहे, उँची जवळ-जवळ एकशे सत्तावन से.मी. होती (तिने स्वतःच सांगितलं होतं), ती खूपंच रोड होती; चंचल, तीक्ष्ण, उत्सुक डोळे आणि बारीक असले तरी खूप मजबूत हात होते तिचे. हात तर तिचे खरंच खूप मजबूत होते, कारण की ती रोज खूप लांबून खाण्यापिण्याचे सामान आणि भाजी पाल्याने भरलेल्या, आणि देव जाणे आणखीही काही काही वस्तूंनी भरलेल्या मोठ्या मोठ्या पिशव्या आणायची. हे सगळं कोणकोणत्या आण्टीज़साठी आणि अंकल्ससाठी, आजोबांसाठी आणि आजींसाठी असायचं ज्यांना ती ओळखायची, किंवा फक्त ओळखीच्या लोकांसाठीसुद्धां असायचं. आन्या आण्टी त्यांना मदत करते, कारण, ते “कठिण परिस्थितीत जगताहेत”.
तसं मी आणि मम्मा तर कठीण परिस्थितीत नाहीं जगंत, पण शेपिलोवाच्या मते आम्हांला सुद्धां मदतीची गरज आहे, कारण की आम्हीं सारखं काम करतो. आणि ती आमच्यासाठी बाजारातूंन भाजी पाला, फळं आणि अशी प्रत्येक वस्तू घेऊन येते, ज्याची तिच्या मताप्रमाणे आम्हांला गरज असते. पैसे आम्हीं देतोच, पण मी सारखा विचार करतो की मी स्वतःसुद्धां, बरेंचदा बाजारात जाऊन काकडी आणि टॉमेटो आणू शकतो. पण आन्या आण्टीचं मत वेगळंच आहे:
‘रचनात्मक प्रक्रियेसाठी सम्पूर्ण समर्पणाची आणि आंतरिक शक्तींना एकाग्र करण्याची खूप गरज आहे!’
म्हणजे, आमच्या शेजारणीला असं वाटतं की जर मी दिवसाचा थोडा अंश गोष्ट किंवा लघु उपन्यास लिहिण्यांत घालवतो, तर उरलेल्या वेळांत टॉमेटो विकत घेण्यांत काहीच अर्थ नाहीये. मी तिच्याशी वाद घालायचो, पण तो फुकटंच असायचा. आन्या आण्टी हट्टी आहे, अगदी लोखण्डासारखी. तिला वाकवणं शक्यंच नाहीये. आणि ती नेहमी आपलंच खरं करते, कोणत्याही परिस्थितीत.
आतां उदाहरणंच द्यायचं तर हे बघा. काही दिवसांपूर्वी मम्माने आन्या आण्टीला म्हटलं की काही गरम जैकेट्स आणि आणखी काही सामान आपल्या अश्या परिचितांसाठी घेऊन जा, जे खूप धनाढ्य नाहीयेत, ज्यांना त्याचा उपयोग होईल (तुम्हांला तर माहीतंच आहे की शेपिलोवाची कित्ती तरी लोकांशी ओळख आहे). पण स्वतः आन्या आण्टीलाच ते राखाडी रंगाचं जैकेट खूपंच आवडलं. तिने ठरवलं की ते जैकेट स्वतःसाठीच ठेवायचं. आणि रविवारी सकाळी, जवळ-जवळ साडे आठ वाजतां, आम्हीं झोपेतंच असतांना दारावरची बेल वाजते.
“तानेच्का, ही मी आहे,” दाराच्या मागून शेपिलोवा ओरडते.
माझी मम्मा, जिचं नाव तान्या आहे, दार उघडते.
“मी तुम्हांला उठवलं तर नाहीं नं?! नाहीं! मी आत्तांच बाजारांतून आलेय, हे घ्या काकड्या, टॉमेटो, संत्री, एपल्स, आंबट कैबेज! ठेऊन घ्या. आणि ते, राखाडी जैकेट, मी स्वतःसाठी ठेवायचं म्हणतेय, चालेल? मी त्याच्यासाठी तुम्हांला पैसे देणारेय. नक्कीच देणार, कारण की ते लोकरीचं आहे, महागडं आणि मस्तं आहे!”
आणि काही बोलायची उसंत न देता एक हजार रूबल्स पुढे केले, त्या जुन्या जैकेटसाठी, ज्याची मम्माला काहींच गरज नव्हती, आणि त्याच्यासाठी शेपिलोवाकडून पैसे घेणं चूकंच झालं असतं.
“कसले पैसे!” मम्माला पण राग आला. “आन्या! असा विचार पण करूं नकोस! मी असंच सगळं देऊन टाकलं होतं, त्या एकदम निरुपयोगी वस्तू आहेत!”
“पण जैकेट तर सुरेख आहे!” आन्या आण्टीने आवाज़ चढवंत म्हटलं, तिला वाईट वाटलं होतं, आणि ती वाद घालू लागली. “कमीत कमी पाचशे तरी घ्या!”
“नाहीं!”
“तीनशे!”
“नाही!” माझी मम्मा ह्या हल्ल्याने गडबडून गेली.
“एकशे घेऊन घ्या, प्लीज़!”
“बस, आन्याआण्टी,” मी मधेच टपकलो. “इथून जा, प्लीज़. थैंक्यू वेरी मच.”
निराश होऊन ती दाराकडे जाते, पण लैच फिरवायच्या आधी वळून सांगते:
“हरकत नाहीं. मी आणखी काही विचार करीन.” आणि तिने विचारमग्न होऊन डोकं हलवलं.
सोमवारी संध्याकाळी एक मोठ्ठा, कदाचित एक लिटरचा, लाल कैवियरचा (स्टर्जन माशाच्या अण्डाच्या एक पदार्थ) डब्बा घेऊन येते, आणि धमकी देतं पैसे नाहीं घेत की अश्याने आपली दोस्ती संपेल. ह्या कैवियरची किंमत, माझ्या मते एक हज़ारापेक्षां जास्तंच असेल. आन्या आण्टीने आपलं म्हणणं खरं केलं, आणि तुम्हीं समजलेच असाल की तिने जैकेटची किंमत चुकवली...