इण्डियन फ़िल्म्स 2.5
इण्डियन फ़िल्म्स 2.5
लेखक: सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर: आ. चारुमति रामदास
माझी पणजी आजी - नताशा
संध्याकाळी मला घरी आणणं खूपंच कठीण आहे, विशेषकरून जेव्हां थण्डीचे दिवस असतांत आणि हॉकीचा खेळ चालू असतो. टेपने गुण्डाळलेली माझी स्टिक “रूस” घेऊन मी एका गोल पासून दुसरीकडच्या गोलकडे जात असतो (आमचे गोल – लाकडाचे डब्बे आहेत, जसे भाजीच्या दुकानाजवळ पडलेले असतात), कानांना झाकणारी लांब पट्ट्यांची टोपी टेकडीवर फेकली आहे, म्हणजे ती खाली डोळ्यांवर घसरू नये, आणि खिडकीतून येणारा आवाज़, की घरी परतायची वेळ झाली आहे, कारण की अंधार झालेला आहे, ऐकूंच नाही येत.
पण रात्रीचे दहा वाजून गेले आहेत, आणि माझी पणजी आजी बाहेर पोर्चमधे येते आणि मला ओंजारत-गोंजारत बोलावते:
“सिर्योझेन्का-आ! चल घरी जाऊं या, आजोबा आले आहेत, आणि त्यांनी काय आणलंय माहितीये! आय-आय-आय-आय!...”
मला मित्रांसमोर लाज वाटते की आजेबाची गिफ्ट हॉकीहून जास्त महत्वपूर्ण असूं शकते, पण तरीही मी थांबतो आणि नताशाकडे बघतो.
“काय आणलंय?”
“ओय, ते स्वतःच तुला दाखवतील, चल, जाऊं या.”
खरंच, मजेदार गोष्ट आहे, की आजोबाने काय आणलंय, - कदाचित दलदलीतून वेत आणले असतील, मी कित्ती दिवसांपासून मागतंच होतो. पण सध्यां तर थण्डीचे दिवस आहेत, आता कुठली आलीय दलदल?
आमच्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वारांत घुसतो. मी पुढे-पुढे, नताशा माझ्या मागे. आम्हीं दुस-या मजल्यावर राहतो, जास्त नाही चालावं लागंत, पण तरीही मी विचारतोच की आजोबाने काय आणलंय. आणि तेव्हां, हे समजून, की मी आता उडी मारून परत बाहेर रस्त्यावर नाहीं पळणार, कारण की तिने माझी वाट रोखली आहे, नताशाचा चेहरा एकदम बदलतो, आणि मला पाठीमागून एखाद्या युद्धकैद्यासारखी ढकलंत ती खडसावते:
“चल! शैतान बाहुल्या! काय आणलयं! ह्याला घरी आणणं मुश्किल आहे! बघ, तुझी स्टिक तर बाकावर तडकली आहे – नवीन नाही घेऊन देणार!!!” &nbs
p;
पण तरीही पणजी आजी मला फार आवडते. जेव्हां फराफोनवा (माझी लोकल डॉक्टर) पहिल्यांदा आमच्या घरी आली, तेव्हां तिने मला बघितलं आणि म्हणाली:
“ओय, कित्ती गोड मुलगी आहे!”
मी स्कर्ट-ब्लाऊज़मधे होतो,डोक्यावर रुमाल बांधला होता – म्हणजे – मी नताशाचा सम्पूर्ण ड्रेस घातला होता.
“मी मुलगी नाहीये!” मी लाजलो.
“मग, तू कोण आहेस, मुलगा?”
“मुलगी नाहीं आणि मुलगा पण नाहीं! मी पणजी आज्जी नताशा आहे, आणि माझं वय पंचाहत्तर वर्षं आहे!”
आता फराफोनवाने गंभीरतेने तोन्या आजीला समजावले की मला स्कर्ट घालूं देऊं नये, नाहीतर मला ती सवय लागेल आणि माझ्या मनःस्थितिवर ह्याचा परिणाम होऊं शकतो, पण तोन्या आजीने अत्यंत दुःखाने उत्तर दिलं की असं करणं शक्य नाहीये, आणि गोष्ट जर स्कर्टपुरतीच मर्यादित असती तर काळजीची काही बाब नव्हती, पण मी तर नताशाची सगळी भांडी घेऊन घेतलीय आणि तिचीच औषधंसुद्धां खात असतो – ब्लडप्रेशरचं , चक्कर यायचं, आणि हार्टचं... (पण मी खरोखरीची औषधं थोडीच खातो, मी वाटाण्याचे दाणे, चॉकलेट्स खातो आणि डोळ्यांत सुद्धां आय-ड्रॉप्स नाहीं, नुसतं पाणीच घालतो).
आणि नताशाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. एकदां संध्याकाळी ती “छोटा गरुड” बाइसिकल घेऊन आले.
माझ्याकडे “स्कूल बॉय” होती, आणि तिला माहीत होतं की मला एक मोठी साइकल पाहिजे. बस, घेऊन आली. “ओह, जिन्यावरून मोठ्या मुश्किलीने आणली!”
आवाज़ ऐकून तोन्या आजी किचनमधून बाहेर आली.
“हे काय आह?”
“अगं, मी मिलिट्री स्टोरच्या जवळून जात होते – ही तिथे उभी होती. अर्धा घण्टा उभीच होती, हिला घ्यायला कोणीच आलं नाही. चला, सिर्योझासाठी होईल.”
“मम्मा,” तोन्या आजी म्हणाली, “तुला अगदी वेड लागलं आहे. हिला कोणीतरी तिथे ठेवलं होतं! तुला स्वतःला सुद्धां कळंत नाहीये की काय करायचंय. परत घेऊन जा.”
आणि नताशा साइकल परत ठेवायला चालली गेली. ही तोन्या आजी घरांत नसती, तर “छोटा गरुड” माझ्या कडेच राहिली असती!
े