इण्डियन फ़िल्म्स - 1.4
इण्डियन फ़िल्म्स - 1.4


लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
जेव्हां मी वीस वर्षाचा होईन, तेव्हां वेरोनिकाला भेटेन आणि आम्ही लग्न करून टाकू. मग हळू-हळू मी एक मोठा माणूस वी.आइ.पी. होईन आणि तीस वर्षाच्या वयांत नक्कीच डाइरेक्टर होईन. हे फार पूर्वीपासून होत आलं आहे, मग ह्यातूंन सुटणार कसं? मला नक्की नाहीं माहीत की ते काम, ते ऑफ़िस कसं असेल, जिथे मी डाइरेक्टर असेन, पण काम मात्र फार जवाबदारीचं असणार, काही असं-तसं, आलतू-फालतू काम नसेल. मी स्वतःच्या कैबिन मधे बसेन, टेलिफ़ोन वर बोलेन, खिडकीच्या बाहेर एक मोट्ठं कम्पाऊण्ड असेल, जिथे खूप सारे ट्रक्स, कन्टेनर्स आणि ड्राइवर्स असतील, आणि मला, कोणत्याही अवस्थेत पालिचला तीन वाजायच्या आधी ल्वोवला पाठवावंच लागेल आणि वलेराला – एलाबूगाला पठवायचं आहे, लगेच. पण वलेराला, माहितीये, एलाबूगाला नेण्यासाठी काहीच नाहीये , तो नुसतांच उभा आहे! आणि, मी टेलिफोनवरून खडसावेन:
“तुम्हांला कळतंय कां जॉर्ज ल्वोविच, मला ह्या गोष्टीत जरा देखील इंटरेस्ट नाहीय की तुमच्याकडे कामाला कोण आलयं आणि कोण नाही आलं! मला फक्त येवढंच पाहिजे की विश्न्याकोवला एग्रीमेन्टप्रमाणे पेमेन्ट झाले पाहिजे!”
मग मी, पप्पांसारखं रागे भरेन, आणि पालिच तडक नोरील्स्कला जाईल, वालेरा – एलाबूगाला, आणि मी आपल्या सेक्रेटरी वीकाला कम्प्लेन्ट करेन की सगळेच्या सगळे मूर्ख आहेत, एक फक्त मीच नॉर्मल आहे – हो, हो.
वीका प्रत्येक वेळेस ‘हो ला हो’ म्हणत असेल, जर एखाद्या गोष्टींत तिचं मत वेगळं असलं तरीही. पण एकदा तिला कळेलं की मी फार रागीट आहे, आणि मी तिला सांगेन की जर माझ्याशी एकमत नसेल, तर फुकट भलते-सलते विचार करण्यापेक्षां तिने तसं स्पष्ट सांगावं.
“मी कधीच विचार करत नाहीं,” वीकाला वाईट वाटेल, “सेर्गेइ व्लादिमीरोविच, मला खरंच असं वाटतं की तुमच्या चारीकडे सगळी मूर्ख माणसं भरली आहेत, फक्त तुम्हीं एकटेच नॉर्मल आहांत. आणि सगळ्यांशी प्रेमाने वागतां, खूपंच प्रेमाने!”
आता मला सांगा, अशी सेक्रेटरी कुठे मिळेल? आणि, जर तिला माझ्या ‘हो शी हो’ म्हणायचं असेल तर काय करणार?
जेव्हां मी चाळीस वर्षाचा होईन तेव्हां माझ्या डाइरेक्टरशिपची टेन्थ एनिवर्सरी साजरी करण्यांत येईल.
शहरातल्या रेस्टॉरेन्ट - ‘इंद्रधनुष्य’ मधे भल्या मोठ्या डाइनिंग टेबललाशी मी बसला असेन, माझे प्रिय सहकारी, मित्र आणि अनेक महिला माझ्यासोबत असतील, स्टार्टर्स घेताना लोकांच्या शुभेच्छा घेईन, त्यांची भाषणं ऐकेन. माझ्या बद्दल, माझ्या मैत्रीबद्दल सम्मान प्रकट केला जाईल.
“तसं बघितलं तर, सिर्योझा,” माझ्या डेप्युटीज़पैकी एक म्हणेल, “साधारण मुलगा आहे, पण त्याच्या योग्यतेकडे बघतां त्याला सर्वोत्कृष्ट म्हणायला काही हरकत नाहीं! तो टेलिफोनचा रिसीवर उचलतो आणी फक्त पाच सेकंदात कोणालाही पटवतो, जेणेकरून वेळेवर सामान चढवणं आणि उतरवणं शक्य होतं.”
बोलणारा अशा पद्धतीने बोलत असेल कि त्याला माझा अधिकार, माझं प्रभुत्व सुदृढ आणि सर्वोच्च वाटतं, आणि मला खूष करणं – त्याची हार्दिक इच्छा आहे. पण एक विसंगत आणि लहरी व्यक्ति असल्यामुळे, मी अचानक आपल्या मित्राला खाली बसवेन आणि म्हणेन :
“बरं, बरं, एफ्रेमोव, काही बोलूं नको. चुपचाप स्नैक्स उचल आणि मग आपण सगळे मिळून ‘कराओके’ म्हणू.” माझ्या शेजारी बसलेली वेरोनिका हसून म्हणेल:
“कित्ती रानटी आहेस तू!” आणि डान्ससाठी निघून जाईल.
आणि जेव्हां मी घरी परत यायला निघेन, तेव्हां माझ्या सोबत वेरोनिका प्रसन्न मनाने चालत असेल.
“काय पार्टी होती!” ती म्हणेल.
आणि, मला माहीत नाहीं कां, ल्योशा रास्पोपोवची आठवण येऊन जाईल.
खरंच तो आमच्या कम्पाऊण्डचा सर्वांत चांगला मुलगा होता!
जेव्हां मी साठ वर्षांचा होईन, तेव्हां माझे नातवंडं असतील. ते आपल्या आजोबावर खूप प्रेम करत असतील, चांगले मार्कं आणून त्यांना खूष करत असतील आणि सदा लाडी-गोडी दाखवतं म्हणत असतील की मी त्यांच्यासोबत खेळावे.
“मी थकलोय,” टी.वी.चे चैनल बदलंत मी कह्णत-कह्णत म्हणेन, “मला विश्रांती घेऊ द्या, दुष्टांनो!”
तेव्हां माझी नात मरीना मला मिठी मारेल आणि खूप-खूप विनंती करंत म्हणेल की मी त्यांच्याबरोबर बाहेर जाऊन ‘स्नो-मैन” बनवावा.
“बस, आता फक्त ‘स्नो-मैन’ बनवणंच शिल्लक राहिलंय!” मी वेड्या सारखा म्हणेन. मला माहितीये की मी थोड़ासा ज़री तोंड वेंगाडत बोललो की मरीना हसत सुटेल. “हे-ए” मी तोंड वेंगाडून म्हणेन, “आलंय म्हातारं खुंट बाहेर रस्त्यावर आणि बनवतंय ‘स्नो-मै-ए-न. येवढी रात्र झालीय, सगळी मुलं आणि त्यांचे मम्मी-पप्पा आपल्या-आपल्या बिछान्यांत लपलेत, पण, डैम इट, मरीनाचा आजोबा बनवतोय स्नो-मै-ए-न.”
मरीनाचं तर हसतां-हसतां पोट दुखूं लागेल, आणि मी बोलतंच राहीन:
“सकाळपर्यंत स्नो-मैन अचानक टाळ्या वाजवूं लागेल आणि आजोबाच्या चारीकडे फेर धरंत नाचू लागेल. त्रा-ता-ता! त्रा-ता-ता! मुलं माझ्या आणि स्नो-मैनच्या जवळून शाळेत जाताना म्हणतील:
‘चौदा नंबरच्या क्वार्टरमधला (हे आमचं क्वार्टर आहे) म्हातारा अगदी भ्रमिष्ट झालांय. रात्रभर झोपंत नाही!’ पण मग आपल्या भागांत ज़ोरदार वारं सुटेल, मोट्ठे-मोट्ठे वादळं येतील, पण मी जरी कुठेही लपलेला असेन, तरी स्नो-मैनचे रक्षण करीन.”
बस, पुरे झालं आजोबा!” मरीना ओरडेल, किंचाळेल, पण मी म्हणतंच राहीन:
“आणि हवा माझ्या बरोबर स्नो-मैनला सुद्धां जमिनीवरून नेहमीसाठी उडवून नेईल. असं होऊं नये, म्हणून, माझे लाडके, मला तुमच्याबरोबर स्नो-मैन बनवण्याची गळ नको घालू.”
अशा प्रकारे मी बर्फाने काहीही बनवायला नाही जाणार, आणि मुलांसोबत खेळंत राहीन.
जेव्हां मी ऐंशी पेक्षा थोड्या जास्त वयाचा होईन तेव्हां माझी शेवटची घटका जवंळ आलेली असेल. पण त्या कठिण क्षणांत सुद्धा मी प्रसन्नच राहीन. नातवंडांना जवळ बालावून सांगेन:
“मुलांनो, माझी अंतिम घटका येऊन ठेपली आहे. तुमचे आजोबा क्षणाक्षणाला मृत्युच्या जवळ-जवळ जात आहेत. पट्कन चहा आणि सैण्डविचेस आणा, शेवटचं खाऊं या.”
डबडबलेल्या नेत्राने माझी नात मरीना सैण्डविच करायला जाईल, आणि माझे गंभीर नातू ( ते, म्हणजे, त्यावेळेपर्यंत मोठे झालेले असतील) दगडासारखे चेहरे घेऊन सोफ़्यावर बसतील, आणि त्यांना जीवन ओझ्यासारखं वाटत असेल.
आणि, त्यांच्याकडे बघितल्याबरोबर मला जणु लहानसा सैतानंच चावेल.
“काय रे, दुःखी झालांत का, मुलांनो?” मी विचारीन. “बघा, मी काय म्हणतो, ते ऐका. डेनिस, तुला मी सांगतोय आणि फक्त मैत्रीपूर्ण सल्ला देतोय की तू तुझ्या फर्ममधे दरोडेखोरांबरोबर काम करणं सोडून दे, आणि प्रामाणिकपणे जगायला आणि काम करायला सुरुवात कर. आणि तुला, एल्बर्ट, मी कोणतांच सल्ला नाही देणार, कारण की तू स्वतःच समजुतदार आहेस. फक्त एकंच गोष्ट, जी तुला सांगावीशी वाटतेय, ती म्हणजे, कध्धी असा चेहरा नको करूं, जसा तू आत्तां केलेला आहेस. मला कळतंय की माझ्या मृत्युचं तुला दुःख होईल, पण स्वतःच्या जीवनाचं काय करशील?” आणि मी नाक शिंकरतो.
तेवढ्यांत मरीना आमच्यासाठी चहा आणि सैण्डविचेस आणेल, पण आता माझी इच्छाच नसेल आणि मी नातवंडांना चहा प्यायला सांगेन.
“चला, एल्बर्ट आणि डेनिस, माझ्या सुखद यात्रेसाठी!”
“आजोबा, चहा पिण्याची इच्छांच नाहीये...” दात कटकट वाजवत डेनिस आणि एल्बर्ट म्हणतील आणि जे घडंत आहे, ते सहन न झाल्यामुळे मुठी आवळून धरतील.
“खा, मी म्हणतो खाऊन घ्या!!!” मी जोराने ओरडेन, जसा तरुणपणी ओरडायचो.
“आणि, त्यांनी चविष्ट सैंडविचला, जसे मरीना नेहमीचं करते, तोंड लावल्याबरोबर, माझी आत्मा छताकडे झेप घेईल, मग खिडकीतून बाहेर निघून जाईल, थोडा वेळ घराचा वरती फिरेल आणि लवकरंच देवाजवळ पोहोचेल.
“तर,” देव म्हणेल, “फुकट इकडे-तिकडे नको फिरू. घे हा कपडा आणि धूळ स्वच्छ कर, बाकीचे करताहेत तसं. नाहीतर इथे स्वर्ग स्वर्ग नाही राहणार, नरक होऊन जाईल.
आणि मी धूळ झाडू लागेन, म्हणजे स्वर्ग हा स्वर्गच राहील आणी...वगैरे, वगैरे.
एक वेळ अशी सुद्धां येईल, जेव्हां मी अजिबातंच नसेन.
गावातील रस्त्यांवर शरद ऋतूतील पावसाची झडी लागेल, कम्पाऊण्ड्समधे बोचरं वारं वाहेल, आणि माझे पाय कधीच फुलांच्या ताटव्यांवर नाही पडणार, माझ्या हाताची बोटं कधीच चुटकी वाजवणार नाहीत, माझ्या तोंडात कधीच चेरी-जूस नाही जाणार आणि माझं मन कधीच आनंदाने उचंबळून येणार नाही. नवीन लोक जन्म घेतील, ते आपापलं जीवन जगतील, माझ्या अनुभवांतून काहीच न घेतल्याशिवाय.
पण, कदाचित, कधीतरी ते माझं हे लहानसं पुस्तक वाचतील. त्यांना कळेल की मी आणि वेरोनिका कसे गैस स्टेशनच्या आवारांत हिंडायचो, आणि जिथे हे लोकं राहतात, तिथेसुद्धा गैस-स्टेशन्स असतीलंच. आपल्याकडे तर गैस-स्टेशन्स नेहमी घरांच्या जवळपासंच असतात नं!
लीज़ा स्पिरिदोनोवासारख्या दुष्ट, सुंदर मुली देखील फूल फेकतील आणि स्मित हास्य करतील, त्यांना आठवणंच नाही राहणार की त्यांच्यापेक्षां सुंदर सुद्धा कोणी आहे.
“हो-हो!” उँच आकाशातून मी त्यांना सांगेन.
आणि तेव्हां थोडा-थोडा पाऊस सुरू होईल. त्या आपापल्या घरांत पळतील चहा प्यायला आणि टी,वी. बघायला, ज्याच्यावर कित्येकदा संध्याकाळी ‘दोन किहोते’ बद्दल फिल्म दाखवंत असतील.