इण्डियन फ़िल्म्स - 1.11
इण्डियन फ़िल्म्स - 1.11
लवकरंच ऑगस्ट येणारेय...
हा आहे रस्ता. दूर एक घर आहे, जिथे पूर्वी म्हातारा मेंढपाळ राहायचा. नेहमी आपल्या शेळ्यांना घेऊन टेकडीवर जायचा. त्यांना तो कुठे ठेवत असे (जवळजवळ पंधरा शेळ्या होत्या त्याच्याकडे, त्यापेक्षा कमी तर नाहीच) – हे मला कधीच समजलं नाही. रस्ता संपल्यावर झाडांचा मळा लागेल. तिथे पहाडी-बदामाची झाडं आहेत. पण जसे सध्या आहेत, अगदी तसेच फक्त हिरवे, टणक, आंबट बदाम होते. कदाचित् जंगली-बदाम असतील आणि त्यांना खायचं नसतं? पूर्वी मला असं वाटायचं की हे खरे बदाम आहेत कारण मळा म्हणजे जंगलच असतो नं, भले ही छोटं का नसो; पण ते बदाम कधी पिकलेच नाही, म्हणून मी त्यांना कधी खाल्लं नाही. एकदा फक्त चव बघितली होती, म्हणून मला माहितीये की – आंबट आहेत.
आजीला चांगलंच आठवतं की युद्धापूर्वी काय काय होतं, पण माझं लहानपण, ज्याच्यासाठी मला आजी खूप-खूप आवडते, ते तिला आठवतंच नाही आणि ती मम्माच्या, मावशीच्या, बहिणीच्या बालपणाशी गफ़लत करून टाकते. तिच्या डोक्यात सगळं गड्ड्मड्ड झालं आहे, तिला फक्त एकच संध्याकाळ आठवते, जेव्हा त्यांच्या घरी डान्ससाठी कुरळ्या केसांचा एक तरूण आला होता आणि त्याने आजीला डान्ससाठी बोलावले होते. अठ्ठावीस वर्षांनंतर तो माझा आजोबा होईल, पण सध्या तर मला त्याचाशी कसलंच घेणंदेणं नाहीये. आजीला आपलं शहर आठवतं, त्याचं शहरपण आठवतं, मैत्रिणी आठवतात, स्टेशन ग्लत्कोव्का आठवतं, जिथे युद्धाच्या मोर्चावर न गेलेल्यांना कराचेवो गावातून काढून नेलं होतं, आणि तिला हे सुद्धा माहीत नाहीये की आता – सोवियत संघ नावाचा देशही नाहीये, तिला तर अजून त्या कुरळ्या केसांच्या तरूणाबरोबर डान्स करायचा आहे, पण अशाप्रकारे करायचा आहे की पाव्लिकला राग नाहीं येणार, तो हेवा नाही करणार...
मृत्यूची आजीला भीती नाहीी वाटत. कदाचित तिने त्याबद्दल कधी गंभीरतेने विचारच केला नसाव, पण आजोबा गेल्यानंतर, जणू काही ती मृत्यूची थोडी-थोडी वाट पाहातेय. जे काही इथे आहे, मनोरंजक आहे, - पण आता तिला ह्याचं काहीच महत्व नाहीये. डान्सेस, गाणं ‘स्टालिन – आमच्या सैन्याची शान, स्टालिन – आमच्या तरुणाईची उड्डाण’, जे त्यांच्या कम्सोमोल-ग्रुपमधे म्हणायचे, पाव्लिक, तूलाच्या जिंजरब्रेडच्या डब्यात ठेवलेली पत्रं – ह्यांच्या आठवणीतच ती जगतेय. मला हे समजतं आणि मी आजीवर आणखी जास्त प्रेम करतो. ती मला खेळण्यासाठी बाहेर जाऊ द्यायला तयार आहे.
मला ह्याचाशी काही घेणंदेणं नाही, की दीम्का, ज्याच्या निळ्या रंगाच्या दारावर किल्लीने खरवडून ‘सुपर क्लब’ लिहिलं होतं, तो अकराव्या वर्षी घरी बसला. कदाचित् एखाद्या गंभीर कारणामुळे घरी बसला असेल, पण ह्याने मला काहीच फरक पडत नाही, मला तो खूप आवडतो. दीम्का खरोखरंच ‘सुपर’ होता, सायकलच्या ‘स्पोक्स’ने ‘गन्स’ बनवायचा आणि एका बुक्कीत दोन बरगड्या बाहेर काढायचा. त्याने शाळा सोडली तरी काही हरकत नाही. त्याने सनकी रूस्ल्यापासून मला वाचवलं होतं. रूस्ल्या म्हणत होता की मी अनवाणी पायांनी सिमेन्टमधे ‘स्टेच्यू’ व्हावं, मी पण झालो असतो स्टेच्यू, मी रूस्ल्याला घाबरत होतो. पण दीम्का तिकडून जात होता, दीम्काची झापड बसल्यावर रूस्ल्या स्वतःच त्या पातळ सिमेंटमधे उडून पडला, आपलं घाणेरडं थोबाड घेऊन चिक्कट वस्तूत पडला आणि त्याला इतकं अपमानित झाल्यासारखं वाटलं की स्वतःच्याच थुंकीने तो गुदमरून गेला. तेव्हा दीम्काने मला चहा पाजला, केक खाऊ घातला, टॅक्सीत हिंडायला नेलं आणि बोलताबोलता एकदम अचूक सांगितलं की, बुशच अमेरिकेचा प्रेसिडेन्ट होणार. तेव्हा रीगन होता, इलेक्शनला तब्बल सहा महिने शिल्लक होते, पण दीम्काला आधीच सगळं माहीत होतं. म्हणजे, सगळे लोक जसं म्हणायचे की त्याला टेलिपॅथी
येते, ते बरोबरच होतं. त्याच्या घरात साखरसुद्धा ब्राऊन रंगाची असायची, जळून गेली होती म्हणून नाही, पण अशासाठी की ती आफ्रिकेतली होती; आता मला पक्कं माहीत आहे की दीम्कावर विश्वास ठेवायलाच हवा.
उन्हाळा लवकरच संपेल. आता जुलैचे शेवटचे दिवस आहेत, पण पायाखाली जमीन करकरू लागली आहे, एखादी लालसर, कडक वस्तू जीवनात प्रवेश करू पाहतेय. प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जाईल, आकाश जास्त दाट होईल, जुलैमधला तो भास लुप्त होऊन जाईल की आम्ही सगळे एखाद्या पारदर्शी प्लॅस्टिकच्या पॅकेटमधे आहोत आणि अचानक कळेल की +18 डिग्री – म्हणजे खूपच गरम आहे आणि आम्ही उगीचच उन्हाळ्याच्या पावसावर चिडत होतो. दुकानात जाईन. कलिंगड विकत घेईन, आजीबरोबर खाईन. हे इथे, लाकडाचं छोटंसं शहर आणि तम्बू असायचा. इथेच मुहनने एका गोड-गोड मुलीला ‘किस’ केलं होतं. मुहन तेव्हा किती वर्षांचा असेल? नक्कीच, मी सध्या जितक्या वर्षांचा आहे, त्याच्यापेक्षा कमीच असेल. पण मी तर आजपर्यंत अशा सुंदर मुलींना ‘किस’ नाही केलंय. त्यांना मुहन का आवडायचा? तो तर काही बोलतच नसे, फक्त गंभीरपणे बघत राही, वाइनचे घोट घ्यायचा, खरंच, सुदृढच होता, बिनबाह्यांचा शर्ट घालायचा, त्याचे ‘मसल्स’ मुश्किलीने बाह्यांच्या ‘कट्स’मधून जायचे. दिवसा मुहनला लाकडाचा भुसा करण्याच्या मशिनीवर काम करावं लागे, पण तो काम सोडून पळून यायचा आणि आमच्याबरोबर फुटबॉल खेळायचा. शिव्यातर अशा द्यायचा की जमीन थरथरून जायची, पण असं जाणवंत होतं की तो चांगला माणूस आहे. कदाचित् असल्या ‘मसल्स’वाल्यासाठी चांगला माणूस होणं कठीण नाहीये, कारण की सगळंच तुमच्या हातात असतं! आणि, जर असंच आहे, तर मग शेखी का मारायची?
मिलिट्री स्टोअरपर्यंत आलो. इथे जाड्या अंद्रेइ राहायचा. सगळ्या बसेसचे ड्रायवर्स त्याला आपल्या कॅबिनमधे बसवायचे आणि मोठमोठ्याने, आणि अकड दाखवत बोलायचे, आणि नंतर जाड्या अंद्रेइसुद्धा बसमधे काम करू लागला. सगळेजण त्याला ‘डोनट’ म्हणायचे. एकदा ल्योशा खाएत्स्की गिटार घेऊन आला आणि मी विक्टर ज़ोयचे व्हाइट स्नो’ हे गाणं वाजवलं. ‘डोनट’ पट्कन घरी पळाला आणि रॉक ग्रुप ‘किनो’बद्दल एक काळं, फाटकं पुस्तक आणून माझ्या हातात ठेवलं आणि, दोन महिन्यांनी, जेव्हा माझ्यासाठी गुलाबी थंडीसाठी निळं जॅकेट विकत घेतलं, तेव्हा मी आपलं जुनं, चामड्याचं जॅकेट, जे खरं म्हणजे, मला कधीच आवडलं नव्हतं, “डोनट’ला देऊ लागलो. पण त्याने ते घेतलं नाही. म्हणाला की त्याला खूप गडतं. कमाल आहे, जॅकेट फक्त चामड्याचं आहे, पण आहे तर साधारण जॅकेट्स सारखंच ना. पण अंद्रेइने नाहीच घेतलं. मी ते जॅकेट कुणाला तरी देऊन टाकलं, आठवत नाही, कुणाला.
कलिंगड विकत घेतलं. चंद्राच्या प्रकाशात टेकड्या दिसताहेत आणि खड्डेसुद्धां. आमच्या प्रवेशद्वाराचे ‘कोड’ पुन्हा विसरलो (आताच बदललं आहे), किल्ल्या जवळ नाहीत, फोन करून आजीला उठवीन आणि टाइम, बाप रे! बारा वाजून गेलेत!
एकदम मेंढपाळ आला तर? मी कल्पना करतोय की तो जागा आहे: तो चालला आहे, बेलोमोरीनचे (सिगरेटचा एक लोकप्रिय ब्राण्ड) कश घेतोय, जमीन करकर करतेय, जुन्या काळाला आठवतोय, पण त्याला कोणीच त्या काळाबद्दल विचारत नाही, म्हातारासुद्धा चुपचापच असतो. पण नाही, नाही. पण रस्त्यावर कोणीच नाहीये. फक्त वेळेचं भान न ठेवणारा, फार्मवरून परत येणारा माणूस कारचे दूरचे लाइट्स लावतोय आणि खूश आहे, की तो बस शहरात पोहोचण्यातच आहे. आंबट बदामांच्या मळ्यावर प्रकाशाचा झोत टाकून तो हायवेवर निघून जातो. तिथे कच्चा रस्ता नाहीये, काही दिवसांपूर्वी टाकलेला सपाट, बिनखड्ड्यांचा रस्ता आहे.
सुंदर...
मूळ लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास