Nagesh S Shewalkar

Others

3  

Nagesh S Shewalkar

Others

हिताचे राजकारण

हिताचे राजकारण

7 mins
1.6K


 डोंगराच्या पायथ्याशी वसलेले जेमतेम पाच हजार लोकवस्तीचे गाव. जिल्ह्याचे शहर अगदी जवळ असल्यामुळे आणि गावातही शिक्षणाची चांगली व्यवस्था असल्यामुळे गावातील बहुतांश लोक शिकलेले होते. गावापासून पंचवीस-तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीवर धरण बांधलेले असल्यामुळे त्या धरणाच्या कालव्यांनी गाव वेढले होते. साहजिकच सारे शेतकरी नगदी पिके घेत असत. त्यामुळे गाव सधन म्हणून ख्यातकीर्त होते. खिशात खुळखुळणारा पैसा गावकऱ्यांची पावले शहराकडे नेत होता.

    सर्वच बाबतीत गाव अग्रेसर होते. तालुका आणि जिल्ह्यातील राजकारणावर गावातील व्यक्तींचा पगडा होता. गावातील राजकारण मात्र गावाच्या विकासाच्या आड कधीच येत नसे. विकासाच्या एकूणएक योजना गावात उत्तम प्रकारे राबविल्या जात होत्या. त्याचे सारे श्रेय गावचे सरपंच देवराव पाटील यांचे! अतिशय सालस, धार्मिक आणि गावाबद्दल पराकोटीची तळमळ असणारे देवराव गढूळ राजकारणापासून दूर असत. गावाचा विकास या एकाच ध्येयातून ते नानाविध योजना गावात यशस्वीपणे राबवत असत.

     कोंडबाराव ही त्या गावातील अजून एक प्रतिष्ठित राजकारणी व्यक्ती! गडगंज संपत्ती असूनही पैशाकडे पैसा वळविण्याच्या प्रयत्नात असताना गावाचा विकास ही जगाला दाखविण्याची धडपड करत असत. बाई-बाटलीत रममाण असणारे हे गृहस्थ तमाशाचेही शौकीन होते. गावासोबतच पंचक्रोशीत कुठेही यात्रा असली की, तमाशाचा फड ठरवायचा मान कोंडबाराव यांचा! सिदोजीराव हे गावातील तिसरं बडं प्रस्थ. गावातील लोकांना विनाकारण भडकून देणे, वेळप्रसंगी आर्थिक मदत करून लोकांची आपसात भांडणे लावण्यात त्यांचा हातखंडा! ही भांडणे मिटविण्याच्या उद्योगातून स्वतःची भाकरी भाजून घेण्यात सिदोजीरावांची कुणी बरोबरी करत नसे. त्यांचा शहरात एक आलिशान, टोलेजंग असा सर्व सोयींनी युक्त बंगला होता. सिदोजीरावांचा मुक्काम बहुतेक शहरात असे. गावातील माणसं कामे घेऊन सिदोजीरावांच्या बंगल्यावर जात. त्या कामांसाठी लागणारा वाजवी, गैरवाजवी पैसा अगोदर सिदोजीरावांना द्यावा लागत असे. प्रत्येक कार्यालयात त्यांची माणसं होती. ती येणाऱ्या व्यक्तींची कामे करून देत असत. कामाच्या स्वरूपानुसार सिदोजीराव स्वतः जाऊन कामे मार्गी लावत असत.

    गावातील पोलीस पाटील यांचाही एक गट होता. हे पद जरी तसे सरकारी असले तरीही पाटील अत्यंत धूर्त होते. पडद्याआड राहून छुपे राजकारण करणे हा त्यांचा आवडता खेळ होता. गावातील सत्तेत प्रत्यक्ष सहभाग नाही हे दाखवून कुणाला केव्हा वर आणायचे आणि कुणाला कसे नेस्तनाबूत करायचे हे पाटलाकडून शिकण्यासारखे. त्यादिवशी सकाळी सकाळी सरपंच देवराव बैठकीत बसले होते. नेहमीप्रमाणे गावातील बरीच मंडळी जमली होती. काही महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक होती. त्याबाबत चर्चा सुरू होती. चहापाणी होत असताना गावातील तलाठी तिथे पोहोचले. अभिवादन होताच तलाठ्याने एक पत्र देवरावांच्या हातात दिले. त्या पत्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम होता.ते पत्र वाचून देवराव आनंदले. एक ओझे उतरले असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. तलाठ्याने दवंडी पिटून, जागोजागी ते पत्रक चिकटवून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

    दुसऱ्या दिवशीपासून गावात ठिकठिकाणी खलबतं सुरू झाली. कुणाचे काम केलेला किंवा गावातील माणसाचे कोणतेही काम न केलेल्या व्यक्तीला निवडणुक लढवावी असे वाटत होते. रात्री उशिरापर्यंत बैठका होऊ लागल्या. चर्चा रंगू लागल्या. प्रसंगी छोटेमोठे वादही होऊ लागले. फॉर्म भरण्याच्या बाबतीत बाजी मारली ती सिदोजीरावांच्या गटाने. त्यांनी नऊ लोकांची निवड केली. फॉर्म भरण्याच्या दिवशी सकाळी सारे संभाव्य उमेदवार आणि इतर अनेक लोक चार पाच जीपमधून तालुक्याला पोहोचले. फॉर्म भरल्यानंतर सारा लवाजमा सिदोजीरावांच्या बंगल्यावर पोहोचला. तिथे रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या पार्टीचा थाट काय वर्णावा? कार्यकर्त्यांना थेट स्वर्गात पोहोचल्याची जाणीव झाली. त्यांच्यापाठोपाठ पोलीस पाटलाच्या गटाने बाजी मारली. दुसऱ्या दिवशी कोंडबाराव आपल्या उमेदवारांना घेऊन तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले. नियमानुसार आपल्या गटातील लोकांचे फॉर्म भरून परतताना शेजारच्या गावातील तमाशाच्या फडाचा रात्रभर निरनिराळे रंग उधळून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गावात परतले.

    दुसरीकडे विद्यमान सरपंच देवराव कमालीचे शांत होते. त्यांच्या हालचाली कुणालाही समजत नव्हत्या. कितीही बारकाईने कानोसा घेतला तरीही अंदाज येत नव्हता. फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस जसजसा जवळ येत होता तसे देवरावांच्या वाड्यातील शांत वातावरण पाहून इतर गट आनंदी होत होते. फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला. सकाळपासून देवराव गावात नव्हते. त्यांच्या विरोधकांनी आपापले हेर तालुक्याला पाठवून देवरावांचा काही पत्ता लागतो का याचा अंदाज घेतला परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. दुपारी दोनपर्यंत सारे हेर गावात परतले आणि देवराव निवडणुकीत उतरले नाहीत याचा आनंदोत्सव साजरा करत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास एक जीप गावात आली. त्यातून देवराव आणि त्यांचे कार्यकर्ते उतरले. दुपारी तीन वाजता देवराव यांनी आपल्या गटाचे फॉर्म दाखल केले होते. ती बातमी समजताच विरोधकांचे चेहरे उतरले. जीपमधून उतरल्यावर देवरावांसह सर्वांनी गावातील देवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी गावातील काही जुन्या जाणत्या लोकांच्या भेटी घेतल्या.

    फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस अजून पाच सहा दिवस दूर होता. सारेच गट आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराला लागले होते. देवराव सरपंच असल्यामुळे त्यांच्या गटावर जास्त आगपाखड होऊ लागली. एकमेकांचे नसलेले दोष बळेबळेच चिकटवून अपप्रचार जोरदार होत होता. देवराव आपले उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्यासह शांतपणे गावातील लोकांच्या भेटी घेऊन कुणालाही दोष न देता आपली भूमिका समजावून सांगत होते. बाकीच्या गटांनी मात्र अपप्रचाराची खालची पातळी गाठली होती. फॉर्म मागे घेण्याचा दिवस उजाडला. फॉर्म मागे घेण्याची वेळ संपत असताना देवराव एकटेच तालुक्याला पोहोचले. स्वतःचा एकट्याचा फॉर्म मागे घेऊन गावी परतले. त्यांच्या त्या अचानक केलेल्या कृतीचा विरोधकांसह गावकऱ्यांना प्रचंड धक्का बसला. निवडणुकीचे राजकारण सोडले तर सारा गाव देवरावांना मानत होता. देवरावांंनी माघार घेतल्याचा आनंद तीन व्यक्तींनाच होता....सिदोजीराव! कोंडबाराव!! पोलीस पाटील!!! देवरावांंनी घेतलेली माघार म्हणजे स्वतःच्या सरपंच पदाचा मार्ग मोकळा असे मानून तिघेही उत्साहाने प्रचाराला लागले.

    प्रचाराची धामधूम संपली. छोट्या छोट्या सभा, भेटी, रात्री उशिरापर्यंत पार्टी अशा गोष्टींनी उच्चांक गाठला. मतदानाचा दिवस उजाडला. मतदान शांतपणे होत होते. जसा मतदारांमध्ये उत्साह होता तसाच जोश कार्यकर्त्यांमध्ये होता. तीनही गटामध्ये एका-एका मतदाराला मतदान केंद्रावर आणण्याची जणू स्पर्धा लागली होती. मतदारांना केंद्रावर आणतानाही आश्वासन आणि प्रलोभनांची खैरात होत होती. मतदानाचा दिवस असूनही देवरावांंची उपस्थिती जाणवत होती. मतदानाची वेळ संपण्याच्या काही मिनिटे आधी देवराव मोटारसायकलवर पोहोचले. तिथे उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि गावातील लोक त्यांच्याजवळ गेले. प्रत्येकाची आस्थेने चौकशी करून, मतदान करून देवराव परतले.

   निकालाच्या दिवशी गावातील अनेक लोक, कार्यकर्ते सकाळी लवकर तालुक्याला पोहोचले. दिवसभर हा पुढे, तो मागे ....कोण जिंकला, कोण पडला असे वातावरण होते. गावात असलेल्या नागरिकांना निश्चित असा अंदाज येत नव्हता. सायंकाळी एक-एक जीप गावात येत होती. उतरणारे सारेच गुलालाने माखलेले असल्यामुळे काहीही समजत नव्हते. आरडाओरडा सुरू असताना हळूहळू चित्र स्पष्ट झाले. त्याप्रमाणे सिदोजीराव, कोंडबाराव आणि पोलीस पाटिलकीचा राजीनामा देऊन निवडणुकीत उतरलेले पोलीस पाटील हे तीनही प्रमुख उमेदवार प्रचंड मतांनी पराभूत झाले होते. सरपंच पदाची माळ आपल्याच गळ्यात पडणार या त्यांच्या स्वप्नाला मतदारांनी धुळीस मिळवले होते. देवरावांंचे तीन, सिदोजीरावांचे दोन, कोंडबारावांचा एक, पोलीस पाटलाच्या गटाचा एक आणि अपक्ष दोन असे नऊ उमेदवार निवडून आले होते....

    दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाले.... खुर्चीचे राजकारण! स्वतः जरी पडलो असलो तरीही आपल्याच गटाचा सरपंच व्हावा आणि सारा कारभार आपल्याच हातात राहावा यासाठी निवडणुकीत पडलेल्या प्रमुखांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. त्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांच्या भेटी घेणे, त्यांना वेगवेगळी आमिषे दाखविणे, दडपशाही करणे असे सारे साम-दाम-दंड असे प्रकार होऊ लागले. या सर्व राजकारणापासून देवराव दूर होते उलट काही दिवसांपासून ते गावातही नव्हते.

    सरपंच पदाच्या निवडणुकीच्या अगोदरच्या दिवशी अपक्ष म्हणून निवडून आलेले साहेबराव सारा गाव झोपेत असताना सकाळी सकाळी निवडून आलेल्या इतर आठ सदस्यांच्या घरी जाऊन प्रत्येकाला उठवून म्हणाले, "आंघोळ करून ताबडतोब मारोतीच्या मंदिरात या.महत्त्वाचे काम आहे."


साहेबरावांच्या बोलावण्यानुसार इतर आठ सदस्य लगोलग मंदिरात पोहोचले. त्यांना बसवून साहेबराव म्हणाले,

"निवडून आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन! आपण आता ग्रामपंचायत सदस्य आहोत. गावाच्या विकासाची धुरा आता आपल्या खांद्यावर आहे. उद्या आपल्यापैकी कुणी तरी एक जण सरपंच होईल. सर्वांना मारोतीरायाची शपथ आहे, एक मनापासून सांगा,प्रत्येकाला गावाचा विकास करायचा आहे ना?"

"हा काय प्रश्न झाला? त्यासाठीच गावातील मतदारांनी आपल्याला निवडून दिले आहे ना? शपथेवर सांगतो, गावाचे भले करायचे आहे.. ."

"आता नीट ऐका. आपले सरपंच देवराव अण्णा यांनी निवडणुकीतून माघार का घेतली? मतदानानंतर ते गावात का आले नाहीत ? ते निवडणुकीला भिले काय? मुळीच नाही. मित्रांनो, ते भ्याले नाहीत तर ते कंटाळले गलिच्छ राजकारणाला. निवडणूक जाहीर झाल्यापासून आपण एकमेकांवर कुरघोडीचे, स्वार्थाचे राजकारण खेळत होतो, विशेषतः अण्णांसारख्या देवमाणसावर जे घाणेरडे आरोप करत होतो त्या साऱ्या प्रकारांना कंटाळून देवरावांंनी माघार घेतली.आपल्यापैकी काही जण त्यांचे विरोधक असलो तरी निवडणूक संपताच राजकारण संपले पाहिजे. गैरसमज करून घेऊ नका. मी शपथेवर सांगतो, आज आपल्या गावाला प्रमुख म्हणून, सरपंच म्हणून देवरावांचीच गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला मनापासून असेच वाटत असेल की, देवराव सरपंच व्हावेत तर कुणाला न भीता तशी शपथ घ्या. तुम्ही जर साथ देणार असाल तर मी अण्णांसाठी माझ्या सदस्य पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. मात्र त्यापूर्वी तुम्ही 'अण्णांना सरपंच पदासाठी पाठिंबा देत आहे...' अशी मारोतीरायापुढे शपथ घ्यायला हवी. बोला, गावाच्या भल्यासाठी तुम्ही असे हिताचे राजकारण करणार का?" साहेबरावांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करून विचारले.

"ठीक आहे. गलिच्छ राजकारणाला तिलांजली देऊन गावाचे हित समोर ठेवून आम्ही देवराव अण्णा यांना पाठिंबा द्यायला तयार आहोत....." सारे सदस्य एका आवाजात म्हणाले.

"परंतु अण्णा आहेत कुठे?...."

"अण्णा, गावाबाहेर असलेल्या त्यांच्या मळ्यात आहेत. कालच आले आहेत. चला. आपण त्यांच्याकडे जाऊ."

     अण्णा, नुकतेच उठले होते. भल्या पहाटे आपल्या घरापुढे थांबलेली जीप पाहून देवराव आश्चर्यात पडले. जीपमधून उतरलेल्या लोकांनी देवरावांच्या पायाला स्पर्श केला. साहेबरावांनी तिथे येण्याचे प्रयोजन सांगितले. ते ऐकून गहिवरलेले अण्णा म्हणाले,

" कसे आहे, खरेतर मी राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे ठरवले होते परंतु तुम्ही जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहात. तुमचे मत म्हणजे जनतेचे मत असे मानतो. त्यामुळे तुमचा मी अनादर करु शकत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे ना, 'पाचामुखी परमेश्वर!' तुम्ही गावचे पंच म्हणजे परमेश्वरच! साहेबरावांचा त्याग आणि तुमचा सर्वांचा प्रामाणिकपणा पाहून मी ही जबाबदारी स्वीकारत आहे."

    चहापाणी झाले. देवरावांंसह सारे सदस्य जीपमधून तालुक्याच्या दिशेने निघालेले पाहून नुकतेच जागे झालेले गावकरी गोंधळात पडत होते...


Rate this content
Log in