The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Nagesh S Shewalkar

Others

5.0  

Nagesh S Shewalkar

Others

हे राष्ट्रध्वजा, क्षमस्व!

हे राष्ट्रध्वजा, क्षमस्व!

9 mins
690


                 

        इमारतीच्या मध्यभागी असलेल्या अत्यंत आकर्षक अशा बागेत गोविंदराव पोहोचले. तिथे त्यांची मित्रमंडळी आधीच पोहोचली होती. सारेजण गोविंदरावांचीच वाट पाहात होते. त्यांना पाहताच वामनराव म्हणाले,

"या.या. गोविंदराव, या. आम्हाला वाटले आज तुम्ही येता की नाही?"

"असे का वाटले तुम्हाला?" गोविंदरावांनी विचारले.

"नाही म्हटलं, आज क्रिकेटचा सामना पाहायला गेला होतात. थकले असाल..." बबनराव म्हणाले.

"थकलो खरा पण एक अद्भुत आनंद उपभोगला. भारतीयांचे अनेक विजय अनुभवले आहेत. याचि डोळा, याचि देही पाहिले आहेत पण ते सारे रेडिओवर समालोचन ऐकून किंवा टीव्हीवर सामने पाहून. पण मैदानावर जाऊन अगदी काही अंतरावर बसून सामना पाहण्याचा आनंद, मजा काही न्यारीच असते."

"पण एक सांगा, टीव्हीवर सामना पाहणे आणि मैदानावर जाऊन सामना पाहणे यात फरक तो कोणता तुम्हाला जाणवला?" अभयरावांनी विचारले.

"खूप फरक आहे. दोन्ही ठिकाणची मजा निराळीच आहे. टीव्हीवर सामना पाहताना सारे कसे स्पष्ट दिसते. खेळाडूंच्या चेहऱ्यावरील हावभाव, खेळपट्टीवरील गवत म्हणा, खेळपट्टीला पडलेल्या भेगा म्हणा, फलंदाजाने फटकारलेला चेंडू नेमका कुठे पडलाय, घेतलेले झेल अशा अनेक गोष्टी कॅमरेच्या माध्यमातून अत्यंत ठळक, स्पष्टपणे दिसतात. शिवाय 'रिप्लेच्या' माध्यमातून वारंवार पाहता येते. मैदानावर रिप्ले नसतो. ते म्हणतात ना, 'नजर हटी दुर्घटना घटी!' अशी काहीशी स्थिती स्टेडियमवर जाऊन सामना पाहताना होते. आपले लक्ष क्षणभर जरी खेळपट्टीवरून बाजूला झाले आणि एखादी घटना घडली की, ती बाब आपणास पुन्हा पहायला मिळत नाही. टीव्हीवर तसे नसते अगदी साधी घटनाही अनेकदा पाहायला मिळते. पण प्रत्यक्ष मैदानात हजारो प्रेक्षकांच्या साथीने सामना पाहतानाचा आनंद, जोश, स्फूर्ती काही वेगळेच असते. ते वातावरण कसे भारावून टाकणारे, जादुई असे असते. तहानभूक सारे सारे विसरून जायला होते..."

"गोविंदराव, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. ती मजा काही न्यारीच असते हो..." केशवराव म्हणाले.

"अगदी बरोबर आहे. आपले. सारे खेळाडू समोर दिसतात तो क्षण काही निराळाच अवर्णनीय असा असतो. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारे विविध खेळाडू असे अगदी जवळून पाहायला मिळतात. खेळाडू सीमारेषेजवळ आला की, होणारा जल्लोष, त्याचे स्वागत करताना त्याचे होणारे कौतुक, त्याच्या नावावरून किंवा त्याच्या खास शैलीवरुन, लकबीवरून त्याची होणारी टिंगलटवाळी, त्याच्या काढल्या जाणाऱ्या खोड्या आणि त्याने प्रेक्षकांच्या दिशेने उंचावलेला, हलवलेला हात हे सारे पाहून होणारा आनंद अवर्णनीय असतो. तो शब्दात नाही पकडता येत."

"खरे आहे. वातावरण अत्यंत जादूमय असते. चेहऱ्यावर काढलेल्या ध्वजाच्या रंगीत प्रतिकृती, फडकणारे, हलणारे ध्वज, दिल्या जाणाऱ्या...'भारत माता की जय!', 'इंडिया... इंडिया...', 'जितेगा भाई जितेगा, इंडिया जितेगा...!' ह्या आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या, अत्यंत जोशपणे दिल्या जाणाऱ्या घोषणा असोत सारे कसे मंत्रमुग्ध करणारे असते..."

"बबनराव, तुम्ही मैदानावर जाऊन सामना पाहिला असे वाटते..."

"बरोबर आहे, अभयजी तुमचे. मी दोन वर्षांपूर्वी सामना पाहिला आहे. म्हणून म्हणतो मैदानावरचा जोश काही वेगळाच असतो..."

"अगदी बरोबर आहे. परंतु हा जोश कधी कधी इतका अनावर होतो की, एवढा विवेकशून्य बनवतो की, काही गोष्टींचा आपण अपमान करतो की अशी शंका मनात निर्माण होते आहे..."

"म्हणजे? अपमान?" गोविंदरावांना थांबवत अभयरावांनी विचारले.

"तुम्हाला सांगतो काही गोष्टींना जसे पाण्याची बाटली, पेन, खाद्यपदार्थ मैदानावर नेण्यास बंदी आहे..."

"बरोबर आहे. अगोदर पाणी आणि खाण्याचे पदार्थ सोबत नेता येत होते पण अनेक ठिकाणी खेळाडूंच्या दिशेने बाटल्या फेकण्यात आल्या त्यामुळे ही बंदी घालण्यात आली..."

"बबनराव, हे कसे झाले, 'चोर सोडून संन्याशाला फाशी!' आज मी पाहिले, अनुभवले आणि भोगले ते असे की, आज कडाक्याचे ऊन होते. सूर्य अक्षरशः आग ओकत होता. अंगाची लाही-लाही होत होती. घसा कोरडा पडत होता. बरे, सामना बघायला आलेल्यांपैकी अनेक प्रेक्षक आबालवृद्ध होते. लहान लेकरं, म्हातारी नाही पण ज्येष्ठ मंडळीचेही पाण्यावाचून हालहाल होत होते..."

"अहो, पण सामना आयोजकांनी पाण्याची व्यवस्था केली असेल ना?"

"होती की, पण पंधरावीस पायऱ्या खाली उतराव्या लागायच्या. तळपत्या उन्हात भल्यामोठ्या रांगेत अर्धा पाऊण तास उभे राहावे लागायचे. तुम्हाला सांगतो, मी एकदा पाणी पिण्यासाठी गेलो. अर्धा तास रांगेत उभे राहून एक ग्लास पाणी पिऊन आलो तर जागेवर परत येईपर्यंत पुन्हा घसा कोरडा पडला आणि दरम्यान रंगलेला सामना पाहायला मिळाला नाही ते वेगळेच..."

"गोविंदराव, हे तर भलतेच की हो. एखाद्याच्या जीवावर बेतायचे की. तुम्ही ते 'अपमान' असे काही तरी बोलत होतात ना? काय घडले असे?"

"मी फार पूर्वीपासून म्हणजे आठव्या वर्गात असल्यापासून क्रिकेट सामन्याचे रेडिओवर लागणारे धावते वर्णन ऐकत असतो. सुरुवातीचे कुतूहल, उत्सुकता नंतर आवड आणि छंद यात बदलली. क्रिकेटचे वेड कधी जडले किंवा ते व्यसनात कधी परावर्तीत झाले ते मला..."

"गोविंदराव, क्रिकेटचे व्यसन हे प्रथमच ऐकतोय..."

"बबनराव, खरे सांगतो तुम्हाला अगदी तहानभूक विसरून मी टीव्हीवर सामने पाहतो. सामना सुरू असताना अगदी महत्त्वाच्या कामाशिवाय मी टीव्ही समोरून उठत नाही. आता सेवानिवृत्त झाल्यामुळे सोडा पण नोकरी असतानाही मी एकतर कार्यालयात रेडिओ नेत असे किंवा या ना त्या कारणांमुळे चक्क कार्यालयाला दांडी मारून घरी बसून सामना पाहत असे. रात्रीचे एकदिवसीय सामने सुरू झाल्यानंतर तर अनेकदा मध्यरात्रीपर्यंत जागून मी सामने बघितलेले आहेत. एक गोष्ट सांगितली तर कदाचित तुम्हाला खरे वाटणार नाही..." गोविंदराव बोलत असताना अभयरावांनी त्यांना मध्येच अडविले आणि विचारले,

"कोणती गोष्ट?"

"पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तेव्हा मी एका तालुक्याच्या ठिकाणी नोकरीला होतो. तो वीजपुरवठा नियमनाचा म्हणजे लोड शेडींगचा काळ होता. बारा-बारा, चौदा-चौदा तास वीज गुल झालेली असायची. माझ्यासारखे काही आठ-दहा क्रिकेट शौकीन जवळच्या शहरात खास जीप करून क्रिकेट सामना पहायला जात असू. तिथे व्हिडीओगृहात सामना पाहून रात्री उशिरा घरी परत येत असू. सांगायचा मुद्दा असा की, मी क्रिकेटशौकीन, क्रिकेटवेडा असे कोणतेही विशेषण शोभेल असा आहे. क्रिकेट पाहण्यासाठी मी अस्वस्थ होतो, बेचैन होतो. माझी तळमळ होते, तगमग होते...".

"मलाही क्रिकेटची खूप आवड आहे. सामना सुरू असताना मी टीव्हीवर इतर कार्यक्रम लावू देत नाही. बरे, गोविंदराव, तुम्ही ते अपमानास्पद असे..."

"सांगतो. मी सामने पाहत असताना एक गोष्ट हेरली आहे की, अनेक प्रेक्षक मैदानावर राष्ट्रध्वज घेऊन जातात..."

"बरोबर आहे. राष्ट्रध्वज हे आपल्या देशाचे एक सर्वोच्च प्रतीक आहे, आन-बान-शान आहे, राष्ट्राचा गौरव आहे, सन्मान आहे." अभयराव म्हणाले.

"अगदी माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रध्वज दिसला की, भावना कशा उचंबळून येतात. मान अभिमानाने ताठ होते." बबनराव म्हणाले.

"राष्ट्रीयध्वज दिसला की त्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या, शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत त्याला झुकू न देणाऱ्या शूर सैनिकांची आठवण येते." अभयराव म्हणाले.

"तिरंगा दिसला की,शरीरात वेगळीच स्फूर्ती येते, हात त्याला वंदन करण्यासाठी असे शिवशिवतात."

"बबनराव, मलाही तसेच होते."

"अशा या तिरंग्याचा कुठे कळत-नकळत अपमान होत असताना मला खूप वाईट वाटते हो. मी अत्यंत अस्वस्थ होतो."

"व्हायलाच हवे. कुण्याही देशभक्त नागरिकांचे असेच होते. त्याच्या तळपायाची आग मस्तकात

शिरते."

"असे करणाऱ्या व्यक्तीला शिक्षाच व्हायला हवी."

"होते हो. शिक्षाही होते पण अनेकदा निरपराध व्यक्ती बळी पडतो. माझ्याच बाबतीत घडलेली घटना आहे. मी नोकरीत असताना मी एका संस्थेचा अधिकारी होतो. तिथे एका राष्ट्रीय सणाला म्हणजे पंधरा ऑगस्टला माझ्या हस्ते ध्वजारोहण झाले. मी संस्थाप्रमुख होतो. दुर्दैवाने मी फडकविलेला ध्वज उलटा फडकविण्यात आला. कुठल्याही संस्थेचा प्रमुख किंवा ज्याच्या हस्ते ध्वजारोहण होते ती व्यक्ती ध्वजारोहणाच्या पूर्वतयारीच्यावेळी तिथे हजर नसते. ध्वजारोहणाची सर्व तयारी झाल्यानंतर मग ती व्यक्ती त्याठिकाणी जाऊन ध्वजारोहण करते पण ती व्यक्ती त्या संस्थेचा प्रमुख असल्याने सारी जबाबदारी त्याच्यावर येते किंबहूना त्यालाच जबाबदार धरून शिक्षाही त्यालाच होते. मीही 'ध्वजाचा अपमान' या सबबीखाली काही महिने निलंबित होतो..."

"अशा घटना शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बाबतीत घडलेल्या आपण ऐकतो, वाचतो..."

"क्रिकेटच्या मैदानावरही राष्ट्रीय ध्वजासंदर्भात अशा घटना घडतात..."

"म्हणजे? तिथे असे कसे होऊ शकते? तिथे तर हातात ध्वज असतात. राष्ट्रप्रेमाने भारावून गेलेले रसिक असतात सारे. खिलाडूवृत्तीने अत्यंत जोशपूर्ण वातावरणात ध्वज फडकवतात, घोषणा देतात. ते पाहून मैदानात प्रत्यक्ष खेळणारे खेळाडू प्रेरित होतात. मैदानावरीर इतर प्रेक्षकही ती दृश्यं पाहून प्रचंड रोमांचित होतात. मग?" अभयराव म्हणाले.

"मी शंभर टक्के सहमत आहे. पण तुम्ही म्हणता तो जोश अंगात भिनला की, अनेक जण होश गमावतात. जास्त दूरचे नाही अगदी काल मी अनुभवलेला प्रसंग सांगतो. सामना सुरू झाला. प्रेक्षकांमध्ये प्रचंड जोश, उत्साह होता. टाळ्या, घोषणा, शेरेबाजी यामुळे वातावरण उत्साही, रोमांचित झाले होते. हळूहळू ऊन तापायला सुरू झाले. घामाच्या धारा, उन्हाच्या चटके परेशान, हैराण होत होते. पाणी नसल्यामुळे घसा कोरडा पडत होता. कुणी टोप्या घालून, कुणी रुमाल बांधून, कुणी ओढणी बांधून, कुणी अर्धवट शर्ट डोक्यावर घेऊन ऊन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असताना हळूच, नकळत ध्वजाचाही उपयोग अनेकांनी सुरू केला..."

"हे तर फार वाईट आहे. राष्ट्रीय ध्वजाचा योग्य सन्मान राखला गेलाच पाहिजे."

"पण हे सांगावे कुणाला आणि कुणी? स्टेडियमवर जाताना अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आली. सुरक्षा रक्षकांचे कवच भेदून जावे लागले. अहो, मला खिशात पेन ठेवायची फार पूर्वीपासून सवय आहे. आत जाताना मला माझी महागडी पेन काढून फेकून द्यावी लागली. पण कुणीही राष्ट्रीय ध्वजाला आत नेण्यासाठी थांबवत नव्हते. इतकेच काय पण कुणी राष्ट्रीय ध्वज डोक्यावर ठेवत होते, बांधत होते. काही व्यक्ती उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अंगावर पांघरत होते. काही महाभाग तर चक्क राष्ट्रीय ध्वजाचा हिरवा रंग वरती करून पांघरत होते, फडकवत होते. सुरक्षा यंत्रणा, पोलीस, छायाचित्रकार, समालोचक, तिथले अधिकारी कुणीही हे प्रकार थांबवत नव्हते. पाहून न पाहिल्यासारखे, आपण त्या गावचेच नाहीत अशा वृत्तीने चक्क कानाडोळा करत होते..."

"एरव्ही देशभक्तीचा, राष्ट्रध्वजाचा पुळका असणाऱ्या प्रेक्षकांनी तरी थांबवायला हवे होते ना?" अभयरावांनी विचारले.

"अहो, महामानवाने जन्म घ्यावा असे प्रत्येकालाच वाटते पण त्या महापुरुषाने माझ्या नव्हे तर शेजारच्या कुटुंबात जन्म घ्यावा ही विचारसरणी आजही फोफावत आहे."

"बबनराव, तुम्ही अगदी नेमके बोट ठेवले पहा.पण मी मात्र एका माणसाला टोकले..."

"काय सांगता गोविंदराव?" बबनरावांनी विचारले.

"काय झाले, मी ज्या रांगेत बसलो होतो त्या समोरच्या रांगेत दहा-पंधरा युवकांचा एक समूह बसला होता.कॉलेजकुमारच ते. त्यांचा जोश फार 'हाय' होता. आमच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर एक व्यक्ती चढउतार करत होता. चेहरा तीन रंगांनी सजवलेला होता. एकटाच घोषणा देत होता. सीमेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देत होता, शेरेबाजी करत होता पण त्या तशा जोशात तो असेल कदाचित नकळतपणे तिरंगा उलटा अंगावर पांघरून फिरत होता..."

"मग?" अभयरावांनी उत्सुकतेने विचारले.

"माझे रक्त सळसळत होते. राग येत होता. माझ्या शेजारच्या एक-दोन माणसांच्या लक्षात मी ती गोष्ट आणून दिली तर त्यांनी मलाच शांत बसण्याचा सल्ला दिला आणि नको त्या भानगडीत न पडण्याचे सुचविले..."

"किती भावनाशून्य, असंवेदनशील वृत्ती आहे ना ही? मग तुम्ही काय केले?" बबनरावांनी विचारले.

"मी जागेवर उभा राहिलो. भारतमातेचा जयजयकार सुरू केला. समोरच्या युवकांचे लक्ष वेधले आणि दुसऱ्या क्षणी त्या माणसाला म्हणालो की, दादा, जरा राष्ट्रीय ध्वज सरळ करा ना..."

"अगदीच संयमाने स्थिती हाताळली म्हणायची. पण तो माणूस काय म्हणाला?"

"तो काही म्हणण्यापूर्वीच माझ्या समोर बसलेल्या तरूणांनी ...'बरोबर... बरोबर... काका, तुमचे बरोबर आहे. अशा घोषणा द्यायला सुरुवात करताच तो माणूस ध्वज हातात घेऊन निघून गेला..."

"व्वा! गोविंदराव, व्वा! फार मोठी कामगिरी केली. तुमचे अभिनंदन!" बबनराव म्हणाले तसे अभयरावांनीही अभिनंदन केले.

"मी काही फार मोठे काम केले असे नाही. सामान्य नागरिकाने जे केले पाहिजे तेच केले. एक व्यक्ती माझे ऐकून सरळ वागला पण इतरांचे काय? स्टेडियमवर सातत्याने ती दृश्यं दिसतच होती. त्यांना कोण अडवणार?"

"गोविंदराव, तिरंगा अंगावर पांघरणे हा सन्मान समजत असतील ते..."

"कशाचा सन्मान आलाय बबनराव? सन्मान तो, खरा ज्यावेळी देशाचे संरक्षण करण्यासाठी हातात ध्वज घेऊन तो सैनिक शत्रूला कंठस्नान घालतो. सन्मान तो, खरा ज्यावेळी मृत्यू समोर दिसतो पण हातात असलेला ध्वज तो शिपाई खाली झुकू देत नाही. हातातला तिरंगा दुसऱ्या समर्थ, बळकट हातात सोपवून जो प्राणाची आहूती देतो तो सन्मान खरा. ह्रदय पिळवटून टाकणारा, डोळ्यात पाणी आणणारा, मनामनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा खऱ्याखुऱ्या सन्मानाचा क्षण म्हणजे देशासाठी बलीदान देणाऱ्या, सर्वस्व अर्पण करणाऱ्या एखाद्या सैनिकाचे शरीर ज्यावेळी तिरंग्यात लपेटून आणतात आणि अंत्यसंस्काराच्या अंतिम क्षणी तो ध्वज त्याच्या शरीरापासून दूर करतात तो खराखुरा सन्मान, तो अत्युच्च गौरव, तो सर्वोच्च पुरस्कार!..." गोविंदराव त्वेषाने बोलत असताना क्षणभर थांबलेले पाहून बबनराव म्हणाले,

"खूप सुंदररीतीने तुम्ही व्यथा मांडली आहे..."

"व्यथा नाही बबनराव, ही व्यथा नाही. हा आक्रोश आहे आक्रोश! राष्ट्रीय ध्वज म्हणजे इतकी साधी बाब वाटते या नालायकांना? कुणीही उठावे आणि राष्ट्रीय प्रतिकाशी, राष्ट्रीय अस्मितेशी असे खेळावे? तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या सैनिकांचा हा अपमान आहे. तो लक्षात येऊनही संबंधित सारे शांत बसणार असतील तर षंढ आहेत सारे षंढ!..."

"पण गोविंदराव, आपण काय करू शकतो? आपले हातच असे किती दूरवर पोहोचणार आहेत?"

"असे म्हणून जर इंग्रजांच्या विरोधात लढणारे आपले पूर्वज शांत बसले असते तर आपण हा स्वातंत्र्याचा क्षण, आनंद उपभोगू शकलो असतो? नाही. मी नाही शांत बसणार? मी राष्ट्रपती, पंतप्रधान, संबंधित मंत्री यांची भेट घेऊन सारे समजावून सांगेन, नाही ऐकले तर सरळ न्यायालयात जाईन. शेवटपर्यंत लढा देईल..." गोविंदरावांच्या बोलण्यात त्वेष होता, एक वेगळाच जोश होता, एक प्रकारची चीड होती सोबतच एक ठाम आत्मविश्वास होता. कुणी काही बोलणार तितक्यात शेजारच्या सरकारी इमारतीवर असलेल्या राष्ट्रीय ध्वजाकडे बघून गोविंदराव जागेवर उभे राहिले... सॅल्यूट देण्याच्या अवस्थेत! त्यांचे ओठ नकळत हलत होते. जणू ते म्हणत होते, 'राष्ट्रध्वजा, आम्हाला क्षमा कर...' त्याच अवस्थेत ते घराकडे निघाले... इतर सारे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असताना त्यांचेही हात नकळत कपाळावर स्थिरावले...                                           


Rate this content
Log in