Nagesh S Shewalkar

Others

1  

Nagesh S Shewalkar

Others

हे राष्ट्र देवतांचे!

हे राष्ट्र देवतांचे!

6 mins
3.0K


       चव्हाण गुरुजी सहाव्या वर्गात गेले तशी सारी मुले जागेवर उभे राहून एका आवाजात म्हणाली, "एक साथ नमस्ते, सर ! "

"नमस्ते, मुलांनो. काय चालले आहे? अभ्यास जोरदार सुरू आहे ना? आज मी तुम्हाला एक सुंदर कविता शिकवणार आहे." चव्हाण गुरुजी म्हणाले.

"कोणती कविता सर? पान क्रमांक सांगा ना." एक - दोन मुले म्हणाली.

"पुस्तक, पान क्रमांक वगैरे नाही. आज तुमच्या पुस्तकात नसलेली एक अतिशय छान कविता शिकवणार आहे. तुम्ही कधी गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच गदिमा हे नाव ऐकले आहे का? " गुरूजींनी विचारले. मुलांची आपसात चर्चा आणि चुळबूळ सुरु झाली. तितक्यात मोहन नावाचा एक विद्यार्थी उभा राहून म्हणाला,

"सर, गदिमा म्हणजे गीतरामायण लिहिले तेच ना?"

"अगदी बरोबर. तू ऐकलेस का?"

"हो. माझ्या बाबांना भक्तीगीतं फार आवडतात. गीतरामायणाची आमच्या घरी कॅसेट आहे. बाबा नेहमी ती लावतात. त्यावेळी आम्ही पण ऐकतो." मोहन म्हणाला.

"व्वाह! छान! गीतरामायण हे अजरामर असे काव्य आहे. गदिमांनी लिहिलेल्या या रचना सुधीर फडके यांनी सुमधुर आवाजात गायल्या आहेत. हे मराठी काव्य प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. जिथे कुठे धार्मिक कार्यक्रम होतात त्याठिकाणी हे काव्य निश्चितपणे ऐकवल्या जाते. अनेक ठिकाणी गीतरामायणाचे विशेष कार्यक्रम होतात. तिथे ही गाणी ऐकताना असे वाटते की, जणू सारे रामायण आपल्यासमोर नव्याने जिवंत होते आहे. केवळ मराठी भाषेतच नाहीतर गदिमांचे गीतरामायण बंगाली, इंग्रजी, गुजराथी, कन्नड, कोकणी, संस्कृत, सिंधी आणि तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. तेही लोक अत्यंत तन्मयतेने, भक्तीभावाने या रचनांचा आस्वाद घेतात. गीतरामायणात एकूण छप्पन्न रचना आहेत. १९५२-५३ मध्ये रचलेली ही गीते आजही तेवढीच लोकप्रिय आहेत...." 

"सर, गीतरामायण आम्हाला पण ऐकावेसे वाटते. आपल्या शाळेत करा ना ती व्यवस्था." एक मुलगा उभा राहून म्हणाला आणि टाळ्या वाजवून अनेक मुलांनी त्याला साथ दिली.

"नक्कीच. मी आपल्या मुख्याध्यापकांशी बोलतो. महत्त्वाचे म्हणजे हे वर्ष गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे आपले मुख्याध्यापक नाही म्हणणार नाहीत. अशी हजारो गीते लिहिणाऱ्या गदिमांचे एक गीत 'हे राष्ट्र देवतांचे..' या गीताचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. करू सुरुवात?" चव्हाण गुरूजी म्हणाले आणि मुलांनी 'होय..' अशी खणखणीत साथ दिली.

"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे....

या पहिल्याच कडव्यात कवी गदिमा असे म्हणतात की, आपला देश, आपले राष्ट्र हे विविध धर्माचे, विविध जातीचे आहे. तसेच ते देवतांचेही आहे. आपल्या देशातील लोक देवांची पूजा करतात, त्यांची मनोभावे भक्ती करतात....." चव्हाण गुरुजी सांगत असताना एक मुलगा उभा राहिला आणि त्याने विचारले,

"सर, माझी आजी म्हणते की, तेहतीस कोटी देव आहेत. हे खरे आहे का हो?"

"हे बघ. तुझी आजी म्हणते ते बरोबर असू शकते कारण पोथी पुराणातही असे सांगितले आहे. आपल्या लोकांचा त्यावर विश्वास आहे. दुसरे असे आहे की, आपल्या सृष्टीमध्ये झाडेवेली, फुल-फळे, पशुपक्षी यांनाही आपण देव मानले आहे. प्रसंगानुरूप आपण त्यांची पूजा करतो. आपण आपल्या घरातील, परिचयातील, नातेवाईक यांनाही आदराने नमस्कार करतो. आईवडील, गुरु हे आपणास देवासम आहेत. हा सारा विचार केला तर तेहतीस कोटी देव आहेत असे मानायला हरकत नाही. जसे हे राष्ट्र वेगवेगळ्या देवदेवतांचे आहे तसेच त्याच देवाने पाठवलेल्या साधूसंत, महात्मे, अवतारी पुरुष यांचेही आहे. तसेच या भूमीवर अनेक लोकांना ईश्वराचे अवतार किंवा देवदूत म्हटले जाते. त्याच भक्तीयुक्त अंतःकरणाने आपण त्यांची पूजा करतो. प्रेषित या शब्दाचा अर्थच मुळी पाठवलेला असा आहे. त्यामुळे ईश्वराने जे जे या धरतीवर पाठवले आहे त्यांचे हे राष्ट्र आहे. या सृष्टीवर आपला भारत हाही एक देश आहे. आपला देश परकीय शक्तींच्या ताब्यात होता. या लोकांच्या तावडीतून हा देश सोडवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले ते सारे आपण इतिहासात शिकत असतो, वाचत असतो. असंख्य नागरिकांनी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिल्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे म्हणून कवी गदिमांना असे वाटते की, हे स्वातंत्र्य चिरकाल म्हणजे जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत टिकले पाहिजे. कवी पुढे असेही म्हणतात की, ही भूमी सीतापती श्री प्रभूरामचंदाची आहे. कर्तव्यदक्ष मुलगा म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या वडिलांनी आपल्या आईला दिलेले वचन पाळण्यासाठी रामराजे पत्नीसह आणि एका भावासह चौदा वर्षे वनवासात गेले. त्यांच्या पराक्रमाने जसा इतिहास घडला त्याचप्रमाणे इथल्या लोकांच्या पराक्रमाची रामायणे घडावीत...."

"सर, पराक्रमाची रामायणे घडावीत म्हणजे काय सतत लढाया लढाव्यात का?" 

"व्वाह! खूपच छान प्रश्न विचारला आहे. मुलांनो पराक्रम हा केवळ मैदानावर, लढाई लढून घडवावा असे नाहीतर आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे आपण वेगळे असे, अद्वितीय असे काही तरी करून दाखवावे असे कविंना वाटते. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आहात, शिकत आहात. याक्षेत्रात तुम्ही सर्वोत्तम होऊन असे नवीन काहीतरी घडवावे की, ज्यामुळे तुमचे नाव तर सर्वत्र गेलेच पाहिजेत परंतु त्यासोबत तुमच्या शाळेचे, कुटुंबाचे नावही सर्वत्र गेले पाहिजे या अर्थाने गदिमा म्हणतात की, 'रामायणे घडावी येथे पराक्रमाची...' पुढे जाऊन गदिमांना असे वाटते की, भारतीयांच्या पराक्रमाने उंच असलेल्या त्या हिमालय पर्वताला ही गर्व वाटावा. त्याचे शीर आनंदाने, समाधानाने, अभिमानाने अधिक उंच व्हावे. त्या उंच हिम पर्वतावर यशाचे, गौरवाचे ध्वज डौलाने फडकत राहावेत. अशीच कामगिरी या देशातील लोकांकडून घडावी."

"सर, आपला सचिन तेंडुलकर किंवा आता विराट कोहली करतोय तसेच पराक्रम का?"

"अगदी बरोबर आहे. पण केवळ क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूंची विश्वस्तरीय कामगिरी कविंना अपेक्षित नाही तर तू म्हणतोस त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात काम करणारांंनी त्या त्या क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करून विक्रम करावेत अशी आशा कविवर्य गदिमांनी व्यक्त केली आहे. आता बघा कवी पुढे काय म्हणतात ते.....      'येथे नको निराशा, थोड्या पराभवाने

                            पार्थास बोध केला येथेच माधवाने

                           हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

                            आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...

कुणी सांगू शकते का काही?' चव्हाण गुरूजींनी विचारले आणि अनेकांनी हात वर केले. गुरूजींनी ईशारा करताच एक विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला,

"सर, मला असे वाटते की, एखाद्या वेळी कुठे पराभव झाला तर खचून जाऊ नये, निराश होऊ नये तर तो पराभव सकारात्मकतेने, खिलाडूवृत्तीने घ्यावा. पुन्हा प्रयत्न करून विजयश्री खेचून आणावी ..."

"अतिशय सुरेख. बरोबर आहे. खचून जाऊन मैदान सोडू नये. तर आत्मविश्वासाने सामना करावा. यासाठी कवी महाभारतातील एका प्रसंगाची आठवण करून देताना म्हणतात की, कौरव- पांडवांचे युद्ध सुरू होणार होते. दोन्ही सैन्य समोरासमोर उभे असताना अर्जूनाने हातातले धनुष्य खाली ठेवले. समोर उभ्या असलेल्या दोन्ही पक्षाच्या सैन्यामध्ये त्याला स्वतःचे नातेवाईक, मित्र, परिचित अशा व्यक्ती दिसल्या आणि आपल्याच माणसांसोबत युद्ध नको, प्राणहानी नको म्हणून पार्थाने लढाईला नकार दिला त्यावेळी माधवाने म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने अर्जुनाचे मत परिवर्तन घडवून आणताना जे मार्गदर्शन केले ते सारे गीतेसारख्या महाग्रंथातून आपल्याला वाचायला मिळते. ही गीता म्हणजे जणू आमची माता आहे. त्यामध्ये जो उपदेश आहे तो जणू एखाद्या मातेने आपल्या मुलाला केलेला उपदेश आहे. त्या ग्रंथातील उपदेशाचे दूध पिऊन आपण सारे मार्गक्रमण करीत आहोत, वाटचाल करीत आहोत असे कविला सुचवायचे आहे..... पुढे कवी म्हणतात,

                              'जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे

                              जनशासना तळीचा पायाच सत्य आहे

                              येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

                             आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे'

आपल्या काही परंपरा आहेत, रीतीरिवाज आहेत त्या पाळणे, त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. या परंपरा धार्मिक असू देत, सामाजिक असू दे, राजकीय असोत, देशसंदर्भात असोत त्या आपण जपल्या पाहिजेत, त्यांचा आदर केला पाहिजे असा एक फार मोठा संदेश या ठिकाणी कविवर्य गजानन दिगंबर माडगूळकर हे आपल्याला देतात. जनता असो, शासन असो वा अजून कुणी त्याने प्रामाणिक, सत्यवादी असले पाहिजे कारण तोच आमच्या यशाचा मूलमंत्र आहे. आपल्या लोकशाहीचा भक्कम पाया आहे, आधार आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाने जागरुक राहिले पाहिजे, आपल्या देशाचे डोळ्यात तेल घालून संरक्षण केले पाहिजे. जगात सर्वत्र भारतीयांच्या कामाचे, यशाचे, जयजयकाराचे गीत निनादत राहिले पाहिजे असेही गदिमांना वाटते. जोपर्यंत ही सृष्टी आहे,चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. बोला, ' भारत माता की...."

"ज s s य..." मुलांनी चव्हाण गुरुजींना जोरदार साथ दिली. तितक्यात तास संपल्याची घंटा झाली. निरोप घेताना चव्हाण गुरुजी म्हणाले,

"गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'गीतरामायणाचा' कार्यक्रम आपल्या शाळेत घेण्याची विनंती मी नक्कीच मुख्याध्यापकांना करीन...." असे सांगत गुरुजींनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलांचा निरोप घेतला........

                      


Rate this content
Log in