दिवस बाजारचा
दिवस बाजारचा
मे महिन्याचे दिवस होते. सूर्यदेवाचा राग जणू अनावर झाला होता. नेहमीपेक्षा चौपट वेगाने ते तळपत होते. काही दिवसांपासून अगदी मध्यरात्री आणि सकाळी रामप्रहरीही अतितीव्र उष्णता जाणवत होती. सूर्य पूर्ण ताकदीने, कमालीच्या उत्साहाने उन्हाची फवारणी पृथ्वीवर करत होता. त्यादिवशी सायंकाळचे सहा वाजत होते मात्र भरदुपारी असावे असे तापमान नि गर्मी जाणवत होती. गावाकडून माझे आबाकाका आले होते. आम्ही दोघे समवयस्क असलो तरीही नात्याने ते माझे चुलते असल्यामुळे मी त्यांना 'काका' म्हणत होतो. तसे ते आमचे 'कुटुंब काका' होते कारण सारेच त्यांना काका म्हणत असायचे. मला पुत्ररत्न झाले परंतु काही कारणास्तव काका बारशाला येऊ शकले नाहीत. त्यामुळे नातवाला पाहण्यासाठी ते मुद्दाम आले होते. आमच्या गप्पांचा फड रंगात आला असताना सौभाग्यवती म्हणाली,
"अहो, ऐकलत का?" त्यावर मी काही बोलण्यापूर्वीच आबाकाका म्हणाले,
"अग, सूनबाई, तुझा नवरा अंर्तज्ञानी आहे की मनकवडा आहे? म्हणजे बघ, तू काही बोललीच नाही तर तो ऐकलेच कसा?"
"तसे नाही हो आबा, आज आहे बाजारचा दिवस. आज जर भाज्या आणल्या नाहीत तर मग आठवडाभर बोंब. आधीच भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. पैशासारखे पैसे मोजून शिळ्या भाज्या घ्याव्या लागतात. हे माहिती असूनही हे बसलेत गप्पा मारत. जाताय ना बाजारात?"
"अग, हो. हो. जातोय. आबा, मी जरा बाजार करून येतो."
"मी पण येतो की. सकाळी मॉर्निंग वॉक झालेच नाही. तेवढेच पाय मोकळे होतील. सकाळी सकाळी कुलरच्या वाऱ्याला अशी झोप लागली म्हणता जणू शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली झोपल्यासारखे. सवयीप्रमाणे सकाळी पाच वाजता जरा झोप चाळवली पण तुम्ही सगळे ढाराढूर झोपले होते. विचार केला कशाला तुम्हाला डिस्टर्ब करावा. गेलो तसाच झोपी. बरे, चल."
काही क्षणात आम्ही दोघे घराबाहेर पडलो. रस्त्यावरील वातावरण मला तसे नवे नव्हते. परंतु रस्त्याने बायकांची गर्दी पाहून आबांनी आश्चर्याने विचारले,
"अरे, हे रे काय? बाजार बायकांचा आहे की भाज्यांचा..."
"आबाकाका, तुम्ही पण ना..."
"तस न्हाई रे पण बघ ना सगळीकडे बायकाच बायका दिसत आहेत......
इकडे बाया तिकडे बाया
या बाजूला बायका, तिकडूनही बायका
मागे बायका पुढे बायका
जिकडून तिकडे बायकाच बायका !"
"व्वा! क्या बात है ! आबा, तुम्ही कवी आहात आणि शीघ्रकवी आहात हे माहिती नव्हते हां शीघ्रकोपी आहात हे सर्वांनाच माहिती आहे."
"छान कोटी केलीस की. कवी म्हणशील तर तसे काही नाही. हे वातावरण पाहून कुणालाही कविता करण्याची खुमखुमी येईल. पण ह्या बायका चालल्यात कुठे?"
"कुठे म्हणजे? बाजारात?"
"बाजार करायला बायका? मग ह्यांचे पती महाशय काय घरी राहून पिठलं भाकरी करतात की, काय? पुरुषांना एवढाही वेळ नसतो का ?"
"असतो आणि नसतोही. वेळ असला तरीही बहुतेक बायकाच बाजारात येतात. कारण या बायकांना वाटते की,त्यांच्या नवऱ्याला अर्थात पुरुषांना भाजीतले काही म्हणता काही कळत नाही."
"कळत नाही म्हणजे?"
"भाजी कोवळी की निब्बर हे समजत नाही. भाजी लुसलुशीत, टवटवीत न आणता शिळीपाकी कोमेजलेली घेऊन येतात."
"काय सांगावे या बायकांना? अरे, कोवळी, टवटवीत बाई दिसली की, तिच्या मागेमागे फिरणाऱ्या आणि तिने जरा 'सॉफ्ट कॉर्नर' दिला की, लाळ गाळणाऱ्या पुरुषांना कोवळ्या आणि टवटवीत भाज्या कळत नाही म्हणजे काय?इथल्या पुरुषांचे तरी काय चुकते म्हणा, शहरात ना तशी भाजी ना तशी..... तुला सांगू, गावरान मेवा मग भाजी असो की बाई, तिचा लुसलुशीतपणा म्हणजे काळीज कसे टणाटण उडते बघ. एक सांग, असा नट्टापट्टा करून या साऱ्या बाजारात चालल्यात की एखाद्या लग्न समारंभात? तो टिव्हीवर असतो तसा कुठे फॅशन शो तर नाही ना ?"
"आबाकाका, किती फिरकी घेणार आहात?"
"तसे नाही रे. टाइमपास आपला. अरे, पण हा भाज्यांचा वास कसा निराळाच येतोय बघ. गावातील बाजारात येणारा वास आणि हा वास..... हां. हां. बरोबर आहे. समजले."
"काय समजले?" मी असमंसपणे विचारले.
"अरे, हा रिमिक्स वास आहे... कॉकटेल! "
"म्हणजे? मी नाही समजलो."
"अरे, इथल्या भाज्यांमध्ये मिसळलाय बायकांच्या मेकअपचा वास! दोन्ही मिळून येणारा हा सुगंध हा कसा न्यारा नि प्यारा! अरे, बाप रे! केवढी ही गर्दी, भाजी विकणाराचे तोंडही दिसत नाही."
"आबाकाका, हा बाजार पार दोन किलोमीटरवर पसरलाय. जाऊ या का त्या टोकाला?"
"चल. चल. पाहूया तरी." म्हणत आम्ही पुढे निघालो. आबा अवाक् होऊन तो बाजार विशेषतः बायकांना न्याहाळत होते. मधूनच कपाळावर, कधी तोंडावर हात मारत होते. भररस्त्यात बाजार भरला असल्यामुळे भाज्यांच्या दुकांनामागे असलेल्या विविध दुकानातील व्यवहार जवळपास ठप्प होते. असे असले तरीही प्रत्येक दुकानात पाच-सहा माणसे बसलेली होती.ते पाहून आबा म्हणाले,
"ही रिकामटेकडी का बसलीत रे?"
"बघायचे का? चला..." असे म्हणत मी आबाच्या पुढे निघालो. भाजींच्या दोन दुकानातून रस्ता काढत पुढच्या बाजूला गेलो. तसे करताना अनेक स्त्रियांना धक्के बसले म्हणण्यापेक्षा मला ते धक्के खावे लागले.त्याचे मला काही वाटले नाही. मला तसा सराव झाला होता. आबांची मात्र ते धक्के चुकवितांना तारांबळ उडत होती, अंग चोरून माझ्यामागे येताना त्यांनाही धक्के बसत होते.
"काय माणूस आहे बाई, चांगलेच शेकून घेतलं की..." एक स्त्री म्हणाली.
"तुलाही धक्का मारला? चालताना अंग चोरून जातोय हे साळसूदपणे दाखवून हाताचा असा कोन केला की नको तिथे धक्का मारून गेला." दुसरी बाई म्हणाली. ती चर्चा माझ्याही कानावर पडली. मी आबांकडे पाहिले. ते कानाला हात लावून म्हणाले,
"बापो रे! अरे, धक्का लागू नये म्हणून मी जीवापाड प्रयत्न करून प्रत्येक धक्का चुकवित होतो पण आजकालच्या बायका आणि रस्त्यावरचे खड्डे सारखेच.... म्हणजे असे बघ,आपण मोटारसायकलने जाताना रस्त्यावरचा एखादा खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला की, आपली गाडी दहा खड्ड्यातून जाते. तसेच आत्ता झाले. बघ. एका स्त्रीला धक्का लागू नये ही खबरदारी घेत असतानाच अनेक स्त्रियांना धक्का लागला बघ...." आबाकाका स्वतःची बाजू मांडत होते. आम्ही एका दुकानाच्या बाहेर उभे राहिलो. समोर असलेल्या दोन-तीन भाज्यांच्या दुकानाची दृश्य पाहताना मी आबांकडे पाहिले. ते डोळे ताणून, 'आ' वासून समोर बघत होते. प्रत्येक दुकानात बारा-पंधरा बायका जमल्याचे दिसत होते. त्यापैकी कुणी भावासाठी, कुणी चिल्लरसाठी, कुणी मापासाठी, कुणी भाजी चांगली नाही म्हणून तर कुणी कशासाठी भाजीवाल्यांसोबत हुज्जत घालत होत्या. दुसरीकडे आजूबाजूचे बघे मात्र वेगळीच मजा लुटत होते, विनासायास नयनसुख घेण्यात दंग होते. क्षणभर समोरचे दृश्य पाहून हरखलेले आबा दुसऱ्या क्षणी सावरून म्हणाले,
"चल रे, बाबा. काही खरे नाही. काही वेळ थांबले तर एखादी बाई चपलेने तोंड रंगवायला मागेपुढे पाहणार नाही." आम्ही लगेच पुढे सरकलो. काही पावले चाललो न चाललो तोच थबकलो. रस्त्याच्या बरोबर मध्यभागी दोन बायका अनेक वर्षांनंतर भेट झाल्याप्रमाणे गप्पांमध्ये दंग झाल्या होत्या. एकीच्या शेजारी तिचा पती उभा होता. त्याच्या दोन्ही हातात भाज्यांनी शिगोशीग भरलेल्या
पिशव्या होत्या. त्यामुळे त्याच्या दोन्ही हातांना कळ लागत होती. आलटून पालटून तो हातातल्या पिशव्या कधी जमिनीवर तर कधी पायातील बुटावर टेकवून हाताला आराम देण्याचा प्रयत्न करीत होता, भार सहन करण्याची कोशीश करीत होता. दुसऱ्या बाजूला एक विदेशी कुत्रा होता. त्याची साखळी बाईच्या हातात होती. ते दृश्य पाहून आबा म्हणाले,
"अरेरे! काय हाल रे बिचाऱ्याचे. हात गळून पडण्याची अवस्था आणि त्या दोघीही गप्पा मारतात."
"काका, दोघींमध्ये कोणती बाई जास्त सुंदर आहे?"
"आं..आं... काय विचार आहे? सांगू का सूनबाईला?"
"तसे काही करू नका बाप्पा. पण सांगा तर..."
"कुत्र्याची! म्हणजे 'जिच्या हाती कुत्र्याची दोरी, ती मनमोहक सुंदरी!' तसेच ती जरा नखरेलही दिसते. बघ ना, डोळे कसे फिरवतेय, ओठ कशी चाळवतेय, बोलताना शरीराला कसे झोके देतेय आणि कपड्यांच्या बाबतीतही जास्तच कंजूष आहे...."
"आता मला सांगा, ओझे घेतलेल्या त्या माणसाला स्वतःच्या बायकोच्या साक्षीने, अगदी बोटाच्या अंतरावरील तशा सौंदर्यवतीचे सान्निध्य मिळतेय, खूप काही पाहायला मिळते, घमघमाट अनुभवयास मिळत असेल तर तो सात जन्म त्याच अवस्थेत पिशव्या सांभाळत उभा राहायला तयार होईल." मी म्हणालो.
"व्वा! मान गए! प्वाइंट है। भतीजे, चल। इस बातपर मै ज्यूस पिलाता हूँ।"
"नको. नको. आत्ता नको. उद्या पिऊ. अंधार पडला आणि भाजी मिळाली नाही तर घरी पोहचताच बिन पाण्याचा माझा ज्यूस होईल..." मी म्हणालो. आम्ही पुढे सरकलो. तसे आबा म्हणाले,
"मी अजून एक गोष्ट हेरली आहे."
"ती कोणती?" मी विचारले.
"भाजीवाल्या बाईपेक्षा भाजीवाल्या पुरुषांकडे जास्त गर्दी आहे. असे का ?"
"पाहायचे का? या माझ्या मागे. पण धक्के खाऊ नका हं." असे म्हणून मी एका भाजीवाल्या बाईजवळ जाऊन उभा राहिलो. तिथे चालू असलेला संवाद ऐकला.
"मावशी, वांगे कसे दिले हो?"
"दहा रूपये पाव."
"अग बाई, एवढे महाग? एवढा भाव नाहीच हो आणि केवढाले मोठे आहेत हो,कोवळे नाहीत का? तिकडे तर पाच रूपये पाव आहेत."
"मग घ्या की तिकडेच...पाच रुपये पाव."
"अग बाई, एवढा तोरा?" असे पुटपुटत ती बाई पुढे सरकली आणि एक तरुणाने त्याच बाईला विचारले ,
"वांगे कसे दिले हो?"
"सात रुपये पाव." ती बाई डोळ्यांची मस्त हालचाल करीत म्हणाली.
"पाच रुपये लावा ना." त्या तरुणाने गळ घातली.
"घे. बाबा, घे." त्या बाईने चेहऱ्याला असा झटका दिला की, खल्लास!
"चांगली. चांगली लावा बरे." तो तरुण म्हणाला. तसे आबांनी हलकेच मला विचारले,
"हे असे कसे?"
"तेच तर गणित आहे.बायका जास्त घिसघिस करतात.शिवाय निवडून निवडून चांगला माल घेतात.
आता या पोराचेच बघा ना, नखऱ्याला भुललं आणि त्या बाईने मापात घातलेले मोठ्ठाले, निब्बर नि किडलेले वांगे घेऊन निघालं म्हणजे नफ्यात कोण राहिले?"
"तसे पाहिले तर भाजीवाली फायद्यात आहे पण पोरगही तोट्यात नाही बरे."
"ते कसे?" मी आश्चर्याने विचारले.
"आधीची बाई भाजीसाठी हुज्जत घालत होती तेव्हा या बाईचा पदर अंगभर होता. ती भांडणारी बाई पुढे सरकली आणि हे पोरग येताच तिने ज्या अदेने पदर पाडला ना, व्वा क्या बात है! माझ्यासारख्याची जान कुर्बान तर त्या पोराची काय कथा? निब्बर माल घेतानाही तो मालामाल झाला रे."
बोलत बोलत आम्ही थोडे पुढे गेलो. बाजूला एका भाजी विक्रेत्याच्या दुकानापुढे चार-पाच बायका ऐसपैस बसल्या होत्या.
"टमाटे काय भाव लावले हो?"
"चार रूपये पाव." तो माणूस म्हणाला.
"असे का हो? जरा बरोबर लावा ना हो.." दुसऱ्या बाईने मानेला सुरेख झटका देत म्हटले.
"काय हो असं, टमाट्याचे भरपूर पिक आलय म्हणतात ना, मग भाव टाइट कसा ?" टाइट पोशाखातील एका स्त्रीने विचारले.
"दोन रुपये लावा ना हो."
"नाही हो, परवडत नाही हो."
"सगळे परवडते हो. तुम्हाला कुठे पैसे लागतात. घरच्याच शेतात तर पिकवता ना?"
"हो ना. आम्हाला सगळं माहिती आहे. लावा बरे, दोन रुपये पाव.." अजून एका बाईने गळ घातली.
तो संवाद ऐकत ऐकत आम्ही पुढे आलो. आबाकाका म्हणाले,
"अरे, बोलणारांचे काहीही विकते म्हणे पण इथे तर घेणाराचाच बोल मोठा आहे. अरे, हे..हे... शेतकरी फार मोठ्या कष्टाने भाजीपाला आणि इतर पिकं पिकवतात रे. पण तुम्ही शहरी लोक मात्र त्यांचा माल हा असा कवडीमोल भावाने विकत घेता. शेतकऱ्याला अन्नदाता, पोशिंदा म्हणता ना तुम्ही तर मग त्याने चार रुपये भाव सांगितला तर अधिक देऊ नका पण चाराचे दोन तरी करु नका. दुसरीकडे हजारो रुपयांचे सोने, कपडे घेतांना एक रुपया कमी करा असे कुणी म्हणत नाही उलट बिल करताना व्यापारी मजुरी, जीएसटी असे टॅक्स लावून शेवटच्या क्षणी पैसे उकळतो. तिथे मात्र या लोकांची दातखिळी बसते. अरे, या भाजीपाल्यावर अनेकांचे पोट अवलंबून आहे आणि हे लोक एक रुपयासाठी त्याच्या पोटावर पाय देत असतात. चला....उद्धवा, अजब तुझे सरकार " आबा हताशपणे म्हणाले. आणि आम्ही तिथून निघालो. तसा अंधार पडलाच होता. पाच-सात भाज्या घेऊन आम्ही घरी आलो.... भाज्यांची पिशवी स्वयंपाक घरात ठेवली. आबांनी पाणी देऊन मी पाणी पीत असताना माझी बायको तिथे आली. तिच्या हातात असलेल्या परातीत भाज्या होत्या. परात माझ्यापुढे आदळून, माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून म्हणाली,"पुन्हा तशीच भाजी. कितीही घसा खरडून सांगा, पहिले पाढे पंचावन्न! पालथ्या घागरीवर पाणी!..."
"अग..अग, सूनबाई, झाले तरी काय?" आबांनी विचारले.
"पहा. आबाकाका पहा, तुम्हीच यांचा भाजीबाजार पहा. ही..ही.. हात हात लांब दोडकी, ही लिबलिब, नासकी टमाटी, ही डागाळलेली, शिळी काकडी आणि ही मिरची बघा..."
"बघ. मी तुला सांगत होतो की, नीट बघून घे. दुसरीकडे लक्ष देऊ नको."
"म्हणजे? यांचे लक्ष भाजी घेण्याकडे नव्हते ?"
"मुळीच नाही. भाजी निवडून घ्यायची सोडून भाजीवालीकडेच अधिक लक्ष होते. तुला सांगतो, सूनबाई, हा भावपण करीत नव्हता. ती बाई म्हणेल तोच भाव निमुटपणे देत होता. सूनबाई, तूच का जात नाहीस ग बाजारात?" माझ्याकडे पाहून मला वेडावत आबाकाका म्हणाले.
"आबाकाका, मीच जाते हो. फार तर पिशवी धरायला यांना नेते.अगदी नववा महिना लागला ना तरीही मीच जात असे. त्यादिवशी बाजार करून आले आणि मला त्रास सुरु झाला. दोन तासात बाळंतीण झाले..."
"का नाही होणार? बाजारात मिळणाऱ्या धक्क्यांचा हा प्रताप! तुझी डिलीव्हरी नॉर्मल झाली... नो सिझेरीन... जय हो ..धक्के!...." म्हणत आबाकाका स्वतःच जोरजोरात हसत सुटले. त्यांच्या त्या गगनभेदी हसण्यात आम्हा दोघांचे हसणे विरुन गेले......