Nagesh S Shewalkar

Others

3  

Nagesh S Shewalkar

Others

छडी लागे

छडी लागे

5 mins
1.2K


   बालमित्रांनो, साधारण बारा वर्षांपूर्वी ग्रामीण भागात केवळ जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या. आजच्याप्रमाणे संस्थांच्या किंवा खाजगी शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. ग्रामीण भागातही कुठे चौथ्या वर्गापर्यंत, कुठे सातव्या वर्गापर्यंत आणि बऱ्यापैकी मोठ्या गावात दहावी इयत्तेपर्यंत शाळा असायची. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मात्र शहराकडे धाव घ्यावी लागे. शिक्षकांची संख्याही विद्यार्थी संख्येप्रमाणे कुठे एक शिक्षक, कुण्या शाळेवर दोन शिक्षक तर कुण्या गावी चार शिक्षक असायचे. त्या काळातील बहुतेक शिक्षक हे शिस्तीचे असायचे. विद्यार्थ्यांनी बेशिस्त वागू नये, रोज नियमित शाळेत यावे, शाळेत आणि घरी खूप अभ्यास करावा यासाठी ते भरपूर मेहनत करायचे आणि विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे. शिस्त मोडणाऱ्या, अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते शिक्षक शिक्षाही करीत असत. आजही तळमळीने शिकवणारे शिक्षक आहेत परंतु मुलांना शिक्षा करायची नाही असे सरकारी फर्मान असल्यामुळे आज फार कमी प्रमाणात मुलांना शारीरिक शिक्षेला सामोरे जावे लागते. आज मी तुम्हाला उदाहरण म्हणून तोटेगाव या छोट्या गावातील शाळेची गोष्ट सांगणार आहे.


   तोटेगाव नावाचे एक अतिशय छोटे खेडे होते. जेमतेम पस्तीस-चाळीस घरांची वस्ती असलेल्या या गावात जिल्हा परिषदेची शाळा होती. पहिली ते चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांची संख्या पन्नास ते पंच्चावन्न एवढी होती. शाळेत धाटे नावाचे एक शिक्षक होते. बावीस वर्षे वय असणारे धाटे जवळच्या गावातून जाणे-येणे करीत असत. ते शाळेच्या वेळेबाबत अतिशय काटेकोर होते. साडेआठ ही शाळेची वेळ असताना गुरुजी सव्वाआठ वाजता शाळेवर हजर होत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत वेळेवर यावे, उशीर करू नये असा त्यांचा कटाक्ष असे. शाळेत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते कडक शिक्षा करायचे. शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची खैर नसायची. बंड करणारी मुले त्यांच्या शिक्षेला पात्र ठरायची. एकदा धाटे गुरुजी नेहमीप्रमाणे शाळेवर आले. आपल्याला शाळेत जायला उशीर होऊन गुरूजींचा मार मिळू नये म्हणून बरीच मुले आठ वाजण्याच्या आधीच शाळेत येऊन बसायची. चौथ्या वर्गापर्यंत शिकणारी बालके ती. एकत्र जमली की खेळणे, त्यातून वाद, बाचाबाची, मारामारी ह्या गोष्टी ठरलेल्याच.


त्यादिवशीही तसेच झाले. खेळताना दोन मुलांची भांडणे, मारामारी सुरु झाली आणि तितक्यात धाटे गुरुजी तिथे पोहोचले. ती दोन्ही मुले एवढी एकमेकांवर संतापली होती, रागाने लालबुंद झाली होती की, आपले गुरुजी आले आहेत हे पाहूनही ते मारामारी थांबवत नव्हते. गुरुजींंना पाहताच इतर मुले बाजूला झाली. धाटे गुरुजींनी मोठ्या प्रयासाने दोघांना एकमेकांपासून दूर केले. तेंव्हा दोघांनीही एकमेकांच्या तक्रारी केल्या.

"गुर्जी, मझी काय बी चूक न्हाई. यानेच मला मारले. विचारा कुणालाही..."

"ये लब्बाड बोलू नको. मास्तर, पहिले याने मला शिवी दिली. हो ना रे?"


ते म्हणतात ना, 'उंदराला मांजर साक्ष' त्याप्रमाणे काही मुलांनी एकाची तर काहींनी दुसऱ्या मुलाची बाजू घेतली. दोघेही खोटे बोलतात. खरे काय ते कुणीही सांगत नाही हे पाहून धाटे गुरूजींना राग आला. दोघांनी खरे सांगावे म्हणून त्यांनी दोघांनाही छडीने मारायला सुरुवात केली. मार खातानाही दोघे आपलेच खरे हे सांगताना दुसऱ्याला धमकावत होते.

"जाणार कुठे तू? शाळा तर सुटू दे मग बघतो तुझ्याकडे...."

"अरे, जा रे. मोठा आला बघणारा...." दुसरा म्हणाला.


मार खात असताना दोघेही आपले ऐकत नाहीत हे पाहून गुरुजींच्या रागाचा पारा चढला. त्यांनी एका मुलाला शाळेतून दोरी आणायला सांगितली. मुलाने दोरी आणताच धाटे गुरूजींनी दोन्ही मुलांना शाळेसमोर असलेल्या एका झाडाला बांधले. शाळा सुरू झाली. मुलांचे लक्ष बाहेर झाडाकडेच होते. शाळेसमोरून जाणारे-येणारे गावातील स्त्री-पुरुष तो प्रकार बघत होते. परंतु कुणीही गुरूजींना त्याचे कारण विचारत नव्हते. उलट काही पालक आपापसात बोलत होते, "चांगले झाले. असेच पाहिजे या पोरट्यांना. भलताच धिंगाणा करतात. घर नाही, शाळा नाही, कुठेही यांंचा उच्छाद चालूच असतो. कंटाळा आलाय. बरे झाले. आता येतील लायनीवर."

"असाच मास्तर पाहिजे होता. शाळा म्हणलं की, काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करायचे. हे गुरुजी आल्यापासून बघा कसे सकाळी सकाळी पळतात शाळेकडे."

"गुरुजी, लै चांगलं केल बघा. अशी जबर शिक्षा दिली तरच ही पोऱ्ह शिकतील बघा..."

पालकांच्या अशा पाठिंब्यामुळे धाटे गुरुजींचा आत्मविश्वास वाढत होता. त्यांना बळ मिळत होते, स्फूर्ती येत होती.


   त्यादिवशी नेहमीप्रमाणे धाटे गुरूजींनी सव्वातीन वाजता मुलांना मैदानावर जमवले. सारी मुले पटापट आपापल्या वर्गाच्या रांगा करून शिस्तीत बसले. 'परवंचा' हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यामध्ये पाढे, दिशांची नावे, वारांची नावे, कविता, गाणी, कथा अशा बाबी घेतल्या जात. एकटे शिक्षक असल्यामुळे दिवसभर मुलांना सांभाळून गुरुजी काहीसे थकत असत. मुलेही कंटाळलेली असत. शाळा सुटण्यापूर्वी अर्धा तास अगोदर घेतलेल्या परवंचामुळे पाठांतर होत असे. करमणूकही होत असे. मुलांमध्ये एक प्रकारची स्पर्धा लागत असे. त्या दिवशी ह्या साऱ्या गोष्टी चालू असताना धाटे गुरूजींच्या लक्षात आले की, चौथ्या वर्गात शिकणारा पांडुरंग नावाचा मुलगा कशातही लक्ष देत नाही. उलट वेगळेच काहीतरी करीत आहे. गुरूजींनी त्याला खुणावले परंतु त्याने तिकडे लक्ष दिले नाही. ते पाहून गुरुजींंनी त्याला आवाज दिला. परंतु पांडुरंगने ऐकून न ऐकल्यासारखे केले. त्यामुळे गुरुजींंच्या रागाचा पारा चढला. त्यांनी आजूबाजूला छडीचा शोध घेतला. छडी नसल्याचे पाहून त्यांनी एका मुलाला आतून छडी आणायला सांगितले. मुलाने पळत जाऊन वर्गातून छडी आणली.


ती छडी घेऊन धाटे गुरूजी पांडुरंगजवळ गेले. रागारागाने ओरडले,"पांड्या, उठ..." ते ऐकून पांडुरंग उठला. तो भीतीने थरथर कापत होता. गुरूजींनी त्याच्या हाताला धरून ओढत बाहेर काढले. हातातल्या छडीने त्याच्या पाठीवर, पायावर जोराने मारायला सुरुवात केली. पांडुरंग कळवळत होता, रडत होता, विनवणी करत होता. आठदहा रट्टे देऊन पांडुरंगला त्याच्या जागेवर ढकलून गुरुजी खुर्चीवर येऊन बसले. पांडुरंग रडत होता. पुन्हा परवंचा सुरू झाला.

तितक्यात एक मुलगा गुरुजींजवळ येऊन म्हणाला,"गुर्जी, पांड्याच्या मांडीतून रगत निघतय..."

"काssय?" असे म्हणत गुरुजी उठले. पांडुरंगजवळ गेले. त्याला उभे करून त्याच्या मांडीकडे पाहिले. मांडी सुजली होती. मांडीवर वळही दिसत होते. थोडेसे रक्तही येत होते. पांडुरंगला घरी पाठवून गुरूजींनी हातातल्या छडीकडे पाहिले आणि ते दचकले. मुलाने आणलेली ती छडी नकाशाच्या बाजूला लावलेली जाड पट्टी होती. त्या छडीच्या एका बाजूला एक खिळा होता. रागाच्या भरात गुरुजींच्या लक्षात ती गोष्ट आली नाही आणि त्यांनी फटके ओढताना तो खिळा पांडुरंगच्या मांडीत घुसला असावा. शाळा सुटली. मुले घरी निघाली. धाटे गुरूजीही सायकलवर निघाले.


   दुसऱ्या दिवशी धाटे गुरुजी ठरलेल्या वेळी शाळेत पोहोचले. मुलेही जमली होती. सायकल लावून गुरुजींंची नजर मुलांवर फिरली परंतु त्यांना पांडुरंग कुठे दिसला नाही. त्याबाबत मुलांना काही विचारण्यापूर्वी त्यांना शाळेत येणारा पांडुरंग दिसला. मात्र तो एकटा नव्हता. सोबत त्याचे वडील दिसत होते. गुरुजींंच्या मनात आले, पांडुरंगचे वडील नक्कीच आपल्याला जाब विचारायला, कदाचित भांडायला येत असतील. महत्त्वाचे म्हणजे पांडुरंगचे वडील पहिलवान होते. पंचक्रोशीत ते गावोगावचे कुस्त्यांचे फड गाजवत असत.... 'काय सांगावे? काय उत्तर द्यावे?' या विचारात ते असताना ते दोघे शाळेत पोहोचले.


गुरुजींंना पाहताच पांडुरंगचे वडील म्हणाले,"गुर्जी, रामराम...."

"र..र...रामराम... काल तो..."

"धिंगाणा करीत आसंल. बर केलंत याला फटकावले ते. अभ्यासाचे नाव काढत नाही. शाळेतून घरी आला की, जे बाहेर जाते ते आंधार पडला की, घरी येते. मग कशाचा अभ्यास नि काय? जेवलं की लगोलग ढारढूर झोपते. भलतंच दांडग झालंय. या मारानं त्याला काही व्हणार न्हाई. अजून रट्टे द्या पर याला चांगल शिकवा. गुर्जी, मी बी थोडाबहुत शिकलेला आहे. कसं आहे गुर्जी, त्ये म्हणतात ना, छडी लागे छमछम, विद्या येई घमघम... ते खूप बरे होते हो. येतो मी. रामराम....",असे सांगत पांडुरंगचे वडील निघून गेले आणि धाटे गुरुजींनी सुटकेचा निश्वास सोडला...                   


Rate this content
Log in