STORYMIRROR

Nagesh S Shewalkar

Others

5.0  

Nagesh S Shewalkar

Others

बारसं नि तेरसं

बारसं नि तेरसं

8 mins
1.6K


विधानसभा निवडणुकांचा काळ होता. निवडणुका म्हटल्या की, धामधूम आलीच. भेटणारांची संख्या वाढते. गप्पाटप्पा, सभा, प्रभातफेऱ्या यांना ऊत येतो. दारूचा घमघमाट पसरतो. कोंबड्या - बकऱ्यांचा बळी जातो. रूपयांची भेट मतदार राजाला चढवली जाते. तरीही हा राजा कुणाला पावेल याची शाश्वती नसते. मतदार सर्वांना गोडगोड बोलून मिळेल तेवढे सावडते. शेवटी करायचे तेच करतो. खुर्चीवर असणारास खाली आणतो, खाली असलेल्यास वर चढवतो. एकंदरीत निवडणुकांचा हंगाम हा मनमुराद मजा लुटायचा काळ असतो.

अशीच चुरस विधानसभेच्या एका मतदारसंघात लागली होती. त्या मतदारसंघात डझनभर उमेदवार उभे होते. लढत मात्र तिरंगी होती. उरलेले उमेदवार केवळ बुजगावणे होते. ही माणसं का उभी राहतात या प्रश्नाचे उत्तर जसे मतदारांना माहिती नसते तसेच त्याचे उत्तर स्वतः त्या उमेदवारांना ही देता येत नाही. सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचे सारे तंत्र अवलंबिले होते.

त्या मतदारसंघात एका मातब्बर पुढाऱ्याकडे त्या दिवशी त्याच्या मुलीचे लग्न होते. मुलीचा पिता निवडणुकीत उभा नसला तरी मंत्रिपदावरून निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराचा खास माणूस होता. नवरीचे सासरे हे ही नामांकित राजकारणी होते. आपल्या पट्टशिष्याच्या मुलीच्या लग्नासाठी मंत्रिमहोदयाचे आगमन होणार होते. पंचक्रोशीतल्या साऱ्या जनतेला लग्नाचे आमंत्रण होते. विरोधी पक्षाचे लहानथोर नेतेही आमंत्रित होते. पंचक्रोशीतल्या आबालवृद्धांची पाऊले विवाहस्थळाकडे चालू लागली. पाहता पाहता मांडव माणसांनी फुलून गेला होता. परिसर वाहनांनी भरून गेला. विवाहाचा मंगलसमय होऊन दोन तास उलटले परंतु, मंत्रिमहोदयाचे आगमन होत नव्हते. विरोधी पक्षनेते ही बसून होते. त्यांच्या प्रचाराचा अमूल्य वेळ वाया जात होता. शेवटी एका उमेदवाराला राहवले नाही, तो आणि त्याचे सहकारी यांनी हात जोडून मांडवात फेरी मारून लागले. ते एका माणसाजवळ थांबले आणि म्हणाले,

"काय पाटील, पुन्हा भेटलेच नाहीत. अहो, तुमच्यासाठी एस. टी. च्या साहेबांना भेटलो. तुमचा ज्येष्ठ नागरिकाचा पास आणून ठेवला. कधी ही घेऊन जा. थांबा. तुम्हाला या वयात कशाला त्रास? अरे, वामन या गावामध्ये आपण पुन्हा प्रचारासाठी येणार आहोत, तेव्हा माझ्या ड्रावरमध्ये ठेवलेला यांचा पास आणायला विसरू नकोस. बरे काका, तुमचे काम केले आता आमच्याकडे बघा. निवडणुकीला उभा आहे... "म्हणत म्हणत तो जत्था पुढे सरकला. तसे हसत हसत तो म्हातारा म्हणाला,

" इच्या आयला, जान ना पहचान, मै तेरा मेहमान! आरं बापू, मी ना या गावचा ना या जिल्ह्य़ातला. नवरदेवाकडचा गडी हाय मी. माण्सं निवडणुकीत सरकत्यात हे खरं हाय. मले वाटले, आमच्याकडे अस्से परकार होतात कानू, पर न्हाई, ह्ये तर लैच भारी...."

शुभ घटिका टळून तीन तास झाले. तसे मंत्रिमहोदयाचे मांडवात आगमन झाले. तशी वेगळीच धावपळ सुरू झाली. मंत्र्यांनी कारमधून उतरताना दोन्ही हात जोडले. चेहऱ्यावर हास्य आणत जमेल तशी प्रत्येकाची चौकशी करत ते मांडवात शिरले. वधुपिता लगोलग त्यांच्याकडे धावला. मंत्र्यांनी त्यांना आलिंगण दिले. काही सेकंदाच्या उरभेटीनंतर दोघे ही व्यासपीठाकडे निघाले.

"आपणास होत असलेला उशीर पाहून विरोधकांनी बाजी मारली." वधुपिता हलकेच म्हणाला.

"ती कशी?" मंत्र्यांनी हळूच विचारले.

"संधी पाहून त्यांनी मांडवातच प्रचार सुरू केला आहे."

"अस्से का? ठीक आहे. बघतो...." म्हणत वधुपित्यासह मंत्री व्यासपीठावर पोहोचले. भटजींच्या हातातला माइक जवळपास ओढून घेत ते म्हणाले,

" आधी मी आपणा सर्वांची माफी मागतो. कारण आमचे नेहमीचेच. आम्हाला यायला थोडा वेळ झाला. आल्यावर समजले की, आमच्या उशिराचा आमच्या विरोधकांनी चांगलाच फायदा घेतला. खर तर मी येथे बोलणार नव्हतो. पण, विरोधकांमुळे बोलावे लागते आहे. काळ काय, वेळ काय, हे वागतात काय? हा काय निवडणुकीचा आखाडा आहे? छे! छे! आम्ही त्यांच्या वागण्याचा अत्यंत कडक शब्दात निषेध करतो आणि निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करणार आहोत. विरोधक प्रचार करीत असताना आमचे कार्यकर्ते बिथरले असते तर... मंगलमय वातावरण अमंगल झाले असते. माझ्या सहकारी मिञांना मी हजार धन्यवाद देतो. आमच्याप्रमाणे सर्व मतदार समजूतदार आहेत. ते आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत. याची विरोधकांनी खात्री बाळगावी. गुडघ्याला बाशिंग बांधून नवरी मिळत नाही. या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी मी काही साधुसंत नाही,राजकारणी आहे. राजकारणी लोकांनी आशीर्वाद देऊ नयेत तर विनंती करावी. असा आमचा आणि आमच्या पक्षाचा विचार आहे. वधुवरांना मी एकच सांगतो, सुखाचा संसार करा, एकमेकांवर विश्वास ठेवा. देशाचे हित जपा. त्यासाठी 'हम दो हमारे दो' हा मंत्र ध्यानात ठेवा.... "

मंत्री बोलत असताना त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. भाषण थांबवून ते म्हणाले," हॅलो, मीच बोलतोय. बाबुराव, तुम्ही लग्नाला येणार होता ना, आज तुमचा आमच्या पक्षात प्रवेश होता ना? काय म्हणता, वारला? अरेरे! वाईट झाले. अंतिम संस्कार कधी आहेत? ठिक.. ठिक आहे.. आम्ही पोहोचतो. तोपर्यंत थांबा. आम्हाला अंतिम दर्शन घेऊ द्या. हां.. हां.. निघालोच... "असे म्हणत मंत्र्यांनी भ्रमणध्वनी बंद केला. परंतु, माइक सुरू असल्याने सर्वांनी ते संभाषण ऐकले.

" मिञांनो, आपण ऐकलेच आहे. बाबुरावांवर दुःखाचे आभाळ कोसळले असून आम्हाला अशा प्रसंगी जाणे आवश्यक आहे. महाराज, माईक घ्या. असे करा, मंगलाष्टक एकच म्हणा. आपले तेच... आता सावधान म्हणा... चालते हो चालते."

अखेर मंत्र्यांपुढे महाराजांनी नमते घेतले. शेवटचे एकमेव मंगलाष्टक झाल्यावर लगेच मंत्री निघाले. जाताना पुन्हा नेहमीचीच मुद्रा... मतांचा जोगवा मागणारी. मंत्र्यांपाठोपाठ विरोधकांचा ताफा निघाला. प्रचाराची अशी नामी संधी ते कशी सोडणार? दोन्ही जत्थे एका मागोमाग एक बाबुरावांच्या गावी पोहोचले. गावावर तशी शोककळा वाटत नव्हती. पानटपऱ्या, हॉटेल्स, व्हिडिओगृह यांच्यामध्ये जणू गाण्याची स्पर्धा सुरू होती. सारा लवाजमा बाबुरावांच्या घरासमोर पोहोचताच बाबुराव बाहेर आले. त्यांनी सर्वांचे स्वागत केले.

"बाबुराव, अरेरे! वाईट झाले. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. कुठे आहे....."

"साहेब, त्याचे काय आहे, ते ते आमच्या गड्याचा नातू जन्माला येताच मरण पावला. आम्ही तुम्हाला फोनवर तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण...."

"असे का... बरे तर मग..." मंत्री बोलत असताना विरोधकांचा तांडा पोहोचल्याचे पाहून

मंत्री पुढे म्हणाले," अहो, गडी तर गडी! शेवटी तो माणूसच! थोरा मोठ्यांच्या दुःखात आपण नेहमीच सहभागी होतो. एखाद्या वेळी गरिबांकडे जायला पाहिजे. चला.."

बाबुराव, मंत्री, पाठोपाठ विरोधी पक्षनेते, कार्यकर्ते आणि शेवटी गावातले लोक अशी पदयात्रा बाबुरावांच्या गड्याच्या झोपडीसमोर पोहोचली. गडबडलेला गडी बाहेर आला. त्याला पाहताच मंत्री पुढे होऊन म्हणाले,

" रामराव, फार वाईट झाले. तुझ्या दुःखात आम्ही.. "

" कहाचं दुख आन् काय? बरे झाले, खाणारे एक तोंड कमी झाले. सायेब, पैलेच चार नातवंडे आहेत मला. दिवसभर खोंडावाणी फिरणारं मझं पोरगं ह्यो उद्योग मातर लै जीव लावून करते. आपरेशन कर म्हंतो तर पोरग तर सोडा पर सुनबी धाय मोकलून रडाय लागते.... " रामा बोलत असताना मंत्री आल्याची बातमी गावात पोहोचल्यामुळे बरीचशी जनता तिथे जमा झाली हे पाहून मंत्र्याच्या अंगात भाषणाची सुरसुरी पेटली. तसे ते तिथल्या एका दगडावर उभे राहून ते म्हणाले,

" आमचे मित्र बाबुराव, त्यांचा गडी रामराव, आमचा पिच्छा न सोडणारे आमचे विरोधक आणि जमलेल्या गावकऱ्यांनो, रामरावांचा नातू मरण पावला याचे आम्हाला अत्यंत दुःख आहे. चिडलेले रामराव काहीही म्हणत असले तरी ते अंतःकरणातून दुःखी आहेत. त्यांचा चेहरा त्यांची दशा, दुःख स्पष्ट सांगत आहे. एक जीव या जगात आल्यावर लगेच निघून गेला. तो का या जगाला कंटाळला? एका क्षणात त्याने सारे जाणले. ओळखलेआणि हे जग सोडायचा त्याने निर्णय घेतला. मित्रांनो, या देशात गरिबी, अज्ञान आणि हटवादीपणा आहे. म्हातारा राम शस्त्रक्रिया आणि त्याचे महत्त्व समजू शकतो परंतु, ते त्यांच्या तरूण मुलास का समजू नये? या देशात कामाची नाही तर काम करणाऱ्यांची कमी आहे. बेकारांची संख्या जास्त नाही तर आळशीपणाने कुणाच्या तरी कमाईवर खाणारांची संख्या जास्त आहे.नवीन जन्मलेलं पोरग उद्या पुढारी झालं असतं, शास्त्रज्ञ झालं असतं, डॉक्टर - इंजिनिअर झालं असतं. मास्तर झालं असतं.... यापैकी काहीही झालं नसतं तर मतदार मात्र नक्कीच झालं असतं. या गरिबीमुळे, अज्ञानामुळे आपला एक मतदार कायमचा गेला. जाऊ द्या. आम्ही मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो. रामरावच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. खरे तर अशा वेळी रामाजवळ बसायला हवे. परंतु, तुम्हाला माहित आहे की, निवडणुका आहेत. मतदारांना भेटायचे आहे. तेव्हा आम्ही चालतो... " म्हणत मंत्र्यांनी रामाच्या खांद्यावर थोपटले. कारमध्ये बसताना बाबुरावांचा निरोप घेऊन त्यांना पुन्हा पक्ष प्रवेशाचे निमंत्रण देऊन ते निघाले....

" किती वाजले रे? " कार गावाबाहेर पडताच त्यांनी विचारले.

" तीन वाजले, साहेब... "

" सखारामच्या पोरांचा बारसं आहे. चला. तिकडे."

"साहेब, आत्ता यावेळी?"

"हे बघा, या हंगामात कंटाळा नसतो. कॅनाॅलचे पाणी सुटले की, शेतकरी कधी हयगय करतो का? रात्र नाही, दिवस नाही, केव्हाही शेतीला पाणी देतोच ना, तसा हा आपला मोसम आहे. अर्ध्या रात्री जरी संधी मिळाली तरी ती गमवायची नसते. बारसं असो की, तेरसं तिथे जायलाच हवे. राजकारणी, मंत्री पोहोचला की, माणसं आपोआप गोळा होतात. साखरेभोवती गोळा व्हायला का कुणी मुंग्यांना आमंत्रण देतं? "

काही मिनिटांत मंत्रीमहोदय सखारामच्या गावी पोहोचले. त्यांच्या कारच्या मागोमाग बरेच लोक धावतपळत निघाले. मंत्री येणार हे माहिती असल्याने सखारामने एक भव्य मंडप टाकला होता,सुशोभित व्यासपीठ तयार केले होते. मंत्र्यांचा सत्कार होताच त्यांनी माईकचा ताबा घेतला.

" सखारामजी, आणि जमलेले लोकहो, तुम्ही आम्हाला बोलावले, सत्कार केला याचा मला आनंद झाला. मी तुमचा आभारी आहे. सखाराम आजोबा झाले ही फार आनंदाची गोष्ट आहे. सखारामजी, आमचे मार्गदर्शक आहेत. मी आणि त्यांचा मुलगा तुकाराम मित्र आहोत. म्हणजे राजकारणात आमची ही दुसरी फळी आहे. सखारामजींच्या नातवाच्या रूपाने तिसरी पिढी उदयास आली आहे. आजोबांच्या छत्रछायेखाली त्यांचा नातू राजकारणाचे धडे गिरवेल. जसे द्रोणाचार्यांच्या शाळेत भीमार्जून, दादोजींच्या निगराणीत शिवाजी महाराज तयार झाले आणि त्यांनी इतिहास घडविला तशीच कामगिरी हा नातू करेल.अशी आम्हाला खात्री आहे. तेव्हा या आजोबा - नातवाला दीर्घायुष्य चिंतीतो. त्यांच्याकडून अधिकाधिक देशसेवा घडावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. "

कारमध्ये बसता बसता तुकाराम म्हणाला," साहेब, आज ग्यानबा पाटलाकडे तेरवी आहे. "

" ग्यानबा पाटील?.... "

" मागच्या निवडणुकीत आपला प्रचार केला होता. त्याला साखर कारखान्याचे अध्यक्षपद पाहिजे.... "

" हां. हां. आले लक्षात. अध्यक्षपद मिळाले नाही म्हणून तो रागाने आपल्याला सोडून गेला होता. त्याची समजूत काढायची ही नामी संधी आहे. चला.... "

पाचव्या मिनिटाला मंत्र्यांचा ताफा ग्यानबाच्या दारी पोहोचला. त्यांना पाहताच ग्यानबा धावतच बाहेर आले. मंत्र्यांना पाहताच म्हणाले,

" या साहेब, या. आज गरिबाची कशी काय आठवण झाली "

" ग्यानबा जी, कोण गरीब, कोण श्रीमंत, सारे फोल आहे. शेवटी आपण सारी माणसे आहोत. अशा दुःखाच्या प्रसंगी माणूस माणसाला नाही तर कोणाला शोधत जाईल? खरे तर, तुमच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हाच आम्ही भेटायला यायला हवे होते परंतु,.... "

" जाऊ द्या. तुम्ही आलात बरे वाटले. "

" झाले ते झाले. ईश्वराच्या इच्छेनुसार सारे घडते. हे दुःख पचवून पुन्हा नव्याने राजकारणात उतरण्याची शक्ती ईश्वर तुम्हाला देवो ही प्रार्थना. "

" साहेब, उद्यापासून प्रचारासाठी येतो. "

"ग्यानबाराव, गडबड नको. दोन दिवसांनी या. येतो आम्ही... "असे म्हणत त्यांनी ग्यानबाचा निरोप घेतला........

त्या सायंकाळी मंत्रीमहोदय त्यांच्या कार्यालयात बसून वेगवेगळ्या गावाहून आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करीत असताना बाहेर बसलेला एक कार्यकर्ता दुसर्‍याला म्हणाला,

" काय साहेबांचा उरक आहे, सकाळपासून दम नाही. सकाळी सकाळी प्रचारसभा झाली. लग्न झालं, मौत झाली, बारसं नि तेरसं ही झाल. पण, साहेब थकले नाहीत. अजूनही काम चालू आहे."

"म्हणून तर ते मंत्री आहेत. आपण चार पावलं चाललो नाही तर लगेच आपल्याला 'घोट' लागतो...."

तितक्यात मंत्री बाहेर आल्याचे पाहून तो पुढे म्हणाला," रात्रीचे दहा वाजले आहेत, आता कुठे निघाले साहेब? "

" तुला ठाव नाही, अरे, कारखाना साइटवर नव्याने बांधलेल्या कलाकेंद्राचे उद्घाटन साहेबांच्या हस्ते आहे. चल. लवकर... "

" च्यायला! साहेबांची कला न्यारीच हाय...." असे बडबडत तो ही कारमागे निघाला.


Rate this content
Log in