*बाल संस्कार कथा १**खरे बोला
*बाल संस्कार कथा १**खरे बोला
"आई मी खेळायला चाललो ग!" असे म्हणत विरू पळत सुटला. आई "विरू विरू" करत राहिली. विरू ने आईची हाक ऐकली नाही. तो मैदानावर पळत गेला. तेथे राजू, सोनू ,आणि हर्ष वीरू ची वाट बघत बसले होते. चौघे एकत्र गोळा झाली आणि कुजबूज करू लागली. काहीतरी गोलमाल चालू होते.
तेवढ्यात त्यांची नूर ऑंटी तिथे आली, "बच्चों, क्या कर रहे हो? आज खेलना नही है क्या? नूर ऑंटीला पाहून मुले दचकली. त्यांच्या चेहऱ्यांवरचे रंगच ऊडाले होते. तिने परत पुढे जाऊन विचारले, "मुलांनो, काय झाले ? आज तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का आहात?" तिच्या प्रश्नाने सगळी मुले कावरीबावरी झाली आणि पळतच येऊन नूर ऑंटीला मिठी मारली.
खूप वेळा विचारल्यानंतर सोनू म्हणाली, "आज आम्ही आमच्या मम्मी-पप्पांना खोटे सांगितले. आज क्लास टेस्ट होती. आम्हाला झिरो मिळाले, म्हणून आम्ही घरी खोटे सांगितले, की आजची क्लास टेस्ट कॅन्सल झाली म्हणून, परंतु आमच्या वर्गशिक्षिकाने पालकांकडून पत्र लिहून आणण्यास सांगितले. यामुळे आम्ही खूप टेन्शन मध्ये आहोत. खोटे बोलून आम्हीच फसलो.
तेवढ्यात हर्ष म्हणाला, "मला तर घरी जाण्याची देखील भीती वाटत आहे, काय करावे कळत नाही!" या सर्वांचे बोलणे ऐकून घेतल्यावर, तिने सर्वांना झाडाखाली बसण्यास सांगितले आणि स्वतः मात्र इकडे तिकडे फेऱ्या मारत काहीतरी विचार करू लागली.
"अच्छा ठीक आहे, म्हणजे तुमची समस्या ही आहे तर, बरं ... मुलांनो मला हे सांगा, जर तुम्ही पत्र नाही नेले तर काय होईल ?" राजू ने सांगितले, "बाई आम्हाला वर्गात बसू देणार नाही आणि त्या घरी येऊन आमच्या पालकांना भेटणार आहेत."
"अरे बापरे! मग तर कठीणच आहे." ती देखील चिंतेत पडली. "मुलांनो तुम्ही सर्व चांगल्या घरातील मुले आहात. तुम्हाला सर्व सुखसोयी उपलब्ध आहे . पहिली गोष्ट, खोटे बोलणे तुमच्या संस्कारात बसत नाही. सत्य कितीही वेदनादायी असले तरीही खरे बोललेच पाहिजे. माझ्या मते तुम्ही न घाबरता तुमच्या मम्मी-पप्पांना सर्व काही खरे बोला. मला आशा आहे, तुम्हाला तुमचे पालक माफ करतील, कारण खरे बोलण्यात जी शक्ती आहे तेवढी कशातच नाही. खरे बोलण्याने तुम्ही तुमच्या पालकांचा विश्वास जिंकू शकता. खोटे बोलून तो गमावू नका. नेहमी खऱ्याची साथ द्यावी. धैर्य, धाडस, आत्मविश्वास आपोआप अंगात भिनतो."
असे म्हणत ती तिच्या घरी गेली. चौघांनी ठरवल्याप्रमाणे आई-वडिलांना सर्व काही खरे सांगितले. त्यांच्या पालकांनीदेखील खरे बोलल्यामुळे मोठ्या मनाने त्यांना क्षमा केले.
*संदेश :- नेहमी खरे बोलावे आयुष्यात कधीच संकटात सापडणार नाही.*
