आजचा विषय - मराठी असे आमुची मा
आजचा विषय - मराठी असे आमुची मा




लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
भाषा ही मुळात साहित्यनिर्मितीसाठी जन्माला आलेली नाही.भाषा हे समाजोपयोगी साधन आहे. फुलांचा उपयोग देवपूजेसाठी किंवा शृंगार यासाठी केला जातो, हस्तिदंतातून सुबक मूर्ती बनवल्या जातात, चंदनातून सुगंधी तेल काढले जाते. पण मुळात या वस्तू काही या कामासाठी जन्माला आलेल्या नाहीत. आपली गरज भागविण्याच्या आणि जिज्ञासा तृप्त करण्यासाठी माणसाने हे शोध लावलेले आहेत. एकमेकांशी व्यवहार किंवा विनिमय तसेच सुसंवाद सुरळीत चालावा म्हणून ही भाषा अस्तित्वात आलेली आहे. इंग्रजी माध्यमातून शिकलो आणि फाडफाड इंग्रजी बोलू लागलो पण पायाला काटा टोचला की तोंडातून "आई गं "असा उद्गार निघतो आणि समोर साप दिसला तर लगेच "बापरे" असाच शब्द बाहेर पडतो. मनातील भावना सहजपणे बाहेर पडतात त्या मायबोलीतच.
'भाषा लक्ष शिका परी सतत द्या लक्ष स्वभाषेकडे' ही आर्या केवळ घोळण्यासाठी नाही. आईला बाळाला डोळे मिटून घेण्याविषयी सांगावयाचे असते पण कवी या कल्पनेचे रुपांतर काव्यात मांडताना म्हणतो," पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे" किंवा "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही" पाळण्यात खेळणाऱ्या बाळाला मध्यरात्र उलटून गेली म्हणून आई गाण्यातून सूचित करते. माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच जास्त संत तुकाराम महाराज म्हणतात, 'सुख जवाएवढे दुःख पर्वताएवढे' परंतु कवी म्हणतात 'एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे'
खरे पाहता भारत हा कमळाच्या फुला प्रमाणे आहे. कमळाला अनेक पाकळ्या असतात. तसे भारतात अनेक भाषा जन्माला आल्या आहेत परंतु प्रत्येक जण आपल्या मायबोलीतून भाषेचा गोडवा गात असतो.आपणास ज्ञान वाढवायचे असेल तर आपले मातृभाषेतील साहित्य वाचावे असे शिक्षण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. आपल्याला समजलेल्या उमजलेल्या ज्ञानाचा आविष्कार मातृभाषेतून करणे सोयीचे होते ."वसुधैव कुटुम्बकम" सारी पृथ्वी हे माझेच कुटुंब आहे एवढी व्यापक दृष्टी भारतीयांना देणार्या संत ज्ञानेश्वरांनासुद्धा मायबोलीचा रसाळपणा भावला आहे म्हणूनच त्यांनी म्हटले आहे
" माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिके मेळविन ||
आपल्या ज्ञानाचा रसाळ झरा रसिकांपर्यंत पोहोचवायला ज्ञानेश्वरांनी ही मायबोलीची बूज राखली आणि भगवान श्रीकृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितलेली संस्कृत भाषेतील गीता त्यांनी ज्ञानेश्वरी रुपे मराठीत निरुपित केली. व्यवसायाने वाणी असलेल्या तुकाराम महाराजांनी साडेचार हजार अभंग मराठीत लिहून मराठीजनांना उपदेशामृत पाजले. इतकेच नव्हे तर 'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर' म्हणत निरक्षर बहिणाबाई चौधरींनी खान्देशी भाषेला प्रतिभासंपन्न बनवले. कितीतरी स्त्रीसंतांनी जात्यावरील ओव्या, गवळणी, विराण्या, अभंग, कीर्तन या सर्व रचनेतून आपल्या भाषेचे महत्त्व नि भाषेचा रसाळपणा वर्णिलेला आहे. महाराष्ट्रात अनेक संत नि पंत कवी होऊन गेले.समाजाच्या उद्धारासाठी ,अनिष्ट चालीरीतीना आळा घालण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचे शस्त्र करून प्रबोधन घडवून आणले.' ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भूललासी वरलिया रंगा || असे म्हणत संत चोखामेळा यांनी जातिभेदातील विषमतेस आव्हान दिले.परमेश्वराची आपण सारी लेकरे आहोत. 'दळिता कांडिता' संत जनाबाई विठ्ठलाला आळवते.
अवघ्या महाराष्ट्रावर गारूड करणारे नि मराठी साहित्यास भारूडासारखे साहित्यरत्न देणारे संत एकनाथ एका भारूडात म्हणतात
'का रे महारा मदमस्ता |
ब्राह्मणबुवा भलतंच काय बोलता |
तुझ्या बापाचे भय काय |
मायबाप तुमचा आमचा एकच हाय ||
संत गाडगेबाबा दिवसभर गावची घाण साफ करत नि रात्री दगडाचा काळ घेऊन कीर्तनातून डोक्यातील घाण साफ करत. सर्व साहित्यिकांनी जातिभेद, उच्च नीच, लहानथोर या भेदावर आपल्या शब्दांचे प्रहार केले आहेत. समाजातील अनिष्ट रूढी,
प्रथा, कल्पना यांच्यावर उपदेशात्मक कोरडे ओढले आहेत. मराठी भाषेचा गोडवा,त्यातले माधूर्य वाटण्याचे काम अनेक साहित्यिकांनी केले. महात्मा फुले,लोकहितवादी,विष्णुशास्त्रीचिपळूणकर,प्र.के.अत्रे,मोरोपंत,या.ग.गडकरी तसेच कितीतरी अधूनिक सारस्वतांनी आपल्या कल्पनेचे,रचनेचे बाळकडू मराठी वाचकांना पाजले आहे.मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राज्यभाषा नसे' कवी यशवंतांनी या ओळीमध्ये मराठी भाषेविषयी ची आपुलकी व्यक्त केली आहे.पंतकवी मोरोपंत निश्रीधरपंतांनीही मराठीला उच्च दर्जा मिळवून दिला आहे.तंतकवींनी डफावर थाप देऊन शाहिरी पोवाडे रचले.वीरांना लढाईसाठी प्रेरणा देण्याहेतू पोवाडे नि शृंगारिक मनोरंजनपर लावण्यांची रचना केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकाच्यावेळी 'राज्यव्यवहारकोश' मराठीतच बनवला. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजीला 'वाघिणीचे दूध' असे संबोधून मराठीतून निबंधमाला लिहिली. ग.दि.माडगुळकर, साने गुरूजी तसेच तांबे, केशवसूत, माधव ज्युलियन, ठोंबरे या साहित्याकांनी ही साहित्यदिंडी पुढच्या पिढीपर्यंत पोहचवली आहे.
आपल्या व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी आपल्याला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेतूनच घ्यायला हवे. म्हणूनच इंग्लंड शिकायला असणाऱ्या सावरकरांना देखील मराठीचा मोह आवरला नाही आणि त्यांनी 'ने मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' असे सागराला उद्देशून म्हणत काव्य बनवले आहे.