आजचा विषय माझे बालपण
आजचा विषय माझे बालपण


बालपण म्हणजे सुखाचा काळ आणि बालपणातील सुख, आनंद काही वेगळाच असतो तिथे भूतकाळाची फिकीर नसते, भविष्याची चिंता करण्याचे काहीच कारण नसते, कसल्याही जबाबदाऱ्या नसतात, उद्याची काळजी नसते. आपण प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने पाहतो. काहीही करावे, हसावे, रुसावे, रडावे, हट्ट करावा, खोड्या काढाव्यात, छोटी छोटी कामे करून मोठी बक्षिसे मिळवावीत.बालपण म्हणजे अवखळपणे वाहणारा निर्मळ झरा. जीवनातील या वसंत ऋतूचे आकर्षण प्रत्येकालाच असते, कारण बाल्यावस्थेत निराशा, अपमान यांचे सावट नसते. बालपण म्हणजे निरागस, निष्पाप या गुणांचा मिलाफ. हसतमुख लहान मुलांचे मन म्हणजे कोरी पाटी. म्हणूनच संत तुकाराम देखील म्हणतात ,
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
लहानपणी कुठलेही कामाच्या कटकटी नसतात. पोटाची चिंता नसते. प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने नि जिज्ञासू वृत्तीने पहात आपण बालपणातून तारूण्यात पदार्पण करतो.
माझेही बालपण खुप सुखात गेले.गडगंज श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन सुखी असणारे माझे कुटुंबीय सर्व बाबतीत आदर्श होते.आम्हा भावंडांवर त्यांनी खुप चांगले संस्कार केले.ज्ञानाची शिदोरी नि सदाचरणाच्या पायघड्यांवरून आम्ही सारी भावंडे आज लग्न होऊन आपापल्या घरात सुखात राहतो आहोत.आज आईबाबांच्या संस्कारांचे बीज आपल्या मुलांच्यात पेरल्याने या नव्या युगातही आमची मुले व्यसन किंवा वाईट सवयींना बळी पडली नाहीत.
माझे बालपण गावी गेले असल्याने नैसर्गिक आहार विहाराची चंगळ होती.भाज्या,फळे,दूध घरच्या घरीच मिळत असे.माझी आई स्वयंपाकात सुगरण असल्याने दुधाचे विविध प्रकार नेहमीच घरी बनत.शेतातील ताजे अन्नधान्य खाल्यामुळे आजही प्रकृती तंदुरूस्त आहे.माझे बाबा शाळेत शिकवायला असल्याने वाचनाचे बाळकडू त्यांनीच पाजले.बालपणीच वाचनाची गोडी लागायला बाबांचेच प्रोत्साहन असे.बाबांचा गणितात हातखंडा होता त्यामुळे गणित विषय एकदम पक्का झाला.
आईने आम्हां बहिणींना स्वयंपाकात तरबेज केले तर बाबांनी जगातील व्यवहारज्ञानाचे धडे दिले.माणूसकी हाच धर्म मानुन गोरगरीब,दीनदुबळ्यांना साह्य करण्याची प्रेरणा दिली.माझी आई अतिथ्यशील होती.त्यामुळे घरात येणारा अतिथी भोजन करूनच जाई.माझे सुखकारक बालपण नि माझ्या जीवनातील क्षण सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावेत असेच आहेत.असे बालपण मला दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभारच मानते.