आजचा विषय - गड किल्ले
आजचा विषय - गड किल्ले
स्टोरी मिरर आयोजित नॉन स्टॉप नोव्हेंबर स्पर्धा
महाराष्ट्रातील किल्ल्यांचे खूप महत्त्व आहे. एकट्या महाराष्ट्रात राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड ,प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग ,विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरूळगड असे कितीतरी शिवरायांनी मिळवलेली राष्ट्रीय संपत्ती आहे.गड मिळविण्यापायी शिवरायांनी आपल्या कितीतरी स्वामीनिष्ठ मावळ्यांना गमावले आहे. मुघल, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज नि औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूपासून हिंदवी स्वराज्याला वाचवण्यासाठी गडकिल्ले महत्त्वाचे ठरले.गडकिल्ल्यावर लपण्यासाठी जागा असत.शत्रूचा मागमूस काढत टेहळणी करता येत असे. उंचावरच्या किल्ल्यावरून शत्रूवर तोफांचा मारा करणे सहज सोपे होते. कारण बलाढ्य फौजफाट्यापुढे पाठवा मुठभर मावळे टिकण्यासाठी गनिमी कावा जरुरी होता.
शिवरायांनी हे सारे ओळखून किल्ल्यांना भक्कम तटबंदी करून घेतली होती. किल्ल्यावर अन्नसाठा, जलपुरवठा भरपूर असल्याने सारे लोक किल्ल्यावर राहू शकत असत. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ले फारच उपयोगी पडत. महाराष्ट्रातील हरेक किल्ल्याला आपला एक असा इतिहास आहे. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे हे गड-किल्ले महाराष्ट्राची शान आहेत. शिवरायांच्या काळातील बांधकाम तज्ञाच्या कलाकुसरीचे सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, मुरुड, जंजिरा सारखे सागरी किल्ले अरबी समुद्रात आहेत. मनाला प्रश्न पडू शकतो की कसे बनवले असतील हे किल्ले? आणि त्यांची विशेषता ही की समुद्राच्यामध्ये असणाऱ्या या किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. शिवाय घनदाट जंगलात असलेले किल्ले लढाई- साठी उपयुक्त असायचे. गडावर अनेक देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. काही किल्ल्यांमध्ये चोरवाटाही आहेत. त्यात लपून बसून शत्रूवर हल्ला चढवण्याचीही सोय दिसते.भिंतीत खिंडार पाडून लपण्याची जागा आहे. काही ठिकाणी त्यांच्या बाजूला भुयार दिसते राजे, महाराण्या किंवा राजपुत्रांच्या सुरक्षतेसाठी त्यामुळे या मार्गातून दुसऱ्या किल्ल्यावर पोहोचण्याच्या सोयी आहेत.
काही किल्ल्यांचे दरवाजे इतके मजबूत असतात की ती उघडायला हत्तींची मदत लागे. किल्ले इतिहासाची नि मराठी पराक्रमाची साक्ष देतात. परंतु गिर्यारोहक नि पर्यटकांनाही ती एक मेजवानीच असते. शिवरायांच्या हरेक किल्ल्याचा आपला एक इतिहास आहे. त्याचे कथानक आहे तो किल्ला मिळविण्यासाठी शिवरायांचे इमानी मावळे कसे त्वेषाने लढले यांचे स्मरण आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्यावेळी जिजाबाई शिवनेरी गडावर होत्या.त्या गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचे नाव पडले. तसेच कोंढाणा किल्ला लढताना शूर तानाजीने आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यामुळे शिवरायांच्या 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार हरेक मराठी मनात अजूनही गुंजत असतात. तानाजी सिंहासारखा लढला त्यामुळे कोंढाण्याचे नाव "सिंहगड "झाले.
जिजाबाईंना प्रतापगड विशेष आवडायचा कारण शिवरायांनी बलाढ्य अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. त्यांच्या गौरव गाथा अजूनही आपणास स्मरते .पुरंदरावर शिवरायांच्या छाव्याचा म्हणजेच संभाजीराजांचा जन्म झाला. किल्ला लढताना धारातीर्थी पडलेल्या मुरारबाजीसारख्या इमानदार मावळ्याला मूठमाती देताना शिवरायांना शोक आवरला नाही. म्हणूनच त्यांनी जयसिंगराव सोबत तह केला नि उद्गारले, "गड-किल्ले तर सर कधीही करता येतील पण माझ्या जीवाला जीव देणारे मावळे मला पुन्हा मिळवता येणार नाहीत "आपल्या सैन्याबद्दल शिवरायांचे मावळ्यांबद्दलचे प्रेम पुरंदरच्या गडावरील लढ्यावरून प्रतीत होते. पन्हाळ्यात अडकल्यानंतर सिद्दी जोहरची नजर चुकून विशाळगडाकडे पलायन करताना शिवरायांसारख्या दिसणारा शिवा काशिद शिवाजी बनून मागे राहिला. नि गनिमाच्या हातून मारला गेला. मावळ्यांच्या मराठी माणसाच्या हरेक मराठी हृदयाला घरे पडतात. मी गनिमाचा ठाव घेण्यासाठी हाताच्या मूठी आपोआपच वळतात. दौलताबादचा देवगिरी किल्ला संपूर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक प्रसिद्ध दिल्लीचा कुतुब मिनारची आठवण करून देणारा आहे. संत एकनाथ यांचे गुरू जनार्दनस्वामी यांची समाधी याच गडावर आहे. हा किल्ला इतका भक्कम होता की तो कोणाला जिंकता आला नाही. पुण्याजवळील लोहगड लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.दाट झाडीमुळे तिथे थंडावा आणि सावली मिळते. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सज्जनगड आपणास भेट देण्यास मोहित करतो. श्रीरामाची मंदिरे मठ आणि तिथल्या थंड वातावरणामुळे सज्जनगड आजही आपली शान आहे.
महाराष्ट्रात एकूण ३५० किल्ले आहेत. ती आपल्या मराठी असण्याची परंपरा सांगतात. त्याकाळची स्थापत्य किंवा वैभव यांचीतुलना कधीच होऊ शकत नाही. आज या किल्ल्याचे पावित्र्य आणि स्थापत्य टिकवणे मराठी म्हणून आपले कर्तव्य आहे. त्याच्यावर नाव कोरणे किंवा किल्ल्यांची तोडफोड करणे आपणास अशोभनीय आहे. पर्यटनासाठी गेल्यानंतर खाऊन टाकलेला कचरा किंवा वस्तू ,पाण्याच्या बाटल्या ही समाजाच्या कोत्या मनाची लक्षणे आहेत. उलट किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यांच्या आजूबाजूची निसर्गसंपत्ती ,वनराई टिकून राहावी हा प्रयत्न व्हायला हवा. नेते किंवा संस्थांनी फुलबागा लावून त्या जागेचे पावित्र्य राखावे. शिवरायांनीनी बनवलेल्या, मिळवलेल्या किल्ल्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र जय शिवाजी
जय मराठी जय संभाजी