Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

आजचा विषय -अंधश्रद्धा

आजचा विषय -अंधश्रद्धा

2 mins
1.0K


आजचे युग हे विज्ञान युग आहे. विज्ञानात अंधश्रद्धांना कधीच वाव नसतो, तरीही आपण त्यांना सत्य मानतो. भूत भानामती यावर विश्वास ठेवतो. चांगल्या कामासाठी बाहेर पडताना कोणी आडवे जाऊ नये म्हणून काळजी घेतो. या घटना अंधश्रद्धेच्या दृष्टीने शाप आहेत. कावळ्याचे ओरडणे घुबडाचे दर्शन कुत्र्याचे रडणे मांजर आडवे जाणे आपण अशुभ मानतो. शुभ कार्यासाठी जाताना काळे कपडे वापरणे बाहेर जाताना कुठे चालला म्हणून हटकणे आपण अनुचित समजतो परंतु काही देशात शुभकार्याला निघताना मुद्दाम घुबडाचे तोंड पाहतात. आपणही भारद्वाज किंवा मुंगसाचे तोंड पाहिले की कार्यात यश मिळणार असे समजतो. रात्रीच्या वेळी कुत्रा रडला तर वाईट काहीतरी घडेल म्हणून घाबरतो आणि आपल्या प्रगतीचे द्वार बंद करतो.

    विज्ञान युगातही मनुष्याने एवढे मागासलेपणा ने रहावे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. निरक्षरच नव्हें तर सुशिक्षित उच्चविद्याविभूषित लोकही अंधश्रद्धा व त्या फैलावणाऱ्या त्यांच्या कारस्थानांना बळी पडतात आणि साधू बुवा ज्योतिषी यांचे उंबरठे झिजवतात. काही लोक मूल होत नाही नवरा-बायकोचे पटत नाही नोकरी लागत नाही किंवा परीक्षेत अपयश येते म्हणून मांत्रिकाकडे जातात. तेही नरबळी पशुबळी असे अघोरी उपाय सांगून लोकांना लुटतात आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर सोडून ज्योतिषी आपले भविष्य काय बदलणार?

    एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर डॉक्टर कडे इलाज करणे किंवा मुल दत्तक घेणे हा चांगला उपाय असताना लोक देव देवर्षी यांची दुकाने ठोठावतात. जर देव देवर्षी यांच्यामुळे मुलं होत असती तर डॉक्टर हा पेशाच झाला नसता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रबोधन करत असतात. अंधश्रद्धेमुळे भाविक नागपंचमीला नागाला दूध पाजतात वास्तविक नागाचे अन्न दूध हे नसून किडे उंदीर हे असते. त्यामुळे दूध पिल्यानंतर नाग मृत्यू पावतात. कितीतरी ठिकाणी नागाचे वारूळ पाहून लोक समजतात की त्याठिकाणी धनसंचय आहे आणि नाग त्याचे रक्षण करत आहे. त्या गैरसमजामुळे नागांची हत्या केली जाते. जे पिकांचा नाश करणाऱ्या उंदरांना खात असतात.

    याची पुढची पायरी म्हणजे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे तिथे राहायला जाण्याची ची तयारी चालू आहे तरीही आपण चंद्रग्रहण सूर्यग्रहण पाळतो आणि दानधर्म सुरू करतो. काही चित्रपट निर्माते शुभ मुहूर्त पाहूनच चित्रपटाचे नाव ठरवतात. काही लोक लकी ड्रेस लकी पेन अशा संकल्पना घेऊन जगतात त्यामुळे बाराव्या शतकातील मानव आणि विज्ञान युगातील मानव सारखेच वाटतात. संशोधकांनी निरनिराळे शोध लावले इंटरनेट मोबाईल लॅपटॉप यांच्या शोधामुळे शेकडो कोर्स दूर असणारी ठिकाणे हाताच्या अंतरावर आली आहेत तरीही ही मनुष्याची वृत्ती संकुचितच राहिली. मग काय उपयोग या ज्ञानाचा आणि संशोधनाचा! अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. तिचे समूळ उच्चाटन करणे आपले कर्तव्य आहे यासाठी गरज आहे साक्षरता प्रसाराची आणि ज्ञानप्राप्तीची समाजात घडणाऱ्या घटनांचा सखोल आढावा घेऊन अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात म्हणून सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.


Rate this content
Log in