Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

आजचा विषय- आईच्या छायेत

आजचा विषय- आईच्या छायेत

3 mins
1.0K


 माझ्या आईच्या छायेत 

नसे कशाचीही भ्रांत 

राही जीव माझा सुखी 

या पदराखाली निवांत


'फुलामध्ये फूल | फुल हूंगावे जाईचे|

सुख भोगावे आईचे |बालपणी ||

माऊली माऊली | कल्पवृक्षाची सावली |

तान्हे बाळालागे दिली |देवाजीने ||


 साने गुरुजींच्या ओव्यांतून आईची महती व्यक्त होते. आईची पूजा म्हणजे वात्सल्यतेने उभ्या असणाऱ्या परमेश्वराची पूजा. माऊली म्हणजे निस्सीम सेवेची मूर्ती. माता म्हणजे मनुष्य जीवनातील गंगाजल, अमृत. मातृत्वाचे पान (पिणे) करून घेण्याचे वरदानच आपणास प्राप्त होते. आईच्या प्रेमापचढे इंद्राचे हे नंदनवनच ओसाड वाळवंट वाटावे. स्वर्गाचा बडेजावही त्याज्य वाटावा. 'मातृदेवो भव' म्हणून ऋषीमुनींनी आईचा केवढा सन्मान केला आहे.'आई हेच दैवत' न मातुपर दैवतम, म्हणून सानेगुरुजी म्हणतात 'माता माझी गुरु माता माझा कल्पतरू' बाळाचे हट्टही न कंटाळता, न चिडता आईच पुरवू शकते. म्हणूनच लेखक टेलर म्हणतात, "मी पडताच मला उचलायला धावून येते आणि मला गोड गोष्टी सांगत जी जमिनीवरची माती उचलून'ईडापीडा टळो" म्हणून फुंकर घालून फेकून देते ,ती माझी आई".आई ही वात्सल्य, प्रेम, ममता, सद्गुण शुचिता या गुणविशेषांचे निधान आहे.

   आई मुलाला बोलायला, चालायला शिकवते म्हणून आईला मुलांची पहिली गुरु म्हणतात. समुद्रात अनेक रत्ने असली तरी मोत्याचे रक्षण शिंपल्यामुळे होते. आई हे बालकाचे पहिले जग. या जगात कोणताही अपराध घडला तरी न्यायाधीश प्रेमळ असल्यामुळे शिक्षेचे स्वरूप ही बक्षिसा- प्रमाणे असते. जगात आई आहे म्हणून हे सुंदर जग पहायला मिळते. मातेच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही म्हणूनच कवी म्हणतात," मातेच्या मायेची तुलना कशाची, आई पुढे किंमत शून्य जगाची" आईच्या मायेमुळे सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे क:पदार्थ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूरांना घडवायला हेच कारण आहे. मातेचा दीर्घ सहवास लाभणे हे सुकृताचे फळ म्हटले आहे ."प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी" आईशिवाय स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यातील सारी संपत्ती ही निरर्थक आहे. म्हणूनच कवी यशवंत म्हणतात, "स्वामी तिन्ही जगाचा आईविना विना भिकारी".

    आपल्यावर आईचे अनंत उपकार असतात. ते सात जन्म घेऊनही फिटणार नाहीत. तुझे उपकार आई ध्यानात येई तुझे या जन्मीही फिटणार नाही "शुभंकरोती शिकवी मजला मना लावी लळा" हीच मागणी तुझं श्रीकृष्णा,रक्षावे मज आईला". सानेगुरुजी म्हणतात, 

"आईचा बोल म्हणजे वाऱ्यांचा झोल

आईच्या हातचा घास म्हणजे अमृताची आस"| म्हणूनच जगज्जेत्या सिकंदराला भारतातून परतताना प्रथम दर्शन हवे होते त्याच्या आईचे. प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्रांनी स्वर्गापेक्षा माता श्रेष्ठ वाटते. उगाचच नाही म्हणत" आईसारखे दैवत साऱ्या जगा मध्ये नाही ". आईचा महिमा सांगताना कवी म्हणतात, "आई ही आई असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते".फळ तयार होताना ते झाडानं आपला जीवनरस ओतल्यानं.मनूष्यरूपी झाडांत जीवनरूपी मंदिराला आईरूपी भक्कम पाया असेल तर यशोशिखराचे काय महत्त्व!

   'हसता मजला पाहून हसते

   मुके मटामट कितीतरी घेते'

   परि अंतरी जी तृप्त न होते

 ती माझी आई. माझी आई ती उत्तम गृहिणी असून स्वयंपाकात, विणकाम, भरतकामात कुशाग्र आणि बोलताना तोंडात साखर घोळवल्याप्रमाणे मधाळ नि रसाळ वक्तृत्व.रस्त्यात ठेच लागली की  "आई गं " म्हटल्यानेच कळ कमी होते.आपल्या मुलाने शिकून कुणीतरी मोठे बनावे नि सदाचारी वागावे म्हणून आपल्या डोळ्यांच्या पणत्या करून मुलांना सांभाळते. अशी या आईची थोरवी "आकाशाचा कागद, समुद्राची शाई नि हिमालयाची लेखणी करून लिहिली तरी संपणार नाही" म्हणूनच म्हणतात,"आई ही दोन अक्षरे हृदयात जपून ठेवा"

 सोन्याच्या झळाळीसाठी आधी बसावे लागतात चटके, मूर्तीच्या सौंदर्यासाठी आधी खाव्या लागतात बंदुकीच्या गोळ्या,स्वप्नांच्या पूर्तिसाठी आधी पहावं लागतं मरण. आईच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची प्रचिती येण्यासाठी आधी पडावं लागतं विरजण".

    आपल्या मुलाच्या सुखासाठी स्वतःचे काळीजसुद्धा काढून देणारी आईच असते. "संसाराचे सार काय तर ममताळू माय "आईची महती सांगताना सानेगुरुजी म्हणतात "आई या अक्षरात माधुर्याचा सागर आहे ,पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता चंद्राची शीतलता नि रमणीयता, आकाशाची विशालता सूर्याची तेजस्विता, सागराची अमितता हे सारे गुण एकट्या आईत एकवटले आहेत. आईच्या गुणांचे वर्णन किती गाऊ तितके कमीच म्हणूनच म्हटले आहे परमेश्वराला अवतार घेऊन एका घरातच राहावे लागले असते पण कुणाच्या घरात राहायचे हा विचार न झाल्याने त्याने आई निर्माण केली व घराघरात पाठवली. आई हे परमेश्वराचेच रूप आहे. आणि भावाची भुकेली असते आपल्या लेकराच्या कल्याणासाठी ती वाटेल तितके कष्ट सोसते. आपल्या बहारदार लेखणीने आईचे वर्णन करताना कवयित्री इंदिरा संत म्हणतात," आई असते जन्माची 

शिदोरी,जी सरतही नाही आणि उरतही नाही. 

 ज्याप्रमाणे मुरांबा जास्त दिवस मुरला की त्याची गोडी अविट लागते त्याप्रमाणे आईचे प्रेम मुलांसाठी मुरांब्याप्रमाणे असते.Rate this content
Log in