ये ना गं ताई
ये ना गं ताई


नाही नाही असं अचानक मी काही मरणार नाही
तुझ्याविना सरणावरी पेटून मी काही सरणार नाही
नातं भाऊ-बहिणीचे, असतं ते कधी आंबट कधी गोड
हिरवी पालवी, फुटतात फांद्या, उमललतात कळ्या
पण राहते झाडाचे मजबुत खोड
दाटून आले ढग आणि घोंघावत सोसाट्याचा वारा
विजांचा गडगडाट आणि चालू मग पावसाच्या धारा
जमलेला चिखल सारीकडे, त्यात खेळणारी लहानगी पोरं
शोधतो मी त्यात हरवलेलं माझ्या डायरीचे एक पान कोरं
पाहतो त्या पोरांमधी तुझ्यासारखी दिसते का कुणी
येतो का रे तू खेळायला बोलावत पटकन हसते का कुणी
कसं म्हणून सांगू की तुझ्याविना गोडी या साखरेला नाही
जसे झुणक्याविना आता काही किंमत त्या भाकरीला नाही
माहित आहे मला तुझ्यासारखे या
जगात मला दुसरे कुणी मिळणार नाही
रक्षाबंधनाच्या तुझ्या हातच्या लाडवांची
चव अमृतालाही कधी ती कळणार नाही
फक्तच एकदातरी मला भेटायला ये ना गं ताई
शप्पथ सांगतो मी तुला काहीच मागणार नाही
येणार तू म्हणून रस्त्याकडे पाहत असतो गं मी ताई
जेव्हा वासराले भेटायले गोठ्यामध्ये परततात त्या गाई
डोळ्यामधून येते आसू पण चेहऱ्यावरी फुलते हसू
म्हटलं स्वत:ला तू येशीलच इतक्यात म्हणून
वाट पाहत स्टेशनवर अजून थोडावेळ बसू