व्यथा बळीराजाची
व्यथा बळीराजाची
तुमच्या गर्दीतल्या झगमगत्या शहरात
आलो आज अनवाणी पायांनी
रक्तबंबाळ झालेल्या हृदयाची
घेऊन केविलवाणी हक्काची कहाणी
रखरखत्या उन्हात जेव्हा
राबतोय दिवसरात्र शेतकरी
तेव्हाच तुम्हाला मिळते
दोन वेळची गोड भाकरी
कर्जाचाही डोंगर चढलाय मस्तकी
तुमचा मात्र थाट आहे श्रीमंतीमधी
विचारा हाल आमचे काय आहे
या जरा सोबत आमच्या शेतामधी
तुमच्याच धोरणाने घेतले
आजवर हजारो बळी
आश्वासनाचा पाऊस तुमचा
वाढताय रिकामी पत्रावळी
लढा उठला क्रांतीचा
लढतोय शेतकरी राजा
हक्काच्या या लढाईसाठी
सांगा कोणती आहे सजा
तुम्ही लावा जोर कितीही
थांबणार नाही हे आंदोलन
गर्जून जाईल सारी दिल्ली
नारा आमचा जय जवान जय किसान
