विठ्ठल रुक्मिणी मम हृदयी
विठ्ठल रुक्मिणी मम हृदयी
माता पिता भागवत भक्त
वसता मम या हदयांतरी|
जावे का मी मग दर्शना
विठूरायाच्या त्या पंढरी?||१||
जरी नसे मातृ पितृ भक्त मी
विठ्ठल भक्त पुंडलिका परी|
नसे श्रावणबाळ कावडीत
अंध माता पिता ते खांद्यावरी||२||
मी सामान्य लेक जी ठेवी
स्मृती माता पित्यांची अंतरी|
करावी वाटेल कशी मग मज
आषाढी कार्तिकीची वारी?||३||
प्रेमळ अशा माता पित्याचे
असता आशिर्वच मम शिरी|
मग काय करावे नसते जाऊन
विठ्ठल रुक्मिणीच्या नगरी||४||
कस्तुरी नाभित असता वणवण
धुंडीत फिरतो का मृग कस्तुरी|
ह्दयातच विठ्ठल रुक्मिणी असता
जावे कां मी अन्य मंदिरी?||५||
