वेडी सखी
वेडी सखी
आहे एक सखी,
बडबडणारी, बोलकी,
मायाळू, प्रेमळ, मनानं हळवी,
साऱ्याशी भावनिक होऊन नाते जुळवी.
आहे थोडी रागीटही,
पण आहे शहाळ्यासारखी,
दिसते खूपच तापट,
पण तितकीच गोड फणसाच्या गऱ्यासारखी.
समंजसपणा आहे फार..
पण काय करणार...
अवखळपणा जातच नाही...
तिच्यातलं अल्लडपण कमीच होत नाही.
साऱ्या जबाबदाऱ्या नीट निभावते,
सगळं कसं छान सांभाळते,
पण काय करणार..
तिचा वेडेपणा जातच नाही.
वेडेपणा आहे .....
सगळ्याशी प्रेमाने राहण्यात,
जीवाला जीव लावण्यात,
लहानांसारखं लहान होण्यात,
सतत कुणाची काळजी करण्यात,
आपल्या माणसाच्या आठवणी जपण्यात,
हा वेडेपणा असेल तर आहेच ती वेडी,
तीच तर आहे तिच्या स्वभावाची गोडी,
निर्मळ, हसरी, अवखळ थोडी थोडी,
आहे ही सखी चांगुलपणा ची वेडी.
