वांझोटी आई
वांझोटी आई
1 min
535
तिच्या अनवाणी पायांना
आता चटके लागत नाही
तिचे मन मरता मरता
मेल्या तिच्या संवेदनाही
अणकुचीदार काट्यांची भीती
तिने केव्हाचीच टाकली
एकटीच सोसते खाचखळगे
यातच सारी ज़िंदगी सरली
तिला नव्या नाही काही
तप्त झळा त्या उन्हाळी
दाह सोसून सोसून गरिबीचा
तिची अख्खी ज़िंदगीच करपली
झाडी झुडपातून मार्ग काढते
अंग काट्यांला घासत जेंव्हा
काळ्या कातडीवर उमटून येई
अस्ताव्यस्त जीवनाची नक्षी तेव्हा
तिची स्वप्ने शुष्क झाली
डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंसारखी
मुलगा शिकून शहरात गेला
ती गावातच जगते वांझोट्या आईसारखी
