तू आहेस ना
तू आहेस ना
जीवन जणू एक यक्षप्रश्न
उत्तर शोधणे अवघड आहे
वाटते, ही वाट नेहमीचीच उष्ण
या वाटेवर चालण्यासाठी
तू आहेस ना
आहे तू जगण्याची प्रेरणा
दिशादर्शक तूच, आणि मार्गदर्शकही
एकही खासां तुजविण सरेना
माझा प्रत्येक क्षण जगण्यासाठी
तू आहेस ना
जेवढे मोठे गगन हे
तेवढाच तुझ्यावर भरोसा
सगळ्या आशा, अपेक्षा तुझ्यामुळेच
देतेस तू मजला हळुवार दिलासा
तो दिलासा जपण्यासाठी
तू आहेस ना
अवघा संसार माझा
तुझ्याविना वाटे शून्य
तूच केली पूर्तता माझी
तू नसल्यास, मी नगण्य
ही नगण्यता संपविण्यासाठी
तू आहेस ना
तुझ्यासवे राहतो मी
माझे हे अहोभाग्य
सहचारिणी तू नसतीस
तर जीवन होते वैराग्य
हे जीवनगाणे गाण्यासाठी
तू आहेस ना
माझे मी पण तूच जपले
केली सुखाची सार्थता
जग पाहिले तुझ्याच नयनांनी
केली तूच स्वप्नांची पूर्तता
माझे स्वप्न बनण्यासाठी
तू आहेस ना
थोरवी तुझी नेहमीच
माझ्या मनी स्मरतो
स्वतः संपताना वाटते
थोडं तुझ्यातच उरतो
कायमचे तुझ्यात उरण्यासाठी
तू आहेस ना
जिंदगीची नसते खात्री
जगण्याचीही नाही शाश्वती
आजचा दिस आपुला
कुणा ठाऊक, कधी मिळेल सद्गती
सगळे दिवस सुवर्णांकीत करण्यासाठी
तू आहेस ना
