तुला बाहूत बांधताना
तुला बाहूत बांधताना
तुला बाहूत बांधतांना
घट्ट होत जातात सारेच ऋतू !
तुझ्या मोकळ्या केसातला मारवा...
प्रणयधुंद लोचन कडांतून
ओघळणारा मल्हार...
तुझ्या प्रत्येक डहाळीवरचा वसंत,
पापण्यांच्या आड असलेला-
तुझा श्यामलडोह!
अवघे ऋतू ओंजळभरून उधळत जातात
त्यांचे लावण्य...!
तुझ्या ओठातली गझल,
तुझ्या डोळ्यातले सुनीत,
तुझ्या मोकळ्या केसांतून झिरपणारा रुबाया,
तुझ्या पैंजणांतून छुमछुमत येणारा हायकू,
तू आपादमस्तक प्राजक्ताचं देणं
माझ्या मनाच्या परडीत
जपून ठेवीन तुझे बकुळ शब्द!
तू म्हणतेस--"मी छान लिहितो"
तू उधळत जाते आणि तेच मी वेचत जातो
मी असं उचललेलं,तुझंच तर असतं उधळलेलं...!
लोक त्याला कविता वगैरे म्हणतात..!
