"ती"ची व्यथा
"ती"ची व्यथा
आईबापाला सोडून सासरी जायचं,
घरासाठी राबराब राबायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
आल्यागेल्याचं पाहुणचार करायचं,
कुणाला काही हवं नको ते बघायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
माहेर तिनं परकं समजायचं,
सासरला आपलंसं करायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
कुणाला काही दुखलं खुपलं पाहायचं,
सगळ्यांच्या हाकेला सदा हजर राहायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
पडेल ते काम करतच राहायचं,
सगळ्यांसाठी झुरतच राहायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
आला किती थकवा तरी करतच राहायचं,
किती नकोसं वाटलं तरी हसतच राहायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
कोणत्याही मुद्द्यावर मत नाही मांडायचं,
कुणी काही बोललं तरी मूग गिळून राहायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
झालीच चूक एखादी बोलणंही खायचं,
सगळ्यासमोर तिनंच अपमानित व्हायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
झाला भांडणतंटा लाथाबुक्क्या खायचं,
पोराबाळांसमोर देखील कमीपणा घ्यायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
सुधारला समाज तरीही मागासलेलं राहायचं,
नवरेशाहीच्या जुलमांना सतत सामोरं जायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं....
तिनं सगळ्यांची काळजी करायची,
तिची काळजी घेणारं कुणी नसतं,
किती दिवस तिनं फक्त आशेवर जगायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं...
तिलाही मन आहे कुणी समजून घ्यायचं,
तिनं तिच्या मर्जीने का नाही जगायचं,
का बरं सगळं तिनंच सहन करायचं...
