स्वामिनी
स्वामिनी
तू आकाशातली वीज, तू नदीतील पाणी
तू शांत सकाळ, तू तांबूस संध्याराणी
तुझिया पदरात सामावले आकाश ग राणी
दे सोडून सारी बंधने, तू तुझीच स्वामिनी ||
तू सावित्रीबाई फुले जिने साक्षर स्त्रीला केले
तू रमाबाई रानडे जिने स्त्री हक्क जाणिले
तू डॉ. आनंदी गोपाळ जी स्त्रीजीवा जाणी
दे सोडून सारी बंधने, तू तुझीच स्वामिनी ||
तू कल्पना चावला घातली आकाशा गवसणी
तू मेरी कॉम बॉक्सर विश्वविक्रमी
तू लता मंगेशकर गाशी मंजुळ गाणी
दे सोडून सारी बंधने, तू तुझीच स्वामिनी ||
जरी उडालीस आकाशी चित्त तुझे घरापाशी
कितीही मोठी झालीस तरी प्रथम तू गृहिणी
तू माता तू भगिनी तू राजाची राणी
दे सोडून सारी बंधने, तू तुझीच स्वामिनी ||
किती किती रूपे तुझी या जगती
मग का ग तुजवर अत्याचार होती ?
उठ घेऊन शस्त्र हे रणरागिणी
दे सोडून सारी बंधने, तू तुझीच स्वामिनी ||
नको सोसू तू छळ, नको मानूस हार
आठव रूप दुर्गेचे, करी दुष्टांचा संहार
तू दुर्गा, तू काली, तू माता राणी
दे सोडून सारी बंधने, तू तुझीच स्वामिनी ||