सुखाचा ठसा
सुखाचा ठसा
1 min
111
स्वतःपासूनही सूट मिळावी,
एकांत एक असा असावा
मनी न ध्वनी ना विचारवारे,
एक देखावा असा दिसावा
सत्याची साद भुलावणाऱ्या,
स्मृती साऱ्या विस्मृतीत जाव्या
मनाच्या सैरभैर कल्पना,
काही काळ निःशब्द निजाव्या
वास्तवाचेही अस्तित्व,
दूर नजरेच्या पल्याड जावे
अन् अकारण अंतःकरणात,
टिपटिप काही मोती रुजावे
हळवी हालचाल करून जावा,
एक थेंब चेहऱ्यावर झुरावा
अलगदपणे उदासीन मुखावर,
एक सुखाचा ठसा उरावा
