सोनसळी झाले रान
सोनसळी झाले रान
1 min
248
कृपा पावसाची झाली
आल्या सरीवर सरी
चिंब वसुंधरा झाली
जणू न्हाली गं नवरी ।।१।।
रानोमाळ हिरवाई
निसर्गानं दिल दान
झाड वेली बहरली
सोनसळी झाले रान ।।२।।
सप्तरंग उधळीतो
इंद्रधनू आकाशात
जणू लावली झालर
आभाळाच्या मंडपात ।।३।।
ऊन तांबूस कोवळे
पूर्व दिशा उजळली
चराचर सृष्टी सारी
उत्साहात जागी झाली ।।४।।
मान डोलावत उभे
राही गवताची फुले
येता वाऱ्याची झुळूक
कशी हळुवार डूले ।।५।।
दिसामाजी दिस जाती
पिके तरारून येती
पशु पक्षी आनंदानं
गाणे गायला लागती ।।६।।
पिके आली सोन्यावाणी
संतोषला बळीराजा
सोनसळी झाले रान
सुखी झाली सारी प्रजा।।७।।