संत-समागम
संत-समागम
तिरस्कार, द्वेष, मत्सर हे सारे मनातले आपल्या षड्रिपू
द्यावी त्यांना तिलांजली, नाहीतर मनःशांती लागेल हरपू
आनंद द्यावा-घ्यावा, जावे आपणही प्रेमाच्या गावा
का करावा द्वेष कुणाचा, का अहंकारास द्यावा ठावा
जाहली जर चूक कोणा हातून, दिला त्रास आपणास त्याने
द्वेषाचा मार्ग त्यजून, तया समजून घ्यावे प्रेमाने
माणूस जेव्हा जन्मा येतो, नसतो तो वाईट बुद्धीने
कधी-कधी परिस्थिती घडवते, कोणाला दुर्जन प्रवृत्तीने
अशा व्यक्तीस तिरस्कार करून, जर आपण लोटले खड्ड्यात
फायदा काय होईल आपला? लाभेल स्थान का स्वर्गात?
द्वेष करून कोणाचा आपण, सुधारेल का ती व्यक्ती जीवनी?
चांगुलपणाचा अंगीकार केला, तर होऊ आपण सत्कर्माचे धनी
द्वेष, मत्सर करून आपण जाळाव्या का आपुल्या सद्वृत्ती
सुधारणा का होईल त्यातून, ज्याची मुळातच वाईट प्रवृत्ती
दूर राहावे, सोडून द्यावे, अशा व्यक्तीचा विचारही टाळावा
संतांचे आचरण अंगीकारुनी, भगवद् भक्तीचा मार्ग अनुसरावा
