संगीतमय आठवण
संगीतमय आठवण
अजूनही आहे ध्यानात,
ती संगीतमय रात्र,
कंपनीच्या मेळाव्यात,
जमले सगळे एकत्र,
कार्यक्रम होता खूप रंगतदार,
मिळाला होता तुला पुरस्कार,
उत्कृष्ट गायक,उत्कृष्ट कवी,
सन्मान मिळाला, मिळाली पदवी.
वाचून तुझी काव्ये,
गायलीस छान गाणी,
भारावून गेलो सगळे,
तुझ्या या कलागुणांनी,
कसं सांगू भाऊराया,
ऊरात आनंदाचे भरते आले.
राहिलास जेव्हा स्टेजवर उभा,
सगळे वातावरण संगीतमय झाले.
नवती पुसटशी कल्पना,
हे संगीत असेल शेवटचे,
तुझे शब्द,तुझे गाणे,
दुरावले रे कायमचे,
तुझे ते शेवटचे काव्य,
तुझा तो शेवटचा आवाज,
अजूनही कानात घुमतो,
मनाला चटका लावून जातो.
गेलास सोडून एकाकी,
दूर दूर ढगांच्या टप्प्यात,
आईबाबा न बहिणी मात्र,
आठवणी जपतात मनाच्या कप्प्यात.
वाटते कधीतरी हळूच येशील,
ताई गं,
ऐकवू का काव्य असं मला म्हणशील,
ऐकवशील एखादे सुंदर गीत सुरेल आवाजात,
अन् एखादी आठवण पुन्हा संगीतमय करशील.
