समाजाची गती
समाजाची गती
समाज ? कुठे चालला आहे हा समाज ?
अंधारातून प्रकाशाकडे ? की शाश्वताकडून विनाशाकडे ?
कोण आहे वाली त्याचा , कोण आहे त्राता ?
गुण ज्याचे गावे असा , कोण आहे नेता ?
भ्रष्टाचाराच्या शेणात वाढताहेत , विचारविहीन बुळबुळीत किडे !
स्वच्छ , तेजस्वी , प्रकाशाचे , त्यांना आज वाटे वावडे !!
गुरंढोरं सुद्धा बाळगतात , विवेकशील बुद्धी !
पण माणसाची मात्र हरपली आहे आज , आत्म्याचीही शुद्धी !!
वाढते आहे गलिच्छ विचारांची वसती |
संस्कृतीची देवालये रोज ढासळताना दिसती ||
पालकच शिकवत आहेत मुलांना , भ्रष्टाचाराचे बोल बोबडे !
कुठे गेली ती जीजामाता , देत होती जी क्षात्रतेजाचे धडे ?
नको आहे कोणालाच आज , चारित्र्य तरुणांचे निधडे |
का चालला आहे हा समाज , शाश्वताकडून विनाशाकडे ?
शिक्षणाचा , आरोग्याचा , बाजार जगी का मांडला ?
मंदिरातून पावित्र्याचा मंगल गंध कोठे सांडला ?
जाणीवांचे स्पंदन हरवून , भावना बनतेय निर्जीव दगड !
शासनकर्ते नादान म्हणून , समाज करतोय पोकळ ओरड !
फुटणार कधी ह्या दांभिकांच्या पापाचे भरले घडे ?
कुठे चालला आहे हा समाज ? अशांतीकडे ? अधोगतीकडे ?
का ? का चालला आहे हा समाज , शाश्वताकडून विनाशाकडे ?
आणि कधी चालणार हा माझा समाज अज्ञातातून विज्ञानाकडे ?
कधी चालणार हा माझा समाज तिमिरातून प्रकाशोकडे ?
तिमिरातून प्रकाशाकडे ?
