सखे मला तू साद दे
सखे मला तू साद दे
मुक्या माझ्या प्रेमाला
आज पुन्हा संवाद दे
प्रेम पाठवलंय तुला
सखे मला तू साद दे ||0||
तूझ्या होकाराची
आस या जीवाला
तूझ्या सहवासाचा
ध्यास या जीवाला
हर्षोल्हासित होईल मन
मनी तो आल्हाद दे
प्रेम पाठवलंय तुला
सखे मला तू साद दे ||1||
भेट रोमँटिक स्मरते
आजही पहिली आपली
एक एक खूण भेटीची
क्षणोक्षणी मी जपली
बहर यावा प्रीतीला
असा नवा उन्माद दे
प्रेम पाठवलंय तुला
सखे मला तू साद दे ||2||
तुझंच पूजन हृदयी माझ्या
तूच माझे प्रारब्ध
तूच ईश्वराच्या जागी
तूझ्या वीना सारे स्तब्ध
कधीतरी प्रसन्न होऊन
प्रेमाचा प्रसाद दे
प्रेम पाठवलंय तुला
सखे मला तू साद दे ||3||
सप्तसुरांच्या गोडव्याची
महेफील जशी सजावी
हृदयाच्या गाभाऱ्यातून
प्रीत अशी उपजावी
प्रेमाच्या भाषेचा हृदयी
भिडणारा तू नाद दे
प्रेम पाठवलंय तुला
सखे मला तू साद दे ||4||
तुलाच बंद लोचनांनी
स्पष्ट मी पाहतो
गर्दीत असलो तरीही
एकटा मी राहतो
कधीतरी माझ्या रचनांना
थोडीशी तू दाद दे
प्रेम पाठवलंय तुला
सखे मला तू साद दे ||5||
