शिवबाचे गड
शिवबाचे गड
मानतो जन्मापासून
आमुच्या महाराजांना
लागली नजर कोणाची
इथल्या गड किल्ल्यांना
थोर तो रायगड
बापुडा शिवनेरी
काळजाला हात घाली
हा प्रतापगड भारी
जंजिऱ्याची साद नि
सिधुदुर्गाचा रुबाब
राजगडावर जाताना
राखावा तो आब
पन्हाळा नि विशाळगड
गाती शिवबाचं गुणगान
मोडला पण नाही वाकला
सिंहगड तो शौर्यवान
पाहतो आता आम्ही
आजमितीला हे काय झाले
कुणास न काही पडलेले
गडांकडे दुर्लक्ष केले
एक एक गड शर्थीने
माझ्या शिवबाने मिळवला
कचरा करून आपण
त्याचा लौकिक हरवला
पाहून हे सारे
चीड येई अनेकांना
विरून जाई सारे हवेत
पुढाकार कोणी घेईना
माझ्या शिवबाचे मावळे
काय होता त्यांचा थाट
आज घालती माझ्या गडांवर
उपाहारगृहाचा घाट
चढताना एक एक पायरी
अंगावर काटा येई
भिंतीला केलेला स्पर्श
अनुभव शिवशाही
सर्वधर्मसमभाव अनुभवले
ह्या गडांनी
रयतेची साऱ्या सेवा पहिली
ह्या गडांनी
कर्तव्य आपुले आहे
जतन यांचे करणे
होता दुर्दशा गडांची
पाप न हे कुठे फेडणे
सगळे सोबत करू निश्चय
सारे गड किल्ले स्वच्छ करू
शिवाजी राजांची शिकवणूक आपल्याला
चांगुलपणाची कास धरू
नांदेल रामराज्य पुन्हा
चिंता करायची नाय
शिवबाला मुजरा करुनि
म्हणूया जय शिवराय
